Thursday, January 8, 2009

येकष्ट्रा...

आत्ता मी बिल्लु बार्बर मधलं शाहरुखचं गाणं बघत होते. शाहरुखच्या मागे नाचणा-या एका लांब केस आणि दाढीवाल्या माणसाकडे लक्ष गेलं आणि तो एकदम ओळखीचा वाटला... नीट पाहिल्यावर लक्षात आलं, अरे हा तर ब-याच गाण्यांमध्ये असतो. हा माणुस award functions मधे वगैरे हिरो-हिरोईनच्या सर्वात जवळ नाचणारा माणुस असतो.
मला त्याला ओळखता आलं ह्याच्या आनंद झाला पण त्याहुनही जास्त आनंद ’अरे त्याला कोणीतरी ओळखल’ ह्याचा झाला. शाळेच्या गॅदरिंगमध्ये शेवटुन दुस-या रांगेत नाचणा-या मुलीचा अर्धा चेहरा दिसल्यावर तिच्या आई-बाबांना होत असेल इतका आनंद झाला.

काल मी सारेगामापा (हिंदी सारेगामापा असतं आणि मराठी सारेगमप असतं) बघत होते. त्यात प्रेक्षक म्हणुन टॅक्सीवाले, स्टेशनवरचे हमाल आणि कोळणी आल्या होत्या. मस्त enjoy करत होती ती माणसं... गाणी, नाच आणि त्याहुन जास्त Camera! मला माहित नाही की ही माणसं खरचं हमाल आणि कोळणी असतील की भाड्याने आणली असतील, पण त्यांच्यांकडे बघुन मला मज्जा वाटत होती. त्यांचे कपडे इतके स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले होते. साफ दाढी केलेली, गंध वगैरे लावुन आलेली काही माणसं... कित्ती छान ना... जेव्हा त्यांना कळलं असेल असं shootingला जायचं आहे, त्यांनी किती तयारी केली असेल, त्यांच्या घरच्यांना कसलं कौतुक वाटलं असेल. घरातल्या बाबु-बाबींनी त्यांच्या सगळ्या मित्र-मैत्रिणिंना सांगितलं असेल कि " आमचे बाबा TVवर दिसणारेत". शुट नंतर घरी आल्यावर त्यांच्यांवर प्रश्नांचा भडिमार झाला असेल. काय होतं? कसं होतं? कोण कोण होतं? TV वर कधी दाखवणार?
ज्यादिवशी TVवर तो episode आला असेल तेव्हा घरचे सगळे TV समोर जमा झाले असतील.. स्वतःला, मित्राला, नव-याला, भावाला, बाबांना... तिथल्या प्रेक्षकांच्या गर्दीत शोधायचा प्रयत्न झाला असेल. आपला माणुस दिसल्यावर जल्लोष झाला असेल. कित्ती सही ना! पण जे दिसले नसतील त्यांना कसं वाटलं असेल ना? त्यांना कॅमेरावाल्याचा राग असेल, किंवा आयत्यावेळी आपल्या चेहे-यासमोर हात घालणा-या बरोबरच्या माणसाचा! बायको किंवा मुलगी रागाने म्हणाली पण असेल त्यांना "तुम्हाला जरा पुढे यायला काय झालं होतं? ते भावजी/काका बघा कित्ती नाचताय्त!"

मी हा सगळा अनुभव घेतलाय म्हणुन मी हे "कसं झालं असेल ना" वगैरे म्हणते आहे. ok, this is first time मी काहीतरी भन्नाट reveal करत्ये माझ्याबाबतीत... म्हणजे secret वगैरे नाहीये, पण हे आजवर कोणाला सांगितलं नाही. माझ्या अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींना पण नाही! लाज वाटली म्हणुन म्हणा किंवा "ई..काहीही होतं ते" म्हणुन त्याहुन जास्त तो माझा पोपट झाला होता म्हणुन!

तुम्ही सई परांजपेंचा "साज" पाहिलाय? आठवत नसेल तर संगीत क्षेत्रातल्या २ बहिणींची गोष्ट आहे. लता-आशा वरुन inspire झालीये असं म्हणतात. ह्या फिल्ममध्ये अरुणा इराणी, शबाना आझमी आणि झाकीर हुसैनही होते. आठवलं? त्यातली गाणी जबरदस्त होती...तर जेव्हा त्या बहिणी लहान असतात तेव्हाचं shooting हे अलिबागजवळ झालं होतं...

मी तेव्हा लहान होते. दुसरी-तिसरीत वगैरे... आमच्या एक ओळखीच्या काकू आमच्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की सई परांजपे येणारेत अलिबागमधे त्यांच्या एका फिल्मच्या शुटिंगसाठी. त्यांना फिल्मसाठी काही लहान मुली हव्या आहेत, हिरोईनच्या मैत्रिणी म्हणुन. साधे कपडे हवे आहेत, शाळेत जाणा-या मुली आधीच्या काळातल्या, परकर-पोलका वगैरे असेल तर ते कपडे घालुन पाठवा, आमच्या इथल्या काही मुली select झाल्या. मग आमच्या आयांना काय आनंद झाला होता. आपली मुलगी फिल्ममधे काम करणार याचा आनंद! माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या आईने तर आम्हाला खास ह्या फिल्मसाठी नवीन परकर-पोलका शिवुन घेतला. उगाचच, पण आत्ता हे लिहिताना डोळे भरुन आल्येत! कित्ती कौतुकाने जाउन अलिबागच्या बाजारातुन चंद्रकोरीची टिकली आणली होती आम्ही. आईने अनेकांना सांगितलं होतं की "माझी मुलगी जाणारे शुटिंगला". गणपतीच्या दिवसांत शुटिंग होतं बघुतेक, कारण आम्ही तेव्हा ह्या शुटिंगसाठी गावाला जाणं पुढे ढकललं होतं.
साधारण आम्हाला वाटत होतं, आम्ही एक ८-१० जणी आहोत म्हणुन. आपल्याला काहीतरी डायलॉग असतिल असंही वाटलं होतं. मग ’ सई परांजपेंना मी आवडेन आणि मला त्या जास्त role देतील’ ही स्वप्नंही मी पाहिली.

