Sunday, March 22, 2009

लेले... तेजस्विनी लेले!!

कित्तीतरी दिवसांपासुन बोटांना अडवुन ठेवलं होतं हे नाव टायपण्यापासुन ह्या ब्लॉगवर... पण आज राहवलचं नाही!
इतकं छान, मस्त, दणदणीत नाव असताना..जास्वंदी काय? म्हणजे मला जास्वंदाची फुलं आवडतात पण स्वत:च्या नावापेक्षा जास्त नाही. आज आत्ता मी स्वत:ला जेम्स बॉंन्ड्सारखं "लेले...तेजस्विनी लेले..." असं नाव सांगताना imagine केलं आणि माझी मला solliidd आवडले.. ( नेहेमीसारखीच :) ).

बरं पण मग "जास्वंदी हे नाव का घेतलं होतस?, anonymous का होतीस?, आता का नाहीस?, ह्या पोस्ट्नंतरही ब्लॉगवर जास्वंदीच नाव आहे..असं का?,..." वगैरे वगैरे अनेक प्रश्न सहाजिकच डोक्यात येतिल तुमच्या... (असे कसे नाही आले? यायलाच हवेत!) पण सध्या ह्यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायल्या माझा mood नाही आहे..खोटं का बोलु? मला ह्या प्रश्नांची उत्तरं ठाऊकच नाही आहेत! त्यामुळे हा भाग विसरुन जाऊयात... तर माझं नाव तेजस्विनी लेले आहे. म्हणुन बघा एकदा मोठ्याने..सही वाटतं (नाही सही वाटलं तर स्वत:चं नाव मोठयाने म्हणुन पहा..ते सही वाटेल).

तर एक कोणीतरी माणुस आणि त्याचं कुटुंब व्यापारासाठी जहाजातुन जात असताना जहाज बुडालं... ते कुटुंब वाचलं आणि विजयदुर्ग, मुटाटला (सिंधुदुर्गात) स्थायिक झालं. मग पिढ्या वाढत गेल्या..काही मंडळी खानूत आली..तिथुन चरवेली... त्यांच्यातला एक पोरगा अलिबागला आला... आणि मी त्याची मुलगी! तर त्या जहाजवाल्या व्यापारी माणसाला "लेले" आडनाव आवडलं असावं म्हणुन आज मी लेले आहे! आमच्या आडनावातुनच आमचा दानशुरपणा ओतप्रोत वाहातोय... कित्ती क्युट आडनाव आहे "लेले"..छोटुकलं छान!
आता तुमच्यातल्या ब-या़च जणांना स्टॅम्पचा जोक आठवला असेल... स्वतःला मोठे शिक्के पाडायला लागतात म्हणुन जळणारे लोक असले जोक बनवतात..तो "ले" च्या स्टॅम्पचा जोक नक्कीच कोणा "सहस्त्रबुद्धे" किंवा "इचलकरंजीकर" सारख्या आडनाववाल्यांनी बनवला असेल.

लेले आणि नेने वगैरे जोक पण खपतात कारण उच्चारायला सोप्पी आडनावं आणि सारखीच आहेत म्हणुन... दोन्ही आडनावांमध्ये साम्य आहे मान्य! पण म्हणुन मला तेजस्विनी नेने म्हणणा-यांचा मला दणकट राग येतो. माधुरी दि्क्षीतचं लग्न ठरलं तेव्हा कित्येकांनी "तुमची झाली आता माधुरी... तुमच्या नात्यात आहेत का श्रीराम लेले?... " असे प्रश्न विचारले होते. ’न’ आणि ’ल’ ह्या अक्षरांमधला साधा फरक का कळत नाही लोकांना?

