Friday, September 12, 2008

सहस्त्रावर्तन

श्री गणेशाय नम:
हरि ओम नमस्ते...

सुरु झालं... मी बाहेरच्या खोलीत बसले होते.
मी agnostic नाही अगदी, पण confused नक्की असते ह्या सगळ्या "देव-देवता-पुजाअर्चा" बाबतीत!

गणपती सण म्हणुन मला भारी आवडतो, दिवाळीपेक्षाही जास्त... पण "आज सहस्त्रावर्तन आहे हं संध्याकाळी" असं काकूनी सांगितल्यापासुन माझा mood गेला होता. म्हणा.. गणपतीत गावाला २च दिवसांसाठी गेले होते, त्यातही एक दिवस सहस्त्रावर्तन खाणार ह्याचा राग जास्त होता. आणि काकू बिचारी "पोरं २ दिवसांसाठीच आल्येत त्यातच सहस्त्रावर्तन करुन घेउ म्हणुन राबत होती". मस्तपैकी वड्या-घारग्यांचा बेत होता...हेच त्यातल्या त्यात बरं होतं!

आत माजघरातल्या देवघरासमोर सगळे बसले होते, आणि मी बाहेर पडवीतल्या झोपाळ्यावर झोके घेत होते. बाबांनी माजघरात लावलेल्या धुपाचा वास पडवीतही छान घमघमत होता... झोपळ्याचा ’किर्रर्र...खट्टक...किर्रर्र..." चा आवाज आतल्या आवर्तनाच्या सुरात होता... पण माझ्या मनात मात्र रामरक्षा सुरु झाली होती.

ह्या कोकणातल्या घरी वर्षातुन १५-२० दिवसच येणं होतं, पण लहान असल्यापासुन पडवीतल्या झोपाळ्यावर संध्याकाळी बाबांबरोबर बसुन परवचा म्हणायची सवयच लागली आहे. पुर्वी अनेकदा लाईट गेलेले असायचे गावात संध्याकाळी तेंव्हा बाबा झोपाळ्यावर येउन बसले रे बसले की मी पण त्याच्यासोबत बसायचे, बसायचे काय? त्यांच्या मांडीवर डोकं ठेवुन पडायचे, मग मला थोपटत थोपटत बाबा रामरक्षा सुरु करायचे. त्यांच्या आवाजात, त्यांच्या शब्दोच्चारात, त्या वातावरणात एक वेगळंच भारलेपण यायचं. रामरक्षा म्हणावी तर ती बाबांनीच आणि पडवीतल्या झोपाळ्यावर बसुनच... कंदीलाच्या प्रकाशात...झोपाळ्याच्या झोक्यांच्या सुरात!

रामरक्षा झाली की बाबा पाढे म्हणायला सुरुवात करायचे..."हं म्हण आता माझ्याबरोबर, एक मी म्हणेन, एक तू म्हण". इतका वेळ रामरक्षा ऐकताना समोरच्या भिंतीवर मोठया भावाचे सावलीचे खेळ बघत हसणारी मी एक्दम झोपेचं सोंग करायचे...पण बाबा उठवायचेच... मग मला नेमके १३,१७ सारखे वाईट पाढे यायचे. तेराचा पाढा म्हणताना मी "तेरा त्रिक एकु..." म्हणुन थांबायचे... तो आकडा ४९,५९,६९ जो काही आहे तो बाबांनी समजुन घ्यावा अशी अपेक्षा असायची... पण कायम ह्या दुष्ट "एक्कु" मुळे मला १३चा पाढा ५ वेळा म्हणायला लागायचा... तरी एकदाका १६चा पाढा झाला की खरी गंमत यायची, माझी लहान बहीण तर ओटीच्या पाय-यावर बसुन टाळ्या वाजवत म्हणायची... "आता ताई रडणार"... सतरा सत्ता काय असतं हे मला आजही आठवत नाही...

आत्ताही बाहेर अंगणातल्या काळोखात बघत मी सतरा सत्ता काय आहे आठवत होते...इतक्यात बाबांची आतुन हाक आली, मला ते आत बसायला बोलावत होते. मी शांतपणे त्यांच्यामागे जाऊन बसले, माझ्या मागेच एका सतरंजीच्या घडीवर आमची मांजर येऊन झोपली होती. मग काय, मला मज्जाच होती... माझे तिच्याबरोबरचे खेळ सुरु झाले. पण मी काय करत्ये हे बाबांना दिसत नसलं तरी स्वयंपाकघरातुन काकुने पाहिलं होतं... तिने मला डोळ्यांनीच दटावलं! त्यामुळे आता वेगळं करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं, गणपती आणि माझ्यामधेच सगळे बसले होते, गणपतीही दिसत नव्हता...

