Sunday, October 11, 2009

तन्याच्या डायरीतली काही पानं

तन्मय बापट
चौथी अ
रोजनिषी
.........................................
७ सप्टेंबर २००८

आज मला कंटाळा आला. मी बाबाला म्हणाला मी शाळेत जाणार नाही. बाबा म्हणाला नको जाऊस, खाली गाड्या पुसायला लागतील कॉलनीतल्या लोकांच्या. बाबा वाईट् आहे. असंच म्हणतो कायम. बाबा मला आवडत नाही. मला म्हणाला की मी आता मोठा झालाय, आता मी शुरवीरासारखा एकटा झोपायला पाहिजे. मला तो एकटा पाडतो. तू झोप की शुरवीरासारखं दुस-या खोलीत. मी आणि आई झोपु एका खोलीत. आई पण बाबाच्या बाजुने बोलते. मी आजीला सांगणारे. मला आजीच आवडते. मी आज दाबेली खाल्ली. गणिताचा गृहपाठ राहिला आहे.
आता झोपेन एकटा. बाबाच्या आईला उद्या फोन करेन आता.
.............................................

२ ऑक्टोबर २००८
आजी आली आहे. मला सायकल घेउन देणार आहे ती ह्यावेळेला. बाबा नको म्हणाला पण आजी देणारे. बाबा म्हणाला, तनु लहान आहे.. मला कळतच नाही काही बाबाचं. मी पक्यासारखी सायकल घेणार आहे, गिअरवाली.. झूम..झूम शाळेत जाता येईल. रिक्षानी जायला जाम बोर होतं. त्या स्टुपिड मुली काहीही बडबडत असतात. त्या सायलीला बहिण झालीये म्हणे नवीन. पकाऊ..त्याबद्दलच सांगत असते. आणि सगळ्या मुली क्युट, स्वीट, कित्ती गोड म्हणत असतात. मी आणि आलोक त्यांच्या बॅगांचे पट्टे तोवर बांधुन ठेवतो. तेवढीच मज्जा येते. मी झोपतो आता आजीजवळ.
................................................

३० ऑक्टोबर २००८
आज काहीतरी घरात सॉलिड झालं आहे. मला कळलं नाही नीट. मी खेळुन आलो तर कोणी मला हात-पाय पण धुवायला सांगितले नाहीत. मी बाबाच्या लॅपटॉपवर जवळ बसलो तरी त्याने लक्ष दिलं नाही. जाम काहीतरी झालं होतं. आई आतल्या खोलीत होती. बाबा आणि आजी बाहेर.. आई बाहेर आली तेव्हा वेगळीच दिसत होती. रडल्यासारखी. मी सायलीला परवा ढकललं तेव्हा सायली अशीच दिसत होती. आजी लगेच मला घेउन आत आली. तनु आता ७ वर्षाचा आहे, कळतं का तुला? असं काहीतरी आई बोलत होती. बाबा काय बोलत होता ऐकु येत नव्हतं. काय झालं असेल? आजी पण काही सांगत नाही नीट.
.....................................................

९ नोव्हेंबर २००८
आज मी आणि आईने मज्जा केली खुप. आई शाळेत घ्यायला आली होती. मग आम्ही संभाजीपार्कात जाउन भेळ खाल्ली. तिच्यातल्या २ पाणीपु-यापण मी खाल्ल्या. नवीन टीशर्ट घेतले २. आईस्क्रिम खाल्लं. आणि हे सगळं झाल्यावर ती विचारत होती की बर्गर खायचा आहे का मेकडोनल्डमधला. मी नाही म्हणणार होतो पण मग आम्ही गेलो. आई वेगळीच वागते आता काही दिवस. मला काहीही विचारत होती. मला म्हणाली तुला एकट्याला झोपायला भीती वाटते ना? तर तुझ्याबरोबर झोपायला कोणी आलं तर? काहीही बोलत होती. पण मज्जा आली आज. आजीने अजुन सायकल आणली नाही आहे. बहुतेक आम्ही रविवारी जाउ.
......................................................

१३ नोव्हेंबर २००८
मी कोणाशीही बोलत नाही आहे. राग आलाय मला सगळ्यांचाच. सगळे खुप वाईट आहेत. मी नाही वागत का शहाण्यासारखा? मी त्रास देतो का कधी त्यांना? मी शाळेत जातो. मी ते सांगतात ते सगळं ऐकतो. सायकलचा हट्ट पण मी केला नाही सारखा सारखा. आजी आपणहुन म्हणाली मी देते म्हणुन. आणि आता हे म्हणतात की ते अजुन एक लहान तनु घेउन येणार म्हणे. मी त्याला येऊच देणार नाही. आला तरी मी त्याला माझ्या खोलीत घेणार नाही. माझं घर आहे. माझे आई-बाबा आहेत. हा कोण नवीन येणार आता माझ्या घरात? साऊ परवाच सांगत होती तिची आई साऊ ला जवळ घेत नाही जास्त त्या बाळालाच जवळ घेते सारखी. एक बाळ असताना दुसरं बाळ का आणतात?
.........................................................

