Thursday, May 13, 2010

अम्येइशॅंग

मणिपुरच्या एका लहानश्या गावातली ती सकाळ... थंडगार वा-याची मधुनच झोंबुन जाणारी झुळुक.. शाल अजुन घट्ट लपेटुन घेत.. तोंडातुन वाफ काढत, वाफाळलेल्या चहाच्या गरम कपातुन जितकी उब मिळेल तितकी घेत मी समोरच्या द-या बघत बसले होते. इथे सकाळ खुप लवकर होते, इथलं वेळेचं तंत्र अजुन शरीराला उमगलेलं नव्हतं. कदाचित मी उशिराच उठले होते जरा, बाहेर सगळे कामाला लागले होते.

मी ज्यांच्याकडे राहत होते त्यांचा एक भला मोठ्ठा केसाळ कुत्रा माझ्याजवळ येऊन बसला.. सकाळी उठले तेव्हा पायाशी मांजर बसुन होती, मी सवयीप्रमाणे दोघांशीही मराठीत बोलले. आणि दोघांनीही सगळं कळल्यासारखं माझ्याकडे बघितलं. (अनेकदा "काय येडी बोलुन राहिल्ये" असा लुकपण देतात प्राणी). इतक्यात एक लहान मुलगा तिथे आला. मणिपुरीमधे काहीतरी ओरडला कुत्र्याकडे बघुन आणि कुत्रा तिथुन उठुन गेला. मी त्या मुलाकडे पाहिलं तर माझ्याकडे हसत बघितलं त्याने आणि कुत्र्याकडे बोट दाखवुन काहीतरी बोलला. मला काही कळेना.. माझ्या चेह-याकडे बघुन त्याला ते कळलं असावं. मग तो दोन मिनीटं थांबला, त्याने शब्द जुळवले "Dog.. Danger.. Bites" .. ओह.. असं झालं काय.. मी त्याच्याकडे बघुन मग त्याला "Thank you" म्हंटलं, त्याचं नाव विचारलं... "अम्येइशॅंग"...

"अम्येइशॅंग".. त्याने ११व्यांदा त्याचं नाव सांगितलं आणि मी ते उच्चारायचा प्रयत्न केला. त्याने कपाळावर हात मारुन घेतला. मग माझ्याकडे बघत म्हणाला "अम्ये".. कित्ती गोड गं.. मी हसले.. "अम्ये..right?" . त्याने मोठ्या माणसासारखी मान हलवली, माझ्याकडे बोट केलं.. माझं नाव.. मी म्हणाले "तेजस्विनी".. आणि एकदम थांबले.. "uhh.. my name is Teju" .. त्याचे बारीक डोळे अजुन बारीक करत तो हसला, तो सहावीत होता, सहावीच्या मानाने बराच लहान दिसत होता. त्याने मला विचारलं मी कितवीत आहे ते. मी बोटं मोजली आणि सांगितलं, सतरावीत आहे! त्याला विश्वासच बसेना. एवढ्यात त्याला त्याच्या आईने बोलावलं म्हणुन तो धावत गेला. मधे एका दुस-या मुलाने त्याला अडवलं, माझ्याकडे बघत दोघंही काहीतरी बोलली, अम्येने मला हात केला मी सुद्धा त्याच्याकडे बघुन हसले आणि अम्ये पुढे गेला.

साडे सहाच वाजत होते सकाळचे.. घरी असते तर आत्ता साखरझोपेतली स्वप्नं बघत असते.. म्हणा समोर जे दिसत होतं ते एखाद्या लई सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. कोवळ्या उन्हात चमकणा-या समोरच्या टेकड्या.. दरीत साचुन राहिलेले ढग आणि धुकं... इतक्यात अम्ये खिदळतच परत माझ्या बाजुला येउन उभा राहिला. कोवळ्या उन्हाची लहान मुलाच्या हसण्याशी केलेली तुलना मला कायम ओढुनताणुन केल्यासारखी वाटायची. आज नाही वाटली तशी! त्याने त्याची बंद मुठ पुढे केली. मी काय आहे विचारल्यावर त्याची ती लहानगी मुठ उघडत, हातातला आवळा दाखवला.मी हात पुढे केल्यावर गड्याने परत मुठ बंद केली आणि "there is tree" म्हणत मला लांबचं आवळ्याचं झाड दाखवलं. मला खरं तरं मुळीच उठायची इच्छा नव्हती, पण आवळ्यांनी लगडलेलं झाड समोर दिसत असताना बसुन कसं राहावं माणसानी? मी शाल काढत उठले. अम्ये शाल परत हातावर टाकत "you will.. get cold" म्हणुन झाडाच्या दिशेने चालयला लागला.

