Thursday, August 28, 2008

सावरी

कॉलेजच्या संपुर्ण आवारात मिळुन साधारण ५-६ सावरीची झाडं आहेत. आत्ता सगळ्यांच्या शेंगा फुटायल्या लागल्या आहेत, त्यामुळे सगळीकडे सावरीचा कापूस उडत असतो. सावरीला शेवरी म्हणतात बहुतेक, मला नक्की माहित नाही, तर सगळीकडे हा कापूस हवेवर तरंगत असतो.

आज मी लायब्ररीमधुन परत आमच्या डिपार्टमेन्टमध्ये यायला निघाले, आणि अचानक ह्या झाडांवर नजर गेली. त्या झाडाच्या सावलीतच एक जास्वंदाचं झाड आहे आणि बाजुला चाफ्याचं... अचानक वाटलं, ह्या झाडाला वाटत नसेल का की आपल्यालाही चाफा किंवा जास्वंदासारखी फुलं हवी. आपल्याला कशी फुलं येतात ह्याकडेही कोणाचं लक्ष नसेल... त्याच्या हिरव्या आणि मग फुटक्या वाळलेल्या शेंगा आणि आता त्यातुन बाहेर डोकावणारा कापूस. त्या झाडाला वाईट वाटत असेल ना त्याच्या रुपाबद्दल? झाडाला माणसासारखं नट्टाफट्टा करणं जमत नाही ना... नाहीतर सावरीच्या झाडाने नक्कीच काहीतरी makeup केला असता!

अरे.. असं का? झाडाला वाईट का वाटेल? ते सुंदर नाही असं मला वाटतं पण कदाचित ते झाड त्याच्या कापसात आणि शेंगांमध्ये आनंदी असेल. त्याला नक्कीच वाटत असेल की आपण छान दिसतो, आपल्यासारखा कापुस जास्वंदाला आणि चाफ्याला येत नाही ह्याचा त्याला अभिमान वाटत असावा...

कॉलेजच्या माळ्याने semiotics चा अभ्यास केला होता का? अचानक माझ्या डोक्यात काहीतरी "टिडींग" वाजलं...
समोरुन येणारा मुलींचा तो घोळका... सुंदर ची definition मला माहित नाही... cliche बोलायचं झालं तर "बघणा-याच्या नजरेत सौंदर्य आहे." आणि मानणा-याच्या मनात! ह्या सगळ्या मुली अतिनॉर्मल दिसणा-या होत्या, पण माझ्यासाठी! त्यातल्या प्रत्येकीनेच घरुन निघताना दहावेळा आरसा बघितला असेल, कोणी आपल्याला बघत नाही न हे बघुन स्वत:ला फ्लाईंग किसही दिलं असेल, कानातले बदलुन पाहिले असतील, ओढणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेउन पाहिली असेल, अनेकदा केस नीट केले असतील... आपण सुंदर आहोत आणि हे आपल्याला सांगणारा, आपलं सौंदर्य ओळखणारा कोणीतरी आपल्याला नक्की भेटेल ह्याचा त्यांना विश्वास असेल. मी कोण आहे हे म्हणणारी की ह्या मुली सुंदर नाहीत? सावरीचा कापुस छान दिसत नाही हे मी कोण म्हणणार?

हा विचार करताना मी कॅन्टीनपर्यंत आले होते, जगावेगळी गाणी लावण्यात अण्णा expert आहे. तो अनेक मुलींशी flirt करतो आणि ह्या बावळट मुली लाजतात... आज "लुटेला... जलवा तोरा, नखरा तोरा गोरी हमका लुटेला" लावलं होतं! पण मग लाजु देत ना त्या मुली, लाजताना छान हसतात त्या पोरी, काळ्या-मिळ्या असल्या तरी हसताना कोणीही मुली चांगल्याच दिसतात. कोणी flirt केल्यावर आपल्याला आता लाज वाटत नाही म्हणुन ज्यांना लाज वाटते त्या मुलींना बावळट म्हणणारी मी कोण? सावरीच्या झाडाने पाऊस पडल्यावर मोहरू नये असं मी का म्हणावं?

कॅन्टीनच्यावर कॉमन रुम आहे, सध्या कसल्यातरी फेस्टची तयारी चालू आहे. आवाज चोरुन गायल्यावर त्यांना आपण छान गातोय ह्याचं समाधान वाटत असेल तर काय हरकत आहे? "देस रंगीला रंगीला" वरच्या सगळ्या स्टेप्स त्यांना पाठ आहेत, आणि त्या आणि तत्सम गाण्यांवर त्या आत्मविश्वासाने नाचु शकतात.. चांगलंच आहे ना? काजोल आणि राणी मुखर्जीच्या त्या भक्त आहेत आणि त्यांच्यासारखे पंजाबी ड्रेस घालतात... कारण त्यामुळे त्या स्वत:ला काजोल आणि राणी समजतात... मग वाईट काय आहे? माझी मैत्रीण म्हणते "इन लोगोंको फॅशन समझताही नही है।"
ओह प्लीजच...कदाचित त्यांना तुझी फॅशन कळत नसेल, त्यांच्यासाठी तुळशीबागेत displayला असलेले कपडे "in vogue" असतात. सावरीचं झाड स्वत:पाशी कापसाचा सडा पाडतं, शेंगा सजवतं... चाफ्याची सर कदाचित ह्याला येणार नाही आणि चाफाही कधी सावरीला समजु शकणार नाही!

