Tuesday, September 7, 2010

परिवलन- परिभ्रमण

घरी आल्या आल्या आईला सांगितलं मला ३९ मिळाले भुगोलात आणि इतिहासात ४०... इतिहासातल्या पैकीच्या पैकी मार्कांकडे दुर्लक्ष करत आईचा पहिला प्रश्न आला होता, "भुगोलात एक मार्क कुठे गेला?" .. दप्तर दिवाणावर टाकत, टीव्ही लावुन मग पाणी पित असताना मी म्हंटलं "एक कुठलीतरी रिकामी जागा भरायची चुकली".. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात असं मी लिहुन आले होते...
"अश्याच बावळटासारख्या चुका करतेस तू कायम" आईने शिकरण-पोळीबरोबर अजुन हे असं आंबट-तिखट तोंडी लावणं दिलं असणार तेव्हा...

त्यानंतर पृथ्वीची परिवलनं-परिभ्रमणं होतं राहिली... आमचंही स्वतःभोवती फिरता फिरता दुस-यांभोवती फिरणं चालुच होतं.. कधी आई-बाबांभोवती, कधी आमच्या idols भोवती, मित्र-मैत्रिणींभोवती.. कधी एखाद्याच मित्राभोवती... दिवसांच्या रात्री झाल्या, रात्रींचे दिवस झाले...गोल फिरणं चालु राहिलं. केन्द्रबिंदुतला तारा बदलत राहिला..नवीन ता-यांबरोबर नवीन संदर्भ आले.. नवीन संदर्भांची नवीन स्पष्टीकरणं आली..कधी तारा तोच राहिला पण माझ्याच कक्षा बदलत गेल्या.. बुधापेक्षापण जवळ फिरले कधी तर कधी इतकी लांब गेले की मला प्लुटो ठरवत त्या सिस्टीमनी माझ्या ग्रहपणावरच घाला घातला..

२४वं परिभ्रमण सुर्याभोवतीचं पुर्ण व्हायला आलं आहे आता...पाव आयुष्य संपलं म्हणणार होते.. पण कोण जगतंय १०० वर्ष? श्या... १/४ पेक्षा जास्त आयुष्य संपलं की..च्यायला आत्ता कुठे कळायला लागलं आहे की दरवेळी परिवलन करताना परिभ्रमण करणं गरजेचं नसतं... इतके दिवस लागतात होय ह्या गोष्टी कळायला?? मग आजुबाजुच्या मैत्रिणींचे साखरपुडे साजरे करत फिरताना वाटतं आता परत कुठे नवीन कक्षा अ‍ॅड करा स्वतःसाठी? एखाद्या तुटलेल्या ता-यासारखं भटकु की जरा दिशाहीन...

पण असा संपतोय थोडीच हा भिंग-यांचा खेळ? मग ह्या भिंग-यांच्या खेळात नवीन भिंगरी येणार आता.. म्हणजे आई-बाबा लागलेत शोधायला.. भिंग-याची कित्ती ती दुकानं आणि कित्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भिंग-या...भिंग-यांच्या बाजारात भाव जास्त मिळावा म्हणुन मग नटुन-थटुन फोटो काय काढा, नोक-या काय बदला अन काय काय अजुन! त्यात scientific भिंग-यांना मागणी जास्त.. arts वाल्या भिंग-या फिरतच नाहीत जणु काही.. फिरत राहायचं पण आपण.. कधीतरी कुठेतरी कोणतीतरी सूर्यमाला आपल्याला घेईल त्यांच्यात, त्यांच्या सूर्याभोवती फिरायला..

हे सगळं डोक्यात चालु असताना, रात्री अंगणात उभं राहिल्यावर व्याध दिसतो मग आकाशात.. Sirius..सर्वात तेजस्वी तारा आपल्याकडुन दिसणारा... मग अचानक लहानपणी आकाशदर्शनाला गेले असतानाचा राम काकांचा आवाज ऐकु येतो "व्याध बायनरी स्टार आहे.. आपल्याकडुन एकच तारा दिसत असला तरी मुळात ते दोन तारे आहेत एकमेकांभोवती असणारे.. पण साध्या डोळ्यांना एकच दिसणारे" .. मग माझ्या चेह-यावर smile येतं.. मी घरात येते आणि झोपुन जाते.

उठते तेव्हा नवीन परिवलन सुरु झालं असतं.. पृथ्वीचं आणि आमचंही...
तेव्हा गेलेला १ मार्क मिळतोय की आता परत...