Saturday, March 23, 2013

आमच्या लग्नाची गोष्ट...

लग्न झालं आमचं... आणि मग लोकं हजार प्रश्न विचारायला लागले...का? कसं? कुठे? कधी? वगैरे वगैरे... म्हंटलं एकदा लिहून टाकूयात आपली गोष्ट...

तर ही गोष्ट सुरु होते इसवी सन १९८४मध्ये... अहमदनगरच्या एका वाघमारे कुटुंबात एक Hazel eyes चा मुलगा जन्माला आला...  लाडकं शेंडेफळ बनला... अतिशय हुशार वगैरे झाला .. पुढे जाऊन तो आपला हिरो होणारे.. तो २ वर्षाचा झाला तेव्हा रत्नागिरीच्या लेलेंना एक नात झाली... टपोर्या डोळ्यांची... अत्यंत सामान्य बुद्धीची वगैरे... पुढे जाऊन ती आपली हिरोईन आहे... 

गोष्ट तेव्हा सुरु झालेली असली तरी मुळात ही दोघं भेटली एकमेकांना इसवी सन २०१० मध्ये... भेटली म्हणजे वाचलं एकमेकांनी लिहिलेलं... आपली हिरोईन इथेच, ह्याच ब्लॉगवर लिहायची काहीबाही.. आणि हिरोही ब्लॉग लिहित होता मस्तपैकी... इथून तिथून कुठूनतरी ती त्याच्या ब्लॉगवर पोचली... तिने त्याचा ब्लॉग वाचला आणि तिला तो जाम आवडला... तिने कमेंट केली.. तिची कमेंट वाचून तो तिच्या ब्लॉगवर आला आणि मग त्याला ती आवडली... so ही त्यांची पहिली भेट... मग ते लिखाणातून, कमेंट्समधून भेटत गेले.. मग असंच एकदा त्याचं खरं नाव कळल्यावर तिने त्याला मेल केला आणि त्याने तिला रिप्लाय दिला.. मग ते बोलायला लागले मेल्समधून... chat करायला लागल्यावर माणसं उथळ बडबडायला लागतात हे दोघांनाही माहित होतं.. दोघंही बोलणं टाळत होते... मग ओळखी निघत गेल्या... "ओह ती तर माझी मैत्रीण आहे.." "अर्रे तो तर माझा मित्र आहे".. मग ह्या ओळखींमधून एकमेकांबद्दल अजून माहिती कळायला लागली...

मधेच एकदा त्याने विचारलं "भेटायचं का?" ती म्हणाली "अर्थातच... नाही"... सगळं छान सुरु असताना भेटून वगैरे आहे ते बिघडवायचं नव्हतं तीला... भेट पुढे जात राहिली, पण मधल्या वेळेत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क चालू होताच... त्याने तिला तार करून फोन नंबर कळवला.. तिने निळ्या पत्रावर प्राजक्त आणि जास्वंदीच्या गोष्टी त्याला लिहून पाठवल्या... त्याने तिला एकदा २२ रुपयांची मनीऑर्डर पाठवली... तिने त्याला तिचा आवाज CDवर रेकॉर्ड करून पाठवला... मग एकदा तो एक काम घेऊन आला तिच्याकडे , एका शोर्ट फिल्मच्या स्क्रिप्टसाठी मग ते रात्र रात्र जागून चर्चा करायला लागले... ती फिल्म काही बनली नाही पण आपली ही फिल्म तिथे अजून रंगत गेली...त्याला पुण्यात बसून तिच्या ठाण्याच्या घराजवळच्या कुत्र्यांचे आवाजही पाठ झाले..

१५ ऑगस्टला ती आली पुण्यात, तिच्या मित्राच्या साखरपुड्याला... आपटे रोडवरच्या एका हॉलमध्ये ती येणार म्हणून तो उगाचच त्या रस्त्यावर २-३ चकरा मारून गेला...अचानक तिला काय वाटलं म्हणून तिने सहज sms केला त्याला "भेटायचं का?" तो म्हणाला "अर्थातच.. हो"... आणि १५ मिनटात ते दोघं एकमेकांसमोर उभे होते आपटे सभागृहाच्या गेटवर... काय बोलायचं कळत नव्हतं दोघांना... पण awkward pauses  टाळायला  काहीही बडबडत होते दोघं.. तिने तर "झाडांवर करण्यात येणारं  lighting" या विषयावर ५ मिनटाचं भाषण वगैरे  दिलं होतं.. मग आधी बाईक आणि नंतर गाडीतून थोडावेळ गप्पा मारत, शांत बसत, उगाचच हसत फिरल्यावर तो मधेच थांबून म्हणाला तिला "मला असं आयुष्यभर गप्पा मारायला आवडेल तुझ्याशी" ती त्यावर फक्त हसली...

"च्यायला हाच मुलगा आवडायचा होता?? त्याचं आडनाव काही वेगळं नसू शकलं असतं का? " आठवडाभर खूप विचार केला तिने... सगळं इतकं perfect  दोघांमध्ये... मग जात कशाला मध्ये येते कडमडायला? पण त्याने विश्वास दिला तिला.. "सगळं होईल आपल्या मनासारखं".. मग त्याने तिला विचारलं आणि तिने "हो" म्हंटलं... आणि त्यानंतर आठवड्याभरातच तो गेला अमेरिकेत कामासाठी महिनाभर  ... दुष्ट कुठला.. पण ही सुरुवात होती फक्त, पुढे २ वर्षात अश्या हजार परीक्षा दिल्या दोघांनी मिळून वेगवेगळ्या... तिच्या घरचे नाही म्हणाले, त्याच्या घरचे नाही म्हणाले... "तो केसाने गळा कापेल तुझा".. "ती येऊन घर फोडेल आपलं" वगैरे वगैरे काहीही ऐकून घ्यावं लागलं त्या दोघांना स्वतःच्याच घरी स्वतःच्याच प्रेमाबद्दल... तरीही दोघं लढत राहिली.. समजावत राहिली... वेळ मिळेल तसा एकमेकांना भेटत राहिली... मुंबई-पुणे एक्सप्रेसवे त्याच्या सवयीचा बनला... तिच्या मित्र-मैत्रींणींना तो आवडायला लागला... तो भागच बनला तिच्या ग्रुपचा...

घरी सतत टेन्शन, बोलणी, राग ह्या सगळ्यातून एकमेकांसोबत मिळणारे एकुणेक क्षण celebrate  करत होती दोघं... अधूनमधून भांडतही होती दोघं.. भांडायला कारणं कुठे लागतात "साडी घालत नाहीत नेसतात", "भात खात नाहीत जेवतात" ही कारणंही कधी कधी तिसरं महायुद्ध घडवू शकतात... मग थोडावेळ अबोला धरल्यावर दोघं हसायला लागायची... "काहीही भांडतो ना आपण"... पण हे अबोले, ही भांडण अजून पक्कं करत होती त्यांच्यामध्ल नातं... घरच्यांच्या विनवण्या करून झाल्यावर ती मिळेल त्या देवाला नवस बोलत होती.. "जोडीने येऊ दर्शनाला पण आता लग्न होऊ दे आमचं"... कधी एकीकडचा विरोध मावळतोय अस्म वाटत असताना नवीन विरोध सुरु होत होता...

अशी २-अडीच वर्ष गेल्यावर दोघंही कंटाळली होती.. "पळून जाऊन वगैरे लग्न करायचं नाही" हा निश्चय विसरावा लागणार असं वाटत होतं... परत एकदा बोलणी सुरु केली.. तो तिच्याकडे गेला.. ती त्याच्याकडे गेली.. एकमेकांच्या आई-वडिलांना विश्वास देत होतो... त्याच्याकडे  give up केलं आई-वडिलांनी.. पण तिच्याकडे ऐकायला अजूनही तयार नव्हतेच... त्यात त्याला आता वर्षभरासाठी अमेरिकेत पाठवायची त्याच्या कंपनीची तयारी सुरु झाली होती... मग आता स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतः हाती घेणं भागच होतं..

बाकी घरांमध्ये आधी कुटुंब भेटतात, मग बोलणी होतात, मग तारीख आणि कार्यालय ठरतं... पण इथे आधी तारीख ठरली , १८ फेब्रुवारी... "तुम्ही येऊन लग्न करून देणार असाल तर अत्युत्तम.. नाहीतर आम्ही लग्न करतोय त्यादिवशी" कार्यालय ठरलं... पत्रिका छापल्या... आणि मग अचानक चक्र फिरावी तसं दोन्ही घरचे सरसावले लग्नासाठी... लग्नाला २ आठवडे असताना लग्नाची तयारी सुरु झाली.. लग्नाआधी ३ दिवस दोन्ही कुटुंब भेटली आणि बोलणी झाली... दोघांची कपडे आणि दागिने खरेदी आदल्या दिवशी संपली rather संपवली ... आणि मग जवळच्या काही माणसांच्या साक्षीने "आमचं" लग्न  मस्तपैकी पार पडलं... २ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्ष उतरलं.. आयुष्यभर गप्पा मारणारोत आम्ही.. :)

आणि आता "touchwood" सगळं सुरळीत चालू आहे.. नवर्यासोबत अमेरिकेत आल्ये... आई-बाबा, सासू-सासर्यांसोबत रोज स्काईपवर गप्पा होतायत... आता नवीन स्वप्नं बघतोय आम्ही दोघं मिळून...

आता ही गोष्ट कुठे खरी खरी सुरु होत्ये... 

"Happily Ever after starts here..." :) 


Sunday, January 13, 2013

जांभाचं झाड


“आपलं जांभाचं झाड गेलं” आईनी सांगितलं.  मी नुसती बघत राहिले.. दीपिका रडायला लागली.. आईच्या डोळ्यांतही पाणी होतंच.. माझ्या आत काहीतरी हललं.. उगाचच स्वयपाकघरात जाऊन मी पाणी पिऊन आले.. “मावशीचा फोन आला होता आत्ता.. आपलं बाजूचं अंगण त्यांच्या हद्दीत येतं.. ते तिथे कुंपण घालणार आणि मग ती जमीन विकणार.. ते झाड त्यांच आहे आता”

अर्धी नारळा-पोफळीची वाडी ते विकणार हे माहित होतंच.. तेव्हाही वाईट वाटत होतंच.. पण आता जास्त त्रास व्हायला लागला.. बाजूचं अंगण म्हणजे कित्ती काय काय आहे तिथे माहित्ये का??

शेकत्याच्या शेंगांचं झाड, मधुनाशिनिचा वेल, कांचनचं झाड, तुळशीची कित्येक सदैव उगवणारी रोपं, मी लावलेलं तगरीचं झाड, कित्तीतरी जुनं जास्वंदाच झाड, दिपूचं लीम्बाचं झाड, केवडा, बिटकी आंबा, गुंजेचा वेल... आप्पांनी लावलेली, बाबांनी जगवलेली नारळ आणि सुपारीची झाडं, बांबूचं बन आणि माझं, दीपिकाचं, आईचं, बाबांचं, आप्पा-आजीचं, दादा-ताईचं, मावश्या-मामांच, इंदू आजीचं जांभाचं झाड..

सगळं बदलणार आता.. थळचं घर आता नेहमीसारखं नाही राहणार... घरा शेजारून आता अजून एक कुंपण जाणार.. ह्यात चूक कोणाचीच नाही.. जमीन विकायला काढलेल्या मावश्यांची नाही, त्यांच्या आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित मुलींचीही नाही.. चूक असेल तर माझ्या आप्पांची आहे.. त्यांनी कधी माझं-तुझं केलंच नाही.. त्यामुळे आम्हालाही हा जमिनीचा भाग त्यांचा, हा आपला हे कधी माहीतच नव्हतं..

