Monday, July 5, 2010

Just a Day before...

तू काय विचार करतो आहेस, तुझा निर्णय काय असणारे, काहीच माहित नव्हतं त्यादिवशी. सकाळी उठलेच नाही मी लवकर... पडुन राहिले होते बेडवरच.. मी उठले नाही तर दिवस जसं काही थांबणारच होता माझ्यासाठी... उठुन बसले, समोर मॉनिटरवर आपल्या दोघांचा वॉलपेपर! ’लॉट लाईक लव’ बघुन तसा फोटो काढायचा होता मला.. त्याचा आपण केलेला खरोखर बालिष प्रयत्न.. जेव्हा जेव्हा हा फोटो बघायचो तेव्हा ते फोटो काढतानाचं सगळं आठवुन कमीत कमी ५ मिनीटं तर हसायचोच आपण. आत्ता ही हसले मी हलकंच, कारण नसताना दाढी वाढवत होतास तेव्हा.. एकदा वाटलं मेल करावा हा फोटो तुला.. कदाचित निर्णय बदलेल तुझा.. तु निगेटीव्हच निर्णय घेणार हे माहितच होतं जवळजवळ मला!

दात घासत असताना आरश्यात मागच्या खिडकीत तू दिलेला टॅट्टी टेडी बसलेला दिसला. तो प्रकार मला कायमच द्यनीय वाटत आलेला होता.. जखमी टेडी बिअर कसा क्युट असु शकतो? पण तू दिला होतास म्हणुन त्याला समोरच ठेवलं होतं. रोज रोज बघुन त्याच्यातलं क्युटत्व जाणवायला लागलं होतं मलाही.. मग तशीच जाऊन बसले त्या टेडीसमोर.. त्याला विचारलं, "काय म्हणेल तो? त्याचं काय असेल उत्तर?" त्याला नाही कळलं काही, ढिम्मच राहिला.. तोंडात ब्रश असताना बोललेलं कोणाला कळतंय? भरपुर वेळ बसले मग तिथेच.. तोंड झोंबायला लागलं त्या पेस्टने इतका वेळ होते तिथेच...

सुजलेले लाल डोळे, त्यांवर पाणी मारुन मारुन ते नॉर्मल होतायत का पाहिलं पण नाही झालं काहीच.. दार उघडलं दुधाची पिशवी आत घेण्यासाठी. त्या दुधवाल्याला सातशेवेळा सांगितलं असेल की बाबा दुधाची पिशवी नीट ठेव कठड्यावर.. पडली आजपण खाली.. दारात दुध सगळीकडे. समोर देशपांड्यांकडे पोपट आहेत पाळलेले म्हणुन मांजर पाळायला बंदी इथे.. मांजरं असती तर लादी पुसा-धुवाचे कष्ट नसते पडले.. लोळल्याच असत्या त्या दुधात. आपले किती वाद झालेत ना मांजर पाळायची की नाही.. कुत्रा पाळायचा की नाही त्यावरुन.. माणसांसाठी बांधलेल्या घरात प्राणी का बंद करायचे हे तुझं नेहेमीचं बिनबुडाचं अर्ग्युमेंट... वाद घालण्यात तू एक्सपर्टच आहेस!

समोरच्याला त्याचाच केराचा डबा विकु शकशील तू इतका स्मार्ट वगैरे... कोणीतरी म्हणालं तू एमबीए करणं गरजेचं आहे. इंजिनीअरींगचे ४ वर्ष, २ वर्षाचा टेक्निकल अनुभव इतका पाण्यात ओतुन... एमबीए करुन फायनान्स किंवा मार्केटींगला जाणार.. किती वेडेपणा असतो हा.. मला नाही पटलं कधीच ते... पैसे मिळतील वगैरे ठीकच होतं...पेपर मधल्या जॉबच्या जाहिराती वाचत मी जमिनीवर बसुन होते. पुण्यात १४ सिव्हील ईजिनीअर, १८ डीटीपी ऑपरेटर ह्व्येत आज... माझी आजपण कोणाला गरज नव्हती.. पेपर उडु नये म्हणुन त्यावर मोबाईल ठेवलेला, सारखं त्याकडे लक्ष जात होतं, वाटत होतं आजच सांगशील काय ठरवलं आहेस ते...मधेच वायब्रेट झाला मोबाईल, एअरटेलच्या दिवसाची सुरुवात झाली होती. भजन्स डाऊनलोड करण्यासाठी डायल करा...

टीव्ही लावला मग थोडावेळ..डान्स इंडिया डान्स लागलं होतं.. काय नाचतात ती माणसं.. एकदम भारी! कॉलेजच्या एका फेस्टमधे मी आणि पृथा नाचलो होतो कथक-हिप हॉप फ्युजन वगैरे. तूला आत सोडलं नव्हतं तू दुस-या कॉलेजचा म्हणुन.. मग रात्री ११ वाजता आम्ही दोघी पुन्हा एकदा आपल्या ग्रु्पसाठी नाचलो कॉलेजच्या मागच्या रस्त्यावर... मज्जा आलेली.. आज कोणी फोन करणार नाही त्यातलं मला.. सगळ्यांना माहित्ये मी डोकं खाणार.. तुम्हाला सगळ्यांना मीच चुक दिसते ना कायम... देशपांडे काकुंनी दार वाजवलं.. त्यांच्या कामवाल्या बाईला दारासमोरची लादी धुवायला सांगितली त्यांनी.. चिकट होईल नाहीतर म्हणे.. तेव्हा जाणवलं नाही प्यायलाय चहा-कॉफी काही अजुन.. काय करावं आधी बाहेर जाऊन दुध आणावं? की अंघोळ करावी?

बाल्कनीत येउन उभी राहिलेले, कालचे वाळत घातलेले कपडे पहाटेच्या दवात परत भिजलेले होते. अगदी ओले नाही पण मधलंच काहीतरी. कपडे बदलल्यावर लक्षात आलं इस्त्री करायची गरज आहे. माणसाने घातलेले कपडे का नाही इस्त्री करता येत तसेच्या तसे? आरश्यात पाहिलं.. डोळे नॉर्मल दिसत होते. ओशोच्या चपला घातल्या.. तुला त्या चपला घराबाहेर घातलेल्या आवडत नाहीत.. घरातल्या चपला वाटतात ना..बिल्डींगमधुन उतरताना रवी दादा भेटला, म्हणाला मी दिसत नाही हल्ली जास्त बाहेर.. खरंच रे, जातच नव्हते मी बाहेर कुठे.. उद्या तू सांगशील तुझं काय म्हणणं आहे ते.. मग पडेन बाहेर.. काय ठरवलं असणारेस तू, त्याचा विचारच डोक्यात होता. मधे घारपुरे काका बघुन हसले माझ्याकडे , मी हसले की नाही आठवत नाहीये आता.. दुकानात गेल्यावरही आठवलं नाही काय घ्यायला आले आहे ते.. जरा काही सेकंदांनी आठवलं. पाव लिटर दुध म्हण्टल्यावर तो कुच्कट माणुस विचारतो, "बास? इतकंच पुरतं?" आमच्यात हा डायलॉग इतक्यांदा झालाय. घरी परत येताना आभा होती लिफ्टमधे. तिला आता मेडिकलला जायचं आहे म्हणुन तिने कुठले कुठले क्लास लावल्येत, किती वेळ असतात ते सांगत होती. ग्राऊंडला जात नाही हल्ली!

आपण टीटीला जायचो ते आठवतय का तूला? मी घरी आल्यावर दुध तापत ठेवलं आणि शोधत बसले टेनिसचा बॉल... मिळाला लगेच, आश्चर्यच वाटलं मला जरा... मग दुध वर आलं, गॅसला मिळालं.. पातेल्याची कडा काळी झाली.. कोणाकडे तरी दुध उतू गेलं आहे असं म्हणाले मी.. अन भिंतीवर टॉक-टॉक खेळत राहिले.. वास आपल्या स्वयपाकघरातुनच येतोय हे जाणवलं.. मग पळत जाऊन गॅस बंद केला आ्णि परत सुरु केलं खेळणं.. हल्ली आपलं हे टॉक-टॉक फेसबुक, जीमेलवरच चालतं ना, पिंगचा आवाज एकदम तसाच येतो ना रे... बघु तू उद्या काय ठरवतोय्स.. जायला हवं परत टीटी खेळायला..

