Thursday, March 20, 2008

ये तारा, वोह तारा...

आज तुळशीबागेत फिरत असताना, अचानक एक मुलगा हातात काही पाकिटं घेउन समोर आला... त्यावर ता-यांची चित्रं होती. मी त्या गर्दीत थांबुन त्याकडे पाहिलं... "तारांगण"... घरात वरच्या सिलिंगवर चिकटवायचे तारे, जे काळोखात चमकतात... छोटे तारे, मोठे तारे,चंद्रकोर, शनी, रॉकेट, धुमकेतु असे काही स्टिकर्स होते त्यात...

ते बघुन मला मी ३री-४थीत असतानाचे आमचे रेडियम-स्टार आठवले... आमची सगळी ट्रान्सॅक्शन्स त्या ता-यांनी व्हायची..."ए माझं नाव बाईंना नको सांगु, मी तुला एक रेडियम देईन"
"मला खोडरबर दिलास तरचं मी तुला स्टार देइन"
"त्याच्या नावाच्या बॅचमधे त्यानी ४ स्टार लावल्येत... त्याच्याशी नकॊ बोलुया.. तो कोणाला ते देत नाही"
आता रेडियम असण्याचा आणि लंगडी येण्याचा काय संबंध? पण मला आठवतं, ज्या मुलाकडे जास्त स्टार होते त्याला आपल्या गटात घ्यायला भांडणं व्हायची!
पुढे शाळेतुनच ज्या मुलांनी प्रत्येक महिन्यात सगळा गृहपाठ पुर्ण केलाय त्यांना हे रेडियम स्टार नावाच्या बॅचमधे लावायला मिळायचे... मला ह्या चांदण्या कधीच मिळाल्या नाहीत! तसा माझा आणि गृहपाठाचा काही संबंधच नसायचा म्हणा!

नंतर एकदा सुट्टीत पुण्याला आले असताना तुळशीबागेतुनच बाबांकडे भरपुर हट्ट करुन भरपुर रेडियम विकत घेतले होते! मी आणि दिपिका मग रोज खोलीचा दिवा बंद करुन काळोख करुन पांघरुणाखाली हे रेडियम स्टार बघायचो! काय मज्जा होती राव... त्या इवल्याश्या रेडियमच्या हिरवट चांदण्या कित्ती कित्ती आनंद देउन जात होत्या! मग जस जशी मोठी झाले..त्या चांदण्या कुठे गेल्या कळलंच नाही! आकाशातल्या ख-याखु-या चांदण्या आवडायल्या लागल्या
अलिबागचं आकाश सुंदरचं होतं... संपुर्ण ता-यांनी भरलेलं.. पुण्या-मुंबईच्या लोकांना ती मज्जा नाही कळायची! आमच्या इथल्या हौशी आकाश-निरिक्षकांबरोबर मी सुद्धा आमच्या मोठ्ठ्या मैदानात जाउन ग्रह-तारे बघायला लागले...
"तो बघ तो ..., पृथ्वीपासुन ....कोटी लांब आहे... आणि त्यांच्या बाजुचा तो पिवळसर तारा ...हजार प्रकाशवर्ष दुर आहे" ..."ह्याचा आकार एवढा आहे", "हे नक्षत्र, तो तारकासमुह", "हा धुमकेतु...साली दिसला", "ह्याच्या वरचा डाग, त्याचावरची खळगी", "ह्याचं आयुष्य... त्याचा स्फोट", "नवा तारा.. आपली आकाशगंगा..." "ता-यांचा मार्ग", "दिशा..एक वीत खाली ध्रुव तारा, वर तिथे सप्तर्षी... तो मृग, तो व्याध", "पिधानयुती, ग्रहण","उल्कापात".... रोज नवीन नवीन गोष्टी तिथले काका सांगत होते...

आणि मी वरती आकाशाकडे बघत त्यांना विचारत होते... "काका, माणुस मेल्यावर त्यांचं काय होतं हो?" कारण आता ’माणुस मेल्यावर त्यांचा आकाशात तारा होतो,’ ह्यावरचा विश्वास त्यांनीच मोडीत काढला होता!
"ध्रुव तारा काही हजार वर्षांनी बदलणार आहे, त्याचं ठिकाण ही नक्की नाहीये.. त्याच्या खाली असणारा अभिजीत तारा काही वर्षांनी आपला ध्रुव तारा बनणार".. काका सांगत होते! विष्णूनी ध्रुव बाळाला फसवलं? त्याला अढळ स्थान, कधीही न बदलणारं स्थान दिलंच नाही?
मी आता आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाला जाणं बंद केलं, मला माझे बावळट असले तरी विश्वास तोडायचे नव्हते... मला अजुनही माझ्या आजी-आजोबांचे तारे एकत्र फिरताना दिसतात.. आणि काका म्हणायचे ते तारे प्रत्यक्षात एकमेकांपासुन काही प्रकाशवर्ष दुर आहेत! ह्यॅ... कशालाच काहीच अर्थ नाही!!

