Wednesday, June 15, 2016

ऐक नं...

आपण ना... मस्त कुठेतरी राहुयात का?
छानसं समुद्राच्या कडेवरचं एखादं क्लिफ हाउस घेऊन...
इथे Pacific ला चिकटून चालेलच...
किंवा मग आपला अरबी समुद्र आहेच... दोन छान केसाळ कुत्री, डझनभर मांजरी आणि आपण दोघं...
हं.. रिटायरमेंट प्लान वाट्तो खरा...

बरं मग ऐक नं..
आहे नाही तेवढं सेव्हिंग घेऊन छानपैकी आरव्हीतून भटकायचं का देशभर? जमल्यास जगभर?
फक्त पैसे नाही रे.. आठवणी, माणसं, एकुणेक छान छान गोष्ट घेऊयात सोबत...
mod podge, glue gun, कागद, रंगसामान सगळं सगळं...
कंटाळा आला, पैसे संपत आले कि काहीतरी छान बनवू, विकू .. नवीन ठिकाणची माणसं गोळा करू आणि पुढे जाऊ... चालेल?

ओके ओके .. हे ऐक.. हे कसं वाटतं आहे मग?
 कॅफे काढूयात एखादा आपला छोटुकला छान... टपरीच हवंतर ...
किंवा त्या तमाशामधल्या सोशल सारखं काहीतरी?
 fancy stuff ... टरमरिक लाटे वगैरे ...
शेकडो पुस्तकं... खुर्च्याऐवजी झोपाळे...
"यु कॅन बी शेफ" म्हणत सगळ्यांना किचन खुलं ठेवायचं... लोक जेवायला टेबल रिझर्व्ह करतात आपल्याकडे स्वयपाक करायला किचन रिझर्व्ह करतील.. awsome ना?

सागरू... ऐक कि..
चल आपण हिमालयात जाऊन राहू... मी एखाद्या  शाळेत शिकवेन... तू एमएस सीआयटीचे क्लासेस घे... तुझ्या आयटीचा तितकाच उपयोग जरा...
बर्फ पडायला लागला कि गुबगूबीत स्वेटर घालून सकाळी सकाळी निघू आपण दोघे... तुझं नाक लाल होईल थंडीने.. ते बघून मी हसेन... तू माझे सोलवटलेले ओठ कसे टोचतात त्याची तक्रार कर...
दुपारी डबा खाऊ रे एकत्रच... चिल लाईफ असेल तर ८-१० पुस्तकंही करूयात का ट्राय?
रस्किन बॉंड एकदम...

बरं बाबा.. लई होतंय बिल..
ऐकतोस का पण मग?
आत्ता जसा बसलायस छान , मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून देत,,,
आत्ता जसं सांभाळतो आहेस मला जमिनीवर माणसांमध्ये राहायला
आत्ता जसं ऐकतोयस छान, मेरी कल्पनाकी उडानोको...
तसं कायम अस ... कायम माझ्या जवळ बस... मला सांभाळ..
आणि माझं ऐक नं...

:)


Monday, August 31, 2015

कट्टी

"लहान असताना करंगळी दाखवून कट्टी घ्यायचो, कधी तर्जनी ओठांवर ठेवून शांत केलं जायचं , आता अंगठ्याने call कट करतो".. सारख्या काहीतरी दवणीय वाक्याने पोस्ट सुरु करायची असं मी ठरवलं आहे. आणि मी ते केलं आहे!  हुश्श.. ब्लॉगबद्दल ठरवलेलं एकतरी काहीतरी केलं मी... नाहीतर गेले किती दिवस "लिहायचं लिहायचं" ठरवत्ये आणि मग नाही लिहित. 

मला वाटतं vlog सुरु करावा कारण लिहित नसले तरी अखंड बोलत असतेच.. आणि हल्ली इतकं बोलते कि अधूनमधून अमोल मला "जरा शांत बस आता" सांगतो. vlog किंवा ऑडीओ ब्लॉग सुरु केला कि कसं माझं बोलणं आपोआपच कमी होईल. "बोलायचं बोलायचं" ठरवेन आणि मग बोलणारच नाही. whatever! 

Whatever पासून आमच्या (माझ्या) अबोल्याची सुरुवात होत असते खरं तर.. काहीतरी चिरीमिरी कारणावरून मी अमोलवर चिडते आणि मग तो चिडतो. मला हे अजिबात आवडत नाही , मला exclusively चिडायला आवडतं. तो चिडला कि मग माझ्या चिडण्याचं महत्त्वचं जातं ना राव.. He loves to steal a spotlight, I tell you! चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच कि आत्ता मी त्याच्याशी भांडून पोस्ट लिहायला बसल्ये. पण म्हंटल "का नाही?" त्यानिमित्ताने जरा इथली धूळ झाडली जात असेल तर "व्हाय नॉट ?" 

तर तो मला आत्ता थोड्यावेळापूर्वी म्हणाला "तेजू.. थोडावेळ एकदम गप्प बस आता". हां तो काम करत होता, मी त्याला डिस्टर्ब करत होते वगैरे वगैरे पण सरळ सरळ अपमान झालाय ना माझा.. म्हणून मी ठरवलं आहे कि मी काय आता आपणहून जाणार नाहीये त्याच्याशी बोलायला... इथेच बोलणारे बाबा मी ! काय काय आत्ता डोक्यात येतंय अमोलला सांगायचं ते..

१. श्रीखंड फ्रीझरमध्ये ठेवायचं नसतं. आईस्क्रीम नाहीये ते! आणि मी आत्ता खाल्लंय एक चमचा.. आणि तोच चमचा ठेवलाय परत श्रीखंडात घालून.. माझं आहे ते आता, तुला मिळेल ह्याची अपेक्षा न ठेवणं उत्तम! 

२. पावभाजी करत्ये.. तुला आवडतात म्हणून मटार घालणारे. (कमी घातलेत) तुला आवडत नाही म्हणून फ्लॉवर घालणार नाहीये (खूप घातलाय) . तू मला शांत बसवलंस तरी माझ्या प्रेमाला शांत बसवू शकत नाहीस, यु नो! (प्रेम..लोल)

३. लोकं बोलताना "लोल" का म्हणतात? शी असतं ना किती ते. सिरीअसली का? हसा न जोरात त्यापेक्षा.. लोल काय म्हणायचं? 

४. आजची गोळी घ्यायची राहिल्ये. मध्यंतरी वाचलं होतं कि रोज तासभर उन्हात घालवला तरी महिन्याभरात विटामिन डी भरून निघेल म्हणून.. जवळजवळ अर्ध्या भारतीय लोकांना विटामिन डीची कमतरता असते. माहित्ये? का ते माहित नाही, पण आहे. वाचलं होतं मी.. आता आठवत नाही. 