आप्पा महानगरपालिकेत होते मुंबईला.. शनिवारी सकाळी लवकर निघायचे ते अलिबागला यायला.. त्या काळात रस्तेही इतके चांगले नव्हते.. कधी बसने, कधी बोटीने, कधी कोणाच्या गाडीने आप्पा नियमित यायचे.. त्यांच्या दोन मुली, म्हणजे माझी आई आणि मावशी.. अजूनही तक्रार करतात “आप्पा सुट्टीला घरी नसायचेच..” कारण त्यांना वेध असायचे त्यांच्या थळच्या घराचे.. घर पडायला आलं होतं, झाडं सुकून चालली होतं.. आणि म्हणून आप्पा दर आठवड्याला येत होते त्यांच्या पूर्वजांची ठेव वाचवायला.. ज्या वयात नवर्याकडे नवीन दागिन्यांचा हट्ट करायचा त्या वयात माझ्या आजीने तिच्या पाटल्या ठेवल्या होत्या सावकाराकडे हे घर आणि जमीन वाचवायला.. आप्पांनी खूप कष्ट घेतले ह्या घरासाठी, ह्या झाडांसाठी..

खूप प्रेमानी लावलं असेल त्यांनी हे जांभाचं झाड... का लावलं, कसं लावलं, कधी लावलं माहित नाही मला.. कारण मला कळायला लागलं तेव्हा हे उंच झाड फळांनी बहरून येत होतं.. शाळेत मी आंब्यापेक्षा जांभ किती बेस्ट असतो हे सांगायचे लोकांना.. पांढराशुभ्र जांभ येतो ह्या झाडाला, एकदम गोड फळ... उन्हाळ्यात इतके जांभ येतात कि एखाद फांदी तरी वजनाने मोडून पडते ह्या झाडाची.. पिशव्या भरून जांभ घेऊन जातात आमच्याकडून लोक.. पोपटांचे थवे येतात जांभ खायला.. कधी न पाहिलेले पक्षीही जमतात ह्या झाडावर.. ऐसपैस पसरलेलं झाड आहे.. माजघरातून दिसतं, स्वयपाकघरातून दिसतं.. न्हाणीघरातूनही दिसतं.. लहानपणापासून आम्ही बघतोय हे झाड आणि तेही बघतं आहे आम्हाला आमच्या लहानपणापासून..

माझ्या आईला, मामा-मावश्यांनाही पाहतं आहे हे झाड लहानपणापासून... आमची बार्शी पाहिल्येत ह्या झाडाने, आमचे वाढदिवसही.. मी हात धुवायला जायचे ह्या झाडाखाली.. ह्या झाडाला पाणी मिळावं म्हणून.. कित्येक भातुकलीचे डाव मांडलेत ह्या झाडाखाली.. कित्येक भांडण झाल्येत आणि मिटली आहेत इथेच.. ह्या अंगणात badminton खेळायचो आम्ही.. फुल ह्या झाडात अडकल्यावर, दगडही मारले आहेत आम्ही.. पण झाड कधी चीडलं नाही आमच्यावर.. दरवर्षी हजारो जांभ देतच राहिलं.. दर आठवड्याला जाणारे आम्ही आता महिन्यातून एकदा जातो अलिबागला.. तेव्हा आम्हाला जितका आनंद होतो तितकाच आनंद होत असेल का ह्या झाडाला?? आप्पा गेले त्यावर्षी जांभ किडले हा फक्त योगायोग असतो का?? बाबा खूप विश्वासाने चढतात ह्या झाडावर जांभ उतरवायला.. झाडही तितकाच विश्वास ठेवत असेल का बाबांवर ते दुखवणार नाहीत ह्याचा?? आमची चिंगी मांजर सरसर चढायची ह्या झाडावर, कधीही पाडलं नाही तिला ह्या झाडाने.. पण जेव्हा ती समोरच्या विहरीत पडली तेव्हा ह्या झाडाला वाईट वाटलं असेल का आपल्याला पाय नाहीत त्याचं?? झाडाला पाय असते, झाडाला हलता आलं असतं तर हे कुंपण पडायच्या आधी ते आलं असतं का आमच्या हद्दीत??

बाबा नेहमी सांगतात, आपलं काहीही नसतं.. पूर्वपुण्याईतून आपल्याला जे मिळतं ते आपल्या वंशासाठी आपण सांभाळून आणि जमल्यास वाढवून पुढे पाठवायचं असतं.. आप्पांनी तेच केलं.. त्यांनी केलेल्या कष्टांची फळ आता दुसर्यांचे वंश चाखणार म्हणून काय झालं.. कुंपण घालणार्यांवर, स्वतः कधीही कष्ट न घेतलेली जमीन विकणार्यांवर माझा राग नाही.. फक्त त्यांनी खूप उशीर केला.. आठवणी तयार व्हायच्या आधीच ह्या मातीची किंमत व्हायला हवी होती..  आता हि जमीन कोण विकत घेणारे माहित नाही.. तो हे झाड काढेल, ठेवेल, काय करेल माहित नाही.. काय माहित कदाचित आमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल तो ह्या झाडावर..पण हे झाड मात्र आता त्याचं होणार.. कुंपणाची नजर चुकवत जांभ नक्की पडतील आमच्या भागात.. पण मग त्या जांभावर आता माझ्या-तुझ्या, आपल्या-त्यांच्या खुणा असणार..

रात्री मीपण रडले.. बाजूच्या अंगणासाठी नाही, वाडीसाठी नाही.. जांभाच्या झाडासाठीही नाही... माझ्या मुलांसाठी, माझ्या मावशीच्या नातवंडान्साठी .. त्यांना ह्या जाम्भाची गोडी कधीच कळायची नाही आता..



Wednesday, December 5, 2012

Hula Hoop..

कधीपासून हवा होता तिला तिचा स्वतःचा हुला हूप .. गोल गोल गोल गोल फिरायला त्याच्यामध्ये.. 
 काही तायांना खेळताना पाहिलं होतं त्याच्याशी.. किती मस्त खेळ होता तो.. आपल्याभोवती फक्त फिरवत बसवायचं ते हूप गोल गोल गोल गोल..

खूप हट्ट केल्यावर , रडल्यावर, चिडल्यावर आला एक दिवस तो हूप घरात.. वेगवेगळ्या फ्लोरोसेंट  रंगाच्या प्लास्टिकच्या कांड्या.. एकमेकांमध्ये अडकवून झाला कि हुला हूप तय्यार.. ती उभी राहिली पंख्याखाली.. पंखा तिच्या डोक्यावर फिरत होता.. कसा? गोल गोल गोल गोल.. खाली ती उभी राहून फिरणार होती.. कशी? गोल गोल गोल गोल.. 

डोक्यातून तो हूप खाली गेला.. दोन पायांमध्ये एक फुटाचं अंतर... अगदी त्या मापातून फुटपट्टी बनवून घ्यावी इतकं बरोब्बर एक फुटाचं.. जास्तच होतंय का हे अंतर? म्हणून मग २ इंच डावा पाय आत.. २ इंच उजवा पाय आत.. समोरच्या आरश्यात पाहून ती हसली.. म्हणजे हसत आधीपासूनच होती.. पण आता आरश्यात पाहून अजूनच हसली.. कधीपासून करायचं होतं तिला हे हुला हूप.. का? कारण फिरायचं होतं तिला त्यात..  कसं? गोल गोल गोल आणि गोल! 

एका बाजूने लावला तिने जोर.. कंबर हलवायला लागली त्याच दिशेने.. अर्धा गोल फिरून तिचा हुला हूप खाली.. हूल हूल हुप्प! 

शक्यच नाही.. बाकी माणसं किती सहज करतात ते.. त्या जाहिरातीत प्रियंका चोप्रा करते ना.. यु ट्यूबवर एक हजार ३७ विडीयो असतील लोकांचे हुला हूप करताना.. ११ तास हुला हूप करून रेकोर्ड केलाय लोकांनी.. आणि तिला का जमेना मग? 

पहिलाच प्रयत्न आहे.. जमेल कि.. प्रियांका चोप्रालाही पहिल्यांदाच नसेल जमलं.. मग सुरु झाला दुसरा प्रयत्न.. ह्यावेळी उजव्या बाजूला जोर देऊन हूप सोडला.. कंबर हलली.. हुप्प! 

हूल हुप्प..
हुप्प..
हूल हूल हुप्प..
हूल हुप्प.
हूल हूल हुप्प..
हुप्प हुप्प..
हुप्प हुप्प..

माकड फिरायचा प्रयत्न करत राहिलं.. पण काही जमेना.. काय जमेना? फिरणं.. कसं? गोल गोल गोल गोल हूल हूल हुप्प!

मग तिने ठेवला तो हूप दारामागाच्या खिळ्यावर.. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र.. दार बंद व्हायला लागलं आणि हुप्प हुप्प माकड उड्या मारत फिरत राहिलं.. पण गोल गोल गोल गोल मधला गो ही पूर्ण होईना म्हणून हिरमुसून रडायला लागलं.. 

आता गंग्नाम स्टायल ला मागे टाकेल असा व्हिडीओ बनू शकला असता तिचा.. एकदा फक्त कंबर हलत्ये.. हूप पडलं.. एकदा नुसतं हूप हललं.. कंबर मठ्ठ.. एकदा दोन्ही गडगड.. एकदा डावा पाय उगाच वर जातोय.. एकदा उजवा पाय.. हातांच काय करावं माहित नाही त्यामुळे हात अधांतरी.. म्हणजे नक्की काय तर? हूल हूल हुप्प! 

हूप गेला परत दारामाग्च्या खिळ्यावर.. आज.. उद्या.. परवा.. आज.. उद्या.. परवा... पृथ्वी फिरत राहिली.. सूर्य फिरत राहिला.. पण तिच्या कंबरेभोवती हुला हूप काही फिरेना.. न गोल.. न गोल.. न गोल.. न गोल.. 

मग? मग खूप दिवसांनी दार बंद झालं एकदा.. एक कोळीष्टक बाजूला करून हूप आलं परत तिच्या कंबरेभोवती.. हुल हूल हुप्प.. तिने मग ते घेतलं तिच्या मानेभोवती.. आणि काय? गोल गोल गोल गोल.. हूल हूल हूल हूल हूल हूल.. फिरत राहिलं कि ते हूप.. आनंद.. आनंद झाला तिला खूप.. आणि कएयट सारखा काहीतरी आवाज झाला.. पुढे ४ दिवस  उजवीकडे मान जाणं बंद.. मान नाही फिरत ना आपली गोल गोल गोल गोल.. 

सकाळी तिने हूप मधून सूर्य पहिला.. गोल

दुपारी तिने हूप मधून पोळी पाहिली.. गोल

संध्याकाळी तिने हूप मधून मारी पाहिलं.. गोल

रात्री तिने हूप मधून चंद पाहिला.. न गोल.. 

तिलाही वाईट वाटलं.. चंद्रालाही वाईट वाटलं.. हूपलाही वाईट वाटलं.. 

मग ती झोपली.. हुप्ला कुशीत घेऊन.. 

आणि रात्रभर स्वप्नात फिरत राहिली.. कशी?

गोल गोल गोल गोल.. 

कसं?

हूल हूल हूल हुप्प! 


