इयत्ता पहिली, पहिल्यांदाच लांब कुठेतरी आई-बाबांशिवाय जाणार होते. आमच्या शाळेची ट्रीप होती शहाड-टिटवाळ्याला, जरी सकाळी जाउन संध्याकाळी परत यायचं होतं तरी खुप वेगळं वाटत होतं. आजही आई-बाबा बसपाशी सोडायला आलेले आठवताय्त. पहाटे पाच वाजता, अंधुकश्या प्रकाशात आई-बाबांचे चेहरे...त्यांच्या चेहेर-यावरचं कौतुक आणि काळजी... नाही, शब्दात नाहीच बसवता येणार तो प्रसंग... आपण जिथे जाणार आहोत तिथे खुप मज्जा येणारे, काहीतरी नवीन असणारे ह्याचा आनंद आणि त्याच वेळेला आई-बाबांपासुन लांब जाणार म्हणुन डोळे भरुन आलेले, गळा जड झालेला...
त्यानंतर हा प्रसंग खुपदा आला, संदर्भ बदलत गेले. मोठी झाल्यावर अनेकदा मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळल्यावर आई-बाबांकडे बघायला सवडही नाही मिळाली. परवा अलिबागहुन परत आले तेव्हा आई-बाबा सोडायला आले होते स्टॅंडवर, खूप दिवसांनी आज गळा दाटुन आला, रडायचं नव्हतं म्हणुन बस लवकर सुटायची प्रार्थना करत होते. अचानक लक्ष गेलं, असं होणारी मी एकटी नव्हते. अलिबागहुन पुण्याला शिकायला आलेली भरपुर मुलं आहेत आणि परवा आख्खी बस अश्या students नीच भरलेली होती. बाहेर अनेक आई-बाबा उभे होते, काळजी आणि कौतुक डोळ्यांत... अनेक सुचना!
१२वी, CET, results, प्रवेश प्रक्रिया आणि अशी अनेक दिव्यं पार केल्यावर, तावुन-सुलाखुन झाल्यावर एक नवं पर्व सुरु होतं. अनेकांना आपलं घर, आपलं गावं सोडावं लागतं... आमच्या अलिबागेत तर जवळ जवळ सगळेच शिकायला बाहेर पडतात. जुन महिना उजाडला की अनेक नवीन प्रश्न उभे असतात. कुठे ऍडमिशन मिळेल? नवीन कॉलेज कसं असेल? नवीन शहर कसं असेल? तिथली मुलं आपल्याशी चांगलं वागतील ना? आपण अलिबागहुन आलो आहोत हे सांगितल्यावर आपल्याला हसतील का? इथल्या सारखे तिथेही नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील ना? घरची, अलिबागची जास्त आठवण तर येणार नाही ना? आपण एकटं राहु शकू ना? अनेक अनेक प्रश्न सारखे डोक्यात येत असतात... आणि मग एक दिवस शिकायला घराबाहेर पडायची वेळ येतेच! नव्या जगात जातोय याचा आनंद आणि आपल्या जगातून बाहेर येतोय याचं थोडं दुखः... बसपाशी सोडायला आलेले आई-बाबा... अगदी तसेच दिसत असतात जसे ते टिटवाळ्याच्या ट्रीप साठी सोडायला आलेले तेव्हा दिसत होते.
आईच्या डोळ्यांत पाणी येतं असतं आणि ती ते लपवायच्या प्रयत्नात असते. आपलं बोटं धरुन चालणारं आपलं बाळ इतकं मोठं कधी झालं हे तिला समजलंच नसतं. आपल्या बाळाबद्दलचा विश्वास तिला असतो पण शेवटी काळजी डिपार्टमेंटही तिलाच सांभाळायचं असतं ना. मग २७व्यांदा ती लोणचं कुठे ठेवलं आहे, चिवडा लवकर संपव, वड्या काळ्या बॅगेत आहेत. चादरी, स्वेटर्स, कपडे सगळयाविषयीच्या काहीतरी सुचना असतात. बाबांनी पैसे दिलेले असले, ATM card दिलेलं असलं तरी आईनेही वरखर्चाला हळुच दिलेले पैसे असतात, अजुन हव्येत का म्हणुन विचारत असते! बाबांना तोवर त्यांच्या ओळखीचं कोणितरी भेटलेलं असतं ते जास्त emotional न होता दुस-या काकांशी गप्पा मारण्यात बिझी होतात!
हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे,ते दुर दुर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यांतील आडवुन पाणी,हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता...अन तुम्हास नियती हसते
संदीप खरेच्या या ओळी आत्तापर्यंत जितक्यांदा ऐकल्यात हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर आलयं आणि समोरचं सगळं धुसर होत गेलयं!
इतके दिवस हे निरोप घेणं सोप्पं होतं हे आता वाटायला लागलं आहे, जेव्हा मी पुढच्यावर्षीचा विचार करत्ये!
बसच्या खिडकीमधुन आईशी बोलता यायचं, बाबा दिसायचे... नजरे आड होईपर्यंत टाटा करता यायचा... आता ते विमानाच्या खिडकीतुन कसं जमणार?
शाळेची सहल रात्री परत यायची... एका दिवसभराच्या गमती जमती पुढे आठवडाभर सांगायचे!
मुंबईला शिकायला आल्यावर दर शनिवार-रविवार घरी जायचे तेव्हा आठवड्याभरच्या गोष्टी २ दिवसात सांगुन संपवायला लागायच्या!
पण आता पुढे...?
(संवादिनीने आजच थोड्याफार अश्याच आशयाचं लिहीलं आहे. माझंही हे पोस्ट अनेक दिवस अर्ध ड्राफ्ट्मधे पडुन होतं, आज तिचा ब्लॉग वाचल्यावर पब्लि्श केलं)
9 comments:
khar saa.ngu.. raDu yet hot vaachun.. baryaach aathavani aalya...
best of luck for ur future...
good....its not just you....I still feel the same every year I go back and leave...
chan!
Excellent. You made me cry. Keep writing..
kiti emotional lihilaM aahes.
he aai-babanpasoon laamb jatana kadhihi, kitihi mothe zalo tari hotaMch! :-(
Thanks everyone! :)
surekha lihilayas ga! paravach punyahuun ithe bangaloralaa aale, vimaanatalavar nirop ghetana dole bharun alech...
Thanks Yashodhara!
chaan lihile ahe...made me cry...
Post a Comment