नागमोडी वळणं घेत, काजु-आंब्यांच्या बागांमधुन उतरल्यावर समोरचं दिसते आमच्या गावची छोटीशी नदी. आणि गोड्या पाण्याचा एक १२ महिने वाहणारा झरा. नारळ-सुपारीची काही झाडं सुगरणीची घरटी मिरवत उभी असतात. खंड्या, कोतवाल,बगळा, टिटवी सारखे पक्षी पाण्याच्या आजुबाजुला दिसतात. मध्येच एखादा पोपटांचा थवा आकाशातुन उडत जातो. झ-यावर पाणी भरायला आलेल्या ३-४ बायका "ही कोण पाहुणी मंडळी आली" म्हणुन आमच्याकडे बघत असतात...त्यातच समोरुन आमच्याघरी काम करणारा विजुभाऊ गुरं नदीवर धुवायला घेउन येताना दिसतो. बाबा गुरांकडे कौतुकाने बघतात... "पाडी कित्ती मोठी झाली..." म्हणत एखाद्या गायीवरुन हात फिरवतात.
जरा पुढे गेल्यावर आमची वाडी दिसायला लागते... वाडी म्हणजे खरं तरं चारचं लेले कुटुंबांची घरं आहेत. आमचं घर सर्वात शेवटी आहे... घराच्या वाटेवर तीन चाफ्यांची झाडं लागतात... तीनही चाफे वेगळ्या रंगांचे. चाफ्याचा वास मनात साठवत असतानाच झाडांआडुन आमचं घर दिसायला लागतं. घराच्या गडग्याजवळची गुलबक्षी आणि जास्वंद आमच्या स्वागताला फुललेली असते. सारवलेलं अंगण आणि अंगणातली तुळस, अंगणात घातलेली वाळवणं..आमसुलं, आंबोश्या, काजुच्या बिया, उन्हं खायला बसलेली दोन मांजरं, आणि दारात दुध-पाणी घेउन उभी असलेली काकु! ह्याला म्हणतात घरी येणं... लिफ्ट्मधुन उतरुन दारावरची बेल वाजवल्यावर सेफ्टीडोर मधुन डोकावुन मग कोणीतरी दार उघडणार, त्यात कुठे ही कोकणातल्या स्वागताची मज्जा?
घरी आत आल्या आल्या पडवीतला झोपाळा खुणावत असतो. पण काकु आतुन कोकम सरबत प्यायला बोलावत असते. माजघरात बसुन सरबत पित मी कौलातुन येणा-या कवडश्यासोबत खेळत राहते... इतक्यात आजोबा आत येतात, "पानं घेतलीस का गो? मुलींना भुका लागल्या असतील!" असं म्हणत नैवेद्य दाखवायला स्वयंपाकघरात जातात. फणसाची भाजी, कुळिथाचं पिठलं, अळुची भाजी, आमरस ह्यातलं त्या सिझन मध्ये मिळत असेल ते पानात असतं. पोळी सोडल्यास सगळं काही घरच्या धान्य, फळं, भाज्यांनी बनवलेलं. आपल्याला हवी ती भाजी शेतातुन आणुन ती बनवुन खायची मज्जा बिग बझारच्या packed vegetables मध्ये कशी यायची?
दुपारच्या भरगच्च जेवणानंतर थोडावेळ आराम केल्यावर आजुबाजुच्या बागांत, शेतांत भटकायचा अनुभव वेगळाच असतो. सगळीकडे शांतता असते. मधुनच एखादा पक्षी ओरडत असतो... झाडंही दुपारची डुलकी घेत आहेत असं वाटावं इतका मंद वारा असतो. मगाशीच नदीवरुन स्वच्छ होऊन आलेली गुरं गोठ्यात रवंथ करत बसलेली असतात. मधुनच घरावरुन जाणारा एखादा माणुस "ओअ..काका" अशी आजोबांना हाक मारुन जातो. मग कोणीतरी "मुंबईकडची पाहुणी कधी आली?" म्हणत विचारपुस करतो. गावातली सगळी माणसं आपल्या आजोबांना ओळखतात ह्या गोष्टीचा मला लहानपणापासुनचं खुप अभिमान वाटत आलाय...आणि त्याचमुळे असेल कदाचित, पण आमच्या लहानश्या सोसायटीतलेही सगळे आम्हाला ओळखत नाहीत ह्याचं वाईटही वाटतं.
दिवेलागणी झाली की आम्ही झोपाळ्यावर बसतो. अथर्वशीर्ष, रामरक्षा आणि पाढे म्हणत... आजही मला वाटतं की रामरक्षा म्हणावी तर ती कोकणातल्या एखाद्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसुनचं! आणि मग जमणारा गप्पांचा फड... रात्रीच्या मऊ खिचडी किंवा पिठलं भातानंतरचं ताक... आणि रातकिड्यांच्या किरकिरीत कधीतरी गप्पांमध्येच लागलेली झोप! डोक्यावर पंखा नसला तरी तिथे शांत झोप लागते.
सकाळी उठल्यावर खोपटातल्या चुलीजवळ बसायला मस्त वाटतं... चुलीवर मोठ्ठालं पितळ्याचं पातेलं पाणी उकळवत ठेवलेलं असतं. स्वयंपाकघरामागच्या चुलीवरही असंच एक पातेलं असतं, त्यात मऊभात रटरटत असतो. मऊ भात,मेतकुट, लिंबाचं लोणचं किंवा फोडणीची मिरची, चुलीत भाजलेला पोह्यांचा पापड, दह्याची कवडी....आह्ह, पंचपक्वान्नं गेली उडत अश्या मऊभातासमोर! आत्ता हे नुस्तं लिहीतानाही मला भुक लागल्ये. भातावर सोडलेल्या साजुक तुपाच्या धारेचा वास येतोय...
आंब्यांचा मोहोर दिसतोय, माडीवर लावलेली आंब्यांची आढी दिसत्ये...बागेतल्या एका रायवळ आंब्याची चव जिभेवर रेंगाळते आहे, सारवलेल्या अंगणाचा, गोठ्यामागच्या बकुळीचा, पाटातल्या पाण्याचा वास दरवळतो आहे. सकाळ-संध्याकाळचे वेगवेगळे पक्षी, पडवीतल्या झोपाळ्याचा "टकर्रर्र-कट्ट" आवाज, मधुनच गोठ्यातल्या वासराचं हंबरणं ऐकु येतं आहे. समोरची कंप्युटर स्क्रीन आता धुसर होत्ये... गदिमांचं "दुर राहिले माझे खेडे" गाणं सारखं वाजतं आहे. आता फक्त सुट्टीची वाट बघायची!
18 comments:
tu mahan lekhika honar ahes !
tuzya gavi tar ata nakkich yayla hawa !
tumche kokan varnan chan aahe. me hey phakt pahile aahe. hey 1kda anubhwayla hawe aahe.
arrr... dhuracha vaas aala ka g??
jaL jaL jaLavalas ! :(
chaan..
apalya javal je nahi tyachi athavan yena swabhavik ahe....tuza je kokan athavun hota...maza te mumbai athavun hota....same emotions....backdrop fakta badalato.....
moments :)
Mastach !
Kokanaat javese vatayla lagle sagale vachoon :)
majha aajol pan asacha ahe ga! aathavan jhali. chulivar garam honarya panyacha vas pan kitee chan aato na? mala ithe basun ala!
:-)
chhan lihilayes.
mala deshavarachya amchya gavachi athavan ali. khup kami vela tithe gelelo, pan ti sheta, tya paayvaaTaa, ti viheer, ambhyachi ti 2 zaaDa - sagaLa ajunahi lakhkha aThavataye.
Chan lihiles....kokanani mala kayam bhural ghatali aahe...aaj tujhya likhanachi yacha pun:pratyay aala...keep it up...
Tanvi
www.sahajach.wordpress.com
आज मलाही गावचीच आठवण व्हावी नि त्यावरच पोस्ट मी ही टाकावं :)
लकी यू...हवं तेव्हा गावी जाता येतं असेल ना!
मस्तच वाटतंय वाचून.
लय म्हन्जे लय भारी लिवलय बग हे. आमाला काय बी सबुद सुचत नाय आता परशंसा म्हन्जे किती आन कशी गं कराची? बर नुस्त पोस्ट वाचून काई बी न लिवता जान बी जमल नसतं म्हनू हे सार
तेजस्विनी,
लहानश्या सोसायटीतलेही सगळे आम्हाला ओळखत नाहीत >>> त्यांना ब्लॉग दे ना वाचायला मग बघ गंमत...
Heyllo
You are doing a good job yourself! Saw your comment on my blog and thought of knocking your door in between my reactions. :)
Khup chan lihilays. Masta watla wachun. :)
कुठूनतरी येऊन पोचलो ह्या blog वर. ब-याचश्या posts चाळल्या, काही वाचल्या. सही लिहिलंयंस! मजा आली वाचताना :-)
dusht muli kevha gheun jate aahes bol.....
आमचं जुनं घर कोकणात का नाही ?
(आणि असंच आमच्या नातवंडांना वाटणार असेल, तर अजुनही का असू नये ?)
असे काही प्रश्न या लेखामुळे आता पुन्हा बळावले आहेत...
छान लेख..
hi
i visited first time on your blog .
This is really one of the great work , i came across. I really liked this post , i enjoyed this very much .
mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.
thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com
regards
vijay
wah..mastch... pavasalyachi vaat baghte ahe kokanat jayala...
Itke aprat warnan keley tumhi .
Khupch bhari
Amche gaav koknat nahi pan tarisuddha amchya gaavi gelyvar lahan pani je ghadayche tech jawalpas tumhi mandley .
Yachyapeksha sundar warnan asuch shakat nahi.
Maze shabd kami padtayet kautuk karayala.🙏🏻🙏🏻🙏🏻
Post a Comment