Monday, April 2, 2012

खिडकी

प्रिय जोन डो,

आज मी आले इथे.. आल्या आल्या खिडकी उघडली. कधीतरी ती खिडकी उघडणार होतीच, उघडायला हवीच होती... आठवतं का कधी बंद केली होती ते? खिडकी उघडल्यावर बाहेरच्या छज्ज्यावरची कबुतरं फडफडली.. सुखलेल्या, काड्या झालेल्या २-३ गुलाबाच्या कुंड्या आहेत  तश्याच.. धुळीत , कबुतरांच्या घाणीत बरबटलेल्या... आपण एकदा लाईट गेल्यावर मेणबत्तीचं मेण सांडवून आपलं नाव लिहिलं होतं खिडकीत आठवतंय? ते आहे अजून मस्तपैकी .. धुळीमध्ये अजून उठून दिसतं आहे.. माहित्ये तू लगेच विचारशील "बसून नाही दिसते का?".. असे किती पकाऊ जोक मारले असशील ना ह्या खिडकीत बसून.. आणि मीही कितीदा "फेकून दिन हा तुला खिडकीतून ..अजून बडबड केलीस तर" अशी धमकी दिली असेन..

शेठ काकूंनी लगेच चहा आणि त्यांच्या कमी साखरेच्या बदामी कुकीज आणून दिल्या.. बसणार होत्या गप्पा मारायला आणि गेल्या २ वर्षातल्या सोसायटीतल्या "महत्वाच्या घडामोडी" सांगायला..पण तितक्यात शेखर आला .. अरे तू विश्वास नाही ठेवणार.. शेखर २ वर्षात २ फुट वाढला असेल..मिश्या ठेवल्यात आता..सायंस घेतलं आहे.. तू अभ्यास घ्यायचास त्याचा ,अभ्यास कमी आणि पोकेमोनच्या चर्चा जास्त चालायच्या... आता खुपच वेगळा वाटला रे.. आपल्या खिडकीची काच फोडली होती त्याने क्रिकेट खेळताना .. आणि आपण ती परत कधी बसव्लीच्च नाही आपल्या आळसाला "कवडसा मस्त दिसतो" हे नाव देऊन.. आत्ता त्या काचेला लागलेला पेपर पिवळा झालाय.. तुला आवडत नाही तसा.. काढूनच टाकेन आता आणि पतंगी कागद नक्षी कापून लावेन नंतर.. रंगीत नक्षीदार कवडसा पडेल म्हणजे..

चहा पित एकटीच बसले मग खिडकीत.. उद्या जाऊन पडदा घेऊन येईन म्हणते... आठवतं? आपण भुलेश्वर पालथं घातलं होतं.. आपल्याला घरी बनवायचे होते पडदे.. बनवलेही होतेच कि आपण.. आकाशी नेटवर काचेच्या टिकल्या आणि तुझे आवडते लाल भडक पडदे आणि त्यावरची पांढरी तूच काढलेली नक्षी.. तसं पडद्यांचा जास्त  उपयोग नव्हताच झाला कधी.. सताड उघडी असायची ना खिडकी.. समोरच्या बिल्डिंगमधल्या ६ पैकी ४ खिडक्या  बंद आहेत आज..माधुरी दीक्षितच्या खिडकीत बाळाचे कपडे वाळत घातलेले दिसतायत. अब्राहम लिंकनच्या खिडकीत नेहमीप्रमाणे त्याचे आतले कपडे वाळत घातलेत. आजी-आजोबांची खिडकी बंदच असावी बरेच दिवस कारण कबुतरांची कोलनी झाल्ये तिथे..वरच्या मजल्यावर डावीकडे कोण राहायचं रे? अन्ना कि वझलवार? मला ना आठवतच नाहीये नक्की..दोघं वर राहायचे इतकं माहित्ये. त्या रंग दे बसंतीवाल्यांकडे मगाशी मुलगी होती एक ..

ही सगळी माणसं कोण आहेत काय माहीत न खर्या-खुर्या आयुष्यात? आपण इथे राहत असताना किती गोष्टी बनवल्या ह्यांच्या.. सुंदर दिसते, गोरी आहे, एकदा मराठी बोलताना ऐकलं म्हणून ती नववधू आपली माधुरी दिक्षित झाली.. बारीक, दाढीवाला अमेरिकेच्या झेंड्याची चड्डी घालतो म्हणून अब्राहम लिंकन झाला..पोलिसात असणारा वझलवार झाला.. लुंगीमुळे अन्ना बनला.. थोराड दिसणारी, कदाचित नापास होणारी  कॉलेज न सोडणारी मुलं रंग दे बसंती झाली.. आजी-आजोबा मात्र तेच राहिले.. चहा पितानाचा आपला  आवडता टाईमपास त्याच्या आयुष्यात काय होतं आहे हे ठरवायचा असायचा .. आपण खर तर ३ वर्षापूर्वीच माधुरीला प्रेग्नंट घोषित केलं होतं रे.. पण आत्ता बाळाचे कपडे दिसतायत..अन्नाचा लिंकनच्या बायकोवर डोळा आहे हे तुझं ठाम मत होतं..तशी ती होती ढिंच्याकच, मी तेव्हा मान्य नाही केलं कधी.. पण आता म्हणायला काय जात? तू तश्या बायकांमध्ये रुची ठेवत नाहीस हे कळलं आहे ना आता..

१०० रुपयांचं घासाघीस करून २० रुपयात आणलेलं छोटेखानी झुंबर कुठे आहे रे? ते मस्त दिसायचं खिडकीत.. wind chyme का नाही आवडायचं रे तुला? किती मस्त किंकिण असते त्याची.. झाडही नाही लावू द्यायचास तू मला जास्तीच.. फक्त गुलाब लावायचं असायचं तुला..उगाच काहीही ना? पाउस प्यायला लावला होतास खिडकीत उभं राहून..फुटलेल्या काचेतून बरोबर चंद्र समोर  येईल तसं  झोपायचं असायचं तुला तो प्रकाश उघड्या अंगावर पाडत.. दिवाळीत सोडलेल्या दिव्यांच्या माळा Christmas झाल्यावर उतरवाय्चास तू.. माळा बघून चुकून santa clause येऊ शकतो म्हणून दुध आणि कुकीज ठेवल्या होत्यास.. मी मग रात्री खाली उतरून एक गिफ्ट आणून ठेवलं.. मला सकाळ आवडायची इथली, आणि तुला संध्याकाळ..तसा cliche माणूस होतास तू कायमच.. तुझे अर्धे प्रोफाईल फोटो ह्याच खिडकीतले असतील ना रे? माझेही किती फोटो काढले असशील तू इथे.. त्यांना black and white करून अपलोड करायचे मग.. आणि अगणित सावल्यांचे खेळ केले असतील ना आपण..

तू माझ्याआधी घरी यायचास .. मला उशीर व्हायला लागला कि खिडकीत बसून राहाय्चास गेटकडे बघत.. आता आंबा मोठा झालाय खालचा.. गेट नाही दिसत हा..मला शेठ काकू कायम म्हणायच्या "नवरा मिळत नाही हो असा बायकोआधी घरी येऊन तिची वाट बघत बसणारा".. मी मनातल्या मनात म्हणायचे "मलातरी कुठे मिळाला आहे".. सगळ्यांना नवरा-बायकोच वाटायचो आपण.. आणि ह्या सोसायटीत राहायला मिळावं म्हणून आपणही तसंच दाखवत होतो.. आता का खोटं बोला? मला आपलं लग्न पुढे-मागे होणारच ह्याची खात्रीच होती.. म्हणून तर live in साठी एका पायावर तयार झाले होते..तेव्हा कुठे माहीत होतं खिडकीत उभा राहून तू फोनवर बोलतोस ते सगळे फोन कामाचे नसतात म्हणून.. खिडकीत तुला बिलगून फोटो काढताना हे फक्त फोटोपर्यंतच आहे हे कुठे माहीत होतं? १-२ दिवस नसले कि खिडकीत रचून ठेवलेल्या बाटल्या आवरताना वाटायचं माझ्या जुदाईत प्यायलास.. तेव्हा कुठे माहीत होतं तुला company  असायची ते?

तुझ्या आताच्या घरात आहे का रे आपल्यासारखी खिडकी? ती तुला खिडकी हवी तशी सजवू देते का? कुंड्या ठेवल्यात तुम्ही? कोणती झाडं आहेत? चहा पिता का खिडकीत बसून? काच फुटल्यावर तशीच ठेवू देईल का ती? तुमच्या खिडकीत बाळाचे कपडे वाळत घालायची वेळ आली का? तुम्ही बनवता का समोरच्या घरामधल्या गोष्टी? तिला तू दात घासत खिडकीत आल्याचं चालतं का, दाढी केल्याच चालतं खिडकीत ? तू तिची वाट बघतोस? कि ती तुझी? चंद्र दिसतो का? उन येतं का? असे एक हजार प्रश्न आहेत अजून.. तू तिच्यापाठी गेल्यावर मीपण सोडलं होतं हे घर.. आज परत मुंबईत आल्यावर आले इथे.. आता काही दिवस रोज विचारेन असेच अनेक प्रश्न.. संपवून टाकेन विचारून एकदाचे.. अश्याच कागदावर लिहेन ते.. मग तुझा आवडता प्रकार करेन.. ह्या कागदांचे बारीक बारीक तुकडे करून खिडकीतून बाहेर उधळेन.. ठिणग्यान्सारखे चमकतील मग ते कपटे.. त्यातच जराशी जळेन आणि मग खिडकी बंद करून टाकेन..

-जेन रो