Thursday, January 21, 2010

शाळा आणि करिष्मा (२)

मी शाळेत पोचले तेव्हा गडबड चालु होती. पोरं बाहेर हैदोस घालत होती, पोरी कडेला उभं राहुन गप्पा मारत हसत होत्या. त्यातल्या एका मुलाला मी ७वीचा वर्ग कुठे आहे असं विचारल्यावर तो चक्क तिथुन पळुन गेला. मग एका मुलीला धरलं आणि विचारलं. ती सरळ चालायला लागली, मला कळेना काहीच. मग ती पुढे गेल्यावर मागे वळुन म्हणाली "चला नं, दाखवते आहे की".. मी वर्गापाशी गेल्यावर आधी बाहेरच उभी राहिले होते. छोटी सुट्टी संपायची होती अजुन.. काही मुली लाजत लाजत माझ्याकडे बघत होत्या. मी त्यांच्याकडे बघुन हसले की अजुन लाजत होत्या. मी करिष्माला शोधत होते.पण ती काही दिसत नव्हती.

सुट्टी संपल्याची घंटा वाजली तेव्हा सर आले वर्गात आणि मग "अरे बापरे.. उशिर झाला" भाव चेह-यावर दाखवत, जीभा बाहेर काढत "सर आत येउ?" करत ५-६ मुली आल्या..त्यातच करिष्मा होती. तिने तिच्या हातातली चिंच हळुच दाखवली मला. मी लगेच मनातल्या मनात प्रार्थना सुरु केली "please let her be the girl.. जी बाईंना impress करायला चिंचा-आवळे आणुन देते". तेवढ्यात सर बोलायला लागले.." आज आपल्याकडे ही आलेली आहे.. (माझं नाव विसरले होते ते).. लेले.. ही जाहिराती आणि लहान मुलांवर संशोधन करत्ये. तर आता ही शिकवेल तुम्हाला तिच्या संशोधनाबद्दल".. मला फिस्सकनी हसु आलं. मी शिंक आली आहे असं दाखवायचा प्रयत्न केला.. सर वर्गातुन बाहेर निघाले आणि मग मी फळ्यासमोर जाउन उभी राहिले.

२५-३० डोकी..लाल रिबीनीच्या वेण्या घातलेली.. काहींच्या डोक्यांत गजरे, चमकीवाले.. एखाद-दोनच डोकी केस कापलेली! सगळी माझ्याकडे बघत होती टक लावुन.. "आता काय सांगणारे ही बया" असे भाव सगळ्यांच्या डोळ्यात! काही काळ सगळं शांत होतं.. मी एक मोठ्ठा श्वास घेतला आणि म्हणाले "तर.. मग ..आता सुरु करुयात?" मुलींनी फक्त माना हलवल्या.. अजुन काय करणार म्हणा.. मला उगाचच पण लई टेन्शन आल्यासारखं वाटलं. पुण्याला आगाउ पोरांना शिकवायची सवय होती.. तुम्ही एक शब्द बोलाल तर ती over smart कार्टी १० शब्द बोलतात.. इथे पोरी बोलल्याच नाही तर? तरी मी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात शाळेतल्या २ शिक्षीका मागच्या बाकावर येउन बसल्या. एक कालच्या ओरडणा-या बाई होत्या त्यात.
मग पुढे अर्धा तास मी जितके प्रश्न विचारले तितक्या सगळ्यांची उत्तरं मला त्या दोन बाईंनी दिली.

मी: तुम्ही टीव्हीवर काय काय बघता?
बाई१: सांगा.. काय काय बघता ते.. अवघाची संसार, कुंकू, गोजिरवाण्या घरात, सारेगमप..
बाई२: हिंदी पण बघतात.. MTV, cartoon network.. सगळं बघतात.. TVच तर बघतात.. अभ्यास नको कोणाला!
मी: अरे वा.. हे सगळं बघता का? फिल्मस पण बघता ना?
बाई२: तर काय? अलिबागला फिल्म लागली की न चुकता बघतात.. सीडी-डीव्हीडीवरही बघतात..
मी: ( मनात: ओह बाई गपा की हो आता) हो का? चांगलं आहे .
तुम्हाला "जाहिरात" म्हणजे काय माहित्ये ना?
बाई १: सांगा गं.. लाजु नका.. जाहिरात म्हणजे वस्तु विकतात ते.. आपल्याला वस्तुंची माहिती देतात.. हो की नाही?
मी: (yeah right!) हा.. तुम्ही द्या की उत्तर.. असं सारखं सारखं बाईन्ना नाही काही उत्तर द्यायला लावायचं! आता ह्या पुढे बाई नाही हं मदत करणार तुम्हाला.. तुमचं उत्तर तुम्ही द्यायचं!

हे बोलल्यावर मला माझा अभिमान वाटला.. आणि बाईसुद्धा गप्प झाल्या. भारी वाटलं मला जाम! मी शाळेत शिकत होते तेव्हापासुन मला आगाऊ बाईन्ना गप्प बसवायला मज्जा येते! मग त्या बाई आपापसांत गप्पा मारायला लागल्यावर मी आणि मुली एकमेकींशी बोलायला लागलो. मुली हळुहळू खुलत होत्या.. हसत होत्या.. एखादी गंमत सांगितल्यावर डोळे मोठे करुन बघत होत्या.. मलाही छान वाटायला लागलं! मी मग त्यांना मधेच "आता तुम्ही जाहिरात बनवुन दाखवणार का?" असं विचारलं.. तर पोरी इतक्या जोरात "हो sss" ओरडल्या.. मला जाम कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं, धक्का बसला.. prejudices.. prejudices.. नाही बोलणार खेड्यातल्या मुली, जाहिराती नाही करता येणार त्यांना.. लाजतील, शांत बसुन राहतील.. असं काहीसं माझ्या डोक्यात होतं! मी त्यांना "products" दिले आणि सांगितलं .."जा मज्जा करा, १५ मिनीटं.. हवी तशी जाहिरात बनवा!"

घोळके-घोळके जाहिरातींबद्दल विचार करण्यात गुंगले होते. कोणीतरी जिंगल बनवत होतं, कोणी रेडिओसाठी जाहिरात बनवत होतं, कोणी स्कीट करत होतं.. करिष्मा मात्र एकटीच बसली होती तिच्या ग्रुपपासुन लांब. मी तिला खुणेनेच "काय?" म्हणुन विचारलं.. ती लगेच उठुन माझ्याकडे आली.. "तुम्ही बोलला नाहीत आल्यापासुन माझ्याशी काहीच!.. मला वाटलं विसरलात मला" .. ओह असा फंडा आहे काय.. ह्यावर काय बोलायचं मला माहित नव्हतं.. मी आपला direct बाईपणा केला, "बरं मग तू जाहिरात नाही करणार का? कोणत्या ग्रुप मधे आहेस तू?" . तिने एका ग्रुपकडे बोट दाखवलं "पण त्या मुली खुप साधीशी जाहिरात बनवताय्त.. माझ्या डोक्यात चांगली जाहिरात आहे त्यांच्यापेक्षा.. मी एकटी करु का?" (Oh My God.. मी शाळेत असताना अशी आगाऊ होते का? म्हणजे मला जे भारी वाटायचं ते असं आगाऊ असायचं का? oh ohf)

मी मागच्या बेन्चवर जाऊन बसले.. एक एक ग्रुप येउन जाहिराती सादर करायला लागला..
Group 1: ( कोरस:(गाणं वगैरे) मला होयचं आहे गोरं.. मला दिसायचं आहे सुंदर..
एक मुलगी: मग वापरा डॅश डॅश क्रीम.....)
Group 2: ( १: ह्या महागाईच्या दिवसात काय करावं बाई?
२: मी सांगते.. ही पावडर विकत घ्यावी कारण ह्याबरोबर मिळतं हे तेल एकदम मोफत...)
Group 3: ( ती बघ किती गोरी आहे.. काय राज आहे गं तिच्या गोरेपणाचा?
ती: माझ्या गोरेपणाचं रहस्य ते क्रीम... )
करिष्मा: (माझ्यासारखं सुंदर व्हायचं आहे? मग वापरा ही पावडर.....)

मी आधी कौतुकाने, मग आश्चर्याने, मग अजुन आश्चर्याने, मग blank हौन, मग मान तिरकी करुन, मग डोळे मोठ्ठे करुन.. मग तोंडाचा मोठ्ठा आ करुन, मग एक भुवई वर करुन.. मग एका बोटाचं नख चावत त्या जाहिराती पाहिल्या.. जाहिराती संपल्या.. मी हसले सगळ्यांकडे बघुन..(स्वत:ला.. बाय माझी तेजू, काय शिकवुन राहिली तू ह्या पोट्ट्यांना? Advertising and body-image म्हणे.. शिका काहीतरी ह्यांच्याकडुन) मग how those ads mislead you.. वगैरे सांगितलं, मुलींना जाहिराती बनवायचे विडीओ दाखवले... मग "self-image enhancement" वगैरे प्रकार केले. You are Beautiful वालं एक motivational speech दिलं! उद्या भेटू म्हणुन त्यांना मग मी तश्याच feel good noteवर सोडुन दिलं.

करिष्मा वर्गातुन बाहेर पडताना माझ्या मागे पळत पळत आली. "तुम्हाला खरंच वाटतं आम्ही सुंदर आहोत?" मी फक्त मान हलवली.. तिनी अविश्वासाने बघत मला विचारलं "सगळ्या? खरंच? सुंदर?"
मी आजुबाजुला कोणी नाही ना पाहिलं.. तिला म्हणाले.." कोणाला सांगणार नाहीस?..बरं, मग सांगते.. सगळ्या सुंदर आहेत.. सुंदर.. पण तुझ्याएवढं सुंदर नाही कोणी" डोळे चमकले मग करिष्माचे. ती अजुन काही बोलणार तेवढ्यात मागुन सर आले म्हणुन ती पळुन गेली. सर तिच्याकडे बघत मला म्हणाले " सांभाळता येतोय ना हा वर्ग? पोरी जरा डॅम्बिस आहेत! अभ्यास काहीही नाही.. नुसत्या उनाडक्या.. ही आत्ता गेली ती पोरगी २दा नापास झाल्ये. अजुन एकदा नापास झाली की मग शाळेतुन तिचं नाव निघणार मग काय लग्नं करुन पोरं सांभाळणार.. हे असंच होतं गं ह्यातल्या अनेक मुलींचं..." सर पुढेही काहीतरी बोलले पण माझं खरंच लक्ष नव्हतं. करिष्मा लांबुन मला टाटा करत होती आणि मगाशी आणलेल्या चिंचा माझ्यासाठी टेबलावर ठेवत होती. तेव्हा ती खरोखर सुंदर दिसत होती..

10 comments:

हेरंब said...

एकदम मस्त!! खूप छान लिहिलंय !! भाग ३ कधी?

अनिकेत वैद्य said...

जास्वंदी,
छान झाल आहे.
मुलांना काही ग्रुहपाठ वैगेरे दिलास की नाही?

Gouri said...

mastach!!!

Yawning Dog said...
This comment has been removed by the author.
veerendra said...

खूपच मस्त लिहिलं आहेस .. पुढच नक्की लिही ..

Maithili said...

Mastach ekdam....
'Mi shalet hote tevha pasoon aagau baina gapp basavayala mala majja yete' Sahiye......

Unknown said...

post chaan aahe....pan tuzha "karishma" sarakhya mulinsathi kahi changale karanyacha vichar asel tar changali gosht aahe...nahitar lekhak vagaire banshil...pan tyat kasali maja..tu film/advertising madhe aahes...research karates..tar lokanparyant lavkar pohochu shakates... education kiti important aahe te patavu shakates.... ek karishma shikali tar baryach karishma shikatil..... baki tuzhe lekh chaan asatat... mi gelya 6-7 mahinyapasun niymit vachak aahe...chaan lihites

tuzhi vicharshakti chaan aahe...

comment karavese vaatale mhanoon 1st time comment kele.....

Post Script: the readers are well educated and upper middle class or rich peoples who use internet, pc's...tyanna hya post mastach watatil ek kutuhul aani gammat mhanoon...

Shardul said...

मजा येते आहे वाचताना.. :)

saurabh V said...

tooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo

good yaar! [:-)]

sagar said...

१ . "....जी बाईंना impress करायला चिंचा-आवळे आणुन देते" हे आम्हा मुलांना सुचणे शक्य नाही :( भारीये हे .....
२ . पण गावातल्या शाळांची मज्जाच वेगळी. ग्राउंड भर सावली, शेवाळलेल्या पायऱ्या, gaudy वाटणाऱ्या पण मनापासून तयार केलेले hanging items-पाट्या-कार्यानुभव चा overdose. ज्या ज्या गावात गेलो तिथल्या 'शाळा' मनात 'घर' करून राहिलेल्या. आणि तिथली आपल्याकडे alien सारखी बघणारी मुलं. एकाच साच्यातल्या शहरी लोकांकडे काय असते इतके कुतूहलाने बघण्यासारखे ?? काय माहित.
३. पण गावात जाताना त्यांच्यासारखेच कपडे घालून जाण आवडतं. तिथे शहरीपणामुळे उठून दिसलो आपण कि त्यांच्या मिसळता येत नाही. आपलं शहरीपण गावाबाहेरच्या ओढ्याजवळ काढूनच आत जायला हवं. (हा माझा अनुभव. )
४. आणि हो...पोस्ट वाचल्याबरोबर काय माहिती का बरं पण करिष्माची खूप काळजी वाटली. त्यामुळे मला तुझ्या या पोस्ट चा impact वेगळाच मिळाला.
तुला नाही वाटली अश्या 'करिष्मांची' काळजी ? कदाचित मी मुलगा आहे म्हणून वाटली असेल , किंवा मी जून झालाय आता किंवा पूर्वग्रह बहुतेक ....वाटायला हवीये का ?