होम सायन्सच्या मुली आहेत ह्या... इतरांनी कायम हिणवलेल्या, "पुढे जाउन काय मोठे दिवे लावणारेत? घरंच तर सांभाळणार ना किंवा काहीतरी छोटी-मोठी कामं, काय मिळवणारेत भविष्यात? लग्नं करुन आया होतील आणि मग संपलं त्याचं अस्तित्व..." त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं कोणाला दिसल्येत पण? आकाशात उडायची स्वप्नं... उंच उंच जायची स्वप्नं... स्वत: सुंदर होऊन, जग सुंदर करायची स्वप्नं... सावरीच्या कापसाने वा-याबरोबर घेतलेली आकाशझेप कोणी पहिल्ये का?

मी आता माझ्या डिपार्टमेन्ट पर्यन्त आले होते. आमच्या डिपार्टमेन्टजवळ सावरीचं झाड नाहीये, पण तिथपर्यंत सावरी उडुन आली होती. तेवढ्यात सुष्मा बाहेर आली, अमरावतीची सुष्मा... माझी सिनीअर, तिला एका मोठ्या NGOमधे जॉब लागला त्याचे पेढे द्यायला! पेढा खात खात माझी मैत्रीण म्हणाली "यार, कही और नही मिला क्या जॉब? किसी प्रोडक्शन कंपनीमे try किया होता..." सावरी उडावी अश्या नाजुकतेने सुष्मा हसली...गेल्या वर्षभरात तिच्या गालावरची खळी मला दिसलीच नव्हती! ती सुंदर आहे. गेल्यावर्षी welcome partyमधे ती ’ताल से ताल’ मिला वर नाचली होती, तो नाच फालतु नव्हता!

NGO बद्दल सुष्मा सांगत असताना माझी मैत्रिण cellवर gossip करण्यात busy होती. जास्वंदी, चाफा, गुलाब आणि बाकी सगळी फुलं सुंदर आहेत. कायमच सगळ्यांना आवडतात! पण आकाशाची स्वप्नं प्रत्यक्षात जगते ती सावरी... उंच भरारी घेते ती सावरीच!

खुप वेळ मनात चाललेली ही सगळी विचार चक्र एकदम थांबली... आता मन शांत झालं होतं, कधी नव्हे ते आमच्या कॉलेजात आज इतक्या सुंदर मुली दिसत होत्या... हातावरची सावरी मी हळुच फुंकरली, आता ती तिची वाट शोधत होती... वा-याबरोबर उंचच उंच जायच्या बेतात होती!

20 comments:

a Sane man said...

very nice post!!...saundarya baghanarychya najaretach asata...tu nazar badalyanyacha prayatna kelas jo anek lok karatahi nahit...nice!

शमा said...

पहिल्यांदाच सगळा ब्लॉग सविस्तर वाचला तुझा.छान उत्स्फ़ुर्त लिखाण आहे.दुसरा ब्लॉग नाही वाचला अजून.आता नक्की वाचते.
तुझी नजर किती सुरेख समजूतदार आहे एकंदरीतच सार्या जगाकडे बघण्याची!ह्या पोस्ट्मधून तर ते प्रक्रर्षाने जाणवतेय.
नुसता नखरा चार दिवसांचा आणि सिध्यासाध्या माणसांमधले लखलखते गुण हेच त्यांच जातिवंत सौंदर्य बनून रहातं.सावरीचं झाड कधी ऐन उन्हाळ्यात पाहिलं आहेस कां तु? जेव्हां इतर नखरेल फ़ुलझाडे माना टाकतात तेव्हां ही सावरी मात्र(जिला शाल्मली असं सुंदर नाव आहे) कशी तेजस्वी लालेलाल फ़ुलांनी बहरुन जाते. ऍडव्हर्स कंडिशन्समधे कसाला लागतात ते खरे गुण.मग ते शारिरीक सौंदर्याचे असोत किंवा मानसिक.हो नां?

HAREKRISHNAJI said...

आपण पुण्यात असता का ? असल्यास केव्हातरी ईशान्य मॉल मधे फेरफटका मारा, आवारात खुप म्हणाजे खुप छोटाली जास्वंदीची झाडे लावली आहेत आणि ही जास्वंदीची फुले ही काहीशी वेगळी, टपोरी व सुरेख आहेत.

Sneha said...

tujhi 'savari' khupach aavadali....
:)

सुप्रिया.... said...

khup khup surekh[:)]

Bhagyashree said...

jabara... khup khup awdla..!

Silence said...

mastach! khup aavadal.