Monday, November 5, 2012

सकाळ

आस्था कुशीवर वळली.. खिडकीतून सुर्याचा उजेड आता डायरेक्ट तिच्या चेहऱ्यावर येत होता..
"दिनभर जलाते हो.. और रात होनेसे पहले खुदही बुझ जाते हो.. ये कौनसी  रीत है?"
तिने जरा जोरातच हा प्रश्न सुर्याला विचारला.. दारात बसलेल्या कुमुदने ते ऐकलं..
"तू सुरजको भी नही छोडेगी... येडी ..."
"ए कुमी.. मी कधीच सोडलयं त्या सुर्याला.. च्यायला तोच नाही सोडत मला.. आजवर एकपण दिवस असा नाही गेल जेव्हा तो मला भेटायला आला नसेल.. मी उठायच्या आधीचं पायाशी घुटमळत बसलेला असतो.."
आस्थाने पायांकडे बोट केलं.. पडद्याच्या एका भोकातून थेट तिच्या पैंजणांवर एक कवडसा पडत होता.. .. कुमुद लगेच उठून तिच्याजवळ आली.. तिच्या पायांना हात लावत म्हणाली..
"साली.. ये किसको लुटा तुने? चांदी आहे?"
"नाहीतर काय अल्मेनीम? तो गणेश आहे ना.. बांद्रावाला.. त्याने दिले.."
कुमुद तिच्याकडे टोवेल फेकत म्हणाली.." प्रेम करायला लागला की काय तुझ्ज्यावर?"
आस्थानी चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला..
खिडकीतून खाली बघत ओरडली "अस्मद.. दो चाय ..आते हुये पार्लेजी लेके आना"
आस्था आरश्यासमोर उभी राहून स्वतःकडे बघत म्हणाली..
"प्रेम.. प्यार.. इस आस्थासे हर कोई प्यार करता है कुमी.. कोई कुच मिन्टोके लिये..कोई कुच घंटोके लिये.. कोणी काही रात्री.. आणि हे असे चुत्ये काही दिवस.."
कुमुद् तिच्याकडे बघत उभी राहिली..
"अबे.. डायलॉग आहे .. मलापण वाटायला लागलं आहे की त्याचं प्रेम बसतं आहे माझ्यावर..ह्या वयात होतंच असं.. आत्ता कुठे मर्द बनायला लागलाय पोरगा.. साला अस्मद  कुठे मेला? "

चहा पित असताना आस्थाने दाराबाहेर घुटमळत उभ्या असलेल्या अस्मदला आत बोलावलं..
"क्या हुआ मेरे अमिताभ बच्चन? आज तू अन्ग्री यंग म्यान नही है क्या?"
अस्मद आत्तापर्यंत जणू वाटच पाहत होता आस्थाने काही बोलायची.. तो लगेच आत शिरला
 "दीदी मेर्को स्कूल जाना है.. पपा नही बोलता है|"
त्यावर कुमुद फिस्स्क्कन हसली..
"अस्मुद्दिन  शहेनशहा.. आपको अब तक २ बार स्कूलमें भरती किया गया .. और आप भाग लिये वहासे.. नही? आस्था.. हा पोरगा असाच करतो " कुमुदने दोन्ही ग्लास उचलून अस्मदच्या हातात दिले
"ए तुम्हे पता नही है तो बोलो नही.. दीदी.. मुझे पपा स्कूल नही भेजते.. गावमें मेरे बडे चाचाजान है.. उनके होटेलमें काम करने जाता हुं मै.. पपा बोलते है, वही अपनी स्कूल है.. सौ-पाचसौका हिसाब माथ्सकी किताब बिना पढेभी आता है ,चायमें चीनी कितनी डलनी है ये सायन्स नही सिखाता..पपा बोलते है.. पढोंगे तो आस्था दीदी जैसे बन जाओगे.. "
आस्थाने चमकून पाहिलं..

काळी-सावळी, बारीकशी आस्था.. आता २४ची झाली असली ती दिसायला मात्र १७-१८चीच.. कपाळावरचं गोंदण टिकलीनी लपवणारी.. बारीक डोळे, लहानसे ओठ, नाक मात्र अगदी चाफेकळी.. हसताना तिचा एक दात खूपच मोठा दिसायचा..  बोलण्यात तिचा हात कोणीच धरू शकणार नाही.. तिच्या आईच्यामते  मोठा दात आणि बोलणं तिला तिच्या वडिलांकडून मिळालं होतं.. तिच्या वडिलांच्यामते ते तिचे वडील नव्हतेच!

आस्था.. एका सामाजिक संस्थेच्या दीदीनी हे नाव ठेवलं होतं..वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायकांच्या मुलांसाठी काम करणारी संस्था होती त्यांची.. दीदी कायम यायची आस्थाच्या  घरी.. आस्थाला पुस्तकं आणून द्यायची, खेळणी द्यायची.. आईकडे गिऱ्हाईक आलं कि आई पडदा लावून घ्यायची.. पडद्यापलीकडे बसून आईचा आवाज ऐकत आस्था पुस्तक वाचत बसायची ..
त्यादिवशी शिव्या ऐकू आल्या.. किंचाळण्याचा आवाज आला.. मारायचा आवाज आला.. ambulanceचा आवाज आला.. रडायचा आवाज आला.. तरी आस्था पुस्तक वाचत बसली ..
 दीदी आस्थाजवळ आली "आस्था.. तुम्हारी मां.."
"अच्छी नही थी...इसलिये चली गयी..दीदी आप मुझे और किताब दोगे?"
आजूबाजूच्या जगातून बाहेर पडायला पुस्तकं तिला मदत करत होती.. पुस्तकं वाचताना ती खुश असायची.. पुढे दीदीचं लग्न झालं.. आणि त्यांच्या संस्थेचं काम ह्या वस्तीत कमी झालं.. दुसर्या एका संस्थेने पुस्तकं वाचते म्हणजे हुशार आहे समजून तिला शाळेत घातलं.. आस्था शाळेत जायला लागली.. आणि तिथेच तिचं पुस्तकांवरचं प्रेम मेलं..

शाळा, अभ्यास, गणितं, शिकवताना नाकात बोटं घालणारे सर नंतर एखाद्या मुलीच्या स्कर्टला हात पुसायचे.. वह्यांवर काही आगाऊ मुलं घाणेरडी चित्रं काढायची .. धक्क्यांची हळू हळू सवय होत होतीच..  शाळेत मराठीच्या चव्हाण बाई तिला खूप आवडायच्या.. त्या तिच्याकडे कधीच बघायच्या नाही तरीही.. त्या वर्गात आल्यावर मस्त गोड वास यायचा.. त्यांना बघून आस्थाला "बाई" व्हावंस वाटायला लागलं होतं..
आस्थाचं घर आता कुमुद्च्या आईला मिळालं होतं..  कुमुद्ची आई आता धंद्यातून बाहेर पडली होती... खूप आजारी असायची.. शेजारी ठेवलेल्या  एका पत्र्याच्या डब्यात दर थोड्यावेळानी थुकत बसायची..
"मावशी.. डॉक्टरकडे जाउया का गं? " आस्था विचारायची..
"पैसे कोण तुझी मेलेली आई भरणार का?" मावशी खाकरत प्रतिप्रश्न करायची..

"मी पैसे भरले तर?" एक दिवस कुमुद हातात पैसे घेऊन आली... आईने नाही विचारलं तिला, कुठून पैसे आले ते.. छातीची कवटाळून रडली फक्त.. त्यादिवसापासून कुमुद बदलली.. साधीच असणारी कुमुद अचानक लिपस्टिक लावायला लागली, गजरे घालायला लागली.. तिचे कपडे लहान झाले.. तिच्याकडे पैसे यायले लागले, नवीन दागिने यायला लागले.. आस्थासोबत ती अजूनही जुनी कुमुद्च होती.. पण आस्था आता तिच्यासोबत जुनी आस्था राहिली नव्हती.. पूर्वी आस्थाला आपण कुमुद्पेक्षा चांगल्या आहोत असं वाटायचं..कुमुद्च्या कायम पुढे आहोत वाटायचं.. आणि आता अचानक कुमुद खूप पुढे गेल्यासारखी वाटायला लागली.. आस्था आता कुमुदसमोर जरा सांभाळून वागायला लागली.. कुमुद्चे नखरे, तिचे दागिने, कपडे बघून आस्थाला "बाई" व्हावसं वाटायला लागलं होतं..

"कहां खो गई आस्थाजान? शाळेत जायचं नाही का? पोरं वाट बघत असतील.. "  आस्था खिडकीतून बाहेर बघत बसली होती..
"वाट लावाणार्याची वाट कोणी का बघेल?" आस्था कुमुदकडे बघत म्हणाली..
"त्या अस्मदच्या बोलण्यात आलीस कि काय? आस्था.. सून.. ना तू किसीकी वाट लगाती है.. ना तेरी वाट लगी है.. जा अंघोळ करून घे.. "

पडदा ओढून घेत आस्था मोरीत उभी राहिली.. समोरच्या भिंतीवर मुंग्याची रांग बघून तिला लहानपणचा खेळ आठवला.. तिने एक तांब्या डोक्यावर ओतला आणि तशीच ताठ उभी राहिली.. एका संस्थेने त्यांच्या वस्तीची ट्रीप काढली होती.. तेव्हा ते गेले होते  श्रवणबेळगोळाला.. तिथल्या गोमटेश्वराच्या मूर्तीकडे आस्था एकटक बघत बसली होती.. वरून येणारं पाणी कसं खालपर्यंत पोचायचं नाही, मग आज्जीने रुईच्या पानातून आणलेलं दुध कसं खालपर्यंत आलं वगैरे गोष्टी ऐकत एकटक बघत बसली होती.. अंघोळ करताना नंतर बरेच दिवस ती हाच विचार करत असायची.. मुंग्यांना आपण असेच मोठे दिसत असू.. आपल्या डोक्यावरचं पाणी खालपर्यंत कसं पोचतं.. ह्याचा विचार करत ती अशीच उभी राहायची..

ती तयार होण्यासाठी आरश्यासमोर उभी राहिली.. आरश्यातून तिला मागे दारात उभी असणारी कुमुद दिसली.. अजूनही सुंदर दिसणारी.. छान कपडे घालणारी.. आता escort बनली होती.. वस्तीतल्या बायकांपेक्षा वरचा जॉब होता तिचा.. भरपूर पैसे मिळत होते.. आता ती चांगल्या सोसायटीत राहात होती.. कंटाळा आली कि आस्थाकडे यायची..

"आस्था.. त्या बांद्र्यावाल्याचं काय आहे? क्या हो रहा है?"

"पता नही.." आस्था केस बांधत म्हणाली..

"आस्था.. तुला आठवतं? तू म्हणाली होतीस.. "जैसी सुबह होती है.. दिनभी वैसेही कटता है"

"हां.. होतं असंच.. सकाळ छान गेली कि दिवस मस्त जातो.. का?"

"आस्था.. तुझी सकाळ चांगली झाली आहे.. खूप चांगली नसली तरी माझ्यापेक्षा चांगली आहे..  आणि तुझा दिवसही तू चांगला घालवू शकतेस.."

"कुमि.. मी असं  बोलायचं असतं.. तू कळेल अश्या भाषेत बोलायचं असतं.. आम्लेट खाणार? मी घेऊन येते खालून.."

आस्था लगेच बाहेर पडली.. कुमुद आता काय सांगणार हे तिला माहित होतं.. वस्तीतल्या शाळेत शिकवणं खूप महत्वाचं काम आहे हे तिला माहित होतं.. शाळेतूनच ती मुलं बाहेर पडू शकतात हेही तिला माहित होतं.. तिला खूप बाहेर पडता आलं नसलं तरी काठावर उभं राहून ती मदत करू शकत होती.. अन काठावर उभं असणार्याला पाणी किती खोल आहे माहित असलं तरी त्यात उडी मारून डुंबायचं असतंच.. ही बाई बनल्यावर आदर आहे पण पैसा नाही.. हुशारी आहे पण नट्टा-फटटा नाही..गेल्या २४  वर्षात पहिल्यांदा तिला भेट मिळाली होती आत्ता.. आस्था विचार करत करत अस्मद्च्या टपरीवर आली.. अस्मद धावत आला तिच्याजवळ
"दीदी मुझे पता था.. आप मुझे स्कूल लेके जाने आओगे.." त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून आस्था त्याच्या पपाकडे वळली..
"चाचा.. आप क्या बोल रहे थे?  चाचा.. सौ-पाच्सौ के लिये माथ्सकि बुक नही लगती.. पर क्या आप ये चाहते हो कि अस्मद जिंदगीभर सिर्फ सौ-पाचसौ में बंद रहे? पढेगा तो मेरे जैसे होगा..तो  क्या बुरा है?"

आस्था परत वर आली.. कुमुद्ला मिठी मारत म्हणाली.. "आजकी सुबह अच्छी है.. जिसके दिलमें सुरज बसता हो.. उसके जिंदगीमे अंधेरा कहां?"

....



Tuesday, October 9, 2012

आत्महत्या

नाव डेंजर आहे पोस्टचं .. पण बाकी काही डेंजर नाहीये.. मी पोस्ट लिहित्ये त्याचा माझ्या आत्ताच्या मनस्थिती वगैरेशी काडीमात्र संबंध नाहीये. मी काय स्वतःहून मरणार नाहीये..