तर मला माझं आडनाव खूप खूप आवडतं. सगोत्री लग्न चालत नाही म्हणुन नाहीतर मी "लेले" आडनाववाल्यांशीच लग्न केलं असतं. आत्ताही लग्न झाल्यावर आडनाव न बदल्याण्याचा विचार आहे माझा... पण जेव्हा मी माझ्या आईबद्दल विचार करते तेव्हा न बदल्याण्याचा विचार मनातुन काढते... म्हणजे बघा ना... आम्ही सगळे "लेले" आणि घरात आई एकटी रानडे असती तर किती विचीत्र वाटलं असतं आम्हाला... म्हणुन आडनाव बदलणं ठीक वाटतं मला ( ह्याबाबतीत अजुन arguments नको... माझं confusion वाढतं). काही झालं तरी मी माझं नाव मात्र बदलणार नाहीये हे नक्की!

’इन्स्पेक्टर तेजस्विनी’ वरुन तुझं नाव ठेवलं आहे का? असं मधे मला कोणीतरी विचारलं होतं.अश्शी चिडचिड झाली होती माझी... लोकं काहीही विचारु शकतात! एका काकुंनी हे नाव सुचवलं आई-बाबांना म्हणुन हे नाव ठेवलं त्यांनी...इतकं साधं आहे ते, पण त्याचवेळेस हे नाव आमच्या कुलस्वामिनीचं आहे म्हणुन मला दिलं घरच्यांनी! ( Thank god.. अंबाबाई नाही ठेवलं..अंबाबाई लेले..मज्जा नसती आली). जन्मदाखला, छोटा शिशू पासुन आत्ता सिनिअर मास्टर्सच्या सगळ्या वह्या-पुस्तकांवर, रेशनकार्डावर, सर्टिफिकेट्स, बक्षिसांवर, ओळखपत्रांवर, पारपत्रावर.... कित्ती ठिकाणी हे नाव लिहीलं, छापलं गेलं... तसं मला "तेजस्विनी" नावाने जास्त कोणी बोलावलं नाही... सगळे तेजुचं म्हणायचे/म्हणतात. माणुस जवळचा आहे लांबचा, मला आवडणारा की न आवडणारा ह्यावर त्याने मला काय हाक मारायची हे ठरतं.

"तेजस्विनी लेले" मी एकटी नाहीये ह्या जगात, एक भरतनाट्यम च्या मोठ्या नर्तिका आहेत तेजस्विनी लेले नावाच्या! मला त्याचा अभिमान आहे... माझं नाही पण माझ्या नावाच्या एकीचं नाव आहे ह्याचा!! [:)]. अजुन काही तेजस्विनी facts:
1) केरळात तेजस्विनी नावाची एक खुप सुंदर नदी आहे.
२) तेजस्विनी नावाची एक सिरिअल लागायची ज्यात रेणुका शहाणे होती.
३) अनेक स्त्री-पुरस्कारांची नावं तेजस्विनी असतात. ( मिस. SNDT ला "तेजस्विनी" म्हणतात. पोरी तेजस्विनी बनायला दिवस-रात्र मेहेनत करतात :) )


तर to conclude... तेजस्विनी लेले माझं नाव आहे (जे तुमच्यापैकी अनेकांना कधीपासुनच माहित्ये). जसं तुम्हाला तुमचं नाव आवडतं तसं मला माझं नाव भरपुर आवडतं. बास्स!!

- तेजस्विनी लेले

( मला ठाऊक आहे..ह्या पोस्टला काहीही साहित्यिक value वगैरे नाहीये (माझ्या कुठल्याच पोस्टांना तशी ती नसते) ... ह्यापेक्षा जास्त value "चहाची पाककृती" ला असेल. पण तरी मला माझ्या नावाविषयी असणारं प्रेम मला इथे लिहायचं होतं... आणि दुसरं म्हणजे "तेजस्विनी लेले" नाव अनेकांना माहिती होईल, प्रसिद्ध होईल इतकं माझं कर्तुत्व असेल ह्याची मला खात्री नाही त्यामुळे इथे नाव अनेकदा छापुन आल्याचा आनंद मिळवला)