Tuesday, July 23, 2013

पेपर क्रेन


कागज़ के दो पंख लेके, उड़ा चला जाए रे

जहाँ नहीं जाना था ये, वहीँ चला हाय रे

उमर का ये ताना-बाना समझ ना पाए रे
के देखे ना, भाले ना, जाने ना दाये रे
दिशा हारा ,कैमोन बोका, मोन्टा रे!




पायाशी एक मांजर दुपारचं जेवण जास्त झाल्यासारखी  सुस्त बसलेली... बाजूच्या टेबलावरचा पंखा आणि खिडकीतून येणारा वारा  एकमेकांत मिसळून कमी-जास्त होणारा... आणि त्या वार्यापासून कागद वाचवत ओरीगामिचे पेपर क्रेन करत बसलेली आज्जी...

एका उंच भिंतीला लागून बराच मोठा पेपर क्रेन्सचा ढीग... भिंतीपलीकडच्या एका लहानश्या खोलीतला लांब दाढीवाला माणूस रोज अशी डझनभर क्रेन्स टाकत असतो खिडकीतून बाहेर... तुरुंगातले शेवटचे दिवस मोजत... निदान हे पक्षी तरी उडतील ह्या आशेने... 

Vanity Vanमध्ये बसलेला तो करोडो रुपये आणि करोडो हृदयांशी कायम खेळणारा... एक पेपर क्रेन जमत नाही म्हणून वैतागलेला..युट्यूब वरून व्हिडीओ  बघत पेपर क्रेन करत बसलेला... दाराबाहेर  त्यांचे पंटर त्याची वाट बघत उभे..
 कोणालातरी impress करायला ओरिगामी शिकतोय म्हणे... as if his charm is not enough...

कपाळावरची बट मागे सारत मिस डूला वर्गात येते... गोंधळ घालणारी मुलं शांत होत क्राफ्टचा गृहपाठ बाहेर काढतात... लहान मोठे, निळे पिवळे , कच्चे पक्के पेपर क्रेन सगळ्या बेंचवर पसरलेले... एक बेंच मात्र रिकामा, रडवेला... मिस डूला त्या बेंचजवळ येणार इतक्यात दारातून त्याचा आवाज... "मिस डूला... पेपर क्रेन.." वर्गातली सगळी मुलं त्या करोडो रुपये अन हृद्यांशी खेळणाऱ्या माणसाला बघून हरखून जातात... मिस डूलाचे गालही गुलाबी होतात..."her homework... shes my niece...she left it in my car"... रिकाम्या बेंचवरची मुलगी हसायला लागते. 

जॉब इंटरव्ह्यू साठी कंपन्यांचे उंबरठे घासत फिरणारा... आता रोजच्या इस्त्रीलाही पैसे द्यायला परवडत नाहीत म्हणून चुरगळलेला शर्ट टाईट इन केलेला... रोज दुपारी बागेत येऊन बसतो आईने दिलेला डबा खायला... डबा संपल्यावर रिजेक्शन लेटरचं पेपर क्रेन होतं त्याच्या... दिवसातला एकमेव आनंद देणारा क्षण त्याचा... 

अनेकदा पहाट मावळत आली की घरी पोचत असतो दमून... केस, कपडे आणि चालणं सगळंच विस्कटलेलं... झोपायच्या आधी थरथरत्या हातांनी लहानसं पेपर क्रेन करून टाकतो एका काचेच्या बरणीत... 'सेक्स-जार' त्याचा... आज ही बरणी भरल्यावर तीही जाईल कपाटातल्या बाकी ९ बरण्याना सोबत करायला... 

लहानपणापासून वाचलेली , तिची आवडती राजकन्येची गोष्ट... "राक्षस तिला पळवून नेतो तेव्हा तिच्या हारातले मोती टाकत जाते ती वाटेत... त्या मोत्यांचा माग काढत राजपुत्र शोधून काढतोच तिला... " आज कांचनजंगेच्या बेस केम्पहून वर चढायला लागल्यावर ती तिच्या पोलादी हातांनी नाजूक पेपर क्रेन सांडत गेली थोडथोड्या अंतरावर... पांढर्याशुभ्र बर्फावर लहानसे लाल क्रेन...