२९ नोव्हेंबर २००८
मी आज एकटा रिक्षापर्यन्त गेलो. मी आज माझ्या बुटांची लेस स्वतः बांधली. आता कोणाला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ होणारच नाही ना. मी सवय करुन घेणार होतो पण सायली म्हणाली की इतक्यात नाही येणारे तुमच्याकडे बाळ. मे महिन्यात येईल असं तिची आई म्हणत होती. तिच्या आईला काय माहित? आमचं बाळ आहे. आम्हाला हवं तेव्हा हॉस्पिटलात जाउ आणि आणु आम्ही बाळ. आजी म्हणाली उद्या जाऊ सायकल आणायला. मी गंमत करणारे. माझ्याकडेपण खुप पैसे आहेत. मी आजीला पुस्तक घेउन देणारे तिनी सायकल घेऊन दिल्यानंतर. उद्या आजी झोपली की मी पिगी बॅन्क उघडेन. आजीच माझी लाडकी आहे.
..........................................................

४ डिसेंबर २००८
बाबा हल्ली उशिरा घरी येतो आणि आई खूप लवकर घरी येते. ती आता जास्त क्लास घेत नाही. आई माझी चित्रकार आहे. ती म्हणाली आहे की ती माझी खोली सजवुन देणारे. मला माहित्ये ती खोली माझ्यासाठी नाही, नवीन बाळासाठी सजवणारे. आजीनी परवा सायकलच्या दुकानातुन परत येताना मला सांगितलं की आता आईला त्रास द्यायचा नाही. तिच्याकडे हट्ट करायचा नाही. तीला कामात मदत करायची. पण मी कधीच आईला त्रास दिला नाही. आलोक म्हणतो लहान भाउ आल्यावर मोठा भाऊ आई-बाबांना वाईट दिसायला लागतो. साऊने पण तसच सांगितलं होतं. पण माझी आई चांगली आहे. ती असं वागणार नाही. बाबाचं माहित नाही. मी आज एकट्याने सोसायटीच्या गेट्पर्यंत सायकल चालवली.
...........................................................

२४ डिसेंबर २००८
आज आईचे पाय खूप दुखत होते. मी विचारलं चेपुन देऊ का? तर जवळ घेत म्हणाली. नको रे तन्या, तू खेळायला जा. मी गंमत केली. कोणाला न सांगता माझ्याकडचे पैसे घेउन सायकल ने सोसायटी बाहेर गेलो. एकट्याने रस्ता क्रॉस केला आणि पाय दुखायचा औषध घेउन आईला आणुन दिलं. आई तर रडायलाच लागली. मला कळलं नाही काहीच. मग म्हणाली तनू मोठा झाला माझा. मी मोठा झालोच आहे. आणि आजीचा ऐकायचं असं ठरवलं आहे. आईला त्रास नाही देणारे मी. आईने बाबाला सांगितलं तेव्हा बाबाने पण कौतुक केलं. बाबा म्हणालाय ह्या रविवारी पिक्चर बघायला जाऊ. बाबा पण तसा चांगला आहे.
...............................................................

१६ जानेवारी २००९
बाळ कसं होतं? मला कोणी सांगितलंच नाही आज मी सगळ्यांना विचारलं. मला आणि आलोकला वाटायचं हॉस्पिटलमधे मिळतं बाळ. पण सायली म्हणाली आईच्या पोटातुन येतं बाळ. पोटातुन कसं काय येईल? सायली येडी आहे. माझ्या आईचं पोट कापतील ते? आईला काही होणार नाही ना माझ्या? आईला हल्ली कुठे कुठे दुखतपण असतं. मला वाईट वाटायला लागलं आहे. मला आई आवाडते माझी. प्लीज देवा, माझ्या आईला काही करु नकोस. मी त्या नवीन बाळाशी चांगला वागेन. रविवारी सोसायटीतल्या सुरेखा कुत्रीला ५ पिल्लं झाली. बाबा म्हणाला आपल्याकडे एकच बाळ येणारे. मी घाबरलोच होतो. ५ भाऊ-बहिणी झाले असते तर आम्ही "मोठे कुटुंब- दु:खी कुटुंब" झालो असतो.
.............................................................

२८ जानेवारी २००९
बाबाने सांगितलं की लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी देव बाळ देतो आई-बाबांना. जर त्यांनी चांगला वाढवलं पहिल्या बाळाला तर अजुन एक बाळ देतो. म्हणजे देवाला वाटलं माझे आई-बाबा मला चांगलं वागावतात तर! बाळ पोटातुन बाहेर येतं. पण बाबा म्हणाला आईला काही होणार नाही. मग ठीक आहे. पण बाळ पोटात जातं कसं हे विचारलं तर म्हणाला आजीला विचार. बाबा इतका मोठा झालाय तरी त्याला खुपश्या गोष्टी माहित नाहीत.
आजी शहाणी आहे. आजीने बरोबर सांगितलं. माझ्या डोक्यात बुद्धी आहे. कुठुन गेली कळलं का? नाही ना. तसचं बाळ येतं. आजीने बाबांना काही शिकवलं नाही बहुतेक. बाबाला तर हनुमान स्तोत्रपण पुर्ण येत नाही. पण तो कठीण कठीण श्लोक म्हणु शकतो.
..................................................................