तर हे का लिहावंसं वाटलं?  कॉलेजमधल्या  एका मुलाने परवा स्टडी टूरला आत्महत्या केली. आगापिछा मला जास्त ठाऊक नाही, काही म्हणतात त्याला सिगरेट ओढू दिली नाही म्हणून, काही म्हणतात नशा करत होता, काही म्हणतात सर ओरडले म्हणून, तो सिगरेट ओढतोय हे कोणीतरी घरी कळवलं म्हणून... नक्की कारण माहीत नाही.. पण ऐकलेल्या ह्या कारणांपैकी कोणतंही कारण असेल किंवा ह्याच्या जवळपास जाणारंही काही असेल तरी २१ वर्षाच्या , आई-बाबांच्या एकुलत्या एक मुलानं रात्री तिस-या मजल्यावरून उडी मारावी?
उडी मारली.. पण त्याआधी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं "so this is my last status ,  im signing off, cant handle life anymore.. bye everyone" अश्या अर्थाचं.. परवा ऐकल्यावर धक्का बसला, त्याची प्रोफाईल पाहिली तर त्याचं हे स्टेटस साधारण ३००हुन अधिक लोकांनी "लाईक" केलं होतं.. इथे फेसबुकबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, पण त्यात नको शिरायला.. हगल्या-पादल्या अपडेट्सना  लोकं लाईक करतात ते माहीत होतंच , पण कोणाच्या सुसाईड नोटमधेही लाईक करण्यासारखं काही असावं, हे विचित्र आहे. घरी आई-बाबा काय करतील आपण गेल्यावर हा विचार नाही करता आला त्याला, पण त्याच्या फेसबुक फ्रेंड्ससाठी जाता जाता स्टेटस अपडेट करणं जास्त महत्त्वाचं वाटलं असावं त्याला.. हेही विचित्रचं आहे!

आत्महत्या वगैरे माझ्या एका मित्राचा आवडता विषय आहे.. तो खूप बोलतो ह्यासगळ्याबद्दल... मी जसं स्वतःहून मरणार नाही म्हणाले तसं तो एकदा म्हणाला होता "संतांनी स्वतः समाधी घेणेच उचित!" (स्वतःबद्दल.. मला संत नाही म्हणू शकत कोणीच) .. काही लोकांना तिरकं बोलायची सवय असते , म्हणजे वाकड्यात शिरून नाही.. तिरकं बघत.. आपण पूर्वेकडे बसलेले असू तर ईशान्य किंवा आग्न्येयेकडे बघत बोलतात ती लोकं, हा तसं बोलतो..अन् बोलायला लागला की साधारण अर्धा तास सलग बोलतो.. तर "मृत्यू" वर त्याने मला अनेकदा (तेचतेच) प्रवचन दिलं आहे.. मला एकदा फूड पोईज्निंग झालं होतं, तेव्हा ह्या पठ्ठ्याने "तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.. काय खाल्लंस? एवढ्या लवकर  giveup करतेस?" वगैरे विचारलं होतं..

तो प्रश्न असेच आर्बिट काहीतरी विचारतो.. एकदा त्याने विचारलं होतं "तू मृत्युपत्रात काय लिहिशील?".. त्याचं तयार आहे म्हणे मृत्यूपत्र.. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या माणसांसाठी एक-एक पान लिहिलं आहे काहीतरी.. त्याला काय करायला आवडलं असतं, ह्याची यादी केलीये म्हणे..
मी खूप विचार केला होत्या ह्या प्रश्नाचा तेव्हा.. मला टेन्शनही आलं जरासं ,
आपण लिहिलेलं शेवटचं काहीतरी असेल ते.. ते चांगलं असायला हवं ना..
किंवा आपण ना श्रीमंत झाल्यावर असं लिहायची वेळ आली तर फिल्मी पद्धतीनं वाटणी करू, "सहा महिने लग्न टिकलं तर १० कोटी रुपये.. " सारखं..
सावरकरांसारखं काही लिहिणं ह्या जन्मात आणि ह्या मृत्युतही शक्य नाही.. प्रबोधिनीत जेव्हा "की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..." म्हटलं जातं तेव्हा अनेकदा अंगावर काटे उभे राहिल्येत..
सरळ शांतपणे " No one is to blame" असं लिहायचं नाहीतर..



अगदी सुरुवातीला मी एक गोष्ट लिहिली होती.. ठाण्या-कळव्याच्यामधल्या ट्रेनच्या ब्रीजजवळ कायम एखादातरी पोलीस असतोच.. नुसता एकटा बसलेला.. तिथे का असतो माहीत नाही.. पण आम्हा मैत्रिणींचा समज असा की तिथे आत्महत्या करायला येणा-या माणसांसाठी बसतो.. तेव्हा मी लिहिली होती गोष्ट.. "एका नदीकाठी  popular suicide pointवर पोलीस एक चौकी बसवतात.. आणि तिथे काम जास्त नसल्याने एका हवालदाराला ठेवतात.. तिथे येणा-या पहिल्या काही  माणसांना तो यशस्वीरित्या परतही पाठवतो.. एकदा एका माणसाला खिशातल्या ३ पैकी २ नोटाही देतो.. पण मग हळूहळू जास्त काम नसल्यानं रिकामं डोकं तिथे आलेल्या लोकांच्या भावनांच्या ओकारीने भरत जातं (किळसवाणी उपमा आहे किती).. नदीच्या दुसऱ्या काठावरून लोकं अजूनही उड्या मारत असतात.. तिथल्या एका नावाडी पोऱ्याला हवालदार डब्बा देत असतो रोज आणि त्याबदल्यात त्या पोराने कोणी उडी मारली की लगेच हवालदाराला येऊन कळवायचं असतं..हवालदार लगेच रिपोर्ट तयार करत असतो.. असेच दिवस जात असतात.. एक सीजन येतो, जो अतीच चांगला असतो जगासाठी.. कोणी येतंच नाही तेव्हा मरायला.. समजवायलाही कोणी नाही अन् रिपोर्ट बनवायलाही कोणी नाही.. एक दिवस नदीत एक इसम उडी मारतो.. नावाडी धावत-पळत चौकीत येतो.. तिथे हवालदार नसतो पण रिपोर्ट तयार असतो.." असंच काहीतरी..

आत्महत्या म्हटलं की मला तो मित्र आठवायचं अजून एक कारण हे आहे की सर्वात घाण आत्महत्या त्याने केली.. फेसबुकवर स्टेटस अपडेट न देता.. प्रचंड creativity असणारा, फिल्म्ससाठी जगणारा.. वयाच्या २५व्या वर्षापर्यंत इतकी मस्त adventurous life  जगलेला तो, फिल्म इंडस्ट्रीत नक्की काहीतरी चांगलं काम करेल असा सगळ्यांना विश्वास होता..मुली काळजी घेणार नाहीत इतका सांभाळायचा स्वतःला .. अचानक काय झालं माहीत नाही.. हल्ली त्याच्या वडलांच्या गारमेंटच्या धंद्यात फायली आणि samples मध्ये बुडलेला असतो.. त्याच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं बघते आणि त्याचं मृत्युपत्र शोधत बसते..

Tuesday, August 28, 2012

युबिकीरी..

"दीदी.. आप मिलने आओगे?" मी फक्त हसले..
"पिंकी प्रॉमिस?" म्हणत त्या पिल्लाने तिची करंगळी पुढे केली..मी  माझी करंगळी तिच्या करंगळीला लावली..
"पक्का?" मी होकारार्थी मान हलवली..

माणूस खोटं बोलू शकतो पण त्याचं शरीर खोटं बोलत नाही असं  body languageवाले सांगत असतील.. पण काहीवेळा जेव्हा तोंडही खोटं बोलायला लाजत असतं तेव्हा हसणं, मानेची हालचाल वगैरे खरं लपवू शकतात.. मी नव्हते भेटणार कधीच तिला परत , तिच्या आईने मला तसंही जास्त  entertain  नव्हतं केलं.. फक्त १८ तासांच्या प्रवासात मुलगी आपल्या एकटीच्या डोक्याला कटकट करणार नाहीये म्हणून जरा बरं वाटलं असेल तिला! मी ट्रेनमध्ये त्यांच्या समोरच्या सीटवर बसल्यावर बराच वेळानी त्या पिल्लाशी बोलायला लागले होते, भारी गोड पोर होती.. खरं सांगू तर मला अजिबात नाव आठवत नाहीये तिचं.. होशंगाबाद किंवा तत्सम गावची होती बहुतेक.. तेही नाही आठवत.. आठवतं फक्त इतकंच आहे की तिने उतरताना माझ्याकडून पिंकी प्रॉमिस घेतलं होतं पुन्हा भेटायचं आणि मी ते पूर्ण नाही केलं.. आणि भविष्यात कधी पूर्ण व्हायचा चान्स नाही..

आज गाजर किसताना करंगळी जराशी किसली गेली.. कोशिम्बिरीला काहीही झालं नाही..ती छान झाली .. पण मला अचानक आठवलं.. पिंकी प्रॉमिस.. करंगळीला करंगळी लावून केलेलं प्रॉमिस.. ते पूर्ण करता आलं नाही की करंगळी कापायची असते म्हणे..खूप काढीव नियम असतात ह्या अश्या शपथ-वचन टाईप गोष्टींना .. आणि तितक्याच काढीव पळवाटाही! आज करंगळीवर बांधलेली पट्टी पाहून न पूर्ण केलेली वचनं आठवत होते..

एकदा जाऊन आल्यावर पुन्हा नाही गेल्ये मणिपूरला अम्येला दिलेलं वचन पूर्ण करायला..

वरची २ सोडल्यास नाही आठवली.. खरोखरच नाही आठवली.. आणि even इथे लिहायला  literary value असणारी काही पूर्ण न केलेली वचनं सुचलीही नाहीत.. माझा प्रोब्लेम्च तो आहे.. मी लाख वचनं देईन, पण ती लक्षात राहायला हवी ना.. आपण काहीतरी विसरतोय हेही कधीतरी आठवायला हवं ना.. मुळात लहान असताना ६७९ वचनं आणि शपथा मोडल्या असलीत "कुणाला सांगू नको हं" पासून सुरु होणाऱ्या.. त्यातून एखादी गोष्ट  top secret  आहे म्हंटल्यावर ती तर exclusively  सगळ्यांना कळायलाच हवी ना.. किती वेगवेगळ्या प्रकारच्या दोऱ्या असायच्या ह्या.. त्यांच्या तीव्रतेनुसार घट्ट - सैल गाठी..
 promise < god promise < mother die promise ..

 पिंकी प्रॉमिस फक्त एक पद्धत आहे.. आमच्यावेळी नव्हती इतकी फेमस..हल्लीच्या जपानी कार्टूनच्या पुरामुळे आपल्याकडे वाहून आली असावी.. जपानीत "युबिकीरी" म्हणतात त्याला.. आवडला मला हा शब्द खूप जास्त.. मी तर वाट बघत्ये युबिकीरी करायची कोणाबरोबर तरी..  तसं स्वतःला रोज किमान २४ वचनं देत असेन मी.. उदाहरणार्थ
: आपण.. ( मी माझ्याशी बोलताना मला आपण म्हणते.. आदर म्हणून.. multiple personality  नाही) तर .. आपण एकदातरी सलग २४ तास झोपू .
: आपण हे वर्ष संपायच्या आत बारीक होऊ
:आपण सगळ्यांच्या विरोधाला सामोरे जात मांजर पाळूच
वगैरे वगैरे.. आणि हे संकल्प नाहीयेत हां.. ही वचनं आहेत..

 हां.. इथेही माझा एक त्रास आहे.. शपथ कधी घ्यायची, वचन कधी द्यायचं हे नाही कळात अजून मला.. पण कोणीतरी म्हटलंचं आहे ना.. "कसमे-वादे  वगैरे सगळं ठीक आहे.. पण त्याचं काय?" मला ना  actually  झोप येत्ये.. मी काय लिहित्ये त्याला तसा काही अर्थ मला स्वतःला लागत नाहीये.. टाईप करताना करंगळी लागत नसली तरी ती ठणकते आहे आता.. त्यामुळे मी इथेच थांबते आहे..

पण अश्या रीतिने ब्लॉगवर पोस्ट टाकत सकाळी "मी आज काहीही करून ब्लॉग लिहेन..  yes yes indeed why not sure sure" म्हणून केलेलं virtual pinky promise पूर्ण करते आहे.. ब्लॉगशी नाही पण युबिकीरीशी इमान राखलं आहे मी ..

Monday, April 2, 2012

खिडकी

प्रिय जोन डो,

आज मी आले इथे.. आल्या आल्या खिडकी उघडली. कधीतरी ती खिडकी उघडणार होतीच, उघडायला हवीच होती... आठवतं का कधी बंद केली होती ते? खिडकी उघडल्यावर बाहेरच्या छज्ज्यावरची कबुतरं फडफडली.. सुखलेल्या, काड्या झालेल्या २-३ गुलाबाच्या कुंड्या आहेत  तश्याच.. धुळीत , कबुतरांच्या घाणीत बरबटलेल्या... आपण एकदा लाईट गेल्यावर मेणबत्तीचं मेण सांडवून आपलं नाव लिहिलं होतं खिडकीत आठवतंय? ते आहे अजून मस्तपैकी .. धुळीमध्ये अजून उठून दिसतं आहे.. माहित्ये तू लगेच विचारशील "बसून नाही दिसते का?".. असे किती पकाऊ जोक मारले असशील ना ह्या खिडकीत बसून.. आणि मीही कितीदा "फेकून दिन हा तुला खिडकीतून ..अजून बडबड केलीस तर" अशी धमकी दिली असेन..

शेठ काकूंनी लगेच चहा आणि त्यांच्या कमी साखरेच्या बदामी कुकीज आणून दिल्या.. बसणार होत्या गप्पा मारायला आणि गेल्या २ वर्षातल्या सोसायटीतल्या "महत्वाच्या घडामोडी" सांगायला..पण तितक्यात शेखर आला .. अरे तू विश्वास नाही ठेवणार.. शेखर २ वर्षात २ फुट वाढला असेल..मिश्या ठेवल्यात आता..सायंस घेतलं आहे.. तू अभ्यास घ्यायचास त्याचा ,अभ्यास कमी आणि पोकेमोनच्या चर्चा जास्त चालायच्या... आता खुपच वेगळा वाटला रे.. आपल्या खिडकीची काच फोडली होती त्याने क्रिकेट खेळताना .. आणि आपण ती परत कधी बसव्लीच्च नाही आपल्या आळसाला "कवडसा मस्त दिसतो" हे नाव देऊन.. आत्ता त्या काचेला लागलेला पेपर पिवळा झालाय.. तुला आवडत नाही तसा.. काढूनच टाकेन आता आणि पतंगी कागद नक्षी कापून लावेन नंतर.. रंगीत नक्षीदार कवडसा पडेल म्हणजे..

चहा पित एकटीच बसले मग खिडकीत.. उद्या जाऊन पडदा घेऊन येईन म्हणते... आठवतं? आपण भुलेश्वर पालथं घातलं होतं.. आपल्याला घरी बनवायचे होते पडदे.. बनवलेही होतेच कि आपण.. आकाशी नेटवर काचेच्या टिकल्या आणि तुझे आवडते लाल भडक पडदे आणि त्यावरची पांढरी तूच काढलेली नक्षी.. तसं पडद्यांचा जास्त  उपयोग नव्हताच झाला कधी.. सताड उघडी असायची ना खिडकी.. समोरच्या बिल्डिंगमधल्या ६ पैकी ४ खिडक्या  बंद आहेत आज..माधुरी दीक्षितच्या खिडकीत बाळाचे कपडे वाळत घातलेले दिसतायत. अब्राहम लिंकनच्या खिडकीत नेहमीप्रमाणे त्याचे आतले कपडे वाळत घातलेत. आजी-आजोबांची खिडकी बंदच असावी बरेच दिवस कारण कबुतरांची कोलनी झाल्ये तिथे..वरच्या मजल्यावर डावीकडे कोण राहायचं रे? अन्ना कि वझलवार? मला ना आठवतच नाहीये नक्की..दोघं वर राहायचे इतकं माहित्ये. त्या रंग दे बसंतीवाल्यांकडे मगाशी मुलगी होती एक ..

ही सगळी माणसं कोण आहेत काय माहीत न खर्या-खुर्या आयुष्यात? आपण इथे राहत असताना किती गोष्टी बनवल्या ह्यांच्या.. सुंदर दिसते, गोरी आहे, एकदा मराठी बोलताना ऐकलं म्हणून ती नववधू आपली माधुरी दिक्षित झाली.. बारीक, दाढीवाला अमेरिकेच्या झेंड्याची चड्डी घालतो म्हणून अब्राहम लिंकन झाला..पोलिसात असणारा वझलवार झाला.. लुंगीमुळे अन्ना बनला.. थोराड दिसणारी, कदाचित नापास होणारी  कॉलेज न सोडणारी मुलं रंग दे बसंती झाली.. आजी-आजोबा मात्र तेच राहिले.. चहा पितानाचा आपला  आवडता टाईमपास त्याच्या आयुष्यात काय होतं आहे हे ठरवायचा असायचा .. आपण खर तर ३ वर्षापूर्वीच माधुरीला प्रेग्नंट घोषित केलं होतं रे.. पण आत्ता बाळाचे कपडे दिसतायत..अन्नाचा लिंकनच्या बायकोवर डोळा आहे हे तुझं ठाम मत होतं..तशी ती होती ढिंच्याकच, मी तेव्हा मान्य नाही केलं कधी.. पण आता म्हणायला काय जात? तू तश्या बायकांमध्ये रुची ठेवत नाहीस हे कळलं आहे ना आता..

१०० रुपयांचं घासाघीस करून २० रुपयात आणलेलं छोटेखानी झुंबर कुठे आहे रे? ते मस्त दिसायचं खिडकीत.. wind chyme का नाही आवडायचं रे तुला? किती मस्त किंकिण असते त्याची.. झाडही नाही लावू द्यायचास तू मला जास्तीच.. फक्त गुलाब लावायचं असायचं तुला..उगाच काहीही ना? पाउस प्यायला लावला होतास खिडकीत उभं राहून..फुटलेल्या काचेतून बरोबर चंद्र समोर  येईल तसं  झोपायचं असायचं तुला तो प्रकाश उघड्या अंगावर पाडत.. दिवाळीत सोडलेल्या दिव्यांच्या माळा Christmas झाल्यावर उतरवाय्चास तू.. माळा बघून चुकून santa clause येऊ शकतो म्हणून दुध आणि कुकीज ठेवल्या होत्यास.. मी मग रात्री खाली उतरून एक गिफ्ट आणून ठेवलं.. मला सकाळ आवडायची इथली, आणि तुला संध्याकाळ..तसा cliche माणूस होतास तू कायमच.. तुझे अर्धे प्रोफाईल फोटो ह्याच खिडकीतले असतील ना रे? माझेही किती फोटो काढले असशील तू इथे.. त्यांना black and white करून अपलोड करायचे मग.. आणि अगणित सावल्यांचे खेळ केले असतील ना आपण..

तू माझ्याआधी घरी यायचास .. मला उशीर व्हायला लागला कि खिडकीत बसून राहाय्चास गेटकडे बघत.. आता आंबा मोठा झालाय खालचा.. गेट नाही दिसत हा..मला शेठ काकू कायम म्हणायच्या "नवरा मिळत नाही हो असा बायकोआधी घरी येऊन तिची वाट बघत बसणारा".. मी मनातल्या मनात म्हणायचे "मलातरी कुठे मिळाला आहे".. सगळ्यांना नवरा-बायकोच वाटायचो आपण.. आणि ह्या सोसायटीत राहायला मिळावं म्हणून आपणही तसंच दाखवत होतो.. आता का खोटं बोला? मला आपलं लग्न पुढे-मागे होणारच ह्याची खात्रीच होती.. म्हणून तर live in साठी एका पायावर तयार झाले होते..तेव्हा कुठे माहीत होतं खिडकीत उभा राहून तू फोनवर बोलतोस ते सगळे फोन कामाचे नसतात म्हणून.. खिडकीत तुला बिलगून फोटो काढताना हे फक्त फोटोपर्यंतच आहे हे कुठे माहीत होतं? १-२ दिवस नसले कि खिडकीत रचून ठेवलेल्या बाटल्या आवरताना वाटायचं माझ्या जुदाईत प्यायलास.. तेव्हा कुठे माहीत होतं तुला company  असायची ते?

तुझ्या आताच्या घरात आहे का रे आपल्यासारखी खिडकी? ती तुला खिडकी हवी तशी सजवू देते का? कुंड्या ठेवल्यात तुम्ही? कोणती झाडं आहेत? चहा पिता का खिडकीत बसून? काच फुटल्यावर तशीच ठेवू देईल का ती? तुमच्या खिडकीत बाळाचे कपडे वाळत घालायची वेळ आली का? तुम्ही बनवता का समोरच्या घरामधल्या गोष्टी? तिला तू दात घासत खिडकीत आल्याचं चालतं का, दाढी केल्याच चालतं खिडकीत ? तू तिची वाट बघतोस? कि ती तुझी? चंद्र दिसतो का? उन येतं का? असे एक हजार प्रश्न आहेत अजून.. तू तिच्यापाठी गेल्यावर मीपण सोडलं होतं हे घर.. आज परत मुंबईत आल्यावर आले इथे.. आता काही दिवस रोज विचारेन असेच अनेक प्रश्न.. संपवून टाकेन विचारून एकदाचे.. अश्याच कागदावर लिहेन ते.. मग तुझा आवडता प्रकार करेन.. ह्या कागदांचे बारीक बारीक तुकडे करून खिडकीतून बाहेर उधळेन.. ठिणग्यान्सारखे चमकतील मग ते कपटे.. त्यातच जराशी जळेन आणि मग खिडकी बंद करून टाकेन..

-जेन रो


Sunday, March 25, 2012

नीट बोल गाढवा..

(गुढी पाडव्याला लिहिली होती.. आज पब्लिश केली)

 आज गुढी पाडवा आहे.. माझ्या ह्या सणाबद्दल तश्या विशेष काही भावना नाहीयेत.. म्हणजे मला दिवाळी लै अशी  नाही आवडत.. गणपती प्रचंड आवडतो.. दसरा चांगला असतो.. ख्रिसमस टीव्हीवर आणि इंग्लिश फिल्म्समध्ये आणि ठाण्यात चरई मध्ये जाम आवडतो..  तसं गुढी पाडव्याबद्ल काहीच भावना नाहीयेत..  त्यामुळे ही पोस्ट गुढी पाडव्याबद्दल नाहीये. ही पोस्ट अशीच जनरल "आता ह्यावर्षी तरी लिहायला हवं आणि सुरुवात आजपासूनच करायला हवी" म्हणून लिहिली गेलेली आहे. आणि as usual  सुचत वगैरे नाहीत विषय म्हणून सुरुवात आपण गुढी पाडव्याने केलेली आहे.

मगाशी माझ्या आईने असं उगाच पुऱ्या लाटत असताना विचारलं.. "आज गुढी उभारतात ना? मग आजच्या दिवसाला गुढी 'पाडवा' का म्हणतात?"  मग मी आणि दीपिकाने ऐकू न आल्यासारखं दाखवून "एका लग्नाची दुसरी गोष्ट' चे आढावे एपिसोड्सबद्दल बोलणं सुरु केलं..मला ना ती सिरीयल बघताना भीती वाटते जाम.. २ कारणं आहेत..
१. कधी टचकन डोळ्यात पाणी येईल सांगता येत नाही.. मग उगाच लाजायला होतं
२. ही सिरीयल ताणली जायची भीती वाटते... ही सिरीयल प्लीज प्लीज जास्त ताणू नको देत.. लोकं नावं ठेवायला लागेपर्यंत नको चालवू देत.. हुरहूर लागून संपवू देत..

ते चार दिवस सासूचे प्रकार काय डेंजर आहे ना .. अजूनही लोकं बघतात आणि ती सिरीयल.. माझ्या ओळखीतले एक आजोबा आहेत ते चा.दि.सा ची वेळ झाली की आजीला बोलवतात "अगं सासूची वेळ झाली..सासू लावायचं आहे ना"  ते क्रिकेट सोडूनपण चा.दि.सा बघतात.

गुढी पाडवा ... नीट बोल गाढवा
सुपारी.. तुझं लग्न दुपारी
सांग... तुझी दाढी-मिशी लांब
काय.. तुझ्या नाकात दोन पाय.. तुझ्या सासुच नाव काय? खाली डोकं वर पाय..
म्हण्जे... वाघाचे पंजे.. कुत्र्याचे कान अन् उंटाची मान..

अजून काय काय असायचं नं ह्या टाईपमधलं.. "तुझ्या नाकात दोन पाय" हे माझ्यामते सर्वात गलिच्छ वाक्य होतं.. माझ्या नाकात अजूनही हुळहूळतं हे ऐकल्यावर..  हां.. आणि ते ऐकून तोंडात घाण चव येते "दे टाळी.. खा पोळी.. दे विडा.. खा किडा.."

ह्या सगळ्यावरून खेळतानाची लहानपणाची वाक्यं आठवली.. आमचे खेळ पण डेंजर असायचे सुट्टीतले..

१. झुंजुमुंजू: ह्या खेळात दोन बाजूना माती असते आणि मधे राज्य घेणारा माणूस.. आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूला राज्य घेणाऱ्या माणसाला चुकवून जाऊन परत यायचं.. बरं, तुम्ही " झुंजुमुंजू- झुंजुमुंजू" म्हणत जात असाल तर राज्य घेणारा माणूस तुम्हांला पकडू शकत नाही.. पण  अट अशीये की तुम्ही एकाच ट्रीपमध्ये झुंजुमुंजू वापरू शकता.. म्हणजे जाताना वापरलं असेल तर येताना वापरू शकत नाही..

२. इंदिप्ना पंचरसी:  हा मंत्र माझ्या भावाने काढला होता.. तर ह्या खेळांत आम्ही सगळे भिडू आमच्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसायचो.. राज्य घेणारा माणूस बाहेर उभा असायचा.. त्याचा aim  हा असायचा की  in any case  झोपाळ्यावर चढायचं आणि झोपाळवरच्या भिडूंनी त्याला चढू द्यायचं नाही.. आणि हा खेळ चालू असेपर्यंत "इंदिप्ना पंचरसी-इंदिप्ना पंचरसी-इंदिप्ना पंचरसी" हा मंत्र म्हणत बसायचा.. जो थांबेल त्यावर पुढचं राज्य..

३. खांब-खांब-खांबोरी: हा अंगणात मांडव असताना खेळायचा खेळ.. मांडवाच्या खांबाला धरून भिडू उभे राहतात.. राज्य घेणारा माणूस मधोमध उभा राहतो.. आता त्याला चुकवत बाकीच्यांनी खांब अदला-बदली करायचे असतात.. राज्य घेणाऱ्याने मग खांबांवर लक्ष देता देता प्रत्येक खांबाजवळ जाऊन म्हणायचं असतं
राज्य देणारा: फफम्मबाई ताक दे..
खांबावरचा: डेरा फुटला.. उद्या ये..

४. प्रोजेक्ट चंद्रभागा: आमच्या घरामागे एक पाण्याचा पाट वाहतो. उन्हाळ्यात पाण्याचा फोर्स कमी झाला कि पाणी यायचं बंद व्हायचं .. मग मी आणि माझा भाऊ तो पाट स्वच्छ करायचा खेळ खेळायचो. त्याला आम्ही प्रोजेक्ट चंद्रभागा म्हणायचो.. आम्ही pretend  करायचो कि आम्ही कोणीतरी मोठे वैज्ञानिक आहोत आणि पाट म्हणजे चंद्रभागा नदी आहे आणि तिला स्वच्छ करायची जबाबदारी आमच्यावर आहे.. ह्यात actually मंत्र वगैरे नव्हते पण पूर्णवेळ आम्ही मोठमोठ्या योजना आखायचो, बातम्या द्यायचो, मग मधेच पूर यायचा तेंव्हा नदीतल्या मुंग्यांना वाचवायचो.. etc etc.

५. नोटे आटे काटे ठोम: (not at home) आम्ही सगळी भावंड, आत्या वगैरे पडवीत बसून हा खेळ खेळायला लागलो कि अख्खी दुपार मस्त जायची.. आपल्याकडे मागितलेला पत्ता आपल्याकडे नसल्यावर "नोटे आटे काटे ठोम" म्हणायला तर असला आनंद व्हायचा..आणि मग लगेच "आता तू.. मला दे.. " म्हणत त्या माणसाने घेतलेले सगळे पत्ते मागायचे..अजून मज्जा यायची ते इतरांकडचे पत्ते पाठ करण्यात "सुजय..दश्शी .. नववी.. आरती एक्का, दीपिका राजा, गोटू" तरी माझा एक लहान भाऊ त्याच्याकडे असलेलं पान दुसऱ्याकडे मागितलं कि स्वतःच ओरडायचा "नोटे आटे काटे ठोम"

६. रुपांझेल रुपांझेल: आमच्याकडे एक तिरकं नारळाचं झाड होतं, त्यावर बर्यापैकी वर चढता यायचं.. आम्ही मग त्यावर चढून rapunzelची गोष्ट enact करायचो.. केसांच्या ठिकाणी एखादी वाळलेली फांदी वगैरे असायची.. सुजयला शाळेत तिचं नाव रुपांझेल सांगितलं होतं आणि तिला प्रेमाने रुपा म्हणायचे ते लोक.. मग आम्हीपण कोणीतरी खाली उभं राहून "रुपा.. रुपा तुझे सोन्यासारखे केस सोडतेस का ग खाली?" म्हणूनमग मराठीतून खेळायचो सगळा खेळ.. मग चेटकीण आणि राजकुमाराच युद्ध म्हणजे आमच्यात मारामाऱ्या आणि रडारड होईपर्यंत जायचं..

आत्ता हे लिहीत असताना मंचची "शोर ना मचाया तो मजा नही आया" जाहिरात आठवली.. खरंय किती.. आता पटली ती जाहिरात.. किती आवाज करायचो आम्ही खेळताना .. खेळायच्या आधी सुटताना तर अजून विचित्र काय काय म्हणायचो .. "इनि मिनी अल्कोसा.. टीप टोप नाकोबा.. नाकोबा का बकाबू.. फ्रांस".. हे फ्रेंच असावं कदाचित.. म्हणजे आम्हाला तरी वाटायचं आणि शेवटी फ्रांस येतं.. फ्रांस ज्यावर येतं तो सुटतो..

"आटली बाटली फुटली" हे मात्र माझं सर्वात नावडतं वाक्य.. लपाछपीमध्ये राज्य आलेलं कोणालाच आवडत नसेल आणि त्यात चुकीच्या माणसाचा धप्पा केल्यावर "आटली बाटली फुटली" होणं किती वाईट ना..पुण्यात काही लोक ह्याला "अंड फुटलं" म्हणतात .. पुण्यात generalच कशालाही काहीपण म्हणतात... "आटली बाटली फुटली" ची मला कायमच भीती वाटायची.. अजूनही वाटत असतेच.. तेव्हा राज्य लपाछपीपुरतं होतं आता "इनि मिनी" न करताही राज्य कायमच असतं.. आणि दिसणाऱ्या माणसाच्या आत नक्की कसा माणूस लपलाय हे अजूनही शोधता नाही येत मला.. आपण काहीतरी बोलून जायचो आणि समोरच्याने "आटली बाटली फुटली" करायचं.. ह्या भीतीने हजारो गोष्टी बोलायच्या टाळल्या आहेत मी.. 'नोटे आटे काटे ठोम" मधल्यासारखं मनातल्या मनात त्या गोष्टी घोळवत बसते मग.. "इंदिप्ना पंचरसि" आणि "झुंजुमुंजू" सारखे मंत्र शोधत बसते मग.. जरा risk घ्यायला नको.. पण मग आज सकाळी उठल्यावर स्वतःच स्वतःला म्हणून घेतलं.. "आज आहे गुढी पाडवा.. आता तरी नीट बोल..वाग अन् खेळ गं गाढवा"

Friday, December 30, 2011

ओपा...

फेलिक्स आणि कायरा जरा काळजीतच बसून होते. संध्याकाळ झाली तरी दिवे लावायचे अजून लक्षात नव्हतं आलं दोघांना..
"काय होणार आता?" कायरा तिचे नाजुकसे हात गोऱ्या हनुवटीवर ठेवत म्हणाली..
 फेलिक्सने डोळे उघडले आणि म्हणाला.. "पार्टी करावी लागणार.."
कायाराने तिच्या शेल्फमध्ये ठेवलेल्या काचेच्या डायनर सेटकडे पाहिलं.. बाहेरून येणाऱ्या नारिंगी उजेडात तिच्या काचेच्या प्लेट्सच्या कडा चमकत होत्या.. " ओह थेयोश मो"

क्रकोझिया देशातल्या पौद् गावात फेलिक्स आणि कायरा राहत होते.. ईस्ट युरोपातला त्यांचा हा छोटा देश वेगवेगळ्या प्राचीन रुढी-परंपरा जवळ बाळगून आहे.. त्यांच्यातलीच एक परंपरा म्हणजे पार्टीनंतर जेवणाच्या प्लेट्स फोडणं.. कदाचित ग्रीसमधून ही परंपरा इथे आली  असावी.. ही परंपरा का आली  असावी ह्याला बरीच कारणं आहेत... कदाचित भारतात मातीचे कुल्हड वापरून टाकून देतात त्याप्रमाणे त्या प्लेट्स परत वापरू नयेत म्हणून असेल.. काही लोक म्हणतात की दुष्टआत्मे  दूर रहावे म्हणून असं करतात.. कदाचित आनंदाला नजर लागू नये म्हणूनही असेल.. किंवा केह्फी, म्हणजे ग्रीकमध्ये उन्मत्त आनंद.. त्याचा उच्चारही इंग्लिशमधल्या carefree आणि आपल्या कैफीसारखा होतो.. इतका आनंद व्हावा की तो दाखवण्यात मग कुठेही अडताचं येऊ नये..
क्रकोझीयात मात्र पार्टी चांगली झाली.. जेवण रुचकर असेल तरच प्लेट्स फोडल्या जातात.. पार्टीत रिझोगालो, बकलावो, रेवानीसारखी डेसर्ट डिश सर्व्ह झाली की घरातल्या बाईचे कान टवकारले जातात.. खळ.. आवाज येऊन कोणी ओपा म्हणून ओरडलं की बाईच्या डोळ्यात पाणी येतं.. आपलं जेवण लोकाना आवडलं, आता ४ दिवस आपल्या पार्टीची चर्चा होणार ह्याचा आनंद आणि पार्टीच्या प्लेट्सचा चुरा होत असतानाचा त्रास... "ओह थेयोश मो"..

फेलिक्स एका सरकारी कार्यालयात  जमिनीच्या कागदपत्रांची कामं करायला होता.. ह्या कामामुळे बिझीनेसमधल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याला कळत होत्या, नवनवीन ओळखी होत होत्या.. त्यालाही बिझिनेसमध्ये रस वाटायला लागला.. तसंही त्याच्या कमी पगारात महिनाभर घर चालवायचा कायाराला कंटाळा आला होता.. ती कधीपासून त्याच्या मागे लागली होती.. "नोकरी  सोड.. बिझिनेस कर.. एकदम श्रीमंत होऊ.. मग आपली मुलं चांगल्या शाळेत जातील..आपण बंगल्यात राहू.." कायराची ही यादी सुरु झाली की तिला थांबवणं कठीण व्हायचं  आणि फेलिक्स फक्त खिडकीबाहेरच्या झाडाकडे बघत राहायचा.. फेलिक्सने बिझीनेस्ची तयारी सुरु केली.. जमिनींच्याचं  व्यवहारात उतरायचं त्याने ठरवलं होतं.. तयारी पूर्ण झाल्यावर त्याने नोकरीचा राजीनामाही दिला..
ज्या दिवशी त्याने  राजीनामा दिला त्यादिवशी संपूर्ण दिवस रेडियोवर क्रकोझियामध्ये आलेल्या  महागाईच्या लाटेबद्दल चर्चा-महाचर्चा चालू होत्या..

फेलीक्सचा अंदाज अंमळ चुकलाच होता.. त्याने केलेलं आर्थिक नियोजन फसलं होतं.. आणि त्यामुळे कायराचंही बिनसलं  होतं.. तिने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांना मोठ्या किमतीची पण   फाईनप्रिंट लेबल  असतात हे तिला आता लक्षात यायला लागलं.. बिझिनेसमध्ये उतरायचं म्हणजे सतत पार्ट्या करणं आलंच असं कायराच्या आईने तिला सांगितलं होतं.. आणि आता फेलिक्सही तेच म्हणाला.. "पार्टी".. साधीसुधी पार्टी नाही.. क्रकोझीयन पार्टी.. घरातली माणसं जीव ओततात ह्या पार्टीत.. अपेटायझर ते डेसर्ट .. सगळं परफेक्ट पाहिजे.. पडदे- टेबल क्लॉथ सगळं सारख्या रंगसंगतीत हवं.. आणि घरात पार्टी म्हणजे कायराने सुंदर दिसायला हवं.. तिचा ठेवणीतला ड्रेस खास धुवून घ्यायला हवा.. परफ्युम, रूज, लिपस्टिक... सकाळी किचनच्या जबाबदाऱ्या आटोपल्या की दुपारीच जाऊन सलोनमधून हेअरस्टाईल करायला हवी..  मग घरी आल्यावर सलाडची तयारी.. ड्रिंक्स.. फायनल बेकिंग.. सजावट आणि सर्विंग.. हे सगळं नुसतं अचूक नाही तर उत्तम असायला हवं.. का? पार्टी संपल्यावर "ओपा!" म्हणून ओरडायला हवेत ना सगळे? तिचा काचेचा डायनर सेट फुटायला नको?

फेलिक्स तिच्याजवळ गेला.. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला..  "ओह थेयोश मो.. त्या काचेच्या सेट्पायी तुला ही पार्टी नकोय? अगं पार्टी चांगली झाली.. अजून बोलणी झाली.. तर बिझिनेस चांगला सुरु होईल.. मग असे हजार सेट विकत घेऊन देईन तुला.."
"फिल.. तुला आठवत नसेल तर हा सेट तुझ्याच आईने दिलाय मला लग्नाची भेट म्हणून.. ५६ पिसचा सेट आहे.. अजून एकदाही वापरला नाहीये आपण"
"आईने काय सांगितलं होतं? आठवतं आहे का तुला कायरा? हे सौंदर्य घरा-दारांत पसरू दे.. ओपा होईल तेव्हा घरा-दारांत.."
"बास.. विचारही नाही करू शकत मी फिल.. पण तू म्हणतोयस की बिझिनेससाठी करावंच लागेल तर.. पार्टीआधीच नवीन क्रोकरी घेतली तर?
"कायरा.. कायरा.. खरंच नाही का गं समजते तुला?  तू किती आवडतेस मला.. तुलाच खुश ठेवायचं आहे मला आणि म्हणूनच बिझिनेस करतोय ना मी.. मी पहिल्या बिझिनेस डीलमधून तुला ह्याहून सुंदर सेट घेऊन देईन.."

कायरा कशीबशी तयार झाली.. मेजवानीची तारीख ठरली.. गावातल्या ठराविक मोठ्या घरात बोलावणी गेली.. आईने कायराला समजावून ठेवलं होतं.. पार्टी चांगली झाली तर चांगली कामं मिळतील.. ओपा झालं की चांगलं भाग्य  उजळेल..तरीही कायरा अजून विचारातच होती.. काचेच्या प्लेट्सकडे बघत बसली होती..

पार्टीचा दिवस उजाडला.. सकाळपासून कायरा मरमरून काम करत होती.. फेलिक्सने सजावटीची जबाबदारी उचलली होती.. तोही सगळं परफेक्ट करण्यात गुंतला होता.. कायरा सलोनमधून आली तेव्हाचं थोडावेळ फेलिक्स थांबला.. हिमगौरीसारखी सुंदर दिसत होती कायरा.. नवर्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तीही सुखावली.. "फिल.. तुझ्या ह्या एका स्माईल साठी माझ्या काचेचा संपूर्ण सेट कुर्बान आहे".. असं म्हणत कायरा पुढच्या तयारीला लागली.. हिच्या डोक्यात अजूनही तो काचेचा सेट आहे? ह्या विचारात फेलिक्स तिच्याकडे पाहात राहिला...

.."जेवण रुचकर असायला हवं.. पण त्याहून महत्वाचं आहे लोकांशी बोलणं.. जेवणावर खुश होऊन काम मिळणार नाहीये तर त्यांना बिझिनेससाठी पटवून काम येणारे.. पार्टी चांगली होत्ये ना, तेवढं बास आहे.. एखादा पदार्थ जरा वर-खाली झाला तर काय हरकत आहे? ओपा तर टाळता येईल..."असा विचार करत  ग्राटीनमध्ये मीठ पडत होतं..
..
फेलिक्स आलेल्या पाहुण्यांशी बोलत होता.. कायरा सर्व्ह  करण्यात गुंग होती.. पण तिच्या गालावरची लाली आज खुलत नव्हती.. "ओपा झाल्यावर बिझिनेस डील मिळेलही.. पण त्यानंतर किती दिवस जातील नवीन डायनर सेट येण्यात?"

डेसर्ट सर्व्ह झाल्यावर  कायरा बावरलेली दिसायला लागली..तिची नजर सतत फेलिक्सकडे जायला लागली.. फेलीक्सने तिच्याकडे बघितल्यावर मात्र ती नजर चुकवत होती.. ती अचानक कोपर्यात येऊन उभी राहिली.. आता जे होईल त्याला तोंड कसं द्यायचं ह्याचा विचार करताना  तिच्या डोळ्यांत पाणी आलं.. तेवढ्यात तिच्याजवळ फेलिक्स येऊन उभा राहिला.. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याने हलकेच पुसलं आणि थोडंस हसला.. तिने त्याचा हात धरला. आणि दोघं एकत्रच म्हणाली... "ओपा नाही होणार.."
" सॉरी.. प्लेट्सच्या मोहापायी मी  असं केलं.. पण मला विश्वास आहे तुला बिझिनेस डील मिळेलच.. ग्राटीनमध्ये मी मीठ घातलंचं नाही.. "
फेलिक्स तिचा हात सोडवत तिच्याकडे बघायला लागला.. आणि तितक्यात मागून आवाज आला...
खळ..खळाळ..

"ओपा!"... "ओपा!"

Monday, December 12, 2011

कारण...

"तेजू .. लिही की गं काहीतरी आता" हे वाक्य हजारदा ऐकून झालं आता तुझ्याकडून.. आणि तरीही ह्या तेजुत काही फरक पडेना..

"अरे.. झोपच लागून गेली.."

"हो ना.. लिहिणारे.. लिहायचं आहे काहीतरी"

"मला आज ट्रेनमध्ये भन्नाट सुचलं होतं.. तेव्हा गर्दी होती जाम, नोट नाही करता आलं.. म्हणजे मी नेहमी करते असं नाही .. पण नाही जमलं.. आणि आता नेमकं आठवत नाहीये"

"च्यायला.. आज नक्कीचं.. लिहिणारच.. होतेच.. पण शनिवार  ना.. लाईट गेले..आणि laptopचं charging संपलं होतं"

" वेळ? तो काय असतो विचारू नको.. शिल्लकच नाहीये माझ्याकडे आता अजिबात.."

" हां.. लिहायचं म्हणत होते मी गेल्या आठवड्यात पण ना मला सगळं असं जरा लहानपणातलं आणि काही कॉलेजमध्ये घडलेलं आठवत होतं.. पण आधीचं लोकांना वाटतं मी काही जमत नाही की  rectrospective and nostalgic  काहीतरी लिहिते.. म्हणजे ते खपतंच..  सो नाही लिहिलं"

" मी लिहिलं आहे की.. नाही दाखवणारे पण आत्ताच.."

"प्रायव्हेट ब्लॉगवर टाकलं आहे की.. ओह.. तू आहेस का तो वाचायला?.. तिथे टाकलं आहे म्हणजे ड्राफ्टमध्ये ठेवून दिलं आहे"

"अरे यु वोन्ट बिलिव्ह.. ६ पोस्ट अर्ध्या लिहून राहिल्यात माझ्याकडे.. हल्ली ना... काय सांगू आता तुला.."

"दिवाळी होती ना.."

"अरे परीक्षा आल्या.. जाम काम होतं"

"dilly-dallier?? मी? आईला विचार माझ्या.. किती काम करते ते.. काल लसूनपण सोलून दिली तिला.."

"हल्ली कोण लिहितं तसंही ब्लॉग? कमीच झालंय एकुणात"

"अंगठा दुखत होता.."

"इतकी दमले ना दिवसभर... "

"प्रवासात खूप वेळ जातो.. नाही होत मग काही दुसरं करून"

" आता आम्ही नोकरदार माणसं.. दिवसभर, चाकोरीचे खरडून कागद.. सहीस पाठवतो.. पाहिलसं? हल्ली स्वतः बोलायची वाक्यंही सुचेना झालीत.."

"आज ना मी मेथी- कोर्नची भाजी केली.."

"नेट डाऊन होतं"

"LAN card गेलं आहे"

" I am only human.. sometimes I procrastinate.."

"हल्ली ब्लॉगवर टाकण्यासारखं नाही सुचतं मला काही.."

"मला विचार.. तुझं काय? तू कधी लिहीणारेस? आं?"

"ऑनलाईन आले की मेल्सं आणि एफबीवर इतका वेळ जातो ना.."

"मुडच नव्हता.."

" हरिनाम सप्ताह चालू होता मागे देवळात.. म्हणजे मी नव्हते जात.. पण  आवाजामुळे नाही लिहिलं"

"करते मी काम अधेमध्ये.. मग लिहिणं नाही होतं"

" वातावरण निर्मिती नाही होत लिहायची माझ्याकडे"

"घड्याळात वाजला एक .. मी ट्राय केला नवा  केक... त्याची विल्हेवाट लावण्यात एक तास गेला .. मी नाही ब्लॉग  लिहिला .."
"घड्याळ्यात वाजले दोन.. होणाऱ्या नवर्याचा आला फोन.. फोनवर बोलण्यात एक तास गेला.. मी नाही ब्लॉग  लिहिला"
"घड्याळात वाजले तीन... कॉलेजमध्ये घडला सीन.. गॉसिप करण्यात एक तास गेला..मी नाही  ब्लॉग  लिहिला"
"घड्याळात वाजले चार.. नं कर्त्याचा वार शनिवार .. पुढची ओळ सुचण्यात एक तास गेला .. मी नाही  ब्लॉग  लिहिला"
"घड्याळात वाजले पाच.. दीपिका करते माझा जाच.. तिलाच बदडण्यात एक तास गेला.. मी नाही  ब्लॉग  लिहिला"
"घड्याळात वाजले सहा.. वाट पाहिली वाजायची दहा.. दहा वाजण्यात बराच वेळ गेला... मी नाही ब्लॉग लिहिला.."
"घड्याळात वाजले मग दहा.. मला हवा होता चहा.. उतू गेलेलं दुध पुसण्यात एक तास गेला... मी नाही ब्लॉग लिहिला"
"घड्याळात वाजले अकरा.. हल्ली लागत नाही MTV बकरा... फालतू यमकं जुळवण्यात एक तास गेला.. मी नाही ब्लॉग लिहिला"
"घड्याळात वाजले बारा..ब्लॉग लिहून झाला सारा... अपलोड करण्यात वेळ नाही गेला.. मी हा ब्लॉग लिहिला"

श्या.. आता ही पोस्ट ब्लॉगवर खाली जाईपर्यंत लवकर काहीतरी लिहीत राहायला हवं..

Tuesday, July 12, 2011

किडे-magnet

टीप: खूप दिवसांनी ह्या ब्लॉगवर काहीतरी लिहिलं आहे कोणीतरी ..म्हणून आशेने, उत्साहाने किंवा उत्सुकतेने वाचायला जाणार असाल.. तर माफ करा.. इथे तुमचा फार कायच्या काय मोठा भ्रमनिरास होईल!


आयुष्यात काही काही गोष्टी फार उशिरा जाणवतात, लक्षात येतात.." श्या, आपण हे करायला हवं होतं" असं वाटतं ..पण तोवर फार उशीर झालेला असतो.. तर मला अचानक जाणवलेली गोष्ट म्हणजे मी जीवशास्त्रज्ञ बनायला हवे होते.. त्यातही entomologist व्हायला हवे होते.. परवा मलेरिया झाल्यावर काही करण्यासारखं नव्हतं म्हणून नुसती पंख्याकडे बघत पडून होते.. तेव्हा जाणवलं .. आपण चुकीच्या क्षेत्रात आलो राव.. किडूक-मिडूक काहीतरी करत बसण्यापेक्षा किड्यांचा अभ्यास करायला हवा होता.. ह्याला आता खूप कारणं आहेत..

१. मला किडे-माश्या-झुरळं-पाली कशाचीच भीती वाटत नाही.. आणि कधी तसं pretendही केलं नाही.. नाही म्हणायला एक-दोनदा झुरळ पाहून किंचाळून चांगल्या दिसणाऱ्या मुलाजवळ सरकायचा चान्स होता.. पण ते ध्यान झुरळ-पालीला घाबरतं बघून मग विचार बदलला...
आपण  जोवर काही करत नाही तोवर आपल्या वाटेलाही न जाणाऱ्या बिचाऱ्या त्या मुक्या प्राण्यांना घाबरण्यासारखं काय आहे? काहींना  किळस येते  ते ठीक आहे .. पण मला तर अनेक माणसांचीही किळस येते मग बिचाऱ्या किड्यांच ते काय नवीन?

२. आणि दुसरं कारण म्हणजे मी रोज स्वच्छ अंघोळ करत असले .. व्यवस्थित कपडे घालत असले तरी का कोण जाणे कुठलेही किडे माझ्याकडे येतात.. कदाचित त्यांना सुरक्षित वगैरे वाटत असेल कारण मी डास सोडून कोणत्याही किड्याला कधी मारलं नाहीये.. लहान असताना मी कधी चतुराच्या शेपटीला दोरा बांधून हेलीकॉप्टर-हेलिकॉप्टर खेळले नाहीये.. कधीच काजव्यांना काडेपेटीत बंद करून ठेवलं नाही.. माझा भाऊ करायचा.. त्याला काजव्यांचा torch बनवायचा होता..
मी कधी सुया पकडल्या नाहीत.. म्हणजे पकडल्या.. पण सुयांचं कलेक्शन नाही केलं.. मी कधी फुलपाखरं नाही पकडली.. त्याना observe नक्की केलं.. त्याच्याचवरून तिसरं कारण..

३. पाचवीत असताना शाळेतल्या विज्ञान प्रदर्शनात मी रेशमाच्या किड्यांची lifecycle दाखवली होती.. अगदी अळ्या-कोश- पाखरं सगळ्या stages.. मी तुतीच्या पानांचा भडीमार केला होता त्यांवर.. तेव्हा मी ठरवलं होतं की फुलपाखरं बनवायची अशी खूप.. आणि मग ती पाळायची.. ती मेली की एका काचेच्या पेटीत बंद करायची.. म्हणजे खोट्या फुलावर बसलेली वगैरे.. आणि मग ती विकायची.. पण तेव्हा आई म्हणाली की रेशीम खूप महाग असतं so माझा plan बदलला आणि मी ठरवलं की रेशीम-उद्योग करायचा..पण तो plan ही काही अपरिहार्य कारणाने बदलला.. (कारण अपरिहार्य असलं की भारी वाटतं ना..) तर लहानपणापासून ते गुण होते माझ्यात कीटक-शास्त्रात नाव कमवायचे.. पण झेप घेण्याआधीच तो दिवा कोणीतरी बंद केला..

आता पुढचा एक paragraph  नका वाचू.. म्हणजे वाचाल.. पण मग नका म्हणू की आधीच नव्हतं सांगितलं.. तसं तर ते ब्लॉगपोस्टच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे..

४. अर्चना नावाची एक मुलगी माझ्या बाजूच्या रांगेत बसायची शाळेत आठवीत .. तिचं नाव सांगायची खरं गरज नाहीये.. पण आता ह्या संदर्भात आहे म्हणून सांगायलाच हवं..मला मुळी म्हणजे मुळ्ळीच नाही आवडायची ती.. तिच्या केसात एक लाख प्राणी होते.. "उ" हे  नाव नाही आवडत मला.. तर तिच्यामुळे आणि तिच्याबद्द्द्लच्या gossip मुळे मला ह्या प्राण्याबद्दल इतकी माहिती झाली होती.. म्हणजे तो प्राणी ७ अंडी घालतो ह्यावर तसा विश्वास नसता बसला.. पण तिला बघून बसायचा.. ७-४९- पुढे असं progression  जाणवायचं तिच्याकडे बघितल्यावर.. आमच्या आयांनी सांगितलं होतं तिच्याजवळ बसू नका जास्त म्हणून.. तेव्हा एखाद-दोन आठवडे तिच्याबद्दल सहानभूती निर्माण झाली होती मला.. तेव्हा वाटायचं, काहीतरी औषध शोधायला हव.. किती मुलींची लहानपण एकटी पडत असतील.. पण मग लगेच विचार आला की मी होईन ही काहीतरी अशी.. मग मला पुढे कोणीतरी विचारेल "हाय.. काय करतेस तू हल्ली?.. "मी लायसील मध्ये काम करते" म्हणायला नाही चांगलं वाटणार ना.. म्हणजे अश्या सांगायला awkward ठिकाणी काम करणाऱ्या लोकांबद्दल मला आदर आहे.. पण कायम गम्मत वाटते.. उदाहरणार्थ.. २ मित्र खूप दिवसांनी भेटतात..
dude1: hey..
dude2: hi..
dude1: so wassap?
dude2: nothing much.. tell me about u man..
dude1: life rocks at Dell..
dude2: dell.. oh thats gr8!
dude1: hey whr r u working?
dude2: uhh.. stayfree..
dude1: oh.. thats..
dude2: i know!

5. मला किड्यांबद्दल बरेच जोक वगैरे पण माहित्येत.. आणि म्हणतातच ना "जेव्हा तुम्ही तुमच्या profession बद्दल जोक करू शकता तेव्हा तुम्ही खरे रुळलेले असता"
उदाहरणार्थ:  एक मुलगा: सफरचंद खातानाची सर्वात घाण मोमेंट कोणती असते?
दुसरा मुलगा: कोणती?
पहिला मुलगा: जेव्हा तू सफरचंदाचा चावा घेतोस आणि हातातल्या सफरचंदात अर्धी अळी तडफडताना दिसते..

(पाचव्या कारणाला काही अर्थ नव्हता.. तिसऱ्या कारणात अळ्या लिहिल्यावरचं मला हा जोक आठवला होता आणि सांगायचा होता.. पण असा मधेच कसा घालणार म्हणून पाचवं कारण)

तर डास सोडून कोणत्याही किड्याचा मी द्वेष करत नाही.. डास मात्र डोक्यात जातो.. आणि तो पृथ्वीवरून नामशेष झाल्यास जीवनचक्र थांबून प्रलय येतील अश्यातलाही भाग नाहीये.. त्यामुळे तो पृथ्वीवरून नामशेष व्हावा असं मला मनापासून वाटतं.. मी करोडपती असते तर मी कासव-छाप आणि good knight ला वगैरे फंड पुरवले असते.. अरे चावतो काय. वरून गुणगुणतो काय ..निर्लज्ज प्राणी.. किड्यांच्या नावावर कलंक आहे.. त्या चट्टेरीपट्टेरी डाशीणीने मला मलेरीया द्यावा.. blood sucking b!
डासांनी मला त्रास दिला म्हणून मला राग आहे असं काही नाही पण.. मला बाकीही किड्यांनी दिलाय त्रास.. म्हणजे मला दोनदा मधमाशी चावल्ये.. एकदा एक unidentified हिरवी अळी मानेला फक्त लागली होती आणि माझा double हनुमान झाला होता.. एकदा मला काजवा चावला होता.. मुंग्या तर असंख्य वेळेला चावल्यात.. पण म्हणून मला त्यांच्याबद्द्ल राग नाहीये.. मीच दिला असेल त्रास बिचाऱ्यांना..  गावाला गेल्यावरही काहीतरी वेगळेच किडे माझ्या आजूबाजूला असतात म्हणून मला किडा-magnet  म्हणते माझी बहिण..

मध्ये एकदा ह्याच अश्या काहीतरी विषयावर बोलताना मी अमोलला  अर्धा तास गोष्ट बनवून सांगितली होती.. "तुलाच का इतके डास चावतात?" ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून!.. त्याचा काही भाग इथे देत आहे..
"अरे मी गेल्या जन्मात entomologist होते.. (entomologist हा शब्द मला GRE चा अभ्यास करताना कळला होता.. abase,abash,abate इतकाच तो लक्षात राहिला ..असतं एकेका शब्दाचं भाग्य) माझी फार मोठी प्रयोगशाळा होती.. आणि महत्वाचं म्हणजे मी मुलगी नव्हते.. मुलगा होते..( हे  एक निश्चित आहे.. गोष्ट खोटी असली तरी मी मुलगाच होते.. दर जन्मात मुलीने मुलगीच असावं असं कुठे लिहिलं आहे?) तर मी अनेक निरनिराळे प्रयोग करत असे.. डासांचा वैद्यकशास्त्रात उपयोग करून घेण्याचा माझा फार मोठा शोध चालू होता.. I was Mr. Know-it-all-about-डास... एक दिवस एक big shot  माझ्याकडे आला आणि म्हणाला मला तुझा formula हवाय.. मी तुला २५ कोटी देईन.. त्या काळात २५ कोटी म्हणजे लै होते.. पण मी माझ्या डासांच्या प्रेमापोटी स्पष्ट नकार दिला.. पण तो शेवटी व्हिलन .. तो कसला ऐकतोय.. त्याने डांबरटाने माझ्या नकळत एक सुंदर सेक्रेटरी पाठवली .. मी शेवटी पुरुषच! भाळलो तिच्यावर.. आणि ती सुंदर बाईच.. काढला माझ्याकडून फॉर्म्युला.. पण हाय रे दैवा.. बावळट ती.. चौथं आणि आठवं पान तिने नेलंच नाही.. आणि उरलेल्या मिश्रणातून डास मारायचं रसायन तयार झालं..मी खूप प्रयत्न केला डासांना वाचवायचा.. पण त्या big shot ने माझ्याविरुद्ध कट रचला.. दुनिया मेरी आवाज सुनती उसके पहले ही उसने मेरी आवाज हमेशा हमेशा के लिये बंद कर दी.. डासांना वाटलं मी त्यांना दगा दिला आणि आजतागायत ते माझ्यावर सूड घेतायत.. the end"

लिहिण्यासारखं अजून खूप आहे.. आणि आपण लिहूया एकदा.. तशी अजून वेळ गेली नाहीये.. काहीतरी करता येईल कीटकशास्त्रात.. (कीचकवध कोणी पाहिलं आहे कां? मला अचानक आठवलं कीटक म्हंटल्यावर) तर.. तशी अजून वेळ गेली नाहीये.. काहीतरी करता येईल कीटकशास्त्रात.. कारण तसे अंगात किडे पहिल्यापासूनच आहेत.. किडे करायची हौस ही आहेच!