दुपारी २ वाजता मी दिवसातला पहिला चहा पित होते. तसंही भुक नव्हतीच.. काय करावं? ऑनलाईन जावं की झोपावं परत? तू असलास ऑनलाईन तर गोंधळायला होईल पण.. काय करावं कळणार नाही...झोपुयाच.. पण झोप कुठे लागणारे? तुच आठवणार.. बेडवर पडले ना की वरती पंख्याला एक लाल कागदाचा तुकडा चिकटलेला दिसतो. माझ्या वाढदिवसाला तुम्ही सरप्राईज दिलं होतं, सगळी रुम डेकोरेट केली होतीत.. त्याची आठवण म्हणुन उरलेला तो कागदाचा तुकडा.. समोर बाथरुमचं दार दिसल्यावर आठवलं अंघोळ नाही केलीये अजुन.. कंटाळा आला होता अंघोळीचा! पण जर तुला एक दिवस आधीच येउन मला काय ठरवलं आहेस ते सांगायचं असेल तर? अश्या अवतारात कुठे येणार तुझ्यासमोर? म्हणुन अंघोळीला गेले. आमचा गिझर गंडला आहे.. जरा जास्तच गरम पाणी होतं, मग ते नॉर्मल करायला गार.. मग जास्त गार झाल्यावर थोडं गरम.. मग परत थोडं गार.. बाहेर आले बाथरुममधुन तेव्हा ४ वाजले होते. अंघोळ केल्यावर जगातली बेस्ट झोप लागते. मग झोपले. ७:३० ला मानसी आली तिने उठवलं.. "तू किती निष्काळजी आहेस, जॉब शोध, ओटा पुस, डब्बा आण, बहिरी आहेस" वगैरे वगैरे मारा सुरु केला.. ते ८:३० ला तिने स्वतः जाऊन डबा आणला आणि मला वाढुन दिलं तेव्हा शांत झाली.

दोडक्याची भाजी आपण करावी असं बायकांना का वाटतं? पण सकाळपासुन काही खाल्लं नव्हतं सो चालली मला ती भाजी आज... प्रेमात किंवा जुदाईमधे वगैरे लोकं भुक-प्यास विसरतात असं म्हणतात.. मला नाही झालं तसं काही रे.. मी दोडक्याची भाजी पण खाल्ली, म्हणजे बघ! मानसी चिडली होती अजुनही.. ती चिडली असेल कोणावर की फ्रेण्ड्स लावते लॅपटॉपवर.. मग मी जाउन बसले तिच्या बाजुला "द वन विथ द लिस्ट".. जमत आलेलं त्यांचं परत तुटतं.. चॅण्डलरच्या लिस्टच्या आयडिआमुळे. आपलं काय होणार? मानसी बघता बघता माझ्या खांद्यावर डोकं ठेवुन झोपली.. दमुन जाते दिवसभर ती.. मग लॅपटॉप बंद केला आणि येउन बसले परत माझ्या बेडवर...

कपडे धुतले.. हल्ली कपडे धुताना रेडिओ लावुन ठेवते मी! रात्री तिथे ते छपरी लव-गुरु असतात.. ते ऐकत होते.. काहीही असतात ब्वा .. असे कसे प्रॉब्लेम असू शकतात? आपल्यातही प्रॉब्लेम अ‍ॅज सच नव्हता ना रे.. ते फक्त तुझं टु बी ऑर नॉट टु बी चा घोळ... कपडे वाळत घालताना नाकावर दोनदा.. खांद्यावर अगणित वेळा पाण्याचे थेंब पडले.. मानसी झोपली होती म्हणुन बरं नाहीतर परत पिळावे लगले असते कपडे.. कपडे धुतल्यावर हात मस्त होतात... मऊ, गुलाबी वगैरे..

येउन झोपले मग बेडवर..झोप नाही आली.. कानात आयपॉडवर कोणीतरी गात होतं.. मी ह्या कुशीवरुन त्या कुशीवर वळत तुझा उद्याचा डिसीजन काय असेल त्याचा विचार करत राहिले.. हे सगळं काय होतं, मी सांगितलं ते? काही नाही... असंच something about " a day before THAT day!!"

Tuesday, June 8, 2010

पहिल्या पावसात अजुन काय लिहीणार?

तू लांब गेल्यानंतरचा पहिलाच पाऊस हा! नाही.. नाही म्हणजे आभाळ भरुन आल्यावर माझं मन दाटुन वगैरे आलं नाही. किंवा पावसाचे थेंब आणि माझे अश्रु वगैरे असंही काही झालं नाही. अगदी खरं सांगु तर तुझी आठवणही आपणहुन आली नाही... आत्ता तासभर पागोळ्यांशी खेळत पडवीत बसले होते, पावलांवर पावसाचं पाणी झेलत..

माहित्ये? पहिला पाऊस.. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला पाऊस ह्याच पडवीतुन पाहिला होता. मला काय आठवणारे का? पण आई खूप कौतुकाने सांगते.. "८ महिन्यांची होतीस तू तेव्हा तेजू, धो धो पाऊस पडायला लागला.. आम्ही आपलं तुला थंडी वाजेल म्हणुन कपड्यांवर कपडे चढवत होतो. पण मग आप्पा आले आणि आज्जीला ओरडले. पाऊस पडतोय बाहेर आणि आत काय बांधुन ठेवताय तिला?... आप्पा मग तुला घेउन पडवीत येउन उभे राहिले.. तुला पाऊस दाखवत.. किती वेळ ते तसेच तुला कडेवर घेउन उभे होते. तुझ्या इवल्याश्या हातावर मग त्यांनी पावसाचा एक थेंब दिला आणि तुझ्या चेह-यावरचे गोंधळलेले भाव बघुन कितीतरी वेळ हसत बसले... "एका मुलीनी पाऊस काय असतो ते अजुन पाहिलंच नाहीये मुळी".."पाऊस आम्हाला माहितच नाही" असं कितीवेळ तुला सांगत बसले होते " .. पहिला पाऊस म्हंटलं ना की अजुनही मला माझे आजोबा छोट्या बाळाला कडेवर घेउन पडवीत उभे आहेत असं दिसतं..

आप्पाची मोठी काळी छत्री असायची आणि आज्जीची एक लाल-गुलाबी डिझाईनची छत्री.. अजुनही आहे ती कुठेतरी कपाटावर ठेवलेली. मला कायम छत्री हवी असायची पावसात, रेनकोट नाही आवडायचा मला.. बाबा आणि मी जायचो पावसाळा शॉपिंगसाठी! बालवर्गात असताना शाळेसाठी म्हणुन बाटाचे काळे पावसाळी बुट, चंदेरी रेनकोटवर हिरवे बेडुक वगैरे असं काहीसा रेनकोट आणि मग फक्त माझा हट्ट म्हणुन ती रेनबोची छत्री बाबांनी घेतली होती. बाबा तेव्हाच म्हणाले होते मला "छत्री हरवशील तेजू तू" .. बाबांना कसं खोटं पाडणार? तरी ४-५ दिवस टिकवली होती हां मी ती छत्री. अजुनही बाबांना खोटं पाड्त नाही मी कधी.. कायम बाबांबरोबर आमच्या येझदीवरुन जाताना जोरदार पाऊस यायचा. मग तोंडावर, हातांवर सणसणीत मारा होयचा थेंबांचा.. आम्ही थांबायचे मग आडोशाला कुठेतरी, बाबा मला रेनकोट घालायचे, स्वतःला रेनकोट चढवायचे आणि आम्ही परत निघालो की पाऊस थांबायचा. मग कोरड्या रेनकोटच्या आत भिजलेले आम्ही घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायचो...आई खसाखसा डोकं पुसुन द्यायची.. आल्याचा गरमागरम चहा किंवा मग वाफाळलेलं हळद दुध... bliss!