मग मी डोळे मिटुन घेतले, बघणा-याला वाटावं, काय अगदी ध्यान लावलं आहे...
आधी तो आला डोळ्यांसमोर, पण त्याला FF [fast forward] केलं, दुस-या दिवशी निघायचं आहे, त्याची तयारी..FF, काकुनी गौरीची काढलेली पाउलं..FF, काही वर्षांपुर्वी माझं आणि बहिणीचं गौरी आणण्यावरुन झालेलं भांडण...FF, मोटरसायकलवर बाबांच्या पुढे बसायला म्हणुन आम्ही केलेली नाटकं...FF, फक्त मी आणि बाबा कुठेतरी जात होतो, मी खणाच्या कापडाचा cute फ्रॉक घातलेला... मी ह्या scene पाशी थांबले...
मी पहिली-दुसरीतली असेन... दोन बो घातलेले, फ्रॉकला आईने रुमाल पिनने लावुन दिलेला. बाबांचं बोट धरुन मी कोणत्यातरी घरात गेले... आत्ता बसल्येत तसे १०-१२ लोक तिथे बसले होते, सहस्त्रावर्तनच चालु होतं... अलिबागला दर संकष्टीला कोणा ना कोणाकडे होणारं सहस्त्रावर्तन!
मी बाबांना चिकटुन बसलेले, एक आवर्तन झाल्यावर एकदम बाबांनी ’हरि ओम नमस्ते गणपतये...’ ला सुरुवात केली... आपले बाबा सगळ्यांपेक्षा जोरात म्हणताय्त ह्याचा मला कित्ती आनंद झाला होता, आणि अचानक एक गोष्ट लक्षात आली, अरे हे तर लाईनीने सगळे एक-एक काका अथर्वशीर्ष म्हणतायत की... आता बाबांनंतर कोणीच उरलं नव्हतं. म्हणजे बाबांनंतर मी म्हणायचं की काय? आधी मला थोडी भीती वाटली पण मग मी ताठ बसले... बाबांचं "श्री वरदमुर्तये नमो नमः" म्हणुन झालं, आणि मग मी लगेच माझ्या अथर्वशीर्षाला सुरुवात केली. सगळे काका कौतुकाने माझ्याकडे बघत होते. मी चुकेन की काय अशी भीती असल्याने मी पण माझी "चुक होण्याआधी संपवुया" ची सुपरफास्ट ट्रेन सोडली...माझं म्हणुन झालं, सगळ्यांनी एकदम "अरे व्वा.." "शाब्बास" वगैरे दाद दिली. कित्ती छान वाटत होतं... ज्या काकुंच्या घरी आवर्तन होतं त्यांनी बक्षीस म्हणुन मला एक छोटी कापडी पर्स दिली होती... घरी आल्यावर बाबांनी आईला माझं कौतुक सांगितलं होतं...


एकदम डोळे उघडले, बाबांचा आवाज आला... का माहित नाही पण माझे डोळे भरुन आले होते. फलश्रुती सुरु झाली होती. ’ओम सहनाववतु सहनौभुनक्तु’ सुरु झालं, ह्या श्लोकात माझं नाव येतं म्हणुन हा माझा आवडता आहे. आजही हे कुठेही ऐकलं तरी माझ्या चेहे-यावर हसु उमटतं!

काकुनी आतुनच मला खुणेने "आता पानं घ्यायला ये" म्हणुन बोलावलं. मी अनिच्छेनेच उठले... पण माझ्यातली छोटी मुलगी अजुनही बाबांना चिकटुन बसली होती. rather ती तिकडुन कधी उठलीच नाही...
झोपाळ्यावर असतानाही नाही आणि आत्ताही नाही. आणि पुढे कधीही त्या छोट्या मला, मी तिथुन उठवणार नाहीये... मोठी वाईईट्ट मी त्यांच्यापासुन कितीही दुर गेले तरी!

13 comments:

Nandan said...

mast! FF cha bhaag bhari aahe.

सर्किट said...

सुरेख!

तुझ्या सुरुवातीच्या टीन-एजरिश पोस्ट्सशी तुलना करता कसलं मॅच्युअर लिहायला लागलीयेस.

विथ धिस पोस्ट यू आर प्रोमोटेड टू द सीनिअर ब्लॉगर्स क्लब - माझ्या मते तरी. :)

Abhijit Bathe said...

अल्टिमेट लेख आहे हा!
याच्यात काय काय नुसतं भारीच नाही तर ’तोड प्रकाराचं’ आहे हे लिहायला लागलो तर माझी कमेंट लेखाएवढी होईल.
पण कुठेही एक शब्दही कमीअधिक न होता लिहिलेला अतिशय सुंदर लेख!

जिओ!

Sneha said...

teju .. cnt express mala kay vatal.. but thanx for this post :)

दीपिका said...

chan! :)

HAREKRISHNAJI said...

आपण मला सिंहगड रस्ता ्किंवा डेक्कन परिसरात ्चांगले M.D. Physician डॉ. सुचवु शकाल काय .

Aboli said...

Jaswantdi, Tuz likhan khoop aawadale... ofiice madhe jaam bore zale hote. Tuze lekh wachun agadi fresh watat aahe - Sushmita

नीरजा पटवर्धन said...

waah kya baat hai!!!

Jaswandi said...

@ nandan... thank you! मलाही जेव्हा ती कल्पना डोक्यात आली तेव्हा मी स्वतःला खुप आवडले होते :)

@ सर्किटेश्वर... thanx! हो, थोडाफार फरक मलाही जाणवला मी काय लिहित्ये त्यात!

आणि अजुन वेळ आहे मी सिनीअर ब्लॉगर बनायला :)


@ abhijit
thanx a tonn

Jaswandi said...

स्नेहा, thanx का?

दिपु, comment साठी thanx! :)

हरेकृष्णाजी, मी पुण्यात नवीन आहे त्यामुळे मला जास्त माहीत नाही. मी विचारुन सांगुन शकेन!

Jaswandi said...

thanx सुश्मिता, मला तुझं नाव खुप आवडलं!

Hey thanx नीरजा... तुझी comment माझ्या ब्लॉगवर बघुन छान वाटलं! :)

Shashank Kanade said...

खूप दिवसांनी ब्लॉगजगताच्या सफरीला निघालो आणि तुमचा ब्लॉग वाचायला मिळाला!
मांजरी आणि झोपाळा ह्या नितांत सुंदर गोष्टी आहेत, ह्यात वादच नाही :).
खूप छान वाटलं वाचून.

Shardul said...

Khup sunder lihila aahe !!!