"दि डे" उजाडला, सकाळी सगळ्या आयांनी आम्हाला घाबरु नका, लाजु नका, सांगतिल ते करा, सांगतिल तसं म्हणा वगैरे सुचना दिल्या. आम्हाला न्यायला बस आली... हो ब - स... ज्या शाळेत शुटिंग होतं तिथे गेल्यावर पाहिलं, अनेक मुली आल्या होत्या... शाळाच होती हो आख्खी. आम्ही तिथे जाऊन बसलो आणि मग पुढचा संपुर्ण दिवस त्या काकु जे सांगतिल ते करत होतो...एकदा तिथे बसा, एकदा इथे बसा... आम्ही शाळेतल्या मुली होतो... शाळेत मुली जे करतात तेच करत होतो. एकदाच कॅमेरा समोरुन गेला, खुप जवळ होता... चला आपण आत्तातरी दिसलो असु असं वाटलं. मी आणि माझी मैत्रिण आम्ही एकदा सई परांजपेंच्या समोर जाऊन पण उभ्या राहिलो होतो, त्यांनी लगेच आम्हांला एका चालु scene मधे मागच्या रांगेत पळत जाउन बसायला सांगितलं.... आमची पाठ तरी दिसायला हवी... नवीन परकर-पोलका शिवुन घेतल्याचं सार्थक झालं..पण चंद्रकोर मात्र नाही दिसली. ज्या दोन बहिणी झाल्या होत्या, त्या दिसायला खरचं खुप सारख्या होत्या... त्यातली एक मुलगी माझ्या बाजुला बसली होती एका scene मधे, त्यामुळे तिथेही मी अर्धी दिसले असेन. मधल्या वेळात तिच्याशी काहीतरी बोलायचं म्हणुन मी विचारलं "तुम्ही खरचं बहिणी आहात?" तर मी कित्ती बावळट आहे अश्या नजरेने तिने बघितलं होतं माझ्याकडे! आता खरं सांगु तर त्या आठवणी खुप पुसट झाल्यात... एका सिनमधलं "वाह वाह, बहोत अच्छा गाया" वगैरे वाक्य अजुनही आठवतं आहे... कारण आम्ही वैतागलो होतो इतक्या वेळेला retake झाला होता त्याचा... बाकी इतकंच आठवतय की आम्ही आमचं shooting नसताना बर्फाचा गोळा खाल्ला होता. आणि संध्याकाळी बस मधुनच घरी आलो होतो.

घरी आल्यावर आई-बाबांनी अनेक प्रश्न विचारले होते. काय झालं? कसं झालं? कोण होतं?.... मी सगळं काही झालं तसं सांगितलं... दुस-या दिवशी आम्हाला कोकणात गावाला जायचं होतं, आता तिथे कळलं होतं की मी कुठल्याश्या shootingला गेल्ये त्यामुळे आम्ही २ दिवस उशिरा येतोय... त्यामुळे आईने लगेच मला दटावलं... तिथे गेल्यावर विचारतील काय झालं? कसं झालं? वगैरे... तर सांग तू त्या लहान मुलीची मैत्रिण होतीस म्हणुन, १-२ डायलॉग होते म्हणुन सांग... का ते मला तेव्हा कळलं नाही पण मी आईने सांगितल्यानुसार तिथे सांगितलं! ही माणसं जाउन "साज" कधिही बघणार नाहीत ह्याची खात्री होती आईला! मीसुद्धा आजवर साज पाहिला नाही आहे. मी त्यात किती दिसले मला माहित नाही... माझ्या मैत्रिणीने मी दिसल्याचं मला सांगितलं. आज हे सगळं आठवल्यावर खुप हसु येतं, विचीत्र काहीतरी वाटतं.

परवा माझ्या कॉलेज प्रोजेक्टच्या short filmचं shooting होतं. मला फक्त ८-१० मुलं हवी होती, ती आली... त्यांच्या आयांनी त्यांना पावडर लावुन, नवीन कपडे घालुन पाठवलं होतं. त्या सगळ्या मुलांमध्ये मला १३-१४ वर्षांपुर्वीची मी दिसत होते. सगळं आटपल्यावर मी त्या पोरांना एकत्र केलं आणि प्रत्येकाला कॅमे-यासमोर नाव आणि इयत्ता सांगायला लावली.... फ़िल्मच्या credits ची वेळ वाढणार होती ह्यामुळे..पण मला चालणार होतं... हे दरवेळी जमेल असं नाही, पण ह्यावेळी हे माझ्या हातात होतं.. उद्या त्यांना CD दिल्यावर मी दिसलेच नाही ह्याचं वाईट नाही वाटणार कोणाला...

उद्या चुकुन-माकुन मी झाले कोणी मोठी...तर माझ्या filmography मधे सर्वात आधी मी ’साज’ चं नाव नक्की लिहिन. :)