पाऊस आणि गरम चहा, कांदा भजी cliche झालं का रे आता? एका पावसाळ्यात आई आजारी असताना मी आणि बाबांनी केली होती भजी... हल्ली मी आणि दिपीका करतो! बाकी मी दिपुकडे जास्त लक्ष नाही द्यायचे कधी पण मला ती पावसात भिजलेलं मुळीच आवडायचं नाही. मीही कधी भिजायचे नाही आणि तिला भिजु द्यायचे नाही! तिच्याकडे कायम छत्री आहे ना, ती रेनकोट घालते ना हे सगळं मी सतत बघत असायचे. शाळेतुन घरी येताना ते पिल्लु नेम धरुन रस्त्यावरच्या सगळ्या खड्ड्यांतुन छपाक्क छप्पाक चालत यायचं.. डोक्यावरच्या छत्रीच्या काहीच उपयोग नसायचा. मी पाऊस पडायला लागला की खेळायला गेलेल्या तिला शोधुन घरी आणायचे. आज सकाळी ती कॉलेजात निघाली तेव्हा मात्र छत्री सापडलीच नाही रे... मी शोधणार होते पण पहिला पाऊस ना.. आईची शिकवण.. लगेच देवांसमोर दिवा लावला.. पावसाला नमस्कार केला, त्याला ओवाळलं... काय धम्माल कल्पना असतात ना आपल्या...

पुण्यातुन सोमवारी सकाळी मुंबईला निघायचे ना मी कॉलेजसाठी तेव्हा मी मनापासुन प्रार्थना करायचे... "देवा प्लीज भरपुर पाऊस पडु दे..आणि मग आई म्हणु दे की नको जाउ मग आज".. पाऊस, ट्रेनची खिडकी आणि लोणावळा.. आह.. च्यायला पण एकदाही ट्रेनमधे समोरच्या सीटवर चांगला दिसणारा मुलगा नव्हता आमच्या नशिबात..

तसं आम्ही एक वर्ष कोकण रेल्वेने गेलो होतो जुनमधे रत्नागिरीला.. बाहेर खरं तर सगळं खूप सुंदर होतं पण तेव्हा त्या मनस्थितीमधे नव्हतो.. आज्जी गेली तेव्हा! आधी २ दिवस पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता.. आजीला नेलं तेव्हा ४-५ तास पाऊस थांबला होता अगदी सगळं कळत असल्यासारखा आणि परत सुरु झाला. आज्जीला किती काय काय गमती सांगायच्या होत्या अरे मला त्या पावसाआधीच्या सुट्टी्तल्या...

तुला सांगितलं होतं ना मी.. हिमालयातल्या पावसाबद्दल? दुपारचे ३-४ वाजले की ढग यायचे आणि मग पाऊस... मी आणि रेणुका एकदा अडकलो होतो पावसात.. नदीच्या काठा-काठाने आम्ही जात होतो. पाण्याचा गोड खळखळाट, पाईनचा वास, लख्ख सूर्यप्रकाश पण तरीही हवेत गारवा... वाट हळुहळु नदी पासुन दूर जायला लागली... खळखळाट कमी होत गेला... आम्ही वर वर चढत होतो, सूर्यप्रकाशही कमी होत गेला. धो-धो पाऊस सुरु झाला..इतका की समोरची वाटही नीट दिसेना... आम्ही मधल्या काही चहावाल्यांच्या तंबुत थांबलो. पाऊसाचा आवाज कमी झाला म्हणुन मी आणि रेणुका तंबुतुन बाहेर आलो. अवर्णनीय, अप्रतिम, सुरेख किंवा कदाचित एकच शब्द बरोबर असेल त्या क्षणासाठी.... "स्वर्गीय". ढग खाली उतरलेले... त्यांचा आडुन दिसणारा सूर्य..दुरवर चमकणारी बर्फ़ाची शिखरं... डोळ्यांत जितकं साठवता येईल तितकं साठवुन घ्यावं... सूर्यानेही त्या दिवशी घरी जाऊन आरश्यात पाहिलं असेल.. इतका सुंदर दिसत होता... मला कदाचित हे शब्दांत नाही सांगता येते ...मी आणि रेणुका शांतच होतो... ते अनुभवताना आम्ही काहीही बोललो नाही... पण तरीही आम्ही एकमेकींबरोबर होतो. ती moment spoil न केल्याबद्दल मी तिची आयुश्यभर ऋणी राहेन!

ए आपण कधी एकत्र पावसात भिजलोच नाही ना? CCDच्या काचेतुन एकदा पाऊस बघत बसलो होतो आपण.. कसले unromantic होतो यार आपण.. म्हणुन कदाचित नाही आठवलास लगेच... पण मला पहिला snowfall आठवतो आहे तू अमेरिकेत गेल्यावरचा... तू आयुश्यात पहिल्यांदाच बर्फ पडताना बघत होतास. माझ्या रात्रीचे २ वाजले होते, तू मला ऑनलाईन बोलावलंस. मी खूप चिडचिड करुन आले.. तू वेबकॅम ऑन केलास तेच बाहेरचा बर्फ दिसायला लागला.. आप्पांच्या कडेवर ८ महिन्यांचं बाळ पहिल्यांदा पाऊस बघताना कसं दिसत असेल ते तुला पाहुन तेव्हा कळलं मला...

चल.. खूप बोलले आता.. पाऊसही थांबला..जाऊन छत्री शोधायच्ये.. सापडणं अशक्य आहे, नवीनच घ्यावी लागणार... नवीन पावसाळा आहे नं ह्यावर्षी

Thursday, May 13, 2010

अम्येइशॅंग

मणिपुरच्या एका लहानश्या गावातली ती सकाळ... थंडगार वा-याची मधुनच झोंबुन जाणारी झुळुक.. शाल अजुन घट्ट लपेटुन घेत.. तोंडातुन वाफ काढत, वाफाळलेल्या चहाच्या गरम कपातुन जितकी उब मिळेल तितकी घेत मी समोरच्या द-या बघत बसले होते. इथे सकाळ खुप लवकर होते, इथलं वेळेचं तंत्र अजुन शरीराला उमगलेलं नव्हतं. कदाचित मी उशिराच उठले होते जरा, बाहेर सगळे कामाला लागले होते.

मी ज्यांच्याकडे राहत होते त्यांचा एक भला मोठ्ठा केसाळ कुत्रा माझ्याजवळ येऊन बसला.. सकाळी उठले तेव्हा पायाशी मांजर बसुन होती, मी सवयीप्रमाणे दोघांशीही मराठीत बोलले. आणि दोघांनीही सगळं कळल्यासारखं माझ्याकडे बघितलं. (अनेकदा "काय येडी बोलुन राहिल्ये" असा लुकपण देतात प्राणी). इतक्यात एक लहान मुलगा तिथे आला. मणिपुरीमधे काहीतरी ओरडला कुत्र्याकडे बघुन आणि कुत्रा तिथुन उठुन गेला. मी त्या मुलाकडे पाहिलं तर माझ्याकडे हसत बघितलं त्याने आणि कुत्र्याकडे बोट दाखवुन काहीतरी बोलला. मला काही कळेना.. माझ्या चेह-याकडे बघुन त्याला ते कळलं असावं. मग तो दोन मिनीटं थांबला, त्याने शब्द जुळवले "Dog.. Danger.. Bites" .. ओह.. असं झालं काय.. मी त्याच्याकडे बघुन मग त्याला "Thank you" म्हंटलं, त्याचं नाव विचारलं... "अम्येइशॅंग"...

"अम्येइशॅंग".. त्याने ११व्यांदा त्याचं नाव सांगितलं आणि मी ते उच्चारायचा प्रयत्न केला. त्याने कपाळावर हात मारुन घेतला. मग माझ्याकडे बघत म्हणाला "अम्ये".. कित्ती गोड गं.. मी हसले.. "अम्ये..right?" . त्याने मोठ्या माणसासारखी मान हलवली, माझ्याकडे बोट केलं.. माझं नाव.. मी म्हणाले "तेजस्विनी".. आणि एकदम थांबले.. "uhh.. my name is Teju" .. त्याचे बारीक डोळे अजुन बारीक करत तो हसला, तो सहावीत होता, सहावीच्या मानाने बराच लहान दिसत होता. त्याने मला विचारलं मी कितवीत आहे ते. मी बोटं मोजली आणि सांगितलं, सतरावीत आहे! त्याला विश्वासच बसेना. एवढ्यात त्याला त्याच्या आईने बोलावलं म्हणुन तो धावत गेला. मधे एका दुस-या मुलाने त्याला अडवलं, माझ्याकडे बघत दोघंही काहीतरी बोलली, अम्येने मला हात केला मी सुद्धा त्याच्याकडे बघुन हसले आणि अम्ये पुढे गेला.