Saurabh said...

sexxxxxxxxxxxxxxxy lihilay!

ajun kahi sangayachi garaj aahe??

Saurabh said...

Ajun ek prShna


"Savari" mhaNajech "Shalmali" kaa???? mee ajun Shalmali cha zad baghitala nahiye paN if they r one n the same tar mag mee baghitalay!

Saurabh said...

aataa mag navin naav "jaswandi" aivaji "savari" kaa?

दीपिका said...

khupach chan ga...
ekdum samor basun sangat aahes asa vattay :)
khup goad!!

संवादिनी said...

tula kho dilay...lavakar ghe

Jaswandi said...

a sane man, Thanks..नजर बदलणं खरं तरं सोप्पं आहे... पण आता ती परत पहिल्यसारखी होऊ न देणं कठीण आहे.. सध्या बदललेली नजर टिकवायचे प्रयत्न चालू आहेत! :)

शमा, खूप खूप thanx! सावरीला शाल्मली म्हणतात मला ठाऊक नव्हतं, मस्त नाव आहे. तुझं अगदी बरोबर आहे...ऍडव्हर्स कंडिशन्समधे कसाला लागतात तेच खरे गुण!!

हरेकृष्णाजी, मी पुण्यातच आहे.. नक्की जाउन बघेन एकदा आता तिथे!:)

Jaswandi said...

स्नेहा,सुप्रिया, भाग्यश्री, आणि silence .. Thanks a lott!!

Silence जेव्हा comment लिहीतोस, ते वाचायला खूप मज्जा येते. "silence said" :D

saurabh 1.. thanx :)
saurabh 2.. मलाही माहित नव्हतं रे, आत्त्ताच कळलं हे नाव!
saurabh 3.. नाही जास्वंदीच राहिल माझं नाव! :)

Jaswandi said...

धन्यवाद दीपिका :) :) :)

संवादिनी, आजच लिहेन!

पूनम छत्रे said...

kiti sundar, kiti mature lihila ahes jaswandi!

Gayatri said...

Sundar lihilayas...antarmukh karanara.

Silence said...

मैं समय बात कर रहा हुं । चा effect जाणवतो का? :)

Medha said...

खुपच सुंदर लिहिले आहे.. ’उंच भरारी घेते ती सावरीच! ’ सावरीची .. कुठलाही गाजावाजा न करता आपले आकाश भरारी चे स्वप्ना पुर्ण करणार्या सौंदर्याची गोष्ट मनाला खुप भावली.. आपल्या सुंदर खळी मधे स्वप्नपुर्तीच्या स्मिताने हसणारी सुष्मा डोळ्यांसमोर उभी राहिली... आणि आजुबाजुच्या सगळ्याच मुली सुंदर दिसायला लागण्याची अनुभुति ही..छानच लिहिले आहेस... खरेतर तुझ्या blog च्या नावाच्या वेगळेपणामुळे मी ब्लोग follow करायला लागले...अजुन सगळे वाचलेले नाही .. पण तन्याची diary वाचली ते लईच आवडले.. :) मग कुठलेसे post वाचत होते तिथे लोकानी तुझ्या ’सावरी’ चे कौतुक केले होते म्हणुन हे वाचले .. आणि आता मी चक्क तुझा ’पंखा’ झाले आहे .. :)

Amit said...

सहज ब्लॉग विश्वाची सफ़र करत, फेर-फटका मारताना तुझ्या ब्लॉग ची लिंक मिळाली.. बर्याच पोस्ट वाचल्या.. छान लिहिल्यात.. एक एक पोस्ट वाचत असताना ही पोस्ट वाचली... आणि खरच, मना पासून आवडली. बाकि कुठल्याही पोस्ट वर कमेन्ट लिहिली नाही.. म्हणजे सगळ्या पोस्ट छानच आहेत... (खर तर मला टाइप करायचा भारी कंटाला येतो.. म्हणुन बाकि पोस्ट्स वर comments लिहिल्या नाहीत)
पण ही पोस्ट मनात घर करून गेली.. खरच, सौंदर्य हे पाहनार्याच्या नजरेत आणि माननार्याच्या मनातच असतं.....
किती वेगळ्या पद्धतिनि बघितलस तू ते सौन्दर्य.. जगाच्या नियमा प्रमाने सामान्य ठरविण्यात आलेल्या म्हणजे लौकिकार्थाने सामान्य आणि अश्यातश्या दिसणार्या मुली आणि स्वतः मधेच मग्न असणारी सावरी.. वा.. काय मस्त उपमा दिलियेस... खरच, दुसर्यांच्या नजरेला जे सामान्य दिसतं, त्यात सौन्दर्य शोधलस तू..
BTW, कुठेतरी माझ्या सारख्या (दिसण्या आणि असन्यान) सामान्य माणसाला हे सुखावून गेलं... आणि मला माझ्यात्ल्याच न दिसलेल, वेगळ अस असमान्यपण जाणवायला लागलय..
अशीच लिहित रहा...

अमित