६ फेब्रुवारी २००९
सायलीची आईपण येडीच आहे सायलीसारखी. तिने सायलीला सांगितलं की प्रसाद खाल्ल्यामुळे बाळ होतं. हनुमानच्या आईने नाही का आकाशातुन पडलेला प्रसाद खाल्ला आणि मग हनुमान झाला. मलाही आता वाटतं आहे तसं. आलोक तर घाणेरडा आहे. तो घाण काहीही सांगतो पिक्चरमधल्यासारखं. मी आणि सायली बोलत नाहीयोत त्याच्याशी. काल आई विचारत होती, भाऊ झाला तर नाव काय ठेवायचं? मी आईला सांगितलं, भाऊ झाला तर म्हणजे काय? मला भाऊच हवा. मुली नाही आवडत मला. बावळट असतात. मी विचार करतोय आता भावाच्या नावासाठी. सचिन किंवा राहुल किंवा रिहितीक किंवा शाहिद असं काहीतरी पाहिजे. महेन्द्र नाही आवडत नाव मला आणि धोनी तर आडनाव आहे.
.......................................................................

२९ मार्च २००९
मी आणि बाबा आणि आजी आम्ही तिघंच आहोत आता. आई मुंबईला गेल्ये तिच्या आईकडे. मी पण जाणार होतो पण माझी वार्षिक परीक्षा आहे. आईला सांगितलं आहे मी, मी आल्यानंतरच बाळ आण. आई म्हणाली मे महिन्यात आणेल. साऊची आई हुशार आहे म्हणजे, ती म्हणाली होती. बाबा आणि मी खुप धमाल करतो. आम्ही दोघं परवा सकाळी सायकल चालवत ग्राउंडवर गेलो होतो. बाबा खुप मस्त आहे. तो विडीओ गेम पण घेउन देणारे. बाबा असा वेगळा वागतो ना कधी कधी कळतच नाही. आजीपण माझ्या आवडीच्याच भाज्या करते. आईसारखं वांगं नाही खायला लावत. पण खरं सांगु? मला आईची आठवण येते. मला आईच्या कुशीत झोपायचं आहे. तिचे पाय दुखत असतील तर तिथे तिला कोण औषध देत असेल? परीक्षा झाली की त्या च्या त्या दिवशी मी मुंबईला जाणार.
.................................................................

५ एप्रिल २००९
माझी परीक्षा संपली. मला आजच मुंबईला जायचं होतं पण बाबा वाईट आहे. तो म्हणाला रविवारी सोडेल तो मला मुंबईला. मी आईला रोज फोन करतो. आईपण मला करते फोन. आलोक मला म्हणाला. बघ बाळ यायच्या आधीच आई लांब गेली तुझ्यापासुन. असं खरचं असेल का? आई माझ्यावर प्रेम करेल ना? मला रडुच येतं रात्री झोपताना. सायलीची बहिण साऊचे केस ओढते आता आणि सायलीने तिला मारलं तर तिची आई सायलीलाच ओरडते. माझा भाऊ मारकुटा असेल तर? मला कोणी धड कसलं उत्तरच देत नाही. कोणालाच काही माहित नाही.
......................................................................

१० मे २००९
मी मुंबईत आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमधे बाळ मिळत असताना आई मुंबईला का आली? मी आईबरोबर आज हॉस्पिटलमधे गेलो होतो. तिथे २-३ बाळं पाहिली ठेवलेली. किती लहान होती. छोटी एकदम. सुरेखाच्या पिल्लांसारखी क्युट. मी क्युट म्हणालो तर आई हसली. पण बाळं खरचं क्युट असतात. तिथल्या डॉक्टरकाकु मला म्हणाल्या. काय मग दादा होणार ना तू आता? मज्जा करणार ना? . मला असली धमाल वाटली. इतके दिवस लक्षातच नव्हतं आलं. मी दादा होणारे.’तन्मय दादा’ म्हणेल मला माझा भाऊ. कसलं भारी. मला खूप आनंद झाला आहे. मी आईला सांगितलं मी चिन्मय नाव ठेवणारे भावाचं आणि त्याला चिनु म्हणायचं. चिनुला मी सायकलवर शाळेत नेईन.
.....................................................................

१ जुन २००९
ढीपाडी डिपांग.. ढीपाडी ठिपांग... मी दादा झालो. मी तन्मय दादा झालो. आम्हाला बाळ झालं आहे. मुलगा बाळ. गोरं आहे एकदम सायलीसारखं. मी काल त्याच्याशी बोलत होतो तर हसला तो. आणि त्यानी बोटचं धरलं माझं.
त्याला मी आवडतो. मला तो आवडतो आणि आई-बाबांना आम्ही दोघं आवडतो. जरा मोठा झाला तो की मी त्यालाच विचारणारे तू कसा झालास नक्की? मला माझा जन्म आठवत नाही. चिन्या विसरायच्या आधीच त्याला विचारणारे.