साडे सहाच वाजत होते सकाळचे.. घरी असते तर आत्ता साखरझोपेतली स्वप्नं बघत असते.. म्हणा समोर जे दिसत होतं ते एखाद्या लई सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. कोवळ्या उन्हात चमकणा-या समोरच्या टेकड्या.. दरीत साचुन राहिलेले ढग आणि धुकं... इतक्यात अम्ये खिदळतच परत माझ्या बाजुला येउन उभा राहिला. कोवळ्या उन्हाची लहान मुलाच्या हसण्याशी केलेली तुलना मला कायम ओढुनताणुन केल्यासारखी वाटायची. आज नाही वाटली तशी! त्याने त्याची बंद मुठ पुढे केली. मी काय आहे विचारल्यावर त्याची ती लहानगी मुठ उघडत, हातातला आवळा दाखवला.मी हात पुढे केल्यावर गड्याने परत मुठ बंद केली आणि "there is tree" म्हणत मला लांबचं आवळ्याचं झाड दाखवलं. मला खरं तरं मुळीच उठायची इच्छा नव्हती, पण आवळ्यांनी लगडलेलं झाड समोर दिसत असताना बसुन कसं राहावं माणसानी? मी शाल काढत उठले. अम्ये शाल परत हातावर टाकत "you will.. get cold" म्हणुन झाडाच्या दिशेने चालयला लागला.

मी, अम्ये आणि त्याचा मगासचा मित्र.. आम्ही तिघं कित्तीतरी वेळ झाडाखाली आवळे खात बसलो होतो. काही काही वेळा जिथे शब्द संपतात तिथे ख-या गप्पा सुरु होतात. आम्ही तिघंही एकमेकांकडे हसत बघत एक एक आवळा संपवत होतो. मधेच त्याचा मित्र माझ्याकडे बघत काहीतरी बोलायचा मग अम्येच त्याला उत्तर द्यायचा आणि माझ्याकडे बघुन "dont worry..मी त्याला समजावलं आहे" look द्यायचा!

"Hot water ? " अंघोळीसाठी निघाल्यावर अम्येनी मला विचारलं आणि मी काही म्हणायच्या आत एक लहानशी बादली आणुन ठेवली समोर गरम पाण्याची... जेवायला बसल्यावर मी शाकाहारीच खाते हे कळल्यावर त्याचा चेहरा जाम पडला होता. त्याने आईला फिश बनवायला मदत केली होती.जेवण झाल्यावर मला तो फुटबॉल बघायला बोलवत होता. पण त्याची आई त्याला ओरडली म्हणुन मला बाय करुन खेळायला गेला.

आज एक विश्रांतीचा दिवस होता त्यामुळे आठवड्याभराची डायरी लिहीत मी दुपारी पाय-यांवर बसले होते. मस्त शांत वाटत असताना अचानक जोरजोरात जोजोचं गाणं सुरु झालं. इथे जोजो? अम्ये त्याच्या मोठ्या भावांबरोबर आला. त्याच्या हातातल्या म्युझिक प्लेयरवर जोजो गात होती. दोघंही भाऊ आत गेले. अम्ये माझ्यासमोर उभा राहिला "are you teacher?" .. मला प्रश्न विचारताना तो घरात बघत होता. मी मागे वळुन पाहिलं, अम्येचे दोन्ही भाऊ माझ्याकडे बघत होते. " No dear.. " त्याचे भाऊ हसायला लागले... आणि अम्ये हिरमुसला होऊन तिथुन पळुन गेला. त्याचा एक भाऊ पुढे आला आणि त्याने सांगितलं, अम्येला वाटत होतं की मी त्याला शाळेत शिकवायला आले आहे आणि मी त्यांच्याच घरी राहणारे. नवीन टीचर आमच्या घरी राहतात हे तो सगळ्या मुलांना सांगुन आला होता. त्यानंतर कितीतरी वेळ मला तो दिसलाच नाही.

संध्याकाळी काळोख्या गावातलं एकटंच झगमगणारं चर्च बघत मी उभी होते. पक्क्या बांधकामाची घरंही नाहीत ज्या गावात तिथे दोन मजली चर्च उभं कसं राहतं ह्यावर विचार करत मी मोबाईलची रेंज शोधत फिरत होते. इतक्यात समोर अम्ये दिसला. त्याने माझ्या हातातल्या मोबाईल कडे पाहिलं आणि शांतपणे एका उंचवट्याच्या ठिकाणी जाऊन उभा राहिला माझ्याकडे बघत. तिथे मरतुकडी रेंज मिळत होती. मी घरी फोन केला. मी फोनवर बोलत असताना अम्ये एकटक माझ्याकडे बघत होता. बोलता बोलता मी बहिणीला म्हणाले " and I have got a new friend here.. Amye" .. तो खुद्कन हसला. अंधारातुन परत घरी येताना त्याने माझा हात धरला. मी त्याला घरी नीट आणलं की त्याने मला.. हे नाही ठाऊक!

दुस-या दिवशी सकाळी निघायच्या वेळी माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. अम्ये त्याच्या आईच्या मागे मागेच उभा होता. त्याच्या मित्राने मला लांबुनच बाय केलं. अम्येने काहीतरी विचारलं इतक्यात.. मला शब्द नाही कळले.. पण मी उत्तर दिलं " I will come back.. I will come back as your teacher" .. त्याने डोळे मिचकावले आणि हसला.. आता मी माझं वचन पुर्ण करणारे .... आमच्या गप्पांची, आवळ्यांची आणि त्या केसाळ कुत्र्याची शप्पथ!!

Thursday, March 25, 2010

लपाछपी..

दादर प्लॅटफॉर्मवर, कल्याण लोकलसाठी.. संध्याकाळी ७:३०-८:०० ची वेळ.. मरणाची गर्दी. मला ती म्हणाली CST end ladies ला ये.. मी कल्याण endला.. त्या गर्दीतुन चालत्ये चालत्ये.. ट्रेन येणार म्हणुन सगळे सरसावल्येत. लोकांचे घोळके उभे.. मधेच सामानाचे ढिग.. बाई माईकवर बोलत्ये.. "प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणारी लोकल बारा डब्यांची कल्याणला जाणारी धिमी लोकल आहे." समोरुन येणारी ट्रेन मला दिसत्ये.. मी अजुन middle ladies ला.. मी आता जीव खाऊन धावायला लागते.. ट्रेन आलीये.. गर्दीची हालचाल सुरु झाल्ये.. आता तिथे पोहोचणं अशक्य आहे. ट्रेन सुरु होते. मी धपापत शेवटच्या डब्यापर्यंत पोचल्ये आता.. पण बायका चढु देत नाहीत.. "मरायचं आहे का? पुढची ट्रेन आहे".. मी निराश होऊन जाणा-या ट्रेन कडे बघत बसते.. दारातुन एक जाडंस धातुचं कडं घातलेला हात "बाय" करतो.. तीच! मला असं चिडवायला काय मज्जा येते? तिचा एसमएस येतो.. " Darling.. ya missed me again" .. मी माझा राग शांत करायचा प्रयत्न करत तिला रीप्लाय करते "Tomaar maa" आणि मग स्वत:शीच हसते. बाजुची बाई माझ्याकडे बघत असते पण आत्ता खरंच मला त्या बाईला काय वाटेल ह्याची काळजी नाहीये..


ठाणे-पुणे Volvo मधे आयपॉडवर गाणी ऐकत मी शेजारच्या सीटवर कोणी नसल्याने मस्त मांडी घालुन ऐसपैस झोपले असताना अचानक मोबाईल दणदणीत वायब्रेट होतो.. "me punyaat ahe"! मी कुठे आहे हे कळायला मला काही क्षण जातात. पलीकडच्या सीटवरचा माणुस उतरलासुद्धा.. म्हणजे नक्कीच वाकडच्या पुढे आल्ये. बाहेर बघुन अंदाज घेण्यात अजुन काही क्षण.. चांदणी चौकातुन बस खाली उतरते. मी मेसेज करते.. "mee pan punyaat ahe". इतके दिवस ती मुंबईत असताना भेट नाही झाली. पुण्यात काय डोंबलाची भेट होणार म्हणुन मी उगाच काळ-वेळ-स्थळ ठरवण्यात माझी शक्ती वाया घालवत नाही आणि माझ्या कामाला लागते. पण तरीही तिच्या मेसेजची जाम आतुरतेने वाट बघते! ती काहीच रीप्लाय करत नाही. असं कसं चालेल? खडुस कुठली.. एक रिप्लाय करायला काय जातं? दर थोड्यावेळानी मोबाईलकडे बघत मी माझं काम आटोपते. आणि तिला sms करते..
"listening to The Corrs..
To sweet beginings
and bitter endings
In coffee city
we borrowed heaven"
बराच वेळ तसाच जातो. "५ मिनीटात तिचा sms आला नाही तर आपण निघायचं" असं ठरवत तासभर मी कॉलेजमधे पाय-यांवर बसुन राहते. मोबाईल वायब्रेट होतो.. समोर एक ज्युनिअर मुलगी रडवेली होऊन "कॉलेजमधे कशी मारतात" हे सांगत असुन मी तिच्यासमोर निर्लज्जासारखा sms वाचुन हसते. "LOL.. teju, koi bhi irrelevantsi lines ko kahipehi relevant kar marti ho.. OK! Coffee at Nal stop CCD.. catch ya in 15 mins"