हिमालयात गेले असताना, तिथलं आकाश माझ्या अलिबागच्या आकाशापेक्षा श्रीमंत दिसलं...सगळं काही अनोळखी, नवीन असताना.. मला माझा व्याध, ध्रुव आपले जवळचे वाटत होते! अलिबागच्या घरातल्या खिडकीतुन कित्ती रात्री त्या चांदण्याशी बोलण्यात घालवल्या! पुण्यात खिडकीतुन फक्त दिसतात बाकीच्या घरांचे दिवे!..दुरवर ता-यांसारख्या खिडक्या आणि त्यातले दिवे पसरलेले!

म्हणुन मग आज त्या मुलाकडुन ते रेडियम-स्टार विकत घेतले.. घरी आल्या आल्या स्टुल, बेड, बेड्वर स्टुल असे अनेक प्रकार करुन त्या हिरवट चांदण्या आमच्या खोलीत चिकटवल्या.. त्यात सप्तर्षी बनवली, मृग, कृतिका, उत्तरा, शर्मिष्ठा माझ्या खोलीत आल्या! ... रात्री झोपेन तेन्व्हा माझ्याकडे माझे ते सगळे तारे हसुन बघत असतील!

रेडियम स्टार- अलिबागचं आकाश आणि माझ्या चांदण्या , एक चक्र पुर्ण झालं!!

16 comments:

veerendra said...

waa ,,
khoopach sunder .. mala hi radiumchi craze hoti .. mastch !

Prashant said...

juni aathvan jagi jhali...

by the way, I have clarified my view on my blog topic. U can read my comment just below urs

Abhijit Bathe said...

'जब तारें जमींपर....’ आठवलं! :)

Monsieur K said...

taare ghar par :)

सुशील गायकवाड said...

एकदम नॉस्टालजिक !

choti-tingi said...

छान लिहीले आहे.....

Vidya Bhutkar said...

U know I have a dream to colour the ceiling of my room with a 'sky' colour and also put those stars which shine in the dark. :-) So during daytime, its a blue sky and at night its a starry one. :-)) I thought of it while reading this post.
U know when I came to US,one of the things that I miss here is a starry sky. As soon as u land in Mumbai, u feel the difference. :-) Even the stars have heavy population in India. :-D
-Vidya.

sahdeV said...


Kahisa relevant post



(Hi hoti tya nimittane mazya blogchi jahiraat! :P)

Jaswandi said...

थॅन्क्स वीरेंद्र... मला अजुनही रेडियमची क्रेझ आहे :)

हो वाचली तुझी कमॆंट, प्रशांत!

:) thanks अभिजित, :D thanx केतन!!

Thanx सुशिल & छोटी टिंगी!!

विद्या, मस्त आयडिआ आहे! :)

सही पोस्ट आहे वेदहास! जाहिरात करण्यासाठी माझ्या ब्लॉगचा वापर केल्याने तुला त्याची फी भरावी लागेल हा... :D

sahdeV said...

mazyakadun milaaleli comment hich tuzi fee :P!!!!


(Maza blog paha comments chya baabatit kiti garib ahe te! Maazi stuti tikde karaychis na!!! :(()

Sneha said...

ह्म्म रेडियमची क्रेझ मलाही आहे... :) [लहानपणापासुन नाही म्हणनार अजुन मोठी झाले नाही मी ;)]
अपुनको आयडिया अच्छा लगा.... अपुन भी चिपकायेंगा रूम मे तारे... बोले तो अपुनके पास भी अपुनको देखकर तारे हसेंगे... :

Jaswandi said...

ओके वेदहास.. तुझ्याही ब्लॉगवर कमेंट टाकुया हं आपण!! (ref: jaswandi lahan mulanshi bolalyasarkha lihite...tuzach blog)

हेहे, स्नेहा काय झालं एकदम ग बाई? नक्की करुन पाहा पण.. सही वाटतं!!

मोरपीस said...

छान लिहीले आहे

Jaswandi said...

thanx :)

केसु said...

sundar lihites khup.. satat wachat rahawasa.. chhan.. asach lihit raha :)

sagar said...

जुन्या कपाटाच्या कोपर्यातल्या कप्प्यात असंच काही-बाही सापडतं. लहानपणीचे कितेक तुकडे त्यात असे अडगळीत पडलेले सापडतात.
तू हे असे कप्पे उघडून देतेस आणि मग ते बिलोरी तुकडे असेच चमचम करायला लागतात. रेडियमच्या स्टार आणि heart सारखे .