पोस्टातून निवृत्त झाल्यावर काहीच काम उरलं नाही... ते आता रोज सकाळी उठून पेपर क्रेन करतात आणि अनोळखी पत्त्यांवर पाठवत बसतात...

"कागदाची टोकचं मुळात जुळत नसतील तर पुढे क्रेन होणारच कसा?... घड्या नको तेव्हा उलगडणार नाहीत ह्याची काळजी सुरुवातीलाच घ्यावी लागते... चुकीची घडी पक्की बसली तर त्याच्या खुणा कायम राहतात कागदावर..." फावल्या वेळातल्या विवाह समुपदेशनात हल्ली त्यांना फावल्या वेळेतल्या "ओरिगामी एक छंद "चा उपयोग होतो...

बाईच्या जातीला राग शोभत नाही हे लहानपणापासून तिच्या मनावर बिंबवलेल... तिने तिची anger management  शोधून काढली आहे... तिच्या डेस्कवर, ओट्यावर, बेडवर , गाडीत, पर्समध्ये पेपर क्रेन पसरलेले असतात... 

 ६  तासांच्या प्रवासात, पहिले २ झोपेत, दुसरे २ नजरानजरेत .. नंतरचे २ लाजून हसण्यात आणि आधी कोणी बोलावं हा विचार करण्यात गेल्यावर ... ट्रेनमधल्या समोरच्या खिडकीतल्या तिचं स्टेशन येतं. तिला सामान उतरवायला मदत करून तो स्वतःला शिव्या देत जागेवर येऊन बसतो आणि तिच्या सीटवर एक दहा आकडी नंबर लिहिलेलं पेपर क्रेन दिसतं...

पेपर क्रेनचा टाटू केल्यावर artistने विचारलं "why not a real crane? some real bird? why paper crane?"... "I dont believe in what nature creates...its seldom perfect" ...लंगडतच ती दुकानातून बाहेर पडते...

टेक ऑफ घेताना तो डोळे घट्ट मिटून घेतो आणि हातांनी कागदाच्या घड्या घालत पेपर क्रेन करतो... अगदी पहिल्यांदा आज्जीने शिकवल्यासारखं.... आज्जीच्या केसांसारख्या पांढर्याशुभ्र ढगांमध्ये विमान पोचल्यावर ते क्रेन तो खिडकीत ठेवतो.. मनातल्या मनात आता आकाशात असणारी आज्जी शोधतो... गेली ४० वर्षं तो विमानातून असाच प्रवास करतो...

भांडण झाल्यावर एकमेकांशी बोलणं सोडलं आहे त्यांनी आता... एकमेकांची खुशाली कळवायला एक कपकेक आणि त्यावर पेपर क्रेन ठेवतात एकमेकांच्या दारासमोर अधूनमधून...

Pintrestवर बघून केलेलं..
.बेसनाने बरबटलेल..
.पावसात भिजलेलं...
शेवटचे श्वास घेणारं...
हातात चुरगळलेलं...
वाऱ्यावर उडणार.
.हजार वर्ष जगणारं...
इंस्ताग्रामवरचं ठिकठीकाणी फिरलेलं...
Spacestationमध्ये  करेननी केलेलं....
जुनं, नवीन, क्रिस्प, सैल, लकी, अनलकी...
.१..१०..१००..५००... १००० पेपर क्रेन







सदाको* ची फक्त ६४४ पेपर क्रेन बनली... १००० झाली असती तर??

6 comments:

विद्या said...

सुंदर, सुरेख, छानच.

मी आतापर्यंत बर्याच वेळा paper crane बनवल्या आहेत. प्रत्येक वेळी काही ना काही कारण होतंच असं नाही. पण इतकी सगळी करणं वाचून सही वाटलं.

Gouri said...

मस्त!
बनवून बघायलाच हवेत आता पेपर क्रेन.
आणि सदाको विषयी काहीच माहित नव्हतं, तिची ओळख करून दिल्याबद्दल थांकू.

Vidya Bhutkar said...

wowww..wonderful. This one made me float with all the wandering thoughts left behind with each person making a paper crane. :)
Vidya.

Vibhavari said...

छान लिहितेस..

विशाखा said...

Superb! Thanks for sharing Sadako's story.

Jaswandi said...

Thank you :)