Wednesday, April 30, 2008

गिचडी

अलिबागच्या घराबाहेरच्या झोपाळ्यावर बसुन आम्ही चौघं गप्पा मारत होतो. आई,बाबा,दिपु आणि मी असं एकत्र बसुन गप्पा मारायची वेळ हल्ली जास्त कधी येतचं नाही! कोल्हापुरला घेतलेल्या नवीन घराबद्दल बाबा सांगत होते. रत्नागिरी, अलिबाग, पुणे आणि आता अजुन एक घर कोल्हापुरात! दिपीका म्हणते तसं बाबांना नवीन घरं घ्यायचा छंदच आहे! घर घ्यायचं म्हणजे सोप्पं का काम आहे? बाबानी नवीन घर घेतल्यावर मलाच टेन्शन येतं...ते हफ्ते, व्याजदर, कर्ज ह्या सगळ्या शब्दांची मला भीती वाटते! का कोण जाणे पण एकदम आम्ही आता गरीब झालोय असं वाटायला लागतं!

देवाच्या दयेने, बाबांच्या मेहेनतीमुळे आम्ही खात्या-पित्या घरात आहोत. महिन्याची टोकं जुळवायला आम्हाला कष्ट करावे लागत नाहीत की आमची स्वप्नं झाकुन ठेवावी लागत नाहीत... rather लहानपणापासुन कशी आणि कोणती स्वप्नं बघावी ह्याचं व्यवस्थित ज्ञान मिळालं आहे आम्हाला. तरीही त्यादिवशी गप्पा मारताना अचानक आई म्हणाली, "काय गरज आहे नवीन घराची तेही कोल्हापुरात? मुलींच्या admissions, त्यांची शिक्षणं, ह्या जुन्या घराचं काही काम... हे सगळं सोडुन नवीन घर का? एका घराचं कर्ज फिटल्यावर लगेच डोक्यावर नवीन कर्ज असायलाच हवं का?"
ह्यावर बाबांचं ठरलेलं उत्तर "कोल्हापुर- रत्नागिरी आणि पुण्याच्या मध्ये, अंबाबाईचं गाव,नियोजित IT-park....घर म्हणजे investment.. कर्ज आणि टॅक्स-बेनेफिट...बाकी मुलींच्या शिक्षणासाठी इतके-इतके सेविंग्स.... वगैरे वगैरे" आजपर्यंन्त बाबांकडुन हे सगळं अनेकदा ऐकलयं पण डोक्यात कधीच काही गेलं नाही! कळत नाही अश्यातल्या भाग नाही आहे, पण पैसे-भविष्य-शिक्षण-खर्च हे असं काही ऐकलं की डोक्यात वेगळीचं चक्र सुरु होतात...आणि मग आजुबाजुला काय चालु आहे त्याच्याशी जास्त संबंध राहात नाही मग माझा!

त्याचदिवशी बाबांनी ही सुद्धा आठवण करुन दिली की येणारा ऑक्टोबरमधला वाढदिवस हा त्यांचा ५०वा वाढदिवस आहे, आणि त्यानंतर ते नोकरी सोडणारेत, त्यांना आता नोकरीत गुरफटुन राहायचं नाहीये. वर्षांपुर्वी त्यांनी पाहिलेली स्वप्नं आता त्यांना जगायच्येत. आईचं पुन्हा "मुलींची शिक्षणं, त्यांची लग्नं" वगैरे बोलुन झालचं! मी मात्र तेव्हापासुन आत्तापर्यंत शांतच आहे.

एकीकडे डोळ्यासमोर त्या कुठल्यातरी पॉलिसीची जाहिरात येत्ये...छोटा मुलगा, तलावात उडी मारायच्ये त्याला पण आई-बाबा नकॊ म्हणताय्त! तोच मोठा झालाय.. बॉसची बोलणी खातोय, संताप अनावर झालाय, ह्या क्षणी नोकरी सोडावीशी वाटत्ये पण डोळ्यासमोर त्याची प्रेग्नंट बायको येते, तिच्यासाठी आणि होणा-या मुलासाठी राग गिळुन हा गप्प होतो. नंतर काही वर्षांनंतरचा हा नवी गाडी घ्यायला आलाय, त्याला हवी तशी नवीन मस्त गाडी... पण त्यात चढायच्या आधी त्याला दिसताय्त त्याची शाळेत जाणारी मुलं, आत्ता त्यांच्यासाठी आपण आपली हौस मारायलाच हवी...इतकी वर्ष दुस-यांसाठी जगल्यावर आता स्वत:साठी काही जग असं सांगणारी ती जाहिरात परत एकदा म्हातार्या त्याला लहानपणीच्या तलावापाशी आणुन सोडते त्याने न घेतलेल्या गाडीतुन.. आज त्याला स्वत:साठी जगायचं आहे कोणाची पर्वा न करता... आणि तो आनंदाने तलावात उडी घेतोय.