५. स्टार्टअप आयडिया: टेस्ट आणि परीक्षा , शाळा-कॉलेज संपल्यानंतर काही परीक्षा नसल्याने आपण वाचलेलं लक्षात ठेवायचे कष्ट घेत नाही. गुगलवर आपण किती काय काय रोज सर्च करून वाचत असतो पण त्यातलं अर्ध-अधिक शोर्टटर्म मेमरीतून परस्पर गायब होतं. तुमचा गुगलचा सर्च डेटा वापरून (प्रायव्ह्सी..लोल) काही दिवसांनी त्यावर प्रश्न टाकायचे. क्विझ " १५ ऑगस्टला तुम्ही तिरंगी बर्फी रेसिपी सर्च केली होतीत. त्यात खवा आणि साखरेचे प्रमाण काय होते?"  आणि मग त्याबदल्यात त्याच्या संदर्भातले कुपन्स वगैरे.. किंवा त्यासंदर्भातल्या पुस्तकांवर डिस्काऊंट.. म्हणजे जरा डीपमध्ये वाचाल. लिहायचा कंटाळा आलाय अजून, बोलायला लागल्यावर बोलूयात ह्यावर.. 

६. ए..ए.. मी आत्ता एका बटाट्याचं साल अखंड सोललं आहे. म्हणजे कळलं ना? टाकलं मी, नाहीतर दाखवलं असतं. न तुटता.. अखंड.. 

७. actually  का सोल्ल? मला कुकरला लावायचे होते बटाटे.. 

८. हेहे.. मगाशी किती स्टाईल मारत होतास रे कॉफी टेबलवर laptop ठेवून बसून काम करत होतास.. घेतलास नं परत मांडीवर? 

९. लोकं हल्ली laptop desk वर वापरतात.. मग त्या laptop चा desktop होतो का? सच आयडेंटीटी क्रायसिस ना.. तू लहान असताना डेस्कटॉप ला डेक्सटोप म्हणायचास? मी म्हणायचे.. 

१०. चप्पल वाजवू नकोस. तुला माहित्ये मला त्रास होतो त्या आवाजाचा.. अजिबात वाजवू नकोस ||||/ ||||/ ||

११. वाईट ह्याचं वाटतं आहे कि तू चप्पल वाजवतो आहेस हे तू माझं लक्ष वेधून घ्यायलाही करत नाहीयेस. मी मुद्दाम ६ शिट्टया करवल्या म्हंटल सांगशील मला, खूप होतायत म्हणून.. पण त्या स्क्रीनवरून लक्ष हटेल तर न.. attention seeking behaviour माझ्याकडून शिक जरा नंतर..

१२. तुला माहित्ये behaviour.. (English, Not American) मध्ये ५ ही अलंकार येतात. AEIOU 

१२ अ. अलंकार कि स्वर? 

१३. उद्या मटकी संपवूयात हं. फ्रीजमध्ये मागे गेलो होती. 

१४. आत्ता कांदा चिरत होते पावभाजीवर घालायला तेव्हा जाणवलं कि आत्ता भारतात पावभाजीवर कांदा कसली लक्झरी आहे नं.. आणि आपल्याला कसा खीच फरक नाहीये. मला नं थोडं गिल्टी वाटतं हा विचार करून.. तुला माहित्ये कांदा इश्श्यू वाचून मला कायम ठाणे स्टेशनवरची भेळ आठवते. दोन वर्षापूर्वी जेव्हा असाच महाग झाला होता कांदा तेव्हा भेय्यानी भेळेत कांद्याऐवजी कोबी घातला होता. कसं न? शेतकरी, दर, महागाई वगैरे गोष्टी त्रास न देता मला भेळेत कांद्यांऐवजी कोबी असणं त्रास देतं. मी किती सेल्फिश आहे ना.. 

१५. मस्त वास येतोय भाजीचा.. अल्मोस्ट डन.. भारी झाल्ये. तुला चव दाखवणार नाहीये पण.. डायरेक्ट वाढेन. 

१६. मी खरंच खूप बडबड करते का रे? कीबोर्डला पावभाजीचा वास येतोय. 

ओके भूक लागल्ये.. कट्टी कटाप.. पानं घे, मी पाव भाजते. 

घे न.. ओके.. थांब बोलतेच! 
Friday, April 24, 2015

कुठेस?

टी-२ वर होते. बोर्डिंग पास घेऊन शेवटचं एकदा दाराकडे पाहिलं. काचेमागून आई-बाबा आणि दीपिका हात हलवून बाय करत होते. मी पण हात हलवला आणि पटापट आतल्या दिशेने चालयला लागले.. शक्य तेवढं मागे वळून बघणं टाळत... "तेजुला काहीच वाटत नाही", "रडू कसं येत नाही ताई तुला" "घाबरणार नाहीस तशी तू एकटी यायला" ह्या माझ्याबद्दलच्या सगळ्या समजुती खोट्या ठरवत अश्रू मोकाट झाले होते.. आणि हात पाय थरथरत होते.
गेटपाशी आले तेव्हा मुलाकडे  चौथ्यांदा जाणाऱ्या एक मराठी काकू बसल्या होत्या. मी कावरीबावरी दिसले म्हणून कि त्यांना टाईमपास हवा म्हणून माहित नाही गप्पा मारत बसल्या मस्तपैकी...
"कुठे जात्येस आणि बे एरियात?".. "माझ्या घरी"

कितीतरी हजार फुटांवरून खाली बघत बसले होते... बर्फ, समुद्र आणि ढग...
"I think we are almost there... We must be somewhere on.. near.. North Pole" मी शेजारच्या मीनाक्षीला . "Isnt North pole Imaginary?" तिनी विचारलं. तिला काय सांगावं कळलं नाही. काल्पनिक आहेच कि पण खरोखर आहे ती जागा.. मी कुठे आहे आत्ता हे विचारल्यावर मी नॉर्थ पोलजवळ आहे हेच उत्तर देईन. काल्पनिक असलं तरी इथेच आहे ना मी...

तशी मी कायमच असते अश्या काल्पनिक आणि अस्तित्वाच्या सीमारेषेवर... आपण सगळेच rather Duel citizenship घेऊन बसलेलो असतो स्वप्न-आठवणींच्या देशाची आणि आज-आत्ता-इथे देशाची! कुठे आहेस विचारल्यावर उत्तर द्यायचं ते कोणतं?

"कुठेस?"
"इथेच"
"नो नो.. इथेच.. अमेरिकेत.. घरात... अशी उत्तरं नकोयत.. तू. तेजू, जास्वंदी.. तुझी तू  कुठेस?"


गेले काही दिवस माझाच माझ्याशी होणारा संवाद आहे हा! नक्की कुठे आहे मी? अक्षांश-रेखांशावर माझी जागा दाखवता येईल मला.. (म्हणजे माहित नाही... आडवे अक्षांश कि आडवे  रेखांश?) #fromwhereistand #hereiam #myhome हष्टाग टाकून  इन्स्टाग्रामही करू शकेन मी कुठे आहे त्या जागेचा फोटो! पण त्या फोटोपलीकडे मी कुठे आहे?

 मी खरंतर काहीच कधीच प्लान केलेलं नव्हतं कि त्या ग्राफवर माझी प्रोग्रेस बघावी... नाही म्हणायला बरीच स्वप्नं पाहिली होतीच कि.. त्या स्वप्नांचे मैलाचे दगड बनवून सांगू का मी कुठे आहे ते? पण तोही हिशोब नाही जमायचा कदाचित. गणित कायमच कच्चं होतं. 

Eat Pray Love वाचलं काही दिवसांपूर्वी. विशेष नाही आवडलं, पण फिल्म पाहायची आहे. (मला ज्युलिया रोबर्ट्स आवडते. अमोलला हिरड्या दाखवून हसणाऱ्या कोणत्याच बायका आवडत नाहीत. ) तर, त्यातला लक्षात राहिलेला भाग म्हणजे बालीमध्ये म्हणे "तू कसा आहेस?" असा पहिला प्रश्न  न विचारता "तू कुठे चालला आहेस?" असं विचारतात. आई-बाबा बाहेर जाताना मी "कुठे जाताय?" विचारल्यावर ते चिडायचे आता काम होणार नाही म्हणून! बालीमध्ये कोणाचीच कामं होत नसावी.. कदाचित म्हणून पुढचा प्रश्न असतो "तू कुठून आलायस?"

कुठून आलोय आणि कुठे चाललोय ह्या गोष्टी किती डिफाईन करत असतात ना आपल्याला... पण जर माहितच नसेल तर? किंवा ठरवलंच नसेल तर... Destiny नेईल ते Destination म्हणून सोडून दिलं तर? असं सोडून देणं सोप्पं असतं तर? मध्यंतरी एक लेख वाचला होता त्यात लिहिलं होतं तुमच्या आजूबाजूच्या माणसाचं भाग्य तुमची जागा ठरवत असतं. नदी समुद्राकडे वाहत जात नसते.. तिला इतक्या दिवसांनी भेटून कडकडून मिठी मारायला  समुद्र आलेला असतो किनाऱ्यावर!


कठीण आहे ना तसं सगळं... मला नाही कळत बऱ्याच गोष्टी... हा, पण मला नकाशे व्यवस्थित कळतात. बायकांना नकाशे कळत नाहीत हा stereotype नाकारून अगदी व्यवस्थित कळतात! पण आयुष्यात जनरलच खूप कमी 'पथदर्शक' वापरलेत. कोणी गुरु, गाईड असतं तर कदाचित हे असे प्रश्न पडले नसते. देव, परमशक्ती आणि त्यात विलीन आपलं अस्तित्व आणि आपल्यात विलीन परमशक्ती ह्याची पाय-डायग्राम काढून दाखवता आली असती बहुतेक... पण उगाच माज करून आपणच आपली नदी आणि आपणच आपले किनारे होऊन वाहत रहायचं रिसीव्ह करायला येणाऱ्या सागराच्या ओढीने! 

अमोल आला जेव्हा मला रिसीव्ह करायला.. त्याला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला जवळ घेत म्हणाला "इतक्यात घरची आठवण यायला लागली?" दोन्हीवेळा घराकडून घराकडे चालले होते... दोन्ही ठिकाणी घराची आठवण येतच होती... मनाने सदैव दुसऱ्या घरात आहेच की मी!


सध्यातरी "कुठेस" ह्या प्रश्नाला "इथेच" इतकंच उत्तर द्यावं म्हणत्ये... खरं खरं १००% उत्तर शोधायची 'पक्की चाहत.. कच्ची कोशिशे' चालू राहतीलच!

तोवर तू कुठेस?  


Tuesday, September 9, 2014

Praising the Bridge that carried us...

"तुझा सर्वात आवडता पूल कोणता?"  मी अमोलला विचारलं...
त्याने खूप जास्त विचार केला.. "पूल म्हणजे ब्रिज न ?" असं म्हणून पुन्हा विचार करायला लागला.
माझ्याकडे तेवढा patience नसतो... मीच मग म्हणाले "Golden Gate न? ok..."
मग परत त्याच्याकडे बघत बसले... आता माझाच नवरा आहे तरीही मी इथे नमूद करू इच्छिते कि Ray-Ban मध्ये तो छावा दिसतो!
तो गाडी चालवत होता, साधारण १ दीड मैल पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं कि मी शांत आहे.. आणि मग मी का शांत असेन ह्याचं कारणही त्याने ओळखलं..
"ओह.. मी तुला विचारू का?.. ओके सांग.. तुझा सर्वात आवडता पूल कोणता आहे?"

"एक असा नाही... ४-५ आहेत.. सांगू?"
साधारण आमच्या सगळ्या गप्पा थोड्याफार फरकाने  अश्याच सुरु होतात... नशिबाने त्याला ऐकायला आवडतं आणि मला बोलायला...

"आवडते सांगते, पण नावडता ब्रिज शाळेसमोरचा... एकदम लहानसा पत्र्याचा पूल होता फक्त लोकांना चालण्यासाठी , खाडीवर बांधलेली कॉलनी होती आमची. ब्रिजच्या दोन्ही बाजूला घनदाट Mangroves, खाली प्रचंड चिखल... लहान असताना मला कायम कधीही एखाद्या झाडामागून मगर किंवा डायनासोर येईल असं वाटायचं... मी कायम मनातल्या मनात प्रार्थना करत असायचे तो पूल ओलांडताना... कोणताही प्राणी नको येऊ दे इथे..
म्हणजे हे सेल्फिश आहे पण लहान असताना अनेक पूल ओलांडताना मी मनातल्या मनात म्हणत असायचे 'देवा प्लीज हा पूल पाडू नकोस... तुला पाडायचाच असेल अगदी , तर माझा ओलांडून झाल्यावर पाड'... पण हा ब्रिज कधीच पाडू नकोस अशी प्रार्थना करते मी "

आम्ही तोवर गोल्डन गेटवर पोचलो होतो. एस-एफ पासून आम्ही तसे तासाभारावर राहतो पण महिन्यातून कमीतकमी एकदातरी तिथे जायलाच हवं असा अलिखित (आता लिहिला गेलेला ) नियम आहे आमच्याकडे! आणि बे एरियात येणाऱ्या आमच्या मित्र/नातेवाईकांना गोल्डन गेटवर नेणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजत असल्याने अधूनमधून जाणं होतंच तिथे...
आतातर मी आपल्याकडे गाईड कसे facts and figuresचा भडिमार करतात कुठे गेल्यावर, तसंही करायला शिकल्ये. " ब्रिजला सतत रंग द्यायला लागतो, आणी ब्रिज इतका मोठा आहे कि एका टोकावरून रंग देत दुसऱ्या टोकाला पोचेपर्यंत परत पहिल्या टोकाला रंग द्यायची वेळ येते" अश्या अनेक खऱ्या खोट्या गोष्टी मी लोकांना सांगत राहते.

