Monday, June 10, 2013

वरच्या मजल्यावरची ती...

"आणि माझ्यानंतर?" वर्षाने हातातला पेपर खाली ठेवत विचारलं...
 "वरच्या मजल्यावरच्या तिला"  अभिने उत्तर दिलं...
"काय्य?" वर्षाने जरा जोरातच विचारलं...

शेजारी उभ्या असणार्या नर्सने डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं... नर्सनी अभिला एका छोट्या डबीतून रंगीबेरंगी लहान मोठ्या ५-६ गोळ्या  भरवल्या. पाणी भरून ग्लास तिने तयार ठेवलेलाच होता.
"वशे ह्या बयेला विचार कधी थांबवणारे हि हा अत्याचार?"
 वर्षा नर्सकडे बघून कसनुसं  हसली..

"Is he talking about me?"

"Oh.. nothing.. he is just kidding..." ती नर्सकडे बघत म्हणाली आणि परत अभिकडे मोर्चा वळवला  "you are kidding right?? वरची बाई?? कुठली वरची बाई? आणि ती कुठे आली मधून? "

नर्स मधेच अभिला म्हणाली.. "whatever it is...you better be kidding man... because right now,  your wife looks pretty angry to me"
वर्षा परत खोटं खोटं हसत नर्सला म्हणाली.. "oh no..he is just being his ass self as usual"
"naughty you..." म्हणत नर्सने अभिला एक चापटी मारली आणि खोलीबाहेर पडली...

 अभि हसायला लागला "त्या बयेला खूपच आवडतेस तू , आणि तुही किती नाटकी बोलतेस तिच्याशी"
"हसू नकोस.. नाटकंही नको करूस आता... कोण वरची ती? काय बोलतोयस तू?"

हॉस्पिटलच्या कोपर्यातल्या स्पेशल रूममध्ये अभि बेडवर पडलेला होता... सगळी खोली सुतकी पांढरी दिसत होती फक्त वर्षांनी आणलेली लाल भडक गुलाबाची फुलं खोलीतली monotony मोडत होती. वर्षा बेडजवळच्या खुर्चीत पोक काढून, पाय बेडवर अभिच्या पायाला लावून बसलेली होती. खरं तर तिला अभिचं उत्तर ऐकून राग आला होता पण ती इतकी दमलेली होती कि ताठ बसून भांडायचीही शक्ती नव्हती तिच्यात...

"आपल्या घराच्या वरच्या घरी राहते ती..." अभि बोलायला लागला..
"नाव काय आहे तिचं? आणि ती का?" वर्षांनी परत विचारलं...
"बाई, बोलू देशील का मला?? सांगतोय ना... तिचं नक्की नाव नाही माहित मला... थांब आता मध्ये काही बोलू नकोस, ऐक फक्त... खूप टोमणे सुचत असणारेत तुला ठाउके मला.. पण ऐक फक्त आत्ता.. "
वर्षा काही न बोलता नुसती बसून राहिली..
"अगं वेडाबाई... खरंच नाही ठाऊक मला तिचं खरं नाव, तिचा नवरा तिला मिष्टी म्हणतो कधीतरी.. परवा एकदा राशोगुल्ला म्हणाला होता... म्हणजे नक्कीच भारतीय आहेत ते.. आणि बंगालीच जास्त करून.. "
"तू त्यांचं बोलणं ऐकतोस? "
"नाही राव.. ते बाल्कनीत बोलत असले तर येतं अंधुकस काहीबाही ऐकू.. मी कशाला मुद्दाम ऐकू?"

"पण तरी अभि... "
"श्श... थांब बोलू दे...कदाचित creepy वाटेल तुला जरा..पण तरी ऐक..  सकाळी आपल्या आधीच उठते ती.. आपल्या बेडरूमच्या खिडकीवर त्यांची बाल्कनी येते, तिथे उभी राहून गुणगुणत असते, मला वाटतं झाडांना पाणी घालत असते ... मोगऱ्यासारखं झाड आहे एक त्यांच्याकडे... मधूनच कधीतरी सुंदर वास येत असतो त्या फुलांचा... अंघोळ झाल्यावर smoke detectorsना चुकवून कधीतरी चंदनाची उदबत्ती लावते ती बाल्कनीत... तेव्हाही मस्त वाटतं...

सकाळी सकाळी कुकर लावते मग ती , तू ३ शिट्ट्या करतेस ना? ती ५ करते... आणि जवळजवळ रोज नॉनव्हेज असतंच... एक विशिष्ट वास येतो ना रोज नॉनव्हेज खाणार्यांच्या घरात तसा वास येतो त्यांच्याकडून,  आपल्या किचनच्या बाल्कनीत उभं राहिल्यावर... खूप पळापळ चालू असते सकाळी तिची, तू इथे कामावर जायच्या तयारीत असतेस तेव्हा ती वर नवर्याला आणि मुलाला शाळा-ऑफिसात पाठवायच्या तयारीत असते.. मला वाटतं मुलाला सोडायला जाते ती शाळेत , कारण १० वाजेपर्यंत काहीच आवाज नाही येत त्यांच्याकडून.. तू ९:३० निघाल्यावर मी नुसता पडलेला असतो बराचवेळ , ती घरी आल्यावर बसतो मग ... मी मध्ये म्हणत होती ना, तुला चांदीचे पैजण घेऊया... ती घालते.. हलकासा आवाज येतो अधूनमधून.. गोड वाटतो खूप.. २ आठवड्यांपूर्वी एक पैजण तुटलं असावं तिचं, कारण हल्ली एकाच पायात असतं पैजण तिच्या.. हे माझं मानसिक असेल, पण ती एकटी असताना जास्त हलकी पडतात पावलं तिची.. मोकळी खूप.. कधीमधी नाचतेसुद्धा ती जरासं... काहीवेळा दुपारी मोठ्याने गाणी लावते...

११:३०-१२ ला अंघोळीला जाते ती.. "

"अभि? हे अति होतंय.."

"ऐक.. मला आवाज येतो , इथली अपार्टमेंटच तशी आहेत वशा...पाण्याचा आवाज येतो, खुपवेळ चालू असते अंघोळ तिची... तासभर वगैरे आरामात..."

"मग तू जातोस का तिला टॉवेल द्यायला?"

अभि हसून म्हणाला "वर्ष्या... ऐक ना... नाही जात मी , मी नाही भेटलोय अजून कधीच तिला...तिचा आवाज ऐकलाय फक्त..सोमवारी ती डिशवाशर लावते.. बुधवारी आख्खं घर vacuum clean करते...शनिवार-रविवार बर्याचदा बाहेरच असतात ते लोक.. तिचा मुलगा घरी आला ना कि प्रचंड धावपळ चालू असते त्या दोघांची.. मुलगा आणि त्याच्या मागे ती.. संध्याकाळी परत स्वयपाकघरात फिरत असतात पावलं तिची बराचवेळ.. परत ५ शिट्ट्या...मला माहित नाही रात्री आवाज का नाही करत ते जास्त बेडरूममध्ये , ते काही करतच नाहीत कि मोजूनमापून करतात ठाऊक नाही.. पण नाही ऐकले तसे आवाज कधीच..

आठवतं आपण इथे राहायला आल्यावर किती वैतागलो होतो तेव्हाच्या वर राहणाऱ्या चायनीज कुटुंबाला.. सारखे धावपळ करायचे, सामानाची हलवाहालव आणि त्यांचा आवाजी सेक्स... ते गेल्यापासून खूपच शांत वाटायला लागलं होतं मला... ही लोकं राहायला आल्यापासून चांगलं वाटतं आहे आणि जास्त आवाजही करत नाहीत..पण मला चाहूल लागते हल्ली, सवय झाल्ये कानांना अंदाज घ्यायची..

वर्षा.. त्या  Accident नंतर, माझं हे असं झाल्यापासून तू दिवस-रात्र एक करून काम करत्येस, ऑपरेशनसाठी इतके पैसे उभं करणं कठीण आहे हे कळून-सवरूनही वेड्यासारखी राबतेस  माझ्यासाठी दिवसभर, आणि रात्री येऊन रडतेस  , मला वेळ देऊ शकत नाहीस म्हणून वेड्या... पण तू नसताना नकळत हि वरची बाई सोबत करते  मला... आधार होता मला तिच्या आवाजाचा... तिला माहितीही नसेल मी असतो खाली तिचा आवाज ऐकत...

तू विचारत होतीस ना,उद्या डॉक्टरांनी डोळ्यावरची पट्टी काढल्यावर , दिसायला लागल्यावर सर्वात आधी कोणाला पाहायचं?
तू  पहिली.. कारण सगळं ठाऊक असूनही तू माझ्या सोबत राहिलीस..
वरच्या मजल्यावरची ती दुसरी... कारण काहीच ठाऊक नसून तिनी माझी सोबत कधीच सोडली नाही..