Wednesday, July 16, 2008

कपाट-पुराण! १ (कपड्यांचं कपाट)

आज अचानक "दार उघड्ल्यावर उतु जाणारं" माझं कपाट आवरायला घेतलं. कित्ती दिवसांपासुन त्यात कपडे कोंबलेले होते. घरात इतके हॅंगर पडलेले आहेत, पण आजपात्तुर त्यांचा आणि माझ्या कपड्यांचा कधी संबंध नाही आलेला. म्हणजे असेल जर मुड तर मी कपड्यांच्या घड्या घालते कधी-तरी..खोटं का बोला? पण माझ्या अंदाजाने मी कपाटाचं दार बंद केल्यावर कपडे एक्मेकांशी खेळत असावेत किंवा मारामारी करत असावेत कारण मी कपाटाचं दार उघडलं रे उघडलं की एकतरी कपडा कपाटातुन खाली उडी मारतोच!

लोकांची छान आवरलेली, सगळ्या कपड्यांच्या मस्त घड्या घातलेली, कपाट उघडल्यावर डांबराच्या गोळ्य़ांचा वास येणारी, लॉक करुन ठेवलेले ड्रॉवर असणारी कपाटं पाहिली की मला उगाच गुदमरल्यासारखं होतं, लाजही वाटते, हेवाही वाटतो, रागही येतो! राव..कसं काय जमतं हो असं? स्वच्छ आणि व्यवस्थित..आवरलेलं! माझं कपाटही असतं बरं असं.. पण मी आवरण्याचा प्रयत्न केल्यावर पुढचे २ दिवस फक्त! "आम्ही कोणाचे कपडे आहोत हे आमच्याकडे बघुन कळायला नको का? म्हणुन तर आम्ही असा गोंधळ घालतॊ" इति आमचे कपाटातले कपडे! म्हणतात ना गुण नाही पण वाण.... असो! :)

तर आज असं कपडे आवरायची सु/दुर्बुद्धी झाल्याचं कारण म्हणजे, काल कॉलेजला निघायला उशिर झाला होता (duh...बाळ काहीतरी वेगळं सांग) मी कपाट उघडलं आणि घालण्यालायक एकही संपुर्ण ड्रेस नाही मिळाला. एकाचा "वरचा" टॉप मिळाला तर सलवार नाही; एकाची चुणीदार तर टॉप नाही... दोन्ही मिळालं तर ओढणी नाही, ज्याची ओढणी आहे त्याचं बाकी काही नाही... जिन्स मिळाली पण सगळे कुर्ते आणि शर्ट एकतर मळलेले नाहीतर चुरगळलेले... काही मिळालेले पुर्ण कपडे हे सध्या थोडं बारीक झाल्यावर घालायला ठेवुन दिलेले... मग लक्षात आलं अरे आपल्याकडे तर अर्ध्याहुन अधिक कपाट हे "बारीक झाल्यावर घालयचे" किंवा "घरात घालायचे" ह्या लेबलचेच आहेत! आणि तिथेच बसकण मारली... कपाट आवरायचंच हे ठरवुन!!

हे जेव्हा माझ्या मैत्रिणीला सांगितलं तेव्हा म्हणाली.." तू मुलीचा जन्म वाया घालवलास, फॅशन कशाची खायची हे तुला माहित नाहीये, ते आख्खं कपाट रिकामं कर आणि माझासोबत शॉपिंगला चल". का राव? फॅशन-बिशन काय? लोकं फॅशन का बघतात? मॅचिंग काय असतं? हे त्याला सुट होतं.. ते त्याच्याबरोबर छान दिसत नाही.. ते कपडे तिला शोभत नाही.. व्वॉव कुठुन घेतली कुर्ती? कित्ती cute!? ..,ए तिचा टॉप बघ काय गोंडस आहे.. काय styleमारु कपडे आहेत तिचे... तिच्या टॉपचं कापड कमी पडलंय.. पोतेरं घालते ती.. हे तंबुच कापडं का घातलंय? तुला ना फॅशनचा सेन्सच नाही! out of fashion आहे हा प्रकार आता...ई तिने बघ जीन्स घातल्ये आणि कपाळावर टिकली लावल्ये! रंग, मटेरिअल, प्रकार, कट, texture इत्यादी इत्यादी सगळ्या बाबतीत ह्या मुली कितीही वेळ बोलू शकतात! सोनेरी हरिणाच्या फॅशनेबल कपड्यांसाठी जिथे खुद्द सीता हट्ट धरुन बसली तिथे तिच्या नाती-पणतींविषयी काय बोलावं?

पण मला नाही कळत राव हे काही! आजतागायत "फ़ॅबईंडिया मधुन घेतलेल्या ६०० रुपयांच्या कुर्त्याचा माज करावा की तसाच पण थोडा हल्का कुर्ता तुळशीबागेतुन कसा घासाघीस करुन स्वस्तात मिळवला ह्याची फुशारकी गाजवावी" हे मला न सुटलेलं कोडं आहे! मला मुलीपेक्षा मुलगा होणं जास्त आवडलं असतं ह्याचं हे एक कारण आहे!

so back to my कपाट! असे कितीतरी कपडे आहेत जे घालायच्या पलीकडे गेले आहेत, पण टाकवतच नाहीत! ठाण्याला न्यु ईंग्लिश मधल्या प्रदर्शनातुन घेतलेला कॉटनचा निळ्या माशाचं डिझाईन असणारा कुर्ता, हिमालयात ट्रेकला सलग ८ दिवस घातलेला बारीक फुलांची नक्षी असणारा हिरवा पंजाबी ड्रेस, माझी पहिली..अगदी पहिली blue faded jeans, कधीतरी आपण खूप बारीक होऊ आणि मग घालू म्हणुन ठेवलेला गुलाबी झगा (त्या प्रकाराला काय म्हणतात मला ठाऊक नाही), दादरला रस्ता क्रॉस करत असताना BEST आणि टॅक्सीच्या मध्ये येउन, टॅक्सीच्या कुठल्याश्या टोकदार भागात अडकुन फाटलेला नवा-कोरा बांधणीचा ड्रेस जो कधीच घालता येणार नाहीये! ही आणि अशी अजुन काही मंडळी कपाटात जागा अडवुन बसल्यावर नव्या कपड्यांना जागा होणार कशी? मग ते बाहेर पसरले तर बिचा-या कपड्यांचं काय चुकलं?

तर आज हे सगळं आवरुन ठेवलं आहे, अत्यंत जड मनाने दोन जुने ड्रेस बाहेर काढले, माझ्यासोबत खुप दिवस होते! एक तर माझा लकी ड्रेस होता... तो घालुन कित्ती स्पर्धा जिंकले होते! पण काय करणार...कपाट आवरायचं होतं ना! आज कपाट आवरताना थोडं स्वतःचं मन आवरायचाही प्रयत्न केला... मी कशी दिसत्ये त्यापेक्षा मला काय comfortable वाटतं आहे, हे मला जास्त महत्वाचं वाटतं...मला काय आवडतं हे मला किंमत आणि स्टेटस किंवा फॅशनपेक्षा जास्त महत्वाचं आहे! मला माझा एक मित्र दहा जणांमध्ये "फॅशनची औरंगजेब" म्हणाला होता, तेव्हापासुन बरीच मॅगझिन्स चाळली, पेपेरमधल्या पुरवण्या आणि फॅशन टिप्स वाचल्या, नेटवर अनेक साईट्स धुंडाळल्या... पण नाही काही जमत स्वतःला बदलायला, rather नाही पटत... हवं तर माझा आळशीपणा असेल हा, कंटाळा असेल न बदलायचा किंवा कदाचित काहीवेळा "मी वेगळी आहे" हे दाखवायचा अट्टाहास?!

माहित नाही!
मी आहे तशी सुखात आणि आवरलेली आहे... आत्ता माझं कपाट दिसतयं तशी!
छान आणि शहाणी!