Friday, June 13, 2014

अर्धवट - ३

"आमच्या संस्थेला फार अभिमान वाटतो आहे की गेली २ वर्ष आम्ही अविरत तुमच्या हरवलेल्या प्रेमाला second  chance  देण्यासाठी झटत आहोत.."
कुर्ता-पायजम्यातला तो माणूस स्टेजवरून बोलत होता. त्याच्यासमोर अनेक भावी (?) जोडपी उभी होती.. काही "आता  एवढं उभं राहावत नाही" म्हणून मागच्या खुर्च्यांवर बसली होती.. ६०+ वयोगटातल्या आता एकट्या असणार्या "मुला-मुलींचा" जोडीदार-मेळावा..आयोजक मुद्दामच "वधू-वर" म्हणणं टाळत असावेत. त्यातही एक गम्मत होती, लग्नाआधीचा आपला एखादा crush, ex वगैरे असेल तर सांगायचं होतं आता देवाच्या (अव)कृपेने तो किंवा ती एकटी असेल तर त्यांना भेटवायचं कामही ही संस्था करत होती..

"एकदमच युनिक कन्सेप्ट बघा" श्रोत्री आजोबा पटवर्धन काकांना सांगत होते .. "आमच्या कॉलेजातल्या अपर्णा फडणीसचं नाव दिलं होतं मी , पण आहे नवरा अजून तिचा .. आणि अगदी ठणठणीत.. म्हणजे मला दुख्ख नाही त्याचं , उलट त्यामुळे अपर्णालाही सौंदर्यात मागे टाकील अशी वेदिका शृंगारपुरे मला suggest  केली .. आलीये आज .. ती बघ तिथे .. तिथे रे बुफेच्या लायनीत.. कशी वाटत्ये?"

"Awkward.."  सुहास पटवर्धन वेदिका शृंगारपुरेच्या समोर उभं राहून म्हणाला.. " मला नव्हतं वाटलं तू इथे .. म्हणजे .. कशी काय? तू दुसरं लग्न केलंस ना? कोणा अमेरिकन माणसाशी.." 
"सुहास.. एकुलता एकच नवरा होता मला.. तू! .. तुझ्यानंतर का लग्न करेन मी? मला डिंगीचि कस्टडी मिळाल्यावर काही संबंधच नव्हता ना लग्न करायचा.."
"वेदा.. तू त्याला अजूनही डिंगी म्हणतेस? मोठा झाला असेल ना आता तो .. तरीही डिंगी म्हणजे "
" आता तो पटवर्धन नाहीये.. त्यामुळे त्याला मी काहीही हाक मारू शकते कोणत्याही वयात.. त्याचं लग्न ठरलं आहे .. त्याची बायको मात्र अमेरिकन आहे आणि तिलाही  आवडतं त्याला डिंगी म्हणायला.. तुझा टकलाचा अन् वजनाचा वारसा घेतलाय बाकी त्याने, लग्नाला बोलवेन तुला.."
जाड , टकल्या तिशीतल्या गोर्या मुलाला त्याची आई डिंगी म्हणून हाक मारते आणि तो धावत तिला येऊन मिठी मारतो हे दृश्य सुहासच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि तो मनात म्हणाला "फक्त वजन आणि टक्कल नाही.. आपल्या दोघांच्या awkwardचाही वारसा असावा"

वेदिकाला  इसवी सन १९७९ मध्ये औरंगाबादची सर्वात सुंदर तरुणी असल्याचा पुरस्कार एका जाहिरातदाराने दिला होता आणि मग फुकटात तिच्याकडून त्यांच्या मलमांची जाहिरात करून घेतली होती..
 एकात तिचा close up  आणि खाली लिहिलं होतं "खरुज? वापरा सातीलाल फार्माचे "खरुजानो"..
एकात परत तिचा closeup  आणि खाली लिहिलं होतं "तारुण्यपिटीका? वापरा सातीलाल फार्माचे "नपीटीका" ..
पुढे साधारण वर्षभर मिस औरंगाबाद म्हणून तिला कोणी ओळखत नसलं तरी खरुज आणि तारुण्यपिटीका नावाने नक्कीच ओळखायचे ... कोणीतरी म्हणाल्यामुळे तिच्या आईला अचानक वाटायला लागलं की औरंगाबादकरांना गुळाची चव नाही.. मुंबईतच मुलीला भविष्य आहे..ती आता बातम्याच देणार.. स्मिता पाटील, चारुशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर, भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किरपेकरच्या यादीत वेदिका शृंगारपुरे हे नावही लागेल अशी तिच्या आईला १००% खात्री होती आणि म्हणून वेदिकाची पाठवणी जोगेश्वरीच्या सरू मावशीकडे करण्यात आली..

सरू मावशीच्या चाळीत समोरच्या घरात पटवर्धन राहायचे.. सुहास हा त्यांचा सर्वात धाकटा मुलगा..वेदिकापेक्षा ३ वर्षांनी लहान.. वेदिका तिथे राहायला आली तेव्हा त्याला नुकतीच मिसरुड  फुटायला लागली होती..स्वतःला  अमिताभ बच्चन समजणारा अमोल पालेकर होता तो..त्याच्यापेक्षा मोठ्या दोन्ही बहिणी आता लग्न करून सासरी गेल्यामुळे आता त्याला खूप सुटसुटीत वाटत असायचं.. जाड आणि तुळतुळीत गोटा असणारे अप्पा पटवर्धन कामावर निघाले की सुहास लगेच गच्चीत  पळायचा.. हातातलं पाकीट उघडून त्यातून सिगरेट काढायचा आणि कोणीतरी चिकटवलेल्या  शबाना आझमीच्या पोस्टरसमोर तोंडातून धूर काढत तासंतास बसायचा.. असाच एक दिवस बसलेला असताना दाम्या धावत वर आला.. "सुहास.. शबाना.. शबाना आल्ये चाळीत .. गुप्तेंकडे राहणारे.. उतरत्ये बघ.. धाव.." दोघंही धावले.. समोर वेदिका सामान उचलून सरू मावशीसोबत चालत येत होती..

"वेदिका शृंगारपुरे... गुप्ते काकूंची भाची आहे... वरळीला जात असते काकांसोबत... खारे दाणे आवडतात.. " दाम्या सांगत होता.. "खारे दाणे? ही माहिती काढलीस तू? भेंडी... काही कामाचा नाहीस तू" सुहास कॅरमच्या बोर्डावर बोरीक पावडर पसरत म्हणाला... "साल्या, उद्या नेलीस फिरवायला आणि दाण्यानैवजी चणे घेऊन दिलेस.. तर?"
"गुप्ते म्हणजे? ... "
"आपले नाही... अप्पा तुला घराबाहेर काढतील घरी विषय जरी काढलास तरी.."
"हं.."
"हं.. आता तू मला भेंडी, काही कामाचा नाहीस म्हणालास म्हणून... नाहीतर मी तुला पुढे सांगणार होतो, गुप्ते काका काकू १५ दिवस पुण्याला जाणारेत मुलीकडे.. वेदिकाच्या सोबतीला आमची वनिता जाणारे रात्री झोपायला..आणि मला विचारत होते काका , सोडशील का बसस्टोपपर्यंत रोज तिला.. "
"च्यायला.. मग? मग? मग काय सांगितलस तू त्यांना?..."
"आपण मित्र आहे तुझा... हो सांगून टाकलं.. आता रोज नेईन तिला माझ्या स्कुटरवरून.. आणि खारे दाणे खात आम्ही बोलू तुझ्याबद्दल..."

पुढचे दोन आठवडे सुहाससाठी खूप कठीण गेले. तो रोज अप्पांना नवीन स्कूटरसाठी पटवत होता, दाम्या आल्यावर रात्री त्याच्या स्कूटरवर सराव करत होता.. आणि रोज दाम्या आणि वेदिकानी आज काय "गंमत" केली ते ऐकून घेत होता.
पहिल्या दिवशी दाम्यापासून दोन वित अंतर ठेवून बसलेली वेदिका आठवड्याच्या शेवटी त्याच्या खांद्यावर हात ठेवते बघून जळफळत होता.

No comments: