जिमुड्या,
आहेस कुठे रे तू? मला तुझी किती प्रचंड आठवण येत्ये माहित्ये का तुला? तुला येते का कधी माझी आठवण? अमोलची? आपल्या घराची? तुझ्या ह्या आवडत्या जागेची? बाकी सोड, आपल्या पॅमची तरी आठवण येत असेलच ना.. तुम्ही दोघं किती मज्जा करायचात आठवतंय ना?
जेव्हा आम्ही तुला आणि पॅमला भेटलो , ऑफिस' आमची आवडती सीरिअल होती . खरंतर आम्ही फक्त पॅमला आणायला आलो होतो. तू आमच्या घरी येणं कधी ठरलं नव्हतंच. तिचा फोटो बघूनच आम्ही तिच्या प्रेमात पडलो होतो. कसली सुंदर आहे ना.. सयामिज मांजरी असतातच छान! तेव्हा तिचं नाव ठरवलं नव्हतं पण जेव्हा तुला बघितलं आणि तूसुद्धा आमच्या घरी येणार हे कळलं तेव्हा मनातल्या मनात मी तुला मायकल स्कॉट म्हणणार हे ठरवून टाकलं होतं. अय्यो, आम्ही फक्त पॅमला घ्यायला आलो होतो हे तुला माहित नव्हतं का? sorry
त्याचं काय झालं सांगते. मी लहानपणापासून मांजरांसोबत वाढलेली आहे. घरात एक तरी मांजर असायलाच हवी ह्यावर माझा विश्वास आहे. अमेरिकेत आल्यावर भारी नियम असतात कुत्रे-मांजरी पाळायचे हे ऐकलं होतं त्यामुळे आम्ही जरा लांब राहत होतो. मात्र अमोलच्या मैत्रिणीकडे तुम्ही आहात आणि फॉस्टरच करायचं आहे , एवढं काय मोठं नाही हे कळल्यावर मी का चान्स सोडत्ये? तुला मी चिंगीबद्दल सांगायचे ते आठवतं आहे का? तुला जसं मी तिच्या आठवणी सांगून बोर करायचे ना तसंच अमोललाही हजारदा चिंगीच्या गोष्टी सांगून कंटाळा आणला असेल. पण निदान त्यामुळे त्यालाही मांजर हवीहवीशी वाटायला लागली असेल (किंवा नवीन मांजर आली तर मी चिंगीबद्दल बोलणं थांबवेन असं वाटलं असेल... पण आता माझ्या मांजरीच्या गोष्टीत तुम्ही दोघांनी अजून भर घातली आहेत) हां तर काय सांगत होते, म्हंटल आणूया एक पिल्लू घरी... ह्यावर आई म्हणाली आता माणसाचं पिल्लूच आणायची वेळ आली आहे. तू लहान आहेस अजून, पण एकदाका ठराविक वय/लग्न होऊन ठराविक वर्ष झाली ना कि आई-वडीलधारया माणसांना सगळ्या गोष्टी बाळ होण्याशी कनेक्ट करता येतात बरं का...
खूप बडबड करत्ये ना मी, आय नो! इतक्या दिवसांनी बोलत्ये तुझ्याशी. पण तुला कोण सगळं ऐकायला सांगतं आहे? समोरच्या झाडावरच्या खारीकडे बघत बस तू... किंवा डोळे मिटून बसून रहा. खूपच कंटाळा आला तर जांभई दे आणि ताणून झोप. ए तू चिडला नाहीयेस ना? तू अजून पूर्ण गोष्ट ऐकली नाहीयेस पण.. फोटो बघून पॅम आवडली असली तरी तिथे प्रत्यक्ष बघून आम्हाला तूच आवडलास... माझा जीमोबा! माझं आणि अमोलचं एकच मांजर घायची तर ती कोण ह्यावरून चर्चासत्रही झालं होतं. मी तुझ्याबाजूनी होते काय... चर्चासत्र अनिर्णीत राहिल्यावर आम्ही विचार केला येऊ दे कि दोघांनाही.. तेवढंच खेळतील एकमेकांशी! Yay आणि तुम्ही दोघं काही दिवसांसाठी घरी आलात.
तुम्हांला घरी आणल्या-आणल्या मी अमोलला पहिला प्रश्न विचारला होता "ह्यांना मराठी कळेल का? कि ह्यांच्याशी इंग्लिशमधून बोलावं लागेल?" . आम्ही दोघंही हसत होतो पण तेव्हा सगळ्या घराची पाहणी करून झाल्यावर तू माझ्या पायाला डोकं घासायला आलास ना तेव्हा लक्षात आलं भाषेची गरज नाही पडणार आपल्या दोघांना... पॅमबाईला मात्र जाम हाका मारायला लागायच्या... तिच्याशी सतत बोलायला लागायचं. जरा दुर्लक्ष केलं कि जे म्याव-म्याव चालू व्हायचं तिचं! तू मात्र एकदम कुल ड्यूड होतास माझा...
काय विचार चालू असायचा रे तुझा दिवसभर? इथून तिथे उड्या मारताना काय खेळ खेळायचास? उगाच भिंतीकडे बघत बसून काय करायचास? आमच्याजवळ तर यायचं नसायचं तरी आम्ही दार बंद केल्यावर दारापलीकडून आम्हांला का हाक मारत असायचास? अमोल घरी आल्यावर कसा त्याच्या मांडीवर जाऊन बसायचास त्याने मोबाईल बाजूला ठेवून तुझे लाड करावे म्हणून... तुझ्या डोक्यावर हात न फिरवता तो मोबाईल बघत बसायचा तेव्हा डोळे बारीक करून कसं चिडून बघायचास ना त्याचाकडे... काही सुधारला नाहीये बघ तो! अजूनही घरी आल्याल्या मोबाईल बघत बसतो. मी काय बोलत्ये काही लक्ष नसतं त्याचं, एकदाका सगळे मेसेजेस बघून झाले कि त्याला माझी आठवण येते .
