Monday, July 19, 2010

जब व्ही मेटची करिना

"छ्या... मला कधी कळतच नाही यार ती"
विक्र्याने खूप जास्त दीर्घ पॉज नंतर हे वाक्य टाकलं. "ओह.. ओके.. असं काय? हं असेल बुवा.." छाप रिअ‍ॅक्शन देउन लोकांचा नजरेत न येता ग्लासला लागलेला कोल्डकॉफीचा फेस कसा चाटता येईल, ह्याच्या मी विचार करायला लागले.
"तुला माहित्ये का? मला एका क्षणाला ती जाम गोंडस वाटते.. जब व्ही मेट मधली करिना आहे नं तशी.. म्हणजे इंटरव्हलच्या आधीची.. चुलबुली टाईप"
शी बाबा "चुलबुली" शब्द नाही आवडत मला.. नो स्पेसिफिक रिजन.. पण नाय आवडत.. पण ना क्लिनीक प्लसची जाहिरात होती ना चुलबुलीची अ‍ॅनिमेशनवाली.. ती जाम आवडली होती...
"पण ना अगं.. मला ना ती काही वेळेस जाम सिरिअस वाटते.. म्हणजे कशी सांगु का?"
मग त्याने परत एक त्याचा ’फेमस सायलन्स एन ऑल’ टाकला...
"हा... जब व्ही मेट मधल्या करिना कपुरसारखी... पण म्हणजे इंटरव्हलनंतरची"
मी तोंडातला स्ट्रॉ ग्लासमधे फुंकत त्याच्याकडे पाहिलं.. ’बाबा-पुता-तुझ्या-आयुष्यात-त्रास-काये-लुक’ दिला त्याच्याकडे...मी त्याला म्हणाले "गुड है ना भाऊ... सो नाऊ यु नो [क्नो.. :) ] तुझी ती मुलगी गीत सारखी आहे" त्याने शुन्य भाव चेह-यावर ठेवत मला विचारलं..
" करिना कपुरचं नाव गीत होतं का जब व्ही मेट मधे?"
मग मी एक रिअ‍ॅक्शन दिली... म्हणजे नक्की कशी ते मला लिहीता नाही येते.. मी आत्ता आरश्यात तसं तोंड करुन पाहिलं पण तरी शब्दात नाही बा उतरवता येते.. पुढच्या वरच्या दातात बडिशोप अडकल्यावर ती काढताना चेहरा जसा होतो तशी थोडीफार.. म्हणजे त्यातल्या त्यात जवळची! पण कोणाच्या पुढच्या वरच्या दातात बडिशोप का अडकेल? व्हाटेव्हर...

"तू काही खाणारेस का?"
विक्रांतने घड्याळात बघत मला विचारलं... ह्या लोकांचा प्रॉब्लेम मला कळत नाही. म्हणजे हातावर घड्याळ बांधा.. वेळ कळायलाच हवी,पाळली नाही तरी चालते एकवेळ! पण दशसहस्त्रवेळा घड्याळात काय बघायचं? लोकं सतत त्यांच्या मोबाईलमधेही बघतात... मी ही बघते म्हणा मला कंटाळा आला समोरच्याच्या बोलण्याचा की.. किंवा काही वेळेस कळतच नाही ’आता कुठे बघायचं’ तेव्हा मोबाईल धावुन येतो! "तुला घाई आहे का विक्र्या? नको खाऊया काही.. तसंही २ कॉफी प्यायल्यावर कोणी काही खात नसेल" मी बोलले.. त्याने उगाच एक स्माईल दिलं..
" भेळ खाऊया.. बिसलेरीचं पाणी वापरतात हे"..
ओक्के.. हा माणुस गंडला आहे... साफच.. प्लीजंच.. सॉरींच.. सगळंच... "विक्रांत हे लोक भेळेत पाणी घालतात??.. बिसलेरीचं?" .. शुन्य भाव... आयुष्यभर काल प्रेमभंग झाल्यासारखा वागतो हा माणुस... शेल्डन लेनर्डला ’देअर देअर’ म्हणतो ते उगाच आठवलं मला, तसं म्हणावंस वाटलं त्याला.. आणि एकदम लेनर्ड आणि विक्रांतमधलं साम्य जाणवायला लागलं.. हेअरस्टाईल, चीज इनटॉलरन्स आणि डोकं सोडल्यास विक्रांत बराच तसा आहे. ( पाहा: बिग बॅंग थेअरी नावाची सिटकॉम [ सिटकॉम वरुन आठवलं.. मला सिटकॉम स्टॅण्डअप कॉमेडीच्या विरुद्धार्थी शब्द वाटायचा,, म्हणजे मला वाटायचं की सिटकॉम मधे ते लोक जास्त वेळ बसलेले असतात बार किंवा कॉफीशॉप किंवा सोफ्यावर वगैरे.. म्हणुन सिट-कॉम { ओके.. हे बळंच होतं.. पण मला वाटायचं, आणि जेव्हा खरा अर्थ कळला.. मला माझा बावळटपणा क्षणभर आवडला होता} ] )

"विक्र्या.. सांगायचं आहे का तुला तिच्याबद्दल अजुन? तू बोलु शकतोस... मी ऐकत्ये" मी स्वतः माझ्या डोक्यात गेले हे म्हंटल्यावर.. पण त्याला बरं वाटलं असावं... त्याने पहिल्यांदाच प्लेटवर चमचा न वाजवता भेळेचा घास घेतला. प्लेटवर चमचा वाजणं ठीक आहे.. लोकांच्या दातांवरही चमचे वाजतात.. त्रास होतो त्या आवाजाचा खूप!
"तिचं हसणं सुर्यप्रकाशासारखं असेल... पण जेव्हा ती जवळ मिठीत येईल तेव्हा रात्र होऊन जाईल"...
एक मिनीट ..एक मिनीट... मला हे माहित्ये...मला हे माहित्ये....हे असं काहीतरी गुलजार, अख्तर वगैरे मंडळी लिहु शकतात.. विक्र्या नाही.. विक्र्या ते चुकीच्या ठिकाणी चुकीच्या शब्दात दॅट टू मराठीत करुन बोलु शकतो... मी डोळे मिटुन आठवायचा प्रयत्न केला.. मग टेबलावर हात आपटुन पाहिला.. कपाळावर बोटं वाजवली ह्यातलं काहीच वर्क नाही झालं.. मग त्यालाच माझी दया आली..
"यहा मधलं गाणं आहे.. नाम अदा लिखना... जब तुम हसते हो दिन हो जाता है, जब गले लगो तो दिन सो जाता है...."
हा..... चोर साला...
मास्टर्स नाही करत ही लोक.. मग त्यांना ’रिसर्च मेथेडोलोजी’ छाप पेपर नसतात.. त्यामुळे सोर्सेसना ड्यु क्रेडिट देत नाहीत.. सोर्स सांगतच नाहीत... आता मला शंका आली म्ह्णुन नाहीतर गुलझार, अख्तर नंतर विक्रांत आला असता की राव... तसं मधे त्याची एक झब्बा फेज होतीच.. ज्यात तो जुने-मळके झब्बे घालुन फिरायचा.. तोंडात कायम एक सिगरेट.. ती अजुनही असते पण आता तो माणसाने घालायचे कपडे घालतो... त्याने आत्ताही सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं.. माझ्यासमोर धरलं... मी स्वतः ओढते की नाही ओढत ह्या कन्फ्युजनमधे जावं इतक्या कॉन्फिड्न्टली त्याने ते पाकिट पुढे केलं होतं.. "मी नाही व्यसनं ठेवत... विडी-काडी-बाई-दारु वगैरे काही नाही..." मला वाटलं ह्यावर हसेल तो.. काही न म्हणता त्याने पाकिट आत टाकलं स्वतः सिगरेट न ओढता [ अशीच शंका... फिल्म सारखं ब्लॉगवरही ’नो स्मोकिंग’ आलं असतं तर? मला आत्ता ह्या पॅरा नंतर "वैधानिक इशारा" टाकावा लागला असता ना विक्र्याने सिगरेट ओढली असती तर]

"सुंदर पण त्यापेक्षा स्मार्ट!.. बडबडी पण खूप उथळ नाही, आणि थोडी वेडी...."
तो परत सुटला... मी मनातल्या मनात म्हंटलं जब व्ही मेट्च्या करिनासारखी... हा माणुस त्या करिना कपुरमधुन बाहेरच येत नव्हता...मला वाटतं अजुनही अनेक मुलं, मुली तिच्या त्या "गीत" मधे अडकुन आहेत. पोरींना उगाच वाटायला लागलं आपणही गीत असावं, आपण गीत आहोत... "मै अपनी फेवरेट हुं।", "पता चल जाता है।", "बचपना ट्राय किया था ना.. अब पागलपन ट्राय करते है।" वगैरे वाक्यं पोरी अजुन टाकतात... आणि त्यांना वाटत असतं कुठेतरी शाहिद बसलाय त्यांचा... अन पोरांना माहित असतं ’आपली पोरगी काय गीत नाही, पण असती तर चालली असती राव’... पण विकसारख्या माणसाने पण तिच्यात अडकुन राहावं हे जरा मला पचणं कठीण होतं... एक्वेळ बिसलेरीचं पाणी ओतलेली भेळ पचेल..
"घे लिहायला मग..."
मी त्याच्याकडे आता शुन्य भाव चेह-यावर ठेवुन बघितलं.. "काय? काय लिहायला घ्यायचं? फिल्म?? हिरोईन जब व्ही मेटची करिना आहे एवढचं सांगितलं आहेस.. ह्यावर मी काय करु?".... "मग-त्यात-काय-एवढं-लुक" देत विक्र्या माझ्याकडे बघायला लागला...
"नाही जमणार का?.... अगं हं आणि तिच्या गालाला खळ्या पडत असतील..."
मेरा बस चलता तो विक्र्याच्या गालावर खड्डे पाडले असते... अरे मनुष्या.. असं कसं करु शकतोस तू? विक्रांत उठला, १२० रुपयाच्या बिलवर १२१ रुपये ठेवुन...माझ्याकडे न बघता सरळ चालायला लागला. मग एक्दम थांबुन परत आला...
"२ आठवडे देतो तुला.. आणि तेजु प्लीज टिपीकल फिल्मी काहीतरी लिहु नको"
विक्र्याण्णा..नारायणा... एका फिल्ममधलंच कॅरेक्टर उचलुन देउन एक फिल्मच लिहायला सांगतोयस तिच्या भोवती आणि म्हणे ते फिल्मी नको..."ओके.. आय विल ट्राय माय बेस्ट विक्रांत"

अश्या रीतीने "आपण-एक-फिल्म-लिहुया" ची १८वी मिटींग संपवत तो निघतो... गेल्या मिटींग्जच्या जोरावर आता माझ्याकडे फिल्म लिहीण्यासाठी शांतारामसारखा हिरो, गीत सारखी हिरोईन आहे, नॉटिंग हिल सारखं काहीतरी पाहिजे हा रेफरन्स आहे, एक गाणं वाळवंटात शुट करता येईल (वाचा: तडप तडप, ह.दि.दे.चु.स) असं काहीतरी घडायला हवं ही त्याची मागणी आहे, फिल्म टिपीकल फिल्मी नकोय ही सुचना आहे आणि सर्वात महत्वाचं गुलजारचं गाणं मराठीत करुन स्वतःचं म्हणुन खपवु शकणारा डिरेक्टर आहे... अजुन काय पायजेल? विक्रांत मोठा डिरेक्टर होणार एक दिवस... त्याची फिल्म हिट जाणार ब्वा...

15 comments:

अनिकेत वैद्य said...

मला बोलवा फिल्मच्या premiere शो ला.

हेरंब said...

हा हा हा .. जाम भारी आहे हा विक्र्या.. आवडला आपल्याला..

a Sane man said...

:-)

Nile said...

हाहाहा!धमाल सुरु आहे तर मग!

Abhi said...

:) उगाचच एका मराठी चित्रपट दिग्दर्शकाची आठवण झाली हे वाचून.. हे लिहिण्यामागे हाच तर हेतू नव्हता?? :)

अभिलाष मेहेन्दळे said...

"मेरा बस चलता तो विक्र्याच्या गालावर खड्डे पाडले असते" हे आवडलं! जबरदस्त लिहिलं आहेस. सुरुवातीला वाटलं एखाद्या मुलीवर प्रेम बसलेल्या तरुणाची कथा आहे. कॉलेजात असताना चित्रपट पाहुन लगेच एखाद्या मुलीवर प्रेम बसणारा माझा एक मित्र होता, त्याची आठवण झाली. :-) मस्त twist केलं आहेस.

Silence said...

धमाल ... मजा आली वाचून.
"लोकांचा नजरेत न येता ग्लासला लागलेला कोल्डकॉफीचा फेस कसा चाटता येईल, ह्याच्या मी विचार करायला लागले."

’बाबा-पुता-तुझ्या-आयुष्यात-त्रास-काये-लुक’

... मस्त हसलो हे वाचून.

Vinit said...

खरच कोणाच्या पुढच्या वरच्या दातात बडिशोप का अडकेल? :D :D
काहीही सुचते का तुला :P :P

Deep said...

हाहाहा माझ्या अडकल्ये वरच्या दातात बडीशेप ;)

भारीच्चेस :ड

Shraddha Bhowad said...

’खो’ दिलाय तुला.

@ErRshreyas said...

खूपच छान !

Gouri said...

बिसलेरीचं पाणीवाली भेळ ... वरच्या दातात बडीशोप ... :D

निशा............ said...

एक नंबर!!!!

आवडेश!!!!

Chinmay said...

ही अठरा मिनिटाची फिल्म असती तरी चालली असती :) ...तिकीट लावून !
उरलेल्या दीड एक तासासाठी थोडी अनुवादित 'गीत' टाक

Monsieur K said...

i am so, so, so proud of u!!
kiti velaa haslo aahe mi hee post vaachtaa-vaachtaa!!

bhaari mhanje lai bhaari lihili aahes tu hee post! :)

shaabbaas!!
keep it up!!