पुराने बरामदे ... नयी धूप...
सक्काळी सक्काळी एका हातात चहाचा कप आणि एका हातात पाण्याची बाटली घेऊन बाल्कनीत आले. आणि उन्हाची एक तिरीप बघून प्रचंड आनंदी झाले.. इथे नवीन घरात राहायला आल्यापासून बाल्कनी/ गैलरी/patio मध्ये आलेलं पहिलं उन!
हल्ली रोज सकाळी येत असते मी थोडावेळ बाल्कनीत .. एक छोटी चटई वजा बसकण टाकून झाडांसमोर बसते ... तुळस, चेरी, लीची, कोथिंबीर, सफरचंद आणि चिंट्या जांभळ्या फुलांची चौकशी करत.. त्यांना काय हवं-नको ते बघत.. त्यांना अंघोळ घालत.. आदल्या रात्री खारीनं येऊन काही किडे केले असतील तर ते निस्तरत... खालच्या छोट्या रस्त्यावरून लहान मुलांना आया शाळेत सोडायला चाललेल्या असतात... पोरांची संतत बडबड... आयाचं "जल्दी चलो.." "hurry up" "kuuai diaan" "date prissa" असं काहीसं त्यांच्या त्यांच्या भाषेत चालू असतं... तिसर्या मजल्यावरच्या एका मराठी मुलाला त्याचे बाबा नर्सरीत सोडायला जातात आणि रोज तो खाली आल्यावर आईला "टाटा" करताना .." आई मला पट्कन घ्यायला ये... पट्कन" असं सांगत असतो. पाहिलं 'पटकन' आर्त असतं आणि नंतरचं दरडावून... ह्या सगळ्यात अर्धा-पाउण तास कसा जातो कळतच नाही.. चहाही संपलेला असतो.. मग कपड्यांच्या Stand वर वाळत टाकलेला टॉवेल उचलते आणि आत येते...
आज उन आलेलं पाहिलं आणि आपण इतके दिवस उन्हाला मिस करत असल्याच जाणवलं... माझ्याच इतकी माझी झाडंही आनंदी झाली असणारेत... अश्यावेळी जास्त डुलताना दिसतात झाडं... (मनाचे खेळ.. पण तेवढे चालायचेच)
Asian paintsची जाहिरात होती ना "हर घर चुपचापसे ये केहता है.. अंदर इसमे कौन रेहता है" तसं बाल्कन्या सांगतात बरचं आतल्या लोकांबद्दल...
इथे खालच्या बाल्कनीत अनेक दोर्या लावल्यात... आणि त्यावर लहान बाळांच्या कपड्यांच्या पताका...
दीपिका लहान असताना बरेच दिवस थळच्या, आजोळच्या घरातली पडवी भरलेली असायची अश्या पताकांनी... लहान बाळ असणाऱ्या घरातला वास आवडतो मला... शेक-धूप, जॉन्सनची पावडर आणि पुन्हा पुन्हा धुतलेल्या लंगोट-दुपट्याचा... थळच्या अंगणानी आणि पडवीनी आम्हांला मोठं होताना पाहिलं आहे.. अंगणात बसून माती खाण्यापासून ते झोपाळ्यावर पाढे म्हणण्यापर्यंत... पकडापकडी खेळण्यापासून Candy Crush Saga खेळण्यापर्यंत... पाउस पडायला सुरुवात झाल्यावर पडवीतून बाहेर अंगणात भिजायला धावण्यापासून... भिजू नये म्हणून ओढणी गुंडाळत अंगणातून पडवीत पळत येण्यापर्यंत... आम्ही मोठ्या झालो, पडवी तशीच राहिली... नेहमीप्रमाणे आमची वाट बघत आणि आम्ही परत यायला निघताना आमची पावलं जड करत...
वरच्या बाल्कनीत सतत इथे तिथे धावण्याचे आवाज येत असतात.. आठवड्यातून एकदातरी वरून एखादं खेळणं आमच्या घरात पडलेलं असतं... दुपारी ती आई तिच्या मुलाला बाल्कनीतच ठेवते बहुतेक... दुपारभर खाद-खुड चालू असते त्या पिल्लाची..
