Friday, April 24, 2015

कुठेस?

टी-२ वर होते. बोर्डिंग पास घेऊन शेवटचं एकदा दाराकडे पाहिलं. काचेमागून आई-बाबा आणि दीपिका हात हलवून बाय करत होते. मी पण हात हलवला आणि पटापट आतल्या दिशेने चालयला लागले.. शक्य तेवढं मागे वळून बघणं टाळत... "तेजुला काहीच वाटत नाही", "रडू कसं येत नाही ताई तुला" "घाबरणार नाहीस तशी तू एकटी यायला" ह्या माझ्याबद्दलच्या सगळ्या समजुती खोट्या ठरवत अश्रू मोकाट झाले होते.. आणि हात पाय थरथरत होते.
गेटपाशी आले तेव्हा मुलाकडे  चौथ्यांदा जाणाऱ्या एक मराठी काकू बसल्या होत्या. मी कावरीबावरी दिसले म्हणून कि त्यांना टाईमपास हवा म्हणून माहित नाही गप्पा मारत बसल्या मस्तपैकी...
"कुठे जात्येस आणि बे एरियात?".. "माझ्या घरी"

कितीतरी हजार फुटांवरून खाली बघत बसले होते... बर्फ, समुद्र आणि ढग...
"I think we are almost there... We must be somewhere on.. near.. North Pole" मी शेजारच्या मीनाक्षीला . "Isnt North pole Imaginary?" तिनी विचारलं. तिला काय सांगावं कळलं नाही. काल्पनिक आहेच कि पण खरोखर आहे ती जागा.. मी कुठे आहे आत्ता हे विचारल्यावर मी नॉर्थ पोलजवळ आहे हेच उत्तर देईन. काल्पनिक असलं तरी इथेच आहे ना मी...

तशी मी कायमच असते अश्या काल्पनिक आणि अस्तित्वाच्या सीमारेषेवर... आपण सगळेच rather Duel citizenship घेऊन बसलेलो असतो स्वप्न-आठवणींच्या देशाची आणि आज-आत्ता-इथे देशाची! कुठे आहेस विचारल्यावर उत्तर द्यायचं ते कोणतं?

"कुठेस?"
"इथेच"
"नो नो.. इथेच.. अमेरिकेत.. घरात... अशी उत्तरं नकोयत.. तू. तेजू, जास्वंदी.. तुझी तू  कुठेस?"


गेले काही दिवस माझाच माझ्याशी होणारा संवाद आहे हा! नक्की कुठे आहे मी? अक्षांश-रेखांशावर माझी जागा दाखवता येईल मला.. (म्हणजे माहित नाही... आडवे अक्षांश कि आडवे  रेखांश?) #fromwhereistand #hereiam #myhome हष्टाग टाकून  इन्स्टाग्रामही करू शकेन मी कुठे आहे त्या जागेचा फोटो! पण त्या फोटोपलीकडे मी कुठे आहे?

 मी खरंतर काहीच कधीच प्लान केलेलं नव्हतं कि त्या ग्राफवर माझी प्रोग्रेस बघावी... नाही म्हणायला बरीच स्वप्नं पाहिली होतीच कि.. त्या स्वप्नांचे मैलाचे दगड बनवून सांगू का मी कुठे आहे ते? पण तोही हिशोब नाही जमायचा कदाचित. गणित कायमच कच्चं होतं. 

Eat Pray Love वाचलं काही दिवसांपूर्वी. विशेष नाही आवडलं, पण फिल्म पाहायची आहे. (मला ज्युलिया रोबर्ट्स आवडते. अमोलला हिरड्या दाखवून हसणाऱ्या कोणत्याच बायका आवडत नाहीत. ) तर, त्यातला लक्षात राहिलेला भाग म्हणजे बालीमध्ये म्हणे "तू कसा आहेस?" असा पहिला प्रश्न  न विचारता "तू कुठे चालला आहेस?" असं विचारतात. आई-बाबा बाहेर जाताना मी "कुठे जाताय?" विचारल्यावर ते चिडायचे आता काम होणार नाही म्हणून! बालीमध्ये कोणाचीच कामं होत नसावी.. कदाचित म्हणून पुढचा प्रश्न असतो "तू कुठून आलायस?"

कुठून आलोय आणि कुठे चाललोय ह्या गोष्टी किती डिफाईन करत असतात ना आपल्याला... पण जर माहितच नसेल तर? किंवा ठरवलंच नसेल तर... Destiny नेईल ते Destination म्हणून सोडून दिलं तर? असं सोडून देणं सोप्पं असतं तर? मध्यंतरी एक लेख वाचला होता त्यात लिहिलं होतं तुमच्या आजूबाजूच्या माणसाचं भाग्य तुमची जागा ठरवत असतं. नदी समुद्राकडे वाहत जात नसते.. तिला इतक्या दिवसांनी भेटून कडकडून मिठी मारायला  समुद्र आलेला असतो किनाऱ्यावर!


कठीण आहे ना तसं सगळं... मला नाही कळत बऱ्याच गोष्टी... हा, पण मला नकाशे व्यवस्थित कळतात. बायकांना नकाशे कळत नाहीत हा stereotype नाकारून अगदी व्यवस्थित कळतात! पण आयुष्यात जनरलच खूप कमी 'पथदर्शक' वापरलेत. कोणी गुरु, गाईड असतं तर कदाचित हे असे प्रश्न पडले नसते. देव, परमशक्ती आणि त्यात विलीन आपलं अस्तित्व आणि आपल्यात विलीन परमशक्ती ह्याची पाय-डायग्राम काढून दाखवता आली असती बहुतेक... पण उगाच माज करून आपणच आपली नदी आणि आपणच आपले किनारे होऊन वाहत रहायचं रिसीव्ह करायला येणाऱ्या सागराच्या ओढीने! 

अमोल आला जेव्हा मला रिसीव्ह करायला.. त्याला पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला जवळ घेत म्हणाला "इतक्यात घरची आठवण यायला लागली?" दोन्हीवेळा घराकडून घराकडे चालले होते... दोन्ही ठिकाणी घराची आठवण येतच होती... मनाने सदैव दुसऱ्या घरात आहेच की मी!


सध्यातरी "कुठेस" ह्या प्रश्नाला "इथेच" इतकंच उत्तर द्यावं म्हणत्ये... खरं खरं १००% उत्तर शोधायची 'पक्की चाहत.. कच्ची कोशिशे' चालू राहतीलच!

तोवर तू कुठेस?  






2 comments:

Gouri said...

खरंच, कुठेस? इथेही फिरकत नाहीस!

Reshma Apte said...

yah nicely written as usual ...

Kuthe ahes la ithech he pan uttar nahi deta yet karan kharach 100% ithech nasatoch mulat apan

keep writing ,,,