Tuesday, June 3, 2014

अर्धवट... १

चांगली कि वाईट माहित नाही... पण मला सवय होती कि एकदा पोस्ट लिहायला बसलं कि संपेपर्यंत उठायचं नाही ... एका बैठकीत लिहून काढायचं जे आहे नाही ते!
पण गेल्यावर्षीपासून ती सवय मोडली... दुसरी कामं दिसत असताना ब्लॉगकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. पोस्ट लिहायला उत्साहाने बसायचे आणि मग काहीतरी काम यायचं आणि ती तशीच drafts मध्ये पडून राहायची... आणि एकदा सोडल्यावर पुन्हा लिहायचा मूड कधी यायचाच नाही (ह्या पोस्ट्स बाबतीत अजूनही आलाच नाहीये) आता drafts मध्ये इतक्या अर्धवट पोस्ट साचून आहेत कि नवीन लिहायला आल्यावर त्या दिसतात आणि मग नवीन लिहायचा उत्साह जातो आणि जुन्या लिहून होत नाहीत...
मग म्हंटल अर्धवट तर अर्धवट... करून टाकूयात पोस्ट! म्हणजे मग पुढे नवीन लिहायच्यावेळी एक कारण कमी... खूप काही potential असणाऱ्या वगैरे नाहीयेत ह्या गोष्टी, कदाचित म्हणून पूर्णही झाल्या नाहीत... पण अर्थात potential लिहीणार्यात असावं लागतं हेही तितकचं खरं.. सो जर कोणाला ह्यातून काही उचलून नेऊन त्याचं त्याचं काही लिहायचं असेल तर बिनधास्त... Yard sale सारखं...

---- ब्लॉग सेल----

---  F R E E--- F R E E--- F R E E---

---------------------

१. मिठाचा खडा or tatsam title...

"...तुमच्या प्रतिक्रिया पत्राद्वारे आम्हाला कळवायला विसरू नका... आता मी, ज्योती , तुमचा निरोप घेते.. पुन्हा भेटूया उद्या दुपारी ३ वाजता वाघ-बकरी स्पेशल चहाबरोबरच्या गप्पांमध्ये .. कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत पंडित कुमार गंधर्व ह्यांनी  गायलेल्या "प्रभू अजी गमला" ह्या रचनेने.."
ज्योतीने ड्युटी चार्टवर सही केली. केस बांधत , सामान आवरून ती स्टूडियोबाहेर पडली.. चप्पल घालताना तिने समोर उभ्या असलेल्या रमाला विचारलं.. "गेली होतीस का काल सिनेमाला?"
रमा फाइलमधून डोकं वर न काढत म्हणाली  "नाही.. आमच्या ह्यांना वेळ नव्हता"

ज्योतीने खूप मोठा आळस दिला आणि मेघाला  A.C. कमी करायला सांगितला.. "मेघा.. एक खुसखुशीत  चहापण प्लीज.."
रमाने आता मात्र दचकून ज्योतीकडे पाहिलं.. "खुसखुशीत  चहा?"
" or whatever the adjective is.. आत्ता शिकवायला लागू नको प्लीज.. आधीच तू काय काय डेंजर मराठी बोलायला लावतेस मला.. आज काय तर 'आध्यारूढ' आणि अजून काय होतं ते..?"
"काहीही असलं तरी बोलतेस ना? येतात ना शेकडो पत्रं?" रमानी परत फायलीत डोकं घातलं..
"रमे.. अमन म्हणत होता, ह्या आठवड्यात कायच्या काय पत्रं आल्येत? थांब.. मीच जाऊन बघते.. तू काय सांगणार नाहीस..पण आधी चहा पिऊन जाते.. चहा येईपर्यंत एक झोप काढते.. ३ ते ५ झोपेचा स्लॉट आहे यार.. काकवा आणि आज्या ऐकतात फक्त मला.. पण का बोलत्ये मी? तू ऐकतपण नाहीयेस.. कुचकट.."

"मिठाचा खडा, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. मी आमच्या घरच्यांच्या आनंदात कायम मिठाचा खडा बनूनच असते. मुलाला मित्रांबरोबर लांब  फिरायला जायचं आहे पण आई जाऊ देत नाही. कारण माझ्यातल्या आईला १४ वर्षाचा असला तरी मुलगा लहानाच वाटतो.. मुलीला स्लीपोव्हर पार्टीला पाठवत नाही, तोकडे कपडे घातल्यावर बोलते. कारण बाहेरचं जग कसं आहे ते तिच्यापेक्षा २५ वर्ष जास्त पाहिलं आहे मी.. ह्यांना मसालेदार काही जास्त खाऊ देत नाही कारण मग रात्रभर त्यांनाचं त्रास होतो.. पण हो, तरीही मी मिठाचा खडाच असते"
"

----------------


२.
गोऱ्या पायातलं तिचं  चांदीचं नाजूकसं पैंजण...
गेल्या शो नंतरचा अजून न  गेलेला पुसटसा आल्ता...
मरून रंगाचं भडक नेलपेंट.. आल्त्यासोबत छान दिसतं म्हणून...
उजव्या पायाच्या अंगठ्यावर एक तीळ.. मावशी म्हणायची ज्याच्या पायावर तीळ असतो तो खूप प्रवास करतो..


--------------------------

1 comment:

Anonymous said...

mast..