आमची अलिबागच्या कॉलनीतली गॅलरी अशी होती बरीच वर्षं... आई दुपारी झोपली कि ती आवाजाने उठू नये म्हणून आम्ही गॅलरीत बसून खेळायचो... एका कोपर्यात आमची भातुकली कायमची मांडलेली होती. दुसऱ्या बाजूला अनेक कुंड्या होत्या.. अधूनमधून आम्ही पाणी घालत असू, पण तेव्हा ते department बाबांचं होतं. कधीतरी काहीतरी प्रयोग करायचो त्या झाडांवर..
आमच्या शेजारच्या बाल्कनीत इतकी धूळ असते.. इतका पाला-पाचोळा साचलेला असतो... आणि त्यात खितपत पडलेला vacuum cleanerचा खोका.. तिथे २-३ मुलं-मुलं राहतात... सकाळी लवकर कामावर जातात ते थेट रात्री परततात...
त्यांच्या बाल्कनीसारखीच आमची ठाण्याची बाल्कनी होती.. rather दोन्ही बाल्कन्या... हॉलच्या बाल्कनीत कबुतरांची शाळा भरायची... धुळीची रांगोळी पसरलेली असायची... बाल्कनीत गेलं कि पावलं उठायची धुळीत... आम्ही कधी जायचोच नाही तिथे.. दार कायम बंद असायचं. कधी वेळच नाही मिळायचा ती आवरायला-स्वच्छ करायला.. नाही म्हणायला एक-दोनदा केला होता प्रयत्न पण पुढे ३-४ दिवस सर्दी-खोक्ल्यानी जखडलं होतं... बेडरूमची गॅलरी मात्र त्यातल्या त्यात बरी होती... तिथूनच खाली एका आमदारच घर दिसायचं.. सतत कार्यकर्त्यांची धावपळ असायची... आमची फोनवर बोलायची जागा होती ती.. फोनवर पलीकडच्या माणसाला खालच्या कुत्र्यांचा आवाजही ऐकू जायचा... (कुत्रे म्हणजे कार्यकर्ते नाही)
-----------------------------------------
फोटोग्राफ
" If I lay here, If I just lay here.. would you lie with me and just forget the world?" - Chasing Cars, Snow Patrol
ती दोघं पडलेली जमिनीवर...आणि आजूबाजूला गठ्ठे ठेवलेले अनेक... उकडत असून पंखा लावू देत नव्हती ती कारण मग उडले असते ना तिचे सगळे फोटोग्राफ्स... तो नुसता पडून बघत होता एकटक तिला...तिने त्याच्याकडे पाहिलं.. हलकेच हसली... हात लांब केला, हाताला लागलेला तिचा फोटो घेतला जवळ तिने आणि त्याला दाखवत विचारलं...
"ह्यात कशी दिसत्ये मी?"
तो निरखून बघत होता... ती हसली मग
"मला माहित होतं नाही सापडणार मी तुला ह्यात... मी स्वतःलाही सापडत नाही ह्या फोटोत.. इय्यत्ता दुसरी किंवा तिसरी, कोळीगीत बसवलं होतं आमचं, आमच्या बैन्नी.. "मी डोलकर" वर.. अंजिरी साडी शोधत आईनी तुळशीबाग पिंजारलं होतं तेव्हा.. खूप कष्टांनी नटवलं होतं तिने मला आणि मी तिसर्या रांगेत मागून दुसरी उभी नाचाच्यावेळी.. तिला दिसलेही नसेन मी. पण तरी तिने घरी आल्यावर रव्याची खीर आणि पुरी केली होती "मी सर्वात सुंदर नाचल्याचं बक्षीस"
(सो बेसिकली ते सगळे रिकामे कागद असतात, त्यावर फोटो नसतातच! असा concept होता... पण नंतर उगाच alzheimer किंवा तत्सम चक्रात अडकले, आणि cliche होईल पोस्ट म्हणून पुढे लिहिलीच नाही )
-------------------------------------------

1 comment:
तुम्ही काय लिहीत आहात, कोणत्या दृष्टिकोनातून लिहीत आहात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जे लिहिले आहेत ते वाचावेसे वाटत आहे.अर्धवटपणाची खदखद आणि एकंदर त्यात असलेली 'रंजिश'मोह घालणारीच...तूर्त इतकेच.
Post a Comment