Thursday, July 30, 2009

म्याव २

करड्या आणि ताई जोरजोरात ओरडत होते. आई कुठे गेली आहे, का गेल्ये हे त्यांना अजुन कळलं नव्हतं. मी त्यांना सांगणार होते, आई आपल्याला सोडुन गेल्ये म्हणुन पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नसता. मी त्यांच्याकडे बघत शांतपणे बसुन होते. पिंगळी मावशीची वाट बघत होते मी. आई तिला नक्कीच सांगुन गेली असेल. मावशीला माहित असेल बहुतेक सगळं!

.... कितीत्तरी वेळ झाला होता. आता मी जिथे बसले होते...तिथे माझ्या अंगावर उन यायला लागलं होतं. ओरडुन ओरडुन करड्या आणि ताई दमले. करड्या तर माझ्या जवळ येउन ऊन खात झोपला. ताई जागीच होती पण ती नुस्ती बसुन होती, काहीही न बोलता. एकदम शांत! मला एकदम ती आईसारखी वाटली..मला आता रडु येणार होतं म्हणुन मी ताईच्या जवळ जाऊन बसले. तिला चिकटुन बसले अगदी. मी जवळ आलेलं तिला मुळ्ळीच आवडायचं नाही पण आत्ता ती काहीच बोलली नाही. माझ्याकडे एकदाच पाहिलं...मग डोळे मिटले आणि दुसरीकडे मान फिरवली. थोडी आक्रसुन बसली आणि एकदा जोरात शेपटी हलवली. मला ती लागली. बहुतेक तिला सुचवायचं असेल की जरा लांब बस. पण मी तिला चिकटुनच बसले. अजिबात हलले नाही. आईची आठवण येत होती आता मला खूप... खूप म्हणजे खूप जास्त...मी ताईच्या अजुनच जवळ सरकले, तिच्या पोटात माझं डोकं घासत जवळ गेले. आईसारखी ती पण उबदार होती..पण आई नव्हती... आई काल रात्री नक्की काय सांगत होती आपल्याला? आई परत येणारे ना? ती परत येईपर्यन्त आता मी ताई आणि करड्याचं ऐकायचं असं ठरवलं होतं.

आम्ही बसुन होतो. मधेच २-३ कावळे उडत जायचे. कावळा गेला की ताई फक्त एकदा माझ्याकडे आणि करड्याकडे बघायची. मग परत डोळे बारीक करुन बसायची. कावळ्यांना आम्ही दिसत नसणार. आईने आम्हाला अश्याच जागी ठेवलं होतं..जिथुन आम्हाला सगळं दिसायचं पण आम्ही कोणाला सहज दिसत नसु. आम्ही एका माणसाच्या घरात राहत होतो. त्याच्या खिडकीपाशी आईने ठेवलं होतं आम्हाला. पण मी आजवर माणुस हा प्राणी पाहिला नव्हता. कारण आम्ही राहत होतो त्या घरात कोणीच माणुस राहायचा नाही. पिंगळी मावशी मात्र एका घरात राहायची जिथे माणसं पण असायची. करड्या म्हणाला होता "माणसांनी पाळलं आहे तिला". म्हणजे काय ते मला कळलं नव्हतं. करड्याने समजावलं होतं मग..."अगं म्हणजे ना...माणसं आपल्याला खायला-प्यायला आणुन देतात. आपल्याला खेळण्यासाठी कोणीतरी मिळतं. आपला वेळ चांगला जातो. आपण आराम करायचा..काही हवं असेल तर माणुस करतो. हवं तेव्हा फिरुन या, हवं तेव्हा उन्हात मस्त एखादी झोप काढा...ते नको असेल तर माणसांच्या जवळ जाऊन झोपा... कसली काळजी नाही..काही काम नाही." मी विचार करत होते...आपल्याला पण माणसांनी पाळायला हवं ना... तेवढ्यात करड्या म्हणाला होता " मला नकोय पण कोणी माणुस-बाणुस..मी स्वतः खाणं शोधेन, शिकार करेन, माझ्या जागेत राहेन... असं सगळं काम करायला माणुस काय ठेवायचा?.. आपलं आपलं मस्त जगायचं" मी आपलं बघत बसले त्याच्याकडे... तो किती हुशार होता. ताई किती मोठ्या मांजरी सारखी वागायची... मीच अशीच... ते म्हणतील तसं वागणारी...तसा विचार करणारी!

आता भुक लागत होती. सूर्यपण दिसत होता खिडकीतुन. आई नाही तर आपण खाणार काय? अरे बापरे...हा विचार मी केलाच नव्ह्ता की... ताई आणि करड्याला पण भुक लागली असावी आता. ताई एकदा इथे-तिथे फिरुन आली. करड्या बाजुच्या एका दोरीशी खेळत होता. "साप-जनावरं वगैरे पकडायची सवय करतोय" असं म्हणणं असायचं त्याचं. त्या दोघांनी ह्याआधी किडे खाल्ले होते. मीच अजुन आईचं दुध सोडुन काही खाऊन पाहिलं नव्हतं. मला काही खाताच आलं नाही तर? काय होईल माझं? मला दुध कसं मिळणार? मला एकदम भीती वाटायला लागली. आई कुठे गेली असणारे? मला अचानक वाटायला लागलं, एखाद्या माणसाने येऊनच आपल्याला न्यायला हवं.

तेवढ्यात पिंगळी मावशी आली. आम्ही तिघंही टुणकन उड्या मारुन बसलो. ती खास काही बोल्ली नाही. माझ्याकडे पाहिलं फक्त तिनं..एकदम विचीत्र नजरेनं. ताईजवळ जाऊन तिने ताईला चाटलं. मग करड्याकडे बघत म्हणाली. "भुक लागली का?", मला खरं तिच्याजवळ जायचं होतं. तिला सांगायचं होतं.."मावशी तुला माहित्ये ना... ते मलाही माहित्ये बहुतेक"..पण ती तिथुन गेली. "मी येते काहीतरी खायला घेउन..मग पुढे काय करायचं ते बघु आपण... मी आल्यावर आपण इथुन निघणारोत" असं सांगुन गेली.

करड्या एक्दम गुरकावला... "म्हणजे काय? आई कुठे आहे? काय झालं आहे? आपण का जायचं इथुन?" त्याचे डोळे मोठ्ठे झाले. अंगावरचे सगळे केस उभे राहिले. शेपुट फुगली त्याची..त्याने नखं बाहेर काढली... "ही मावशी वाईट्ट आहे" . ताई एकदम ओरडली त्याच्यावर.. "करड्या... शांत बस. आई आपल्याला सोडुन गेली आहे. ती आता अशक्त झाली होती. आपल्याला सांभाळू शकत नव्हती. स्वतःला सांभाळायची शक्ती नाहीये तिच्यात...कदाचित परत येईल, कदाचित... आजपासुन मावशी आणि मी आहोत आई येईपर्यन्त!" मी बघतच बसले. ताईला कसं कळलं हे? ताईने माझ्याकडे बघितलं. पहिल्यांदा आपणहुन माझ्या जवळ आली. मला चाटलं... "छोट्या, जागी होते मी काल रात्री. मला माहित्ये सगळं..काळजी नको करु बाळा... मी आहे" मी माझी मान तिच्या अंगावर घासली आणि मला तिच्या डोळ्यात पाणी दिसलं.

...