"अश्या खऱ्या खोट्या गोष्टी मला कोणी न कोणी चरवेलीच्या साकवाबद्दल सांगायचं... पावसात पर्ह्यात  पाणी भरून वाहायचं... तेव्हा फांद्यांपासून बनवलेल्या त्या कामचलाऊ पुलावरून जायला मला प्रचंड भीती वाटत असायची... पुलाच्या ह्या बाजूला आमचं घर आणि शेत, त्याबाजूला विठ्ठलाचं देऊळ आणि गराठवाडी... मला अनेक पुलांब्द्द्ल हे आवडतं... पुलांच्या दोन बाजूंना किती वेगळ्या दोन जागा असतात, वेगळी दोन जगं असतात  .. साकव लेल्यांच्या चार  ब्राह्मणी घरांना वीस एक गराटे  घरांशी जोडतो.. आमचा कॉलनीतला पूल ऑफिसर्सच्या घरांना कामगारांच्या घरांशी जोडत होता... गोल्डन गेट एस-एफच्या झगमगाटाला, जोषाला सौसलीटोच्या शांत आरामाला जोडतो... " मी अमोलला सांगतच होते... काही काहीवेळा अतिसामान्य बोलतानाही मी जाम फिलोसोफिक्ल काहीतरी बोलत्ये असा आव आणते. आवडतं मला तसं!

आम्ही तिथल्या एका फोनला क्रॉस झालो, मी कायम कोणी तिथे बोलत नाहीये न फोनवर ते बघते... गोल्डन गेट आत्महत्या वगैरे बाबतीतही फेमस आहे. पुलावर काही ठिकाणी suicide helplines म्हणून फोन आहेत... (अर्थातच, ते परावृत्त करतात, आत्महत्या करायला मदत नाही करत) ...
"असायला हवेत असे फोन आत्महत्या इच्छुकांच्या आवडत्या जागांवर... लोकलनी उल्हासनगरला जाताना अनेकदा मला ती बाईची गोष्ट आठवायची... माहित्ये न? कोणीतरी बाईनी लोकलमधून खाडीत उडी मारून जीव दिला होता म्हणे आणि आता कोणत्याश्या पौर्णिमेला वग्गैरे असते ती ट्रेनमध्ये.. अगदी नॉर्मल बाईसारखी असते असं काहीतरी... "

अमोलनी  माझ्याकडे न बघता मला विचारलं "तुला दिसली होती?"

"माहित नाही.. दिसली असेलही.. कळणार कसं?"

"हं... बरं.. मला एक आठवला .."
कधी कधी होतं हे, कदाचित मी जास्त बोर करायला लागल्यावर मग तो बोलायला लागतो किंवा काहीवेळा त्याला खरंच सांगायचं असतं म्हणून...
" नगरचा मिस्कीन मळ्याच्याइथला... पूल म्हणजे लहानसाच होता, पावसाळ्यात पाणी वाहायचं फक्त पुलाखालून... आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं तिथे बरं का.. (I know, he is very good at it) आम्ही सायकलनी जायचो तेव्हा, त्या पुलावरून न जाता मुद्दाम एका दुसऱ्या रस्त्याने जायचो... म्हणजे ओढ्यातून जायला मिळायचं पाण्यातून"
आता इथे clearly मी बोर करत होते म्हणून तो बोलला.. म्हणजे तो त्या पुलावरून जायचाही नाही आणि तरीही उगाच!

आमचा पूल एव्हाना ओलांडून झाला होता... "टोल नाक्यावरून... मला खारपाड्याचा पूल आठवला आणि त्याच्या दोन्ही बाजूंचा अडकून पडलेला ट्रफिक.. आता नवीन पूल झाल्यावर खूप चांगलं झालं आहे नाहीतर आधी अलिबागहून मुंबईला जाताना अर्धा-एक तास आरामात जायचा खारपाड्याला... वाशीच्या पुलावरही जायचा कधी कधी असा वेळ... पण तो पूल आवडतो मला... नवी मुंबईत राहायचे तेव्हा वाशीचा पूल ओलांडल्यावरच "आता घर आलं" अशी फिलिंग यायची.. मस्त वाटायचं "

मागे वळून मी गोल्डन गेटकडे बघत होते.." छान दिसतो न किती गोल्डन गेट... मी अजून बांद्रा-वरली सीलिंकवरून गेले नाहीये पण मला तो दिसायला आवडतो... बिक्स्बी आवडला होता मला... पुण्याला राजाराम आवडायचा कारण तिथपासून टमटम मिळायची कॉलेजपर्यंत... झेड ब्रिज वगैरे ठीकच.. आजी-अप्पांकडे जाताना खडताळ पूल लागायचा तो आवडायचा... आणि आणि... दोन मनांना जोडणारा, काहीतरी म्हणतात नं smile is the smallest bridge between two hearts.. असंच आहे न? " मी आठवत होते..

"दोन कडव्यान्मधल्या म्युझिकला ब्रिज म्हणतात न?" अमोलनी मला विचारलं... ह्याचा अर्थ "आता विषय बदल" असा होऊ शकतो!
"तुला पत्त्यांमधला ब्रिज येतो खेळता? तुझा पत्त्यांमधला सर्वात आवडता खेळ कोणता? "  त्याच्याकडे बघून हसत मी विषय बदलला...
पूल, पत्ते, फिलोसोफी, नोस्ताल्जीया विषय कोणताही असो... जोवर हे गप्पांचे पूल आम्हांला जोडून ठेवतायत तोवर मी बडबड करत राहणारे!

Monday, July 21, 2014

उडान...

मुंबईचा मुसळधार पाऊस... अर्ध्या तासापूर्वीच शिवडी स्टेशनवरच्या कधी काळी ९:३० ला बंद पडलेल्या घड्याळानी बरोबर वेळ दाखवली होती... रुळावर पाणी भरलेलं, फलाटावरच्या कोरड्या जागा लोकांनी पकडलेल्या आणि इंडिकेटरवर शून्य शून्य शून्य शून्य !

"८ टक्केच राहिल्ये बेटरी... ट्रेन माहित नाही कधी येईल... पहाट होईल बहुतेक घरी पोचायला.. हो... वडापाव... ठेव.. मी बंद करतोय हा फोन...हो हो.. डोंबलाची गुड नाईट... तिला बंद करायला सांग टीव्ही, गेल्या पावसाळ्यासारखा  उडाला न तर बघ.. ठेव.. "
राजानी मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवला... बाजूला त्याला चिकटून बसलेला माणूस त्याच्याकडे बघत होता..

"थोडं तिथे सरकता का?" राजानी विचारलं..

"पाणी थेंब थेंब गळतय..." तो म्हणाला आणि हसायला लागला.. "म्हणजे वरून.. भोकातून" आणि अजून जोरात हसला "कळलं ना?" डोळा मिचकावत म्हणाला...

राजा दुसरीकडे पाह्यला लागला.

"वैभव... माझं नाव... नाही आवडत का तुम्हाला जोक? राहिलं तर... मी म्हंटल एवीतेवी आपण इथे खेटून  बसणारच आहोत तर करू जरा मस्करी"

"हं"

"मगाशी मी तुम्हाला बोलताना ऐकलं फोनवर.. तुम्ही म्हणालात पहाट होईल म्हणून... कुठेशी जायचं आहे तुम्हाला?"

"कोपर खैरणे"

वैभव पुन्हा हसला  "आणि पहाटे पोचणार असं वाटतं आहे तुम्हाला?.. तुम्हाला काय उडता वगैरे येतं का?"

वैतागून राजा म्हणाला "हो.. येतं उडता.. आत्ता इथे पंख सुखवायला थांबलोय... काय कटकट आहे?"

"अर्रे, चिडता कायको? मी काय म्हणतो, 'उडण्याची व्यवस्था' आहे कि काय खरचं तुम्हच्याकडे? धूर कि बुडबुडे?"

"काय बोलताय तुम्ही?"

"अरे वैभव म्हणा.. अहो जाहो कशाला? मी विचारत होतो, कसं उडता? मलापण सांगा, उडायचं औषध असल्यास दिलंत तरी चालेल"

राजा बाजूला सरकत वैभवकडे बघत म्हणाला,
 "तू शांत नाहीच बसणार नं? ठीके... औषध वगैरे नाही.. पीटर पॅन माहित्ये का?  हल्ली माझ्या मुलीला आवडतो तो... कायम त्याची गोष्ट वाचून दाखवायला लागते तिला, आत्ताही कार्टून फिल्म बघत होती टिंकर बेलचं.. "

"मग काय, माहित्ये कि ... हिरव्या कपड्यातला न? मी परवाच वाचलं कि लहान मुलं मेल्यावर यमदूताला घाबरतील म्हणून पीटर येऊन त्यांना घेऊन जातो, गाणी गात आणि नाचत वगैरे फुल.., तो दूत आहे, आणि नेव्हरलंड, मुलांचा स्वर्ग म्हणजे.. तिथली मुलं मेलेली आहेत त्यामुळे त्यांची वयं वाढत नाहीत... "

राजानी राग आणि आश्चर्यांनी  वैभवकडे पाहिलं "अशक्य माणूस आहेस तू...नाही.. असं काही नाहीये"

"आता कुठे कळणार आपल्याला? आपल्या नशिबात आता यमदूतच! एनीवे.. तर तुम्ही उडायची गोष्ट सांगत होतात.. सांगा "

"हां तर, तो जेव्हा मुलांना उडायला शिकवत असतो तेव्हा तो त्यांना सांगत असतो, छान गोष्टींचा विचार करा म्हणजे तुम्हाला उडता येईल... Think of the happiest things ,It's the same as having wings"

"व्वा... आवडलं आपल्याला... तर, कुठपर्यंत जायचं म्हणालात? कोपर खैरणे न? व्हा सुरु.. बघुयात पोचू शकतो का पहाटेपर्यंत"

राजा बघत राहिला..

"मी करू का सुरु? मला कुठे जायची घाई नाहीये... माझ्या आनंदाचे पंखही तुम्हालाच! कुठेही जायची घाई नसणं, ही बेस्ट गोष्ट आहे न? माझा पहिला आनंद.."

" ओह , Thank you... पण ह्या आनंदाइतकाच मोठा आनंद, कोणीतरी घरात वाट पाहतं आहे आणि घरी पोचल्यावर ते आपल्याला कडकडून मिठी मारणार आहेत ह्यातही आहे.. "

"आत्ताचा आनंद सांगू? इथे आपल्याला कोरडी जागा मिळालेली असणं"

"लहान गोष्टीत आनंद शोधण्याची कुवत अजून आपल्यात असणं हाही आनंदच आहे"

"चला, तुम्हाला मोठी गोष्ट देऊ का? आई? आईचं हसणं, आईचं रुसणं, आईचं असणं!! आईचा मौसुत पदर, आईच्या मांडीवर झोपणं... मी पुण्याला शिकायला होतो, आई सांगलीला... माझा अभ्यासाचा वेळ प्रवासात  जाऊ नये म्हणून दर १५ दिवसांनी तीच यायची,  मला भेटायला खाऊ घेऊन. माझे मळलेले कपडे घेऊन जायची आणि धुवून आणायची पुढच्यावेळी... 'पुढच्या पंधरवाड्यात नाही जमलं यायला तर' म्हणत दर १५ दिवसांनी महिन्याभराच्या खर्चाचे पैसे देऊन जायची... तुम्हाला सांगू? तेव्हा तिला स्वारगेटला एसटीत बसवून दिलं की आनंद व्हायचा... मित्रांसोबत रात्रीचे बेत करायला...
आणि आता कळतंय... ती एस्टीतून उतरल्यावर जड पिशवी  माझ्याकडे न देता स्वतःच धरायची, केस आणि पाठीवर हात फिरवत म्हणायची 'विभ्या, वाळलायस रे किती'.. तो एक क्षण परत मिळण्यासाठी माझे लाखो आनंद कुर्बान करायला तयार आहे...
असो! इमोशनल नाही होत नाहीतर रडलो तर उलटा परिणाम व्हायचा आपल्या उडण्यावर"

"आईच्या हातचं कालवण...म्हणजे आता बायकोसुद्धा करायला लागल्ये तसं... बायको! माझी बायको, लग्न, संसार, एक छोटी मुलगी.. प्राजक्ता..." राजा खिशातून पाकीट काढत वैभवला तिघांचा एकत्र फोटो दाखवतो...

"गोड आहे हो मुलगी... माझ्या खिशात साईबाबा आहेत... वर्षातून एकदा तरी शिर्डीला जात असतो.. साईच दर्शन होतं तेव्हाचा आनंद वेगळाच असतो ... नाहीत शब्द तो आनंद सांगायला.. तुम्ही कोणाला मानता?"

"पुलं, वपू, जीए ... माझी बायको लायब्ररीअन आहे, मोठ्ठा आनंद आहे तो! तिथेच भेटलो आम्ही... मला पुस्तक परत करायला कायम उशीर व्हायचा... दंड भरता भरता प्रेमात पडलो... पुस्तकं आनंद आहे माझा... आता उशीर झाला तरी दंड लागत नाही हा आनंद आहे आणि तरीही एका रात्रीत पुस्तक संपवण्यातही आनंद आहे ... एकावेळी मी ४ पुस्तकं घेऊ शकतो... २ माझ्यासाठी घेतो, २ प्राजक्तासाठी... तिलाही आवडतात पुस्तकं हा अजून मोठा आनंद आहे.
गेल्या दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दिल्लीला गेलो होतो.. भारत फिरण्यातही आनंद आहे हं... किती सुंदर गोष्टी आहेत आपल्याकडे... तर तेव्हा आम्ही एका दुकानात पुस्तक घ्यायला गेलो तेव्हा आम्हांला चेतन भगतला भेटायला मिळालं... किती मोठा आनंद! त्याच्यामुळे इंग्लिश पुस्तकं वाचायला लागलो... तुम्ही वाचता?"

"ह्या स्क्रीनवर जितकं येतं वाचता तितकं वाचतो... नवीन आहे हं..." वैभव त्याचा मोबाईल दाखवत म्हणाला... " व्हात्सापवर आहात का तुम्ही? आमच्या शाळेचा ग्रुप आहे त्यावर... रात्रंदिवस मेसेजेस चालू असतात... कधीच एकटं नाही वाटत त्यामुळे... जुन्या मित्रांना नव्यानी भेटण्याचा आनंद!"

"आणि नवीन मित्र अगदी जुने असल्यासारखे वाटणं... तुझ्यासारखे...Thank you.."

"माधुरी दिक्षीत"

"मधूनच? म्हणजे हो, तिचं हसणं आहेच सुंदर... सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर..."

"मराठी असणं.. म्हणजे काय नाय तर ही नाव फटाफट वापरता येतात.."

"मुंबई"

"पुणे.. मुबई-पुणे एक्स्प्रेस वे... पाउस, पावसातलं लोणावळा... गरम भजी , आल्याचा चहा..."

"आत्ताचा पाऊस नाहीये पण आनंद.. म्हणजे नव्हता... चहा हवा होता पण आत्ता, न?"

"आपल्याला हवी असणारी गोष्ट आपल्याला हवी तेव्हा मिळणं..."

"तू काय करतोस? कुठे राहतोस?"

"मी जे करतो ते मला आनंद देतं.. मी ज्या घरात राहतो ते मला आनंद देतं... आणि तुम्ही पुस्तकं वाचता न? मिस्ट्रीसुद्धा कधीतरी आनंद देते.. नाही का?"

राजा हसला फक्त...

"हे काय? संपले कि काय आनंद तुमचे? मानखुर्दपण नसेल आलं अजून..."

"लहानपण, खेळणी, बर्फाचा गोळा, वर्गात पहिला नंबर येणं, आज्जी-आजोबा, मामा-मामी, नागपूर, रेल्वेचा प्रवास, खिडकीची जागा, आता फोर्थ सीटपण पुरते... मेरीट लिस्ट, चांगलं कॉलेज, चांगली नोकरी..."

"अबोलीची फुलं, त्या फुलांचा गजरा, ऋचा घालायची... तिच्या गुलाबी ड्रेसला माचींग , पांढऱ्या रंगातही सुरेख दिसायची ती.. तिच्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आनंद होती... डाव्या गालाला खळी पडायची तिला.. आनंद हो आनंद!"

"पहिलं प्रेम? नक्कीच आनंद!"

"प्रेम.. तो काय शब्द आहे? आदर, कृतज्ञता, कौतुक... शब्दात नाही अडकत पण ह्या सगळ्या भावना असणं हा आनंद आहे.. त्या भावना असणं म्हणजे आपण जिवंत असणं... माहित नाही हे बरोबरे का पण जिवंत असण्यातही आनंद आहे न? रोज इतकं काय काय घडत असतं आजूबाजूला , आनंदी असणं अपेक्षित नसावं नियतीला... पण तरीही आपण प्रार्थना करत असतोच, हसत असतोच, गुणगुणत असतोच... हरलो तर नव्याने उभं राहत असतोच आणि जिंकलो तर ते दुसर्यांबरोबर वाटत असतोच... जगण्याचे कष्ट  सफळ होणं आनंद आहे!"

"आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपण आनंदी होतो तसं आपल्याबरोबर न घडणाऱ्याही किती गोष्टी आपला आनंद सांभाळत असतात"

"पीटरला झेपेल का हो ही इतकी फिलोसोफी?"

"मुसळधार पावसात, ह्या घाण चिकचिकाटात, उपाशीपोटी, अर्ध्या ओल्या आंबट कपड्यात आपण रडत, चिडत, कटकट करत बसलो नाहीयोत आणि आनंद वाटतो आहेत, हे एवढं तरी नक्कीच झेपेल त्याला..."

"राईट... चला पुढे सांगा..."

राजा आणि वैभव त्यांचे लहान-मोठे, खरे-खोटे आनंद बराचवेळ सांगत बसले...

पहाटे पाच वाजता राज्याच्या घराचं दार वाजलं... बायकोने येऊन दार उघडलं...

"हे काय? ट्रेन्स झाल्या का सुरु? तुम्ही इतके लवकर कसे आलात?"

राजा तिला जवळ घेत म्हणाला "उडत"
Friday, June 13, 2014

अर्धवट - ३

"आमच्या संस्थेला फार अभिमान वाटतो आहे की गेली २ वर्ष आम्ही अविरत तुमच्या हरवलेल्या प्रेमाला second  chance  देण्यासाठी झटत आहोत.."
कुर्ता-पायजम्यातला तो माणूस स्टेजवरून बोलत होता. त्याच्यासमोर अनेक भावी (?) जोडपी उभी होती.. काही "आता  एवढं उभं राहावत नाही" म्हणून मागच्या खुर्च्यांवर बसली होती.. ६०+ वयोगटातल्या आता एकट्या असणार्या "मुला-मुलींचा" जोडीदार-मेळावा..आयोजक मुद्दामच "वधू-वर" म्हणणं टाळत असावेत. त्यातही एक गम्मत होती, लग्नाआधीचा आपला एखादा crush, ex वगैरे असेल तर सांगायचं होतं आता देवाच्या (अव)कृपेने तो किंवा ती एकटी असेल तर त्यांना भेटवायचं कामही ही संस्था करत होती..

"एकदमच युनिक कन्सेप्ट बघा" श्रोत्री आजोबा पटवर्धन काकांना सांगत होते .. "आमच्या कॉलेजातल्या अपर्णा फडणीसचं नाव दिलं होतं मी , पण आहे नवरा अजून तिचा .. आणि अगदी ठणठणीत.. म्हणजे मला दुख्ख नाही त्याचं , उलट त्यामुळे अपर्णालाही सौंदर्यात मागे टाकील अशी वेदिका शृंगारपुरे मला suggest  केली .. आलीये आज .. ती बघ तिथे .. तिथे रे बुफेच्या लायनीत.. कशी वाटत्ये?"

"Awkward.."  सुहास पटवर्धन वेदिका शृंगारपुरेच्या समोर उभं राहून म्हणाला.. " मला नव्हतं वाटलं तू इथे .. म्हणजे .. कशी काय? तू दुसरं लग्न केलंस ना? कोणा अमेरिकन माणसाशी.." 
"सुहास.. एकुलता एकच नवरा होता मला.. तू! .. तुझ्यानंतर का लग्न करेन मी? मला डिंगीचि कस्टडी मिळाल्यावर काही संबंधच नव्हता ना लग्न करायचा.."
"वेदा.. तू त्याला अजूनही डिंगी म्हणतेस? मोठा झाला असेल ना आता तो .. तरीही डिंगी म्हणजे "
" आता तो पटवर्धन नाहीये.. त्यामुळे त्याला मी काहीही हाक मारू शकते कोणत्याही वयात.. त्याचं लग्न ठरलं आहे .. त्याची बायको मात्र अमेरिकन आहे आणि तिलाही  आवडतं त्याला डिंगी म्हणायला.. तुझा टकलाचा अन् वजनाचा वारसा घेतलाय बाकी त्याने, लग्नाला बोलवेन तुला.."
जाड , टकल्या तिशीतल्या गोर्या मुलाला त्याची आई डिंगी म्हणून हाक मारते आणि तो धावत तिला येऊन मिठी मारतो हे दृश्य सुहासच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तो मनात म्हणाला "फक्त वजन आणि टक्कल नाही.. आपल्या दोघांच्या awkwardचाही वारसा असावा"

वेदिकाला  इसवी सन १९७९ मध्ये औरंगाबादची सर्वात सुंदर तरुणी असल्याचा पुरस्कार एका जाहिरातदाराने दिला होता आणि मग फुकटात तिच्याकडून त्यांच्या मलमांची जाहिरात करून घेतली होती..
 एकात तिचा close up  आणि खाली लिहिलं होतं "खरुज? वापरा सातीलाल फार्माचे "खरुजानो"..
एकात परत तिचा closeup  आणि खाली लिहिलं होतं "तारुण्यपिटीका? वापरा सातीलाल फार्माचे "नपीटीका" ..
पुढे साधारण वर्षभर मिस औरंगाबाद म्हणून तिला कोणी ओळखत नसलं तरी खरुज आणि तारुण्यपिटीका नावाने नक्कीच ओळखायचे ... कोणीतरी म्हणाल्यामुळे तिच्या आईला अचानक वाटायला लागलं की औरंगाबादकरांना गुळाची चव नाही.. मुंबईतच मुलीला भविष्य आहे..ती आता बातम्याच देणार.. स्मिता पाटील, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर, भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किरपेकरच्या यादीत वेदिका शृंगारपुरे हे नावही लागेल अशी तिच्या आईला १००% खात्री होती आणि म्हणून वेदिकाची पाठवणी जोगेश्वरीच्या सरू मावशीकडे करण्यात आली..

सरू मावशीच्या चाळीत समोरच्या घरात पटवर्धन राहायचे.. सुहास हा त्यांचा सर्वात धाकटा मुलगा..वेदिकापेक्षा ३ वर्षांनी लहान.. वेदिका तिथे राहायला आली तेव्हा त्याला नुकतीच मिसरुड  फुटायला लागली होती..स्वतःला  अमिताभ बच्चन समजणारा अमोल पालेकर होता तो..त्याच्यापेक्षा मोठ्या दोन्ही बहिणी आता लग्न करून सासरी गेल्यामुळे आता त्याला खूप सुटसुटीत वाटत असायचं.. जाड आणि तुळतुळीत गोटा असणारे अप्पा पटवर्धन कामावर निघाले की सुहास लगेच गच्चीत  पळायचा.. हातातलं पाकीट उघडून त्यातून सिगरेट काढायचा आणि कोणीतरी चिकटवलेल्या  शबाना आझमीच्या पोस्टरसमोर तोंडातून धूर काढत तासंतास बसायचा.. असाच एक दिवस बसलेला असताना दाम्या धावत वर आला.. "सुहास.. शबाना.. शबाना आल्ये चाळीत .. गुप्तेंकडे राहणारे.. उतरत्ये बघ.. धाव.." दोघंही धावले.. समोर वेदिका सामान उचलून सरू मावशीसोबत चालत येत होती..

"वेदिका शृंगारपुरे... गुप्ते काकूंची भाची आहे... वरळीला जात असते काकांसोबत... खारे दाणे आवडतात.. " दाम्या सांगत होता.. "खारे दाणे? ही माहिती काढलीस तू? भेंडी... काही कामाचा नाहीस तू" सुहास कॅरमच्या बोर्डावर बोरीक पावडर पसरत म्हणाला... "साल्या, उद्या नेलीस फिरवायला आणि दाण्यानैवजी चणे घेऊन दिलेस.. तर?"
"गुप्ते म्हणजे? ... "
"आपले नाही... अप्पा तुला घराबाहेर काढतील घरी विषय जरी काढलास तरी.."
"हं.."
"हं.. आता तू मला भेंडी, काही कामाचा नाहीस म्हणालास म्हणून... नाहीतर मी तुला पुढे सांगणार होतो, गुप्ते काका काकू १५ दिवस पुण्याला जाणारेत मुलीकडे.. वेदिकाच्या सोबतीला आमची वनिता जाणारे रात्री झोपायला..आणि मला विचारत होते काका , सोडशील का बसस्टोपपर्यंत रोज तिला.. "
"च्यायला.. मग? मग? मग काय सांगितलस तू त्यांना?..."
"आपण मित्र आहे तुझा... हो सांगून टाकलं.. आता रोज नेईन तिला माझ्या स्कुटरवरून.. आणि खारे दाणे खात आम्ही बोलू तुझ्याबद्दल..."

पुढचे दोन आठवडे सुहाससाठी खूप कठीण गेले. तो रोज अप्पांना नवीन स्कूटरसाठी पटवत होता, दाम्या आल्यावर रात्री त्याच्या स्कूटरवर सराव करत होता.. आणि रोज दाम्या आणि वेदिकानी आज काय "गंमत" केली ते ऐकून घेत होता.
पहिल्या दिवशी दाम्यापासून दोन वित अंतर ठेवून बसलेली वेदिका आठवड्याच्या शेवटी त्याच्या खांद्यावर हात ठेवते बघून जळफळत होता.

Sunday, June 8, 2014

अर्धवट -२

---------------------------

पुराने बरामदे ... नयी धूप...

सक्काळी सक्काळी एका हातात चहाचा कप आणि एका हातात पाण्याची बाटली घेऊन बाल्कनीत आले. आणि उन्हाची एक तिरीप बघून प्रचंड आनंदी झाले.. इथे नवीन घरात राहायला आल्यापासून बाल्कनी/ गैलरी/patio मध्ये आलेलं पहिलं उन! 

हल्ली रोज सकाळी येत असते मी थोडावेळ बाल्कनीत .. एक छोटी चटई वजा बसकण टाकून झाडांसमोर बसते ... तुळस, चेरी, लीची, कोथिंबीर, सफरचंद आणि चिंट्या जांभळ्या फुलांची चौकशी करत.. त्यांना काय हवं-नको ते बघत.. त्यांना अंघोळ घालत.. आदल्या रात्री खारीनं येऊन काही किडे केले असतील तर ते निस्तरत... खालच्या छोट्या रस्त्यावरून लहान मुलांना आया शाळेत सोडायला चाललेल्या असतात... पोरांची संतत बडबड... आयाचं "जल्दी चलो.." "hurry up" "kuuai diaan" "date prissa" असं काहीसं त्यांच्या त्यांच्या भाषेत चालू असतं...  तिसर्या मजल्यावरच्या एका मराठी मुलाला त्याचे बाबा नर्सरीत सोडायला जातात आणि रोज तो खाली आल्यावर आईला "टाटा" करताना .." आई मला पट्कन घ्यायला ये... पट्कन" असं सांगत असतो. पाहिलं 'पटकन' आर्त असतं आणि नंतरचं दरडावून... ह्या सगळ्यात अर्धा-पाउण तास कसा जातो कळतच नाही.. चहाही संपलेला असतो.. मग कपड्यांच्या Stand वर वाळत टाकलेला टॉवेल उचलते आणि आत येते...

आज उन आलेलं पाहिलं आणि आपण इतके दिवस उन्हाला मिस करत असल्याच जाणवलं... माझ्याच इतकी माझी झाडंही आनंदी झाली असणारेत... अश्यावेळी जास्त डुलताना दिसतात झाडं... (मनाचे खेळ.. पण तेवढे चालायचेच)

Asian paintsची जाहिरात होती ना "हर घर चुपचापसे ये केहता है.. अंदर इसमे कौन रेहता है" तसं बाल्कन्या सांगतात बरचं आतल्या लोकांबद्दल...

इथे खालच्या बाल्कनीत अनेक दोर्या लावल्यात... आणि त्यावर लहान बाळांच्या कपड्यांच्या पताका...
दीपिका लहान असताना बरेच दिवस थळच्या, आजोळच्या  घरातली पडवी भरलेली असायची अश्या पताकांनी... लहान बाळ असणाऱ्या घरातला वास आवडतो मला... शेक-धूप, जॉन्सनची पावडर आणि पुन्हा पुन्हा  धुतलेल्या लंगोट-दुपट्याचा... थळच्या अंगणानी आणि पडवीनी आम्हांला मोठं होताना पाहिलं आहे..  अंगणात बसून माती खाण्यापासून ते झोपाळ्यावर पाढे म्हणण्यापर्यंत... पकडापकडी खेळण्यापासून Candy Crush Saga खेळण्यापर्यंत... पाउस पडायला सुरुवात झाल्यावर पडवीतून बाहेर अंगणात भिजायला धावण्यापासून... भिजू नये म्हणून ओढणी गुंडाळत अंगणातून पडवीत पळत येण्यापर्यंत... आम्ही मोठ्या झालो, पडवी तशीच राहिली... नेहमीप्रमाणे आमची वाट बघत आणि आम्ही परत यायला निघताना आमची पावलं जड करत...

वरच्या बाल्कनीत सतत इथे तिथे धावण्याचे आवाज येत असतात.. आठवड्यातून एकदातरी वरून एखादं खेळणं आमच्या घरात पडलेलं असतं... दुपारी ती आई तिच्या मुलाला बाल्कनीतच ठेवते बहुतेक... दुपारभर खाद-खुड चालू असते त्या पिल्लाची..
आमची अलिबागच्या कॉलनीतली गॅलरी अशी होती बरीच वर्षं... आई दुपारी झोपली कि ती आवाजाने उठू नये म्हणून आम्ही गॅलरीत बसून खेळायचो... एका कोपर्यात आमची भातुकली कायमची मांडलेली होती. दुसऱ्या बाजूला अनेक कुंड्या होत्या.. अधूनमधून आम्ही पाणी घालत असू, पण तेव्हा ते department  बाबांचं होतं. कधीतरी काहीतरी प्रयोग करायचो त्या झाडांवर..

आमच्या शेजारच्या बाल्कनीत इतकी धूळ असते.. इतका पाला-पाचोळा साचलेला असतो... आणि त्यात खितपत पडलेला vacuum cleanerचा खोका.. तिथे २-३ मुलं-मुलं राहतात... सकाळी लवकर कामावर जातात ते थेट रात्री परततात...
 त्यांच्या बाल्कनीसारखीच आमची ठाण्याची बाल्कनी होती.. rather दोन्ही बाल्कन्या... हॉलच्या बाल्कनीत कबुतरांची शाळा भरायची... धुळीची रांगोळी पसरलेली असायची... बाल्कनीत गेलं कि पावलं उठायची धुळीत... आम्ही कधी जायचोच नाही तिथे.. दार कायम बंद असायचं. कधी वेळच नाही मिळायचा ती आवरायला-स्वच्छ करायला.. नाही म्हणायला एक-दोनदा केला होता प्रयत्न पण पुढे ३-४ दिवस सर्दी-खोक्ल्यानी जखडलं होतं... बेडरूमची गॅलरी मात्र त्यातल्या त्यात बरी होती... तिथूनच खाली एका आमदारच घर दिसायचं.. सतत कार्यकर्त्यांची धावपळ असायची... आमची फोनवर बोलायची जागा होती ती.. फोनवर पलीकडच्या माणसाला खालच्या कुत्र्यांचा आवाजही ऐकू जायचा... (कुत्रे म्हणजे कार्यकर्ते नाही)

-----------------------------------------

फोटोग्राफ 

" If I lay here, If I just lay here.. would you lie with me and just forget the world?" - Chasing Cars, Snow Patrol

ती दोघं पडलेली जमिनीवर...आणि आजूबाजूला गठ्ठे ठेवलेले अनेक... उकडत असून पंखा लावू देत नव्हती ती कारण मग उडले असते ना तिचे सगळे फोटोग्राफ्स... तो नुसता पडून बघत होता एकटक तिला...तिने त्याच्याकडे पाहिलं.. हलकेच हसली... हात लांब केला, हाताला लागलेला तिचा फोटो घेतला जवळ तिने आणि त्याला दाखवत विचारलं...
"ह्यात कशी दिसत्ये मी?"
तो निरखून बघत होता... ती हसली मग
"मला माहित होतं नाही सापडणार मी तुला ह्यात... मी स्वतःलाही सापडत नाही ह्या फोटोत.. इय्यत्ता दुसरी किंवा तिसरी, कोळीगीत बसवलं होतं आमचं,  आमच्या बैन्नी.. "मी डोलकर" वर.. अंजिरी साडी शोधत आईनी तुळशीबाग पिंजारलं होतं तेव्हा.. खूप कष्टांनी नटवलं होतं तिने मला आणि मी तिसर्या रांगेत मागून दुसरी उभी नाचाच्यावेळी.. तिला दिसलेही नसेन मी. पण तरी तिने घरी आल्यावर रव्याची खीर आणि पुरी केली होती "मी सर्वात सुंदर नाचल्याचं बक्षीस"

(सो बेसिकली ते सगळे रिकामे कागद असतात, त्यावर फोटो नसतातच! असा concept होता... पण नंतर उगाच alzheimer किंवा तत्सम चक्रात अडकले, आणि cliche होईल पोस्ट म्हणून पुढे लिहिलीच नाही )

-------------------------------------------