अवेळी पडणारा पुण्यातला पिरपिरा पाऊस, गुलाबी संध्याकाळ ह्याहुन मस्त वेळ कोणती असु शकेल तिला भेटायला.. पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटायला? मी पावसाची पर्वा न करता पळत पळत नळस्टॉपवर पोचले. नेहमीपेक्षा heartbeats नक्कीच जास्त होत्या.. तिथल्या मिनी-कबुतरखान्याला पार करत मी शौकीनपर्यंत आले. अजुन २५ पाउलं आणि मग मी तिला बघणार.. एवढ्यात परत एक मेसेज आला तिचाच.. "
tomake jeno dekhechhi" म्हणजे काय? तिनी मला बघितलं का? मला काही कळलंच नाही.. मी काही रीप्लाय करणार त्या आधीच तिचा अजुन एक मेसेज.. "client has some problem with my design.. i have to go.. sorry.. I was waiting for you at CCD..dont bliv me? I hv left my scarf there..pink floral. njoy" मी खुप गोंधळुन ते परत दोनदा वाचलं.. काय? ती बाई तिचा स्कार्फ तिथे ठेवुन गेली? फिल्मी आहे किती येडी.. दुस-या दिवशी तिच्या ब्लॉगवर तिने आमच्या न झालेल्या भेटीबद्दल लिहीलं.. तिला आधीच माहित होतं तिची मिटींग आहे, उगाच मज्जा म्हणुन तिने हे सगळं केलं होतं. मला आधी राग आला थोडा पण मग ह्या मुलीची गंमत वाटायला लागली.. तिने तळतीप लिहीली होती.. "Now please बंगाली शिवी नको घालु.. तुला बंगाली शिवी देता येत नाही.. तु बंगालीलाच शिवी देतेस बंगाली बोलुन!"

हिची आणि माझी ओळख झाली तिच्या ब्लॉगवर. आधी मला ती typical emo वाटली ब्लॉगकडे बघुन.. पण वाचायला लागल्यावर आवडायला लागली. भारी सुंदर काहीतरी लिहुन जायची एखादंच वाक्य, पण ते वाक्य आख्खी पोस्ट खाऊन जायचं.. आणि मुळात नेहमी लिहीणारी. इतर बन्गाली मुलींसारखी स्वतःच्या डोळ्यांच्या प्रेमात असणारी, पुण्यात वाढलेली त्यामुळे बन्गाली मराठी बोलणारी.. ते तिच्या english blog मधुन पण जाणवायचं! मी एकदा कमेंट केली तिच्या ब्लॉगवर. त्यावर ती काहीतरी बोलली..मग मी.. मग परत ती. असं खूप वेळ झाल्यावर मग आम्ही मेला-मेली सुरु केली. तेव्हा जाणवलं "च्यायला ही पोरगी भन्नाट आहे.".. मला जे वाटायचं, मी जशी जगते त्याच्या सगळं विरुद्ध हिला वाटतं, ती तशी जगते. तिच्या एका एका फंड्यांच्या प्रेमात मी पडायला लागले.

मग आम्ही चॅट करायला लागलो. "mon diye shunun" म्हणुन ती किस्से सांगायला सुरुवात करायची.. मधेच बंगाली गुगल्या टाकायची.. आणि टाटा-बायबायचे प्रकार झाल्यावर "bishwe shanti biraj koruk" (let there be peace on earth) वगैरे म्हणायची काही वेळेस.. काहीही आहे तो प्रकार..मी मनापासुन काही सांगायला लागले तर मधेच मला अडवत "eta baje katha..i have better things to tell" म्हणत तिची गोष्ट अर्धवट सांगायची.. मग अर्ध्यावर आल्यावर म्हणायची " I am talking agdam bagdam.. your story was better.. go ahead".. आम्ही असं तासंतास बोलायचो.. दोघींकडे एकमेकींचे नंबर होते..पण आधी कोण फोन करणार म्हणुन कोणीही फोन केला नव्हता.. sms-sms चालायचे फक्त कायम.. तिच्यामुळे मी बंगाली शिकायला लागले. आमचे फिल्म्स वरुन वाद होयला लागले.. मला आवडणा-या फिल्म्स तिला नाही आवडत.. KKR आणि MI वर आम्ही एकमेकींमधे पैजा लावायचो.. आणि असं बरंच काही..खुप मज्जा केली आम्ही, अर्थात ऑनलाईन! आणि फोनवर.. भेटायचं आहे यार एकदा असं ठरवुन ठरवुनही भेट होत नव्हती.. कायम लपाछपी खेळल्यासारखं होत होतं..आणि कायम त्या भेटीला filmy effect देत ती असं काहीतरी करत होती.. कडं काय, स्कार्फ़ काय.. एकदा म्हणाली "मी sndtमधे येते आहे. मोरपिसचे कानातले घातले आहेत.. बघ येतं का ओळखता" मी लक्षच नाही दिलं तेव्हा.. नंतर officeमधे एक Graphics Designer आली होती.. माझ्याविषयी विचारत होती असं माझ्या वर्गातल्या मुलीनी सांगितलं.. मी तिला विचारलं "तिनी कानात काय घातलं होतं?.. "अरे इतना Awesome था..".. श्या.. ती खरंच आली होती, तिचं कार्ड ठेवुन गेली होती!


"तेजु, हिरो खुद नही बनता उसे बाकी लोग हिरो बनाते है" असं मधेच एखादं random वाक्य टाकायची.. किंवा मधेच sms करुन "saajan film ka woh chai ke baagonme kaunsaa gana hain sanjay dutt n madhuri ka?" ..किंवा मग काही वेळेस अगदीच त्यांच्या लॉ कॉलेजच्या गेटवर बसुन रिकामी असल्यागत मला updates देत बसायची..
"abhi woh banda aya.. he is interested in crime ya...sahi na?"...
"usake eyes blue hain! n hes wearing white shirt"...
"m thinking of taking up crime now"

मुलीसारखी मुलगी.. पण तरीही हुशार आणि emo नाही! हे असुनही सुंदर.. हे असुनही practically relationship मधे.. आणि तरीही कुठेही बिघडलेली नाही.. आणि तरिही कुठेही काकुबाईपण नाही! जुन्या एखाद्या जन्मीची ओळख असल्यागत आमची मैत्री झाली होती.. वाढत होती.. एक दिवस तिनी पिंग केलं .. म्हणाली..
ti: now lets make it real
mi: aan?
ti: milate hain re abhi realmein..
tomar katha amar mone pore
mi: aan?
ti: yaar.. natak mat kar! kal eternity mall, Thane.. mi ani Ori yetoy tithe.. tu ye 7 vajta..
mi: tum donome aake main kya karu? bf-gf khush raho!
ti: tu ye.. bbye

आणि गायबच झाली. मी दुस-या दिवशी ५ वाजल्यापासुन तयार होऊन बसले. परत एकदा वाढलेले heartbeats, वेगळीच काहीतरी feeling.. teen-agerish BFF असल्यागत काहीतरी वाटत होतं मला..तिचा मेसेज आला " we are here.. m wearing green, he is wearing white.. box office" मी घरातुन निघाले. तिच्या वाचलेल्या पहिल्या ब्लॉगपासुनची ती आठवायला लागली. ती कसली perfect होती.. मॉल जसजसा जवळ आला मी अजुन अस्वस्थ होत गेले. रिक्षाला दिड मिनीटांचा सिग्नल लागल्यावर मला कायम चिडचीड होते पण आज बरं वाटलं.. आजवरची सर्वात छान मैत्रिण.. एकदम मनमोकळी आणि जिच्याशी आपल्यालाही मन मोकळं करता येईल अशी.. आजवरची सर्वात विचीत्र मैत्रिण.. जेवढी लहान मुलासारखी वागणारी तितकीच मोठ्यांसारखं सांभाळणारी.. थोडक्यात too good to be real! मला एकदम धस्स झालं.. मी असं का म्हणाले? too good to be real??

मी रिक्षातुन उतरुन चालत होते. गेटमधुन आत गेले.. नेहमीप्रमाणे आजही लपाछपी व्हावी असं वाटायला लागलं आणि तितक्यात एक पांढरा शर्ट घातलेला मुलगा आणि त्याच्या समोर एक हिरवा स्कर्ट घातलेली मुलगी दिसली.. ती पाठमोरी होती.. मी पुढे चालत होते पण माझा वेग आता मंदावला होता.. ती मागे वळत होती.. हातात कडं, कानात मोरपिसं.. त्या क्षणाला पुढे टाकण्यासाठी उचललेलं पाउल मी थांबवलं.. क्षणभर तसंच अधांतरी ठेवुन परत मागे आणलं.. त्या दोघांकडे हसुन पाहिलं आणि मागे वळले.. परत वेगाने चालत येत रिक्षात बसले. तिचा कॉल आला.. पहिल्यांदाच ती कॉल करत होती.. "तेजु.. wait.. what was that?"
"तू मला तिनदा असं चुकवुन गेलीस.. माझं राज्य होतं.. आता राज्य तुझ्यावर आलं आहे..you missed me.. "
"चोले जावो.. कालके आबार ऑनलाईन देखा होबे" ती म्हणाली आणि आम्ही दोघीही हसायला लागलो...

dont know about this लपाछपी.. the only thing I know is बास्तब कल्पकाहिनीर ठेक्यो बिष्मयकार..
कल्पनेत आणि वास्तवात खूप अंतर असतं राव.. ती मला माझ्या कल्पनेमधलीच आवडते .. तिच्या त्या imageला मला धक्का द्यायचा नाहीये.. आणि तिलाही माझ्या बाबतीत हेच वाटतं.. आज नजरानजर झाली.. उद्या कदाचित भेटही होईल.. पण तोवर आम्ही आमच्या आमच्या मनातल्या if unreal is the word त्या unreal प्रतिमांना जपुन ठेवु!

based on a true story and The real friend ;)



Thursday, January 21, 2010

शाळा आणि करिष्मा (२)

मी शाळेत पोचले तेव्हा गडबड चालु होती. पोरं बाहेर हैदोस घालत होती, पोरी कडेला उभं राहुन गप्पा मारत हसत होत्या. त्यातल्या एका मुलाला मी ७वीचा वर्ग कुठे आहे असं विचारल्यावर तो चक्क तिथुन पळुन गेला. मग एका मुलीला धरलं आणि विचारलं. ती सरळ चालायला लागली, मला कळेना काहीच. मग ती पुढे गेल्यावर मागे वळुन म्हणाली "चला नं, दाखवते आहे की".. मी वर्गापाशी गेल्यावर आधी बाहेरच उभी राहिले होते. छोटी सुट्टी संपायची होती अजुन.. काही मुली लाजत लाजत माझ्याकडे बघत होत्या. मी त्यांच्याकडे बघुन हसले की अजुन लाजत होत्या. मी करिष्माला शोधत होते.पण ती काही दिसत नव्हती.

सुट्टी संपल्याची घंटा वाजली तेव्हा सर आले वर्गात आणि मग "अरे बापरे.. उशिर झाला" भाव चेह-यावर दाखवत, जीभा बाहेर काढत "सर आत येउ?" करत ५-६ मुली आल्या..त्यातच करिष्मा होती. तिने तिच्या हातातली चिंच हळुच दाखवली मला. मी लगेच मनातल्या मनात प्रार्थना सुरु केली "please let her be the girl.. जी बाईंना impress करायला चिंचा-आवळे आणुन देते". तेवढ्यात सर बोलायला लागले.." आज आपल्याकडे ही आलेली आहे.. (माझं नाव विसरले होते ते).. लेले.. ही जाहिराती आणि लहान मुलांवर संशोधन करत्ये. तर आता ही शिकवेल तुम्हाला तिच्या संशोधनाबद्दल".. मला फिस्सकनी हसु आलं. मी शिंक आली आहे असं दाखवायचा प्रयत्न केला.. सर वर्गातुन बाहेर निघाले आणि मग मी फळ्यासमोर जाउन उभी राहिले.

२५-३० डोकी..लाल रिबीनीच्या वेण्या घातलेली.. काहींच्या डोक्यांत गजरे, चमकीवाले.. एखाद-दोनच डोकी केस कापलेली! सगळी माझ्याकडे बघत होती टक लावुन.. "आता काय सांगणारे ही बया" असे भाव सगळ्यांच्या डोळ्यात! काही काळ सगळं शांत होतं.. मी एक मोठ्ठा श्वास घेतला आणि म्हणाले "तर.. मग ..आता सुरु करुयात?" मुलींनी फक्त माना हलवल्या.. अजुन काय करणार म्हणा.. मला उगाचच पण लई टेन्शन आल्यासारखं वाटलं. पुण्याला आगाउ पोरांना शिकवायची सवय होती.. तुम्ही एक शब्द बोलाल तर ती over smart कार्टी १० शब्द बोलतात.. इथे पोरी बोलल्याच नाही तर? तरी मी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात शाळेतल्या २ शिक्षीका मागच्या बाकावर येउन बसल्या. एक कालच्या ओरडणा-या बाई होत्या त्यात.
मग पुढे अर्धा तास मी जितके प्रश्न विचारले तितक्या सगळ्यांची उत्तरं मला त्या दोन बाईंनी दिली.

मी: तुम्ही टीव्हीवर काय काय बघता?
बाई१: सांगा.. काय काय बघता ते.. अवघाची संसार, कुंकू, गोजिरवाण्या घरात, सारेगमप..
बाई२: हिंदी पण बघतात.. MTV, cartoon network.. सगळं बघतात.. TVच तर बघतात.. अभ्यास नको कोणाला!
मी: अरे वा.. हे सगळं बघता का? फिल्मस पण बघता ना?
बाई२: तर काय? अलिबागला फिल्म लागली की न चुकता बघतात.. सीडी-डीव्हीडीवरही बघतात..
मी: ( मनात: ओह बाई गपा की हो आता) हो का? चांगलं आहे .
तुम्हाला "जाहिरात" म्हणजे काय माहित्ये ना?
बाई १: सांगा गं.. लाजु नका.. जाहिरात म्हणजे वस्तु विकतात ते.. आपल्याला वस्तुंची माहिती देतात.. हो की नाही?
मी: (yeah right!) हा.. तुम्ही द्या की उत्तर.. असं सारखं सारखं बाईन्ना नाही काही उत्तर द्यायला लावायचं! आता ह्या पुढे बाई नाही हं मदत करणार तुम्हाला.. तुमचं उत्तर तुम्ही द्यायचं!

हे बोलल्यावर मला माझा अभिमान वाटला.. आणि बाईसुद्धा गप्प झाल्या. भारी वाटलं मला जाम! मी शाळेत शिकत होते तेव्हापासुन मला आगाऊ बाईन्ना गप्प बसवायला मज्जा येते! मग त्या बाई आपापसांत गप्पा मारायला लागल्यावर मी आणि मुली एकमेकींशी बोलायला लागलो. मुली हळुहळू खुलत होत्या.. हसत होत्या.. एखादी गंमत सांगितल्यावर डोळे मोठे करुन बघत होत्या.. मलाही छान वाटायला लागलं! मी मग त्यांना मधेच "आता तुम्ही जाहिरात बनवुन दाखवणार का?" असं विचारलं.. तर पोरी इतक्या जोरात "हो sss" ओरडल्या.. मला जाम कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं, धक्का बसला.. prejudices.. prejudices.. नाही बोलणार खेड्यातल्या मुली, जाहिराती नाही करता येणार त्यांना.. लाजतील, शांत बसुन राहतील.. असं काहीसं माझ्या डोक्यात होतं! मी त्यांना "products" दिले आणि सांगितलं .."जा मज्जा करा, १५ मिनीटं.. हवी तशी जाहिरात बनवा!"

घोळके-घोळके जाहिरातींबद्दल विचार करण्यात गुंगले होते. कोणीतरी जिंगल बनवत होतं, कोणी रेडिओसाठी जाहिरात बनवत होतं, कोणी स्कीट करत होतं.. करिष्मा मात्र एकटीच बसली होती तिच्या ग्रुपपासुन लांब. मी तिला खुणेनेच "काय?" म्हणुन विचारलं.. ती लगेच उठुन माझ्याकडे आली.. "तुम्ही बोलला नाहीत आल्यापासुन माझ्याशी काहीच!.. मला वाटलं विसरलात मला" .. ओह असा फंडा आहे काय.. ह्यावर काय बोलायचं मला माहित नव्हतं.. मी आपला direct बाईपणा केला, "बरं मग तू जाहिरात नाही करणार का? कोणत्या ग्रुप मधे आहेस तू?" . तिने एका ग्रुपकडे बोट दाखवलं "पण त्या मुली खुप साधीशी जाहिरात बनवताय्त.. माझ्या डोक्यात चांगली जाहिरात आहे त्यांच्यापेक्षा.. मी एकटी करु का?" (Oh My God.. मी शाळेत असताना अशी आगाऊ होते का? म्हणजे मला जे भारी वाटायचं ते असं आगाऊ असायचं का? oh ohf)

मी मागच्या बेन्चवर जाऊन बसले.. एक एक ग्रुप येउन जाहिराती सादर करायला लागला..
Group 1: ( कोरस:(गाणं वगैरे) मला होयचं आहे गोरं.. मला दिसायचं आहे सुंदर..
एक मुलगी: मग वापरा डॅश डॅश क्रीम.....)
Group 2: ( १: ह्या महागाईच्या दिवसात काय करावं बाई?
२: मी सांगते.. ही पावडर विकत घ्यावी कारण ह्याबरोबर मिळतं हे तेल एकदम मोफत...)
Group 3: ( ती बघ किती गोरी आहे.. काय राज आहे गं तिच्या गोरेपणाचा?
ती: माझ्या गोरेपणाचं रहस्य ते क्रीम... )
करिष्मा: (माझ्यासारखं सुंदर व्हायचं आहे? मग वापरा ही पावडर.....)

मी आधी कौतुकाने, मग आश्चर्याने, मग अजुन आश्चर्याने, मग blank हौन, मग मान तिरकी करुन, मग डोळे मोठ्ठे करुन.. मग तोंडाचा मोठ्ठा आ करुन, मग एक भुवई वर करुन.. मग एका बोटाचं नख चावत त्या जाहिराती पाहिल्या.. जाहिराती संपल्या.. मी हसले सगळ्यांकडे बघुन..(स्वत:ला.. बाय माझी तेजू, काय शिकवुन राहिली तू ह्या पोट्ट्यांना? Advertising and body-image म्हणे.. शिका काहीतरी ह्यांच्याकडुन) मग how those ads mislead you.. वगैरे सांगितलं, मुलींना जाहिराती बनवायचे विडीओ दाखवले... मग "self-image enhancement" वगैरे प्रकार केले. You are Beautiful वालं एक motivational speech दिलं! उद्या भेटू म्हणुन त्यांना मग मी तश्याच feel good noteवर सोडुन दिलं.

करिष्मा वर्गातुन बाहेर पडताना माझ्या मागे पळत पळत आली. "तुम्हाला खरंच वाटतं आम्ही सुंदर आहोत?" मी फक्त मान हलवली.. तिनी अविश्वासाने बघत मला विचारलं "सगळ्या? खरंच? सुंदर?"
मी आजुबाजुला कोणी नाही ना पाहिलं.. तिला म्हणाले.." कोणाला सांगणार नाहीस?..बरं, मग सांगते.. सगळ्या सुंदर आहेत.. सुंदर.. पण तुझ्याएवढं सुंदर नाही कोणी" डोळे चमकले मग करिष्माचे. ती अजुन काही बोलणार तेवढ्यात मागुन सर आले म्हणुन ती पळुन गेली. सर तिच्याकडे बघत मला म्हणाले " सांभाळता येतोय ना हा वर्ग? पोरी जरा डॅम्बिस आहेत! अभ्यास काहीही नाही.. नुसत्या उनाडक्या.. ही आत्ता गेली ती पोरगी २दा नापास झाल्ये. अजुन एकदा नापास झाली की मग शाळेतुन तिचं नाव निघणार मग काय लग्नं करुन पोरं सांभाळणार.. हे असंच होतं गं ह्यातल्या अनेक मुलींचं..." सर पुढेही काहीतरी बोलले पण माझं खरंच लक्ष नव्हतं. करिष्मा लांबुन मला टाटा करत होती आणि मगाशी आणलेल्या चिंचा माझ्यासाठी टेबलावर ठेवत होती. तेव्हा ती खरोखर सुंदर दिसत होती..

Monday, January 11, 2010

शाळा आणि करिष्मा (१)

अलिबागला जाताना मधेच खिंडीत उतरुन साधारण एक किमी चालत गेलं की टमटम (6 सीटर) स्टॅन्ड आहे.. तिथे अर्धा एक तास थांबलं दुपारच्या वेळेला की मग माणसं गोळा होतात एक टमटम भरण्यासाठी..पुण्यासारखं एका टमटममध्ये १०-१२ माणसं नाही भरत इथे.. ६-७ जमली की निघतात. वळणावळणांचा रस्ता.. पण सुंदर वगैरे नाही..रुक्ष ब-यापैकी! माझ्या डोक्यात अनेकदा रेडिओ वाजत असतो. ह्या प्रवासात स्वदेसचं थीम म्युझिक आहे ना, ते ऐकत होते. भारी वाटत होतं. मी काही खास करायला चालले नव्हते पण अचानक मोहन भार्गव सारखं भन्नाट वाटलं. गावाच्या नावाची पाटी दिसल्यावर मी उतरले . टमटमवाल्याने लांब एके ठिकाणी बोट दाखवत "तिथे बघा शाळा" म्हणुन शाळा दाखवली आणि तिथे जायचा शॉर्टकट सांगितला. दगड-धोंडे आणि रानातला रस्ता.. मज्जा वाटली अजुनच मला!

शाळा समोर दिसत होती.. बैठी, टुमदार, कौलारु! बाहेर सायकली लावुन ठेवलेल्या १०-१२... चुन्याने रंगवलेल्या विटांचं एक तकलादू कुंपण, आत शोभेची झाडं.. सकाळीच शिंपण केलं असावं बहुतेक शाळेसमोरच्या मैदानावर..अजुनही हलकासा मातीचा वास येत होता. शाळेसमोरचं मोट्ठं आंब्याचं झाड मोहोरलेलं आणि त्याच्या पारावर ३ पिंपं ठेवलेली पाण्याची. एक लहान मुलगी तिथे पाणी पित होती..भांड्याला तोंड लावुन आणि ते भांडं न विसळता तसचं उपडं ठेवुन बाहीला तोंड पुसत पळुन गेली आत!

७ खोल्यांची शाळा.. पिवळ्या कार्डबोर्डवर लाल मार्करने "संगणक कक्ष" लिहीलेली खोली सर्वात डावीकडे. आत जुनी २ कपाटं आणि ३ नवीन कॉम्प्युटर! त्याच्या बाजुला निळ्या कार्डबोर्डवर "प्रयोगशाळा" लिहीलेला एक वर्ग.. हेच स्टाफरुम पण! २ शिक्षक आत पेपर वाचत बसलेले होते. एक सर फळ्यावर "आजचा प्रयोग..साहित्य, निरीक्षण" वगैरे लिहीत होते. कोणाचं माझ्याकडे लक्षचं गेलं नाही. बाहेर भिंतीवर रवींद्रनाथांची कविता चिकटवलेली. त्याच्याबाजुचा फळयावर "आजचा सुविचार" लिहीलेला कोरा फळा. एका वर्गाचं दार होतं मग.. आतमधली सगळी पोरं-टोरं मला बघत होती.. "हे कोण आलं आहे?" नजरा. एक मुलगी माझ्याकडे बघत असताना मी तिच्याकडे बघुन हसले तर असली मस्त लाजली ती.. इयत्ता कुठली ते लिहीलेलंच नव्हतं..कदाचित ७-८वी असेल. एक बाई वह्या तपासत होती.. "नवीन शब्द ऐका रे ह्याने बनवलेला.. आ-र-कु-ती.." मग मुलगा ओशाळुन बाईंकडे बघायला लागला.. बाई त्यांच्या अंगावर खेकसत म्हणाल्या. "आकृती लिहीत येत नाही हो अजुन साहेबांना". मी पटकन पुढे गेले.. शाळेचे "दैदिप्यमान यश" नावाचा फळा.. श्लोक पाठांतर स्पर्धेत शाळेची ८ मुलं निवडली गेली होती. त्यावर दहावीत शाळेतुन पहिल्या आलेल्या मुलांची यादी.. ६० ते ७५% मधली मुलं. गेल्यावर्षी ७९% मिळाले होते एका मुलीला.. तीच आत्तापर्यन्तची सर्वात जास्त टक्के मिळवलेली मुलगी होती.

पुढे एक एक वर्ग बघत मुख्याध्यापकांच्या खोलीत येउन बसले त्यांची वाट पाहत. तिथल्या शिपायाने लगेच टेबल फॅन माझ्या दिशेला फिरवला आणि लावला..खटार-खटर आवाज येत होता त्यातुन. एक बाई ओरडत होत्या. एका वर्गात कोणी शिक्षक नाही म्हणुन वर्ग उठलेला. बाजुच्या वर्गात एक शिक्षक कसल्यातरी सुचना देत होते. बाहेर एका झाडावरचा कावळा ओरडत होता. समोर प्लॅस्टिक कव्हर घातलेली सरस्वती, वह्यांचे ८-१० गठ्ठे, २००९ डिसेंबर- कालनिर्णय, तांब्या-भांडं.. मी तांब्यातुन पाणी घेतलं भांड्यात पण मग बाहेरची मुलगी आठवली.. तांब्यातुनच वरुन पाणी प्यायलं. घड्याळात ३ वाजलेले दिसले भिंतीवरच्या..

बसल्या जागेवरुन मला व्हरांडा दिसत होता. बाहेर कागदाचे बोळे पडलेले होते मधेच, पेन्सिलचे तुकडे आणि टरफलं, मधेच एखादी चॉकलेटची चांदी.. तितक्यात तो शिपाई परत आला घाईघाईने आणि घंटा वाजवली. शाळा सुटली! मुलं बाहेर आली वर्गातुन.. कोणी हसत-खिदळत..कोणी शांतपणे.. काही मुली पळाल्याच..काही मुलं इथे-तिथे बघत उभी राहिली. माझ्याकडे बघत मग आपांपसात काहीतरी बोलली.. आम्हीपण असंच करायचो, शाळेत कोणी नवीन दिसलं की त्या माणसाकडे बघत त्यावर कमेन्टस मारत बसायचो. कमेन्टच्या ह्या टोकाला उभं राहुन कसं वाटतं ते आत्ता कळत होतं मला.

तितक्यात सर आले. सगळी मुलं पळाली. सर मला पाहुन अगदी आनंद झाल्यासारखे हसले. "काय कसं करायचं?", "कधी येत्येस वर्ग घ्यायला?" .. मी सरांना विचारलं "उद्यापासुन येऊ?" सरांनी मान डोलावली.
मी तिथुन बाहेर पडताना मुलींकडे एकदा पाहिलं समोरच्या .. आमच्या चव्हाण बाई बघायच्या आमच्याकडे वर्गात शिरण्याआधी तसं.. "अब मुझसे बचके कहा जाओगे?" सारखं. पुण्याला एका शाळेत जात असले आधी शिकवायला तरी on my own असं पहिल्यांदा शिकवणार.. तेही इथे मला ह्या पोरी "बाई" किंवा "मॅडम" म्हणणार.. मी जरी २च दिवस येणार असले तरी फुलटू त्यांना गृहपाठ देणार असं मी ठरवलं होतं... एक्दम बाई टाईप वागणार.. मारणार किंवा ओरडणार नाही कदाचित पण धाक-दरारा वगैरे असा विचार करत होते मी.

परत रस्त्यापर्यन्त चालत आले आणि टमटमची वाट बघत उभी राहिले. अर्धा-एक तास लागणार ह्या तयारीनेच उभी होते. माझ्या शेजारी एक मुलगी उभी राहिली मागुन येउन.. माझ्या इतकीच उंची, वर बांधलेल्या २ घट्ट वेण्या पण कपाळावर एका बाजुने फ्लिक्स.. व्यवस्थित युनिफॉर्म, पायात स्लिपर्स.. माझ्याकडे बघुन ती हसली. मी पण हसले.. " तुम्ही शिकवायला येणार आम्हाला?" अचानक तिचा प्रश्न आला.. "कितवीत आहेस तू? मी ६वी-७वीचे तास घेणार २ दिवस." मग ती अजुन हसली.. "म्हणजे आमच्यावरच". मग ती लगेच म्हणाली.. " माझं नाव करिष्मा आहे. ७वीत आहे मी.." मी शिकवायला येणारे म्हणुन इतक्या आनंदाने आणि उत्साहाने कोणी माझ्याशी बोलेल असं वाटलं नव्हतं मला..

"तू पण टमटमसाठी थांबली आहेस?" मी विचारलं तिला. "नाही मैत्रिणीसाठी" तिनी गोंधळुन उत्तर दिलं. मागे २ मुली उभ्या होत्या गप्पा मारत. "तुम्ही टीव्ही-फिल्म्ससाठी काम करता ना? सर म्हणाले आम्हाला.. मला पण काम करायचं आहे एकदा असं" मी मनातल्या मनात सरांना नमस्कार केला, त्यांनी सॉलिडच काहीतरी सांगितलेलं दिसतं आहे.. मला ह्या पोरीला काय म्हणावं कळेना.. "अरे वा.. कर की" सारखं एक पाचकळ उत्तर मी टाकलं. ती अजुनही माझ्याकडे एकटक बघत होती मी पुढे काय सांगत्ये ऐकण्यासाठी थांबुन..मी मागे वळुन पाहिलं तर त्या दोन मुली गायब.. मी तिला म्हणाले "मैत्रिण गेली की गं तुझी". तिने मागे न वळता "हा.. जाऊ दे.. तुमच्याशीच बोलायला आले" असं प्रामाणिक उत्तर दिलं मग! "मला काजोल आवडते" ती म्हणाली.. मी हसले .."अरे वा.. मला पण!"

तितक्यात एक टमटम आला जो मी घालवु शकत नव्हते. मी तिला म्हणाले.. "उद्या भेटु गं आपण.. तेव्हा बोलु" ती हिरमुसली. "मॅडम.. करिष्मा नाव लक्षात ठेवा हं.. उद्या ओळखाल ना ? मी लगेच पुढे येईन तुम्ही आल्यावर..उंचीमुळे मागे बसावं लागतं." ती बोलत होती मी टमटममधे चढल्यावरही.. मी हात हलवुन तिला अच्छा वगैरे केलं. पुढे खिंडीत पोचेपर्यन्त डोक्यातल्या रेडिओवर "मेरे ख्वाबोंमें जो आए.." वाजत राहिलं!

Monday, November 30, 2009

इस शहरमें ना अपना ठिकाना रहा...

तो. त्याने खांद्याला सॅक अडकवली. दाराला कुलुप लावलं. उरलेल्या दोन जड बॅगा हातात घेतल्या आणि खाली उतरला. खालच्या मजल्यावरच्या कुलकर्णी काकुंकडे किल्ल्या दिल्या. काकू अगदी मनापासुन हसल्या आणि त्याला म्हणाल्या "येत जा हो अधुनमधुन.. घर नाही असं समजु नको, सरळ आमच्याकडे यायचं. हक्काने ये हो." बिल्डींगमधुन बाहेर पडताना त्याला हसु आलं.. गेल्या २ वर्षात, तो इथे आल्यापासुन एकदाही काकू इतकं हसुन बोलल्या नव्हत्या त्याच्याशी. पद्धत म्हणुन किती गोष्टी अश्याच करतो आपण.. काकू म्हणाल्या "ये".. तो म्हणाला, "येईन".. त्याला हे मनात पक्कं ठाऊक होतं.. हे शहर परत नाहीच आणि ही बिल्डींग त्याहुन नाही.. आता इथे कशाला परत यायचं?

गल्लीच्या टोकावरच्या देवळाबाहेर तो थांबला.हा देव नवसाला पावतो म्हणतात पण ह्या देवाकडे त्याने कधीच काही मागितलं नव्हतं, ह्या देवाने दिलं नव्हतं. