Monday, July 21, 2014

उडान...

मुंबईचा मुसळधार पाऊस... अर्ध्या तासापूर्वीच शिवडी स्टेशनवरच्या कधी काळी ९:३० ला बंद पडलेल्या घड्याळानी बरोबर वेळ दाखवली होती... रुळावर पाणी भरलेलं, फलाटावरच्या कोरड्या जागा लोकांनी पकडलेल्या आणि इंडिकेटरवर शून्य शून्य शून्य शून्य !

"८ टक्केच राहिल्ये बेटरी... ट्रेन माहित नाही कधी येईल... पहाट होईल बहुतेक घरी पोचायला.. हो... वडापाव... ठेव.. मी बंद करतोय हा फोन...हो हो.. डोंबलाची गुड नाईट... तिला बंद करायला सांग टीव्ही, गेल्या पावसाळ्यासारखा  उडाला न तर बघ.. ठेव.. "
राजानी मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवला... बाजूला त्याला चिकटून बसलेला माणूस त्याच्याकडे बघत होता..

"थोडं तिथे सरकता का?" राजानी विचारलं..

"पाणी थेंब थेंब गळतय..." तो म्हणाला आणि हसायला लागला.. "म्हणजे वरून.. भोकातून" आणि अजून जोरात हसला "कळलं ना?" डोळा मिचकावत म्हणाला...

राजा दुसरीकडे पाह्यला लागला.

"वैभव... माझं नाव... नाही आवडत का तुम्हाला जोक? राहिलं तर... मी म्हंटल एवीतेवी आपण इथे खेटून  बसणारच आहोत तर करू जरा मस्करी"

"हं"

"मगाशी मी तुम्हाला बोलताना ऐकलं फोनवर.. तुम्ही म्हणालात पहाट होईल म्हणून... कुठेशी जायचं आहे तुम्हाला?"

"कोपर खैरणे"

वैभव पुन्हा हसला  "आणि पहाटे पोचणार असं वाटतं आहे तुम्हाला?.. तुम्हाला काय उडता वगैरे येतं का?"

वैतागून राजा म्हणाला "हो.. येतं उडता.. आत्ता इथे पंख सुखवायला थांबलोय... काय कटकट आहे?"

"अर्रे, चिडता कायको? मी काय म्हणतो, 'उडण्याची व्यवस्था' आहे कि काय खरचं तुम्हच्याकडे? धूर कि बुडबुडे?"

"काय बोलताय तुम्ही?"

"अरे वैभव म्हणा.. अहो जाहो कशाला? मी विचारत होतो, कसं उडता? मलापण सांगा, उडायचं औषध असल्यास दिलंत तरी चालेल"

राजा बाजूला सरकत वैभवकडे बघत म्हणाला,
 "तू शांत नाहीच बसणार नं? ठीके... औषध वगैरे नाही.. पीटर पॅन माहित्ये का?  हल्ली माझ्या मुलीला आवडतो तो... कायम त्याची गोष्ट वाचून दाखवायला लागते तिला, आत्ताही कार्टून फिल्म बघत होती टिंकर बेलचं.. "

"मग काय, माहित्ये कि ... हिरव्या कपड्यातला न? मी परवाच वाचलं कि लहान मुलं मेल्यावर यमदूताला घाबरतील म्हणून पीटर येऊन त्यांना घेऊन जातो, गाणी गात आणि नाचत वगैरे फुल.., तो दूत आहे, आणि नेव्हरलंड, मुलांचा स्वर्ग म्हणजे.. तिथली मुलं मेलेली आहेत त्यामुळे त्यांची वयं वाढत नाहीत... "

राजानी राग आणि आश्चर्यांनी  वैभवकडे पाहिलं "अशक्य माणूस आहेस तू...नाही.. असं काही नाहीये"

"आता कुठे कळणार आपल्याला? आपल्या नशिबात आता यमदूतच! एनीवे.. तर तुम्ही उडायची गोष्ट सांगत होतात.. सांगा "

"हां तर, तो जेव्हा मुलांना उडायला शिकवत असतो तेव्हा तो त्यांना सांगत असतो, छान गोष्टींचा विचार करा म्हणजे तुम्हाला उडता येईल... Think of the happiest things ,It's the same as having wings"

"व्वा... आवडलं आपल्याला... तर, कुठपर्यंत जायचं म्हणालात? कोपर खैरणे न? व्हा सुरु.. बघुयात पोचू शकतो का पहाटेपर्यंत"

राजा बघत राहिला..

"मी करू का सुरु? मला कुठे जायची घाई नाहीये... माझ्या आनंदाचे पंखही तुम्हालाच! कुठेही जायची घाई नसणं, ही बेस्ट गोष्ट आहे न? माझा पहिला आनंद.."

" ओह , Thank you... पण ह्या आनंदाइतकाच मोठा आनंद, कोणीतरी घरात वाट पाहतं आहे आणि घरी पोचल्यावर ते आपल्याला कडकडून मिठी मारणार आहेत ह्यातही आहे.. "

"आत्ताचा आनंद सांगू? इथे आपल्याला कोरडी जागा मिळालेली असणं"

"लहान गोष्टीत आनंद शोधण्याची कुवत अजून आपल्यात असणं हाही आनंदच आहे"

"चला, तुम्हाला मोठी गोष्ट देऊ का? आई? आईचं हसणं, आईचं रुसणं, आईचं असणं!! आईचा मौसुत पदर, आईच्या मांडीवर झोपणं... मी पुण्याला शिकायला होतो, आई सांगलीला... माझा अभ्यासाचा वेळ प्रवासात  जाऊ नये म्हणून दर १५ दिवसांनी तीच यायची,  मला भेटायला खाऊ घेऊन. माझे मळलेले कपडे घेऊन जायची आणि धुवून आणायची पुढच्यावेळी... 'पुढच्या पंधरवाड्यात नाही जमलं यायला तर' म्हणत दर १५ दिवसांनी महिन्याभराच्या खर्चाचे पैसे देऊन जायची... तुम्हाला सांगू? तेव्हा तिला स्वारगेटला एसटीत बसवून दिलं की आनंद व्हायचा... मित्रांसोबत रात्रीचे बेत करायला...
आणि आता कळतंय... ती एस्टीतून उतरल्यावर जड पिशवी  माझ्याकडे न देता स्वतःच धरायची, केस आणि पाठीवर हात फिरवत म्हणायची 'विभ्या, वाळलायस रे किती'.. तो एक क्षण परत मिळण्यासाठी माझे लाखो आनंद कुर्बान करायला तयार आहे...
असो! इमोशनल नाही होत नाहीतर रडलो तर उलटा परिणाम व्हायचा आपल्या उडण्यावर"

"आईच्या हातचं कालवण...म्हणजे आता बायकोसुद्धा करायला लागल्ये तसं... बायको! माझी बायको, लग्न, संसार, एक छोटी मुलगी.. प्राजक्ता..." राजा खिशातून पाकीट काढत वैभवला तिघांचा एकत्र फोटो दाखवतो...

"गोड आहे हो मुलगी... माझ्या खिशात साईबाबा आहेत... वर्षातून एकदा तरी शिर्डीला जात असतो.. साईच दर्शन होतं तेव्हाचा आनंद वेगळाच असतो ... नाहीत शब्द तो आनंद सांगायला.. तुम्ही कोणाला मानता?"

"पुलं, वपू, जीए ... माझी बायको लायब्ररीअन आहे, मोठ्ठा आनंद आहे तो! तिथेच भेटलो आम्ही... मला पुस्तक परत करायला कायम उशीर व्हायचा... दंड भरता भरता प्रेमात पडलो... पुस्तकं आनंद आहे माझा... आता उशीर झाला तरी दंड लागत नाही हा आनंद आहे आणि तरीही एका रात्रीत पुस्तक संपवण्यातही आनंद आहे ... एकावेळी मी ४ पुस्तकं घेऊ शकतो... २ माझ्यासाठी घेतो, २ प्राजक्तासाठी... तिलाही आवडतात पुस्तकं हा अजून मोठा आनंद आहे.
गेल्या दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दिल्लीला गेलो होतो.. भारत फिरण्यातही आनंद आहे हं... किती सुंदर गोष्टी आहेत आपल्याकडे... तर तेव्हा आम्ही एका दुकानात पुस्तक घ्यायला गेलो तेव्हा आम्हांला चेतन भगतला भेटायला मिळालं... किती मोठा आनंद! त्याच्यामुळे इंग्लिश पुस्तकं वाचायला लागलो... तुम्ही वाचता?"

"ह्या स्क्रीनवर जितकं येतं वाचता तितकं वाचतो... नवीन आहे हं..." वैभव त्याचा मोबाईल दाखवत म्हणाला... " व्हात्सापवर आहात का तुम्ही? आमच्या शाळेचा ग्रुप आहे त्यावर... रात्रंदिवस मेसेजेस चालू असतात... कधीच एकटं नाही वाटत त्यामुळे... जुन्या मित्रांना नव्यानी भेटण्याचा आनंद!"

"आणि नवीन मित्र अगदी जुने असल्यासारखे वाटणं... तुझ्यासारखे...Thank you.."

"माधुरी दिक्षीत"

"मधूनच? म्हणजे हो, तिचं हसणं आहेच सुंदर... सचिन तेंडूलकर, लता मंगेशकर..."

"मराठी असणं.. म्हणजे काय नाय तर ही नाव फटाफट वापरता येतात.."

"मुंबई"

"पुणे.. मुबई-पुणे एक्स्प्रेस वे... पाउस, पावसातलं लोणावळा... गरम भजी , आल्याचा चहा..."

"आत्ताचा पाऊस नाहीये पण आनंद.. म्हणजे नव्हता... चहा हवा होता पण आत्ता, न?"

"आपल्याला हवी असणारी गोष्ट आपल्याला हवी तेव्हा मिळणं..."

"तू काय करतोस? कुठे राहतोस?"

"मी जे करतो ते मला आनंद देतं.. मी ज्या घरात राहतो ते मला आनंद देतं... आणि तुम्ही पुस्तकं वाचता न? मिस्ट्रीसुद्धा कधीतरी आनंद देते.. नाही का?"

राजा हसला फक्त...

"हे काय? संपले कि काय आनंद तुमचे? मानखुर्दपण नसेल आलं अजून..."

"लहानपण, खेळणी, बर्फाचा गोळा, वर्गात पहिला नंबर येणं, आज्जी-आजोबा, मामा-मामी, नागपूर, रेल्वेचा प्रवास, खिडकीची जागा, आता फोर्थ सीटपण पुरते... मेरीट लिस्ट, चांगलं कॉलेज, चांगली नोकरी..."

"अबोलीची फुलं, त्या फुलांचा गजरा, ऋचा घालायची... तिच्या गुलाबी ड्रेसला माचींग , पांढऱ्या रंगातही सुरेख दिसायची ती.. तिच्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आनंद होती... डाव्या गालाला खळी पडायची तिला.. आनंद हो आनंद!"

"पहिलं प्रेम? नक्कीच आनंद!"

"प्रेम.. तो काय शब्द आहे? आदर, कृतज्ञता, कौतुक... शब्दात नाही अडकत पण ह्या सगळ्या भावना असणं हा आनंद आहे.. त्या भावना असणं म्हणजे आपण जिवंत असणं... माहित नाही हे बरोबरे का पण जिवंत असण्यातही आनंद आहे न? रोज इतकं काय काय घडत असतं आजूबाजूला , आनंदी असणं अपेक्षित नसावं नियतीला... पण तरीही आपण प्रार्थना करत असतोच, हसत असतोच, गुणगुणत असतोच... हरलो तर नव्याने उभं राहत असतोच आणि जिंकलो तर ते दुसर्यांबरोबर वाटत असतोच... जगण्याचे कष्ट  सफळ होणं आनंद आहे!"

"आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपण आनंदी होतो तसं आपल्याबरोबर न घडणाऱ्याही किती गोष्टी आपला आनंद सांभाळत असतात"

"पीटरला झेपेल का हो ही इतकी फिलोसोफी?"

"मुसळधार पावसात, ह्या घाण चिकचिकाटात, उपाशीपोटी, अर्ध्या ओल्या आंबट कपड्यात आपण रडत, चिडत, कटकट करत बसलो नाहीयोत आणि आनंद वाटतो आहेत, हे एवढं तरी नक्कीच झेपेल त्याला..."

"राईट... चला पुढे सांगा..."

राजा आणि वैभव त्यांचे लहान-मोठे, खरे-खोटे आनंद बराचवेळ सांगत बसले...

पहाटे पाच वाजता राज्याच्या घराचं दार वाजलं... बायकोने येऊन दार उघडलं...

"हे काय? ट्रेन्स झाल्या का सुरु? तुम्ही इतके लवकर कसे आलात?"

राजा तिला जवळ घेत म्हणाला "उडत"




3 comments:

Navnath said...

तुमचा ब्लॉग वाचणं हाही एक मोठा आनंद !!

Vaishali said...

अप्रतिम लिहिलंय. खरचं तुमचा ब्लॉग वाचण हा पण एक आनंद. आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या सगळ्या गोष्टी समरसून अनुभवण अन त्यातला आनंद घेण हाही एक आनंद.

प्रीति छत्रे said...

पोस्ट आवडली.
या पोस्टच्या संदर्भात तुमच्या ब्लॉगर-प्रोफाईलवर दिलेल्या ईमेल आयडीवर एक ई-मेल पाठवलं आहे. ते पाहून उत्तर पाठवावे ही विनंती.