बाबाही असंच सतत आमच्यासाठी जगुन म्हातारपणी का त्यांची उरलीसुरली स्वप्नं जगणारेत? आमच्यासाठी त्यांनी त्यांच्या हौसेवर पाणी फिरवणं म्हणजेच त्यांनी त्यांचं कर्तव्य निभावणं का? मुलं झाली की आई-बाबांनी मुलांसाठी जगायचं मग स्वतःच्या अश्या वेगळ्या आवडी-निवडी राहत नाहीत का? ज्या इच्छा होत्या त्या मुलांकडुन पुर्ण करुन घेतल्याने खरचं समाधान मिळतं का? आई-बाबानी आमच्यासाठी काही त्याग केला तर ते त्यांचं कर्तव्यच असतं आणि मुलांना त्याग करावा लागला तर तो त्यांचा कमीपणा... असं का राव?

कोल्हापुरच्या घराची आज आम्हाला गरज नसेल वाटत.. पण मग आम्ही बाबांकडॆ हट्ट करुन मागितलेल्या अश्या कित्येक गोष्टी विनाकारण होत्या... फक्त एक हौस म्हणुन घेतलेल्या...

डोक्यात प्रचंड गिचडी होत्ये प्रश्नांची, विचारांची! बरोब्बर एका वर्षापुर्वी होते तिथे परत गेले आज... पुढचं शिक्षण की काम?
बाबांनी आमच्यासाठी-त्यांच्या आईबाबांसाठी नोकरी केली पण आम्ही नोकरी करायची नाही ही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे नोकरी नाही पण काहीतरी काम करावं असं मला गेल्यावर्षी वाटत होतं. मास्टर्स केलं काय नाही केलं काय...अश्या विचारांची होते मी! बाबांना मास्टर्स करता आलं नाही निदान आम्ही तरी करावं ही त्यांची इच्छा मी पुर्ण करत्ये! आता तर परदेशात उडायची तयारी सुरु झाली आहे... पण बाळा आता तू मोठी झालीयेस गं, येता पावसाळा २२वा पावसाळा असणार आणि अजुनही मी कोणासाठीही काहीचं करत नाही आहे.मी घरातली मोठी मुलगी आहे..आता बाबांबरोबर मीसुद्धा जवाबदारी शेअर करायला हवी पण मला माझ्या उडण्याच्या स्वप्नांमधुन वेळ कुठे आहे? मी पुढे शिकल्याने त्यांना अभिमानचं वाटणारे... आपल्या मुलींनी खूप शिकावं हेही त्यांचं स्वप्न आहेच ना? पण परत एकदा हा प्रश्न समोर येतोच आहे.. पुढे शिकायचं की काम करायचं?

त्यादिवशी एका मैत्रिणीची आई म्हणाली "मध्यमवर्गात हे उच्चशिक्षण वगैरे मुलींना जमणारे नखरे आहेत... मुलांना घराची जबाबदारी असते" तसं त्यांच्या सगळ्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही पण हे खटकलं.. का बुवा असं का? माझ्या आईबाबांना दोन्ही मुलीच आहेत त्यामुळे त्यांना मदत करण्यात, घर चालवण्यात माझाही वाटा असणारचं ना? मी मुलगी म्हणुन मला काही कर्तव्यचं नाही का? असं का? ह्याला काय अर्थ आहे? फक्त चांगला मुलगा "गटवुन" त्याच्याशी लग्न केलं म्हणजे झालं का माझं काम? माझे आईबाबा आनंदी का?

माझ्या त्याला हे सगळं सांगितलं.. तर किती हसत हसत त्याने उडवुन लावलं "तुम बहोत पागल हो.. कुछ भी सोचती हो! ये सब बातें बादमें सोचेंगे..पहेले US आ जाओ!" त्याच्या आई-बाबांचं स्वप्नं मुलाने US मधे राहावं.. तो ते करतोय, माझ्या आई-बाबांना काय वाटतयं ते इथे consider होणारे का?

परवा call-center मधे काम करणारी एक मैत्रिण म्हणाली "अजुन किती दिवस आपण कोणावर depend राहाणार? स्वतःपुरतं स्वतः कमवायला हवं" फक्त स्वतःपुरतं? आईबाबांना आपल्याला वाढवायला खरचं इतका त्रास होतोय का? ती घरखर्चात हातभार लावत नाही हे मला माहित्ये...पण मग २-३ KT लावुन घेवुन, एक ना धड करत, स्वतःपुरतं जगण्यासाठी हा असा अट्टाहास करावा का?

परवा बाबा म्हणाले आता तू आणि आम्ही काय काही दिवसांसाठी एकत्र, मग तू जाणार त्याच्याकडे, कुठे येणारे मग इतका संबंध? अरे.. म्हणजे काय? झालं तुटणारे का आता नातं जमिनीशी आणि माणसांशीही? असं कसं होऊ शकतं? मग मी काय फक्त माहेरवाशिण म्हणुन यायचं का घरी? मुलींना इतक्या easily परकं धन वगैरे मानता येतं का?

हे प्रश्न जितका विचार करु तितके वाढत जाताय्त! उत्तरं कशाचीच नाहीत...
माझी स्वप्नं, त्यांच्या इच्छा... माझ्या इच्छा, त्यांची हौस... मुलगी-मुलगा... नोकरी-काम-शिक्षण...अमेरिका-भारत... तो की बाबा... त्याचे आईबाबा आणि माझे आईबाबा... माझ्या capabilities आणि माझ्याकडुनची expectations... गिचडी सगळी गिचडी!
मी मधोमध उभी राहायचा प्रयत्न करत्ये आणि माझ्याभोवती ही वेटोळी वाढत जातायेत...
पाटीवरची गिरमीट वाढत जात्ये..जोपर्यंत ही पाटी पुसली जात नाही मनाला शांती मिळणार नाही...

Friday, April 4, 2008

जे जे उत्तम!

केतनने खो दिला खरा, पण इतक्यात तो घ्यायचा विचार नव्हता...
सध्या ब्लॉग आणि अभ्यासाची पुस्तकं सोडता काहीच वाचन चालू नाहीये! :(
त्यातलचं एक पुस्तक (वाचत होते रेफ़रन्स म्हणुन, पण अभ्यासाचं पुस्तक नाही), त्यातलाच एक आवडलेला उतारा....

.............

सर्वसाधारणपणे आवडणारी कामेही काही जण पाट्या टाकल्यासारखी करतात, तर अगदी कंटाळवाण्या कामातही काही जण लय कशी उत्पन्न करतात याचे रहस्य, ’आता-इथे-या क्षणी’ मधे आहे.

एका मोठ्या फॅक्टरीच्या परिसरामध्ये मी उभा होतो.माझ्या शेजारीच लाल दगडांचा लांबसडक फूटपाथ होता. एक सफाई कामगार तो फूट्पाथ साफ करत होता. दिवस पावसाळ्याचे होते. ब्रश, पावडरचा डबा, बादली, पाण्याचा पाईप अशा आयुधांनिशी तो कामाला भिडला होता, त्याच्या हालचालींमध्ये लय होती.मग्न होता कामामध्ये. त्याचा चेहरा तल्लीन होता... मला तो कबीरासारखा भासला, थोडा बहिणाबाईसारखा. मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्याकडे पाहुन हसलो. त्याने प्रतिसाद दिला. मी म्हणालो, " किती रंगुन काम करताय तुम्ही...छान वाटतंय तुम्हाला पाहतानाच."

तो चकित झाला. त्याला कदाचित अशी दाद या आधी कुणी दिली नसावी. "आता हे काम करताना तुमच्या डोक्यात काय विचार चालले होते, सांगू शकाल?" मी विचारले.

"कुठले विचार, साहेब... काही नाही..., नुस्तं काम करत होतो... दुसरं काही नाही" तो बावचळला.मीही ताणून धरले नाही. तो त्याच्या कामाला लागला. मी मला न्यायला येणार्या वाहनाची वाट पाहायला लागलो. काही मिनिटे तशीच गेली.

"साहेब... गावला... सापडला... विचार" तो मला म्हणाला. मी पुन्हा त्याच्याजवळ गेलो. "ऐका... या समद्या लाद्या साफ करत करत मी त्या टोकाला पोचन ना... तवा पाठी वळून बघनं...अन म्हनेन...चकाचक.. हा फूट्पाथ मी साफ क्येलाय." तो म्हणाला..मी मान डोलावली. " आणि हे मला तिथं ताठ मानेनं म्हणायचं तर मला आता हा दगड पयला चकाचक नको करायला... शेवटी हा रस्ता आख्खा बनला कसा... दगडांनीच का न्हाय!" मला त्याच्या कबीरपणाचा पुरावा ’त्या-क्षणी’ देत तो म्हणाला.

अशी गंमत आणणारे पानवाले असतात, भेळवाले असतात, शहाळी सोलणारे मलबारी असतात, भजी तळणारे असतात, चहा करणारे असतात, केबल खेचणारे असतात, पॉलिश करणारे असतात, केस कापणारे असतात... तिकिटे फाडणारे कंडक्टरही असतात... प्रत्येक क्षणाला ते जिवंत करतात.

अनुभवांशी समरस होणारी ही मंडळी, ते करत असलेल्या प्रत्येक कृतीला ’चव’ आणतात. आपण त्यांचे कौतुक केले तर ते आनंदतात जरुर, पण आपण कौतुक करावे म्हणून ते काहीही करत नसतात.


स्वभाव-विभाव
डॉ. आनंद नाडकर्णी