मला अनेकवेळा सॉरी म्हणायचं आहे रे. त्यातलं एक सॉरी आहे लेझरसाठीचं... किती त्रास द्यायचो ना आम्ही लेझरनी. बायदवे आता माहित्ये ना तुला कि तो लेझर आम्हीच खेळवत असायचो? जिम्या पॅमला कधीकधी किती छळायचास रे तू... कचाकचा भांडणं चालू असायची तुम्हा दोघांची. जेवढ जोरात भांडायचात तेवढंच प्रेमात येऊन एकेमेकांच्या कुशीत झोपायचात ना छान! आणि कधी कधी सकाळी उबेला माझ्या आणि अमोलच्या पांघरुणात शिरून बसाय्चात...कितीवेळ झोपायचात ना तुम्ही... मलाही झोप यायची तुम्हाला बघून! तूम्ही दोघं माझी आवडती पिल्लं आहात जिम्या...
आम्ही किती हो-नाही करत होतो आठवतंय? "असू देत ना दोघंही आपल्याकडे, कशाला परत द्यायची?" "आपणच करूयात ना त्यांना adopt" किती कठीण होतं माहित्ये तुम्हांला परत देणं... तुला माहित्ये ना आपलं घर किती लहान होतं . तूम्हा दोघांना लहान पडली असती रे जिम्या ही जागा... खरंच सॉरी माझ्या मनीमाऊ आम्ही नाही ठेवलं तुला घरी. अमोलशी बोलत नव्हते मी दोन दिवस... तुला काय वाटत होतं रे तेव्हा? तुला राहायचं होतं आमच्यासोबत कि उलट बरं वाटलं नवीन घरी गेल्यावर?
जिम्या तुला कोणी घरी न्यायच्याआधी शेवटचं एकदा भेटायला म्हणून मी शेल्टरमध्ये आले होते. तिथे पॅम नव्हतीच. तिला दुसरीकडेच नेलं होतं, पण तू होतास काचेपलीकडे छोट्याश्या पेटीत बसलेला... जिमू मी तिथे १५-२० मिनिटं होते. तुला हाक मारत होते , काचेवरून हात फिरवत होते आणि एकदाही तुला माझ्याकडे बघावंस वाटलं नाही का? एकदाही माझ्याशी बोलावंस वाटलं नाही ना? इतकी वाईट होते का मी? अमोल म्हणतो तुला औषध दिलं असेल त्या गुंगीत असशील तू... काचेपलीकडून आवाज जात नसेल कदाचित...
जिम्या पण आपल्याला शब्द लागणार नाहीत हे आपलं ठरलं होतं ना आधीच? माझी हाक ऐकू नसेल आली तरी मी आलेली कळलं होतं ना तुला? मन्या एकदा मला माझ्या जिमला भेटायचं होतं रे... तू किती अनोळखी मांजरासारखा बसला होतास तिथे.. इतरवेळी स्वतःला इतकी सांभाळणारी मी तिथे हमसाहमशी रडले होते तुला बघून आणि तू नेहमीच्या रागाने डोळे बारीक करून बसला होतास. किती दुष्ट आहेस ना तू जिम्या! त्यादिवशी मांजराचं नाव राखलंस बाबा कुचकटपणा करून...
एनीवे, जिथे कुठे आहेस आनंदात रहा... वेड्यासारखा खेळत रहा... गुरगुरत रहा...सोफ्याच्या कडेला झोपत रहा... लोळताना खाली पडलास तर स्वतःलाच चाटत आळस देत रहा... पक्ष्याकडे-खारीन्कडे बघून उड्या मारत रहा... इतर माऊन्सोबत भांडत रहा आणि प्रेमाने कुरवाळत रहा... डोळे मिटून पाणी पीत रहा... खाऊच्या डब्यात चढून खाऊ खात रहा... तुझ्या नवीन माणसांवर प्रेम करत रहा, रागवत रहा, जीव लावत रहा... आणि हे सगळं करत असताना जमल्यास कधीतरी माझी आठवण काढशील का? जमल्यास मला पुन्हा कधी भेटशील का? लव यु जिमुड्या!
4 comments:
awww
कसलं क्युट आहे हे. मी लगेच रिलेट झाले ह्याच्याशी. मांजरी , कुत्रीं एकुणातच पाळीव प्राणी इतकं निर्व्याज प्रेम करतात , खूप लळा लावतात . त्या आठवणी अश्याच असतात आपल्या सोबत कायम. माझ्याकडे माझ्या बु-स्वामी च्या , बिलुबाय च्या ,नाम्या भुभुच्या असंख्य माऊ आणि भुभुंच्या आठवणी आहेत. आय मिस देम. पण त्या आठवणी मला पुढे जगायला मदत करतात.
कसलं क्युट आहे हे. मी लगेच रिलेट झाले ह्याच्याशी. मांजरी , कुत्रीं एकुणातच पाळीव प्राणी इतकं निर्व्याज प्रेम करतात , खूप लळा लावतात . त्या आठवणी अश्याच असतात आपल्या सोबत कायम. माझ्याकडे माझ्या बु-स्वामी च्या , बिलुबाय च्या ,नाम्या भुभुच्या असंख्य माऊ आणि भुभुंच्या आठवणी आहेत. आय मिस देम. पण त्या आठवणी मला पुढे जगायला मदत करतात
अप्रतिम
खुप खुप खुपच सुंदर
Post a Comment