मी, अम्ये आणि त्याचा मगासचा मित्र.. आम्ही तिघं कित्तीतरी वेळ झाडाखाली आवळे खात बसलो होतो. काही काही वेळा जिथे शब्द संपतात तिथे ख-या गप्पा सुरु होतात. आम्ही तिघंही एकमेकांकडे हसत बघत एक एक आवळा संपवत होतो. मधेच त्याचा मित्र माझ्याकडे बघत काहीतरी बोलायचा मग अम्येच त्याला उत्तर द्यायचा आणि माझ्याकडे बघुन "dont worry..मी त्याला समजावलं आहे" look द्यायचा!

"Hot water ? " अंघोळीसाठी निघाल्यावर अम्येनी मला विचारलं आणि मी काही म्हणायच्या आत एक लहानशी बादली आणुन ठेवली समोर गरम पाण्याची... जेवायला बसल्यावर मी शाकाहारीच खाते हे कळल्यावर त्याचा चेहरा जाम पडला होता. त्याने आईला फिश बनवायला मदत केली होती.जेवण झाल्यावर मला तो फुटबॉल बघायला बोलवत होता. पण त्याची आई त्याला ओरडली म्हणुन मला बाय करुन खेळायला गेला.

आज एक विश्रांतीचा दिवस होता त्यामुळे आठवड्याभराची डायरी लिहीत मी दुपारी पाय-यांवर बसले होते. मस्त शांत वाटत असताना अचानक जोरजोरात जोजोचं गाणं सुरु झालं. इथे जोजो? अम्ये त्याच्या मोठ्या भावांबरोबर आला. त्याच्या हातातल्या म्युझिक प्लेयरवर जोजो गात होती. दोघंही भाऊ आत गेले. अम्ये माझ्यासमोर उभा राहिला "are you teacher?" .. मला प्रश्न विचारताना तो घरात बघत होता. मी मागे वळुन पाहिलं, अम्येचे दोन्ही भाऊ माझ्याकडे बघत होते. " No dear.. " त्याचे भाऊ हसायला लागले... आणि अम्ये हिरमुसला होऊन तिथुन पळुन गेला. त्याचा एक भाऊ पुढे आला आणि त्याने सांगितलं, अम्येला वाटत होतं की मी त्याला शाळेत शिकवायला आले आहे आणि मी त्यांच्याच घरी राहणारे. नवीन टीचर आमच्या घरी राहतात हे तो सगळ्या मुलांना सांगुन आला होता. त्यानंतर कितीतरी वेळ मला तो दिसलाच नाही.

संध्याकाळी काळोख्या गावातलं एकटंच झगमगणारं चर्च बघत मी उभी होते. पक्क्या बांधकामाची घरंही नाहीत ज्या गावात तिथे दोन मजली चर्च उभं कसं राहतं ह्यावर विचार करत मी मोबाईलची रेंज शोधत फिरत होते. इतक्यात समोर अम्ये दिसला. त्याने माझ्या हातातल्या मोबाईल कडे पाहिलं आणि शांतपणे एका उंचवट्याच्या ठिकाणी जाऊन उभा राहिला माझ्याकडे बघत. तिथे मरतुकडी रेंज मिळत होती. मी घरी फोन केला. मी फोनवर बोलत असताना अम्ये एकटक माझ्याकडे बघत होता. बोलता बोलता मी बहिणीला म्हणाले " and I have got a new friend here.. Amye" .. तो खुद्कन हसला. अंधारातुन परत घरी येताना त्याने माझा हात धरला. मी त्याला घरी नीट आणलं की त्याने मला.. हे नाही ठाऊक!

दुस-या दिवशी सकाळी निघायच्या वेळी माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. अम्ये त्याच्या आईच्या मागे मागेच उभा होता. त्याच्या मित्राने मला लांबुनच बाय केलं. अम्येने काहीतरी विचारलं इतक्यात.. मला शब्द नाही कळले.. पण मी उत्तर दिलं " I will come back.. I will come back as your teacher" .. त्याने डोळे मिचकावले आणि हसला.. आता मी माझं वचन पुर्ण करणारे .... आमच्या गप्पांची, आवळ्यांची आणि त्या केसाळ कुत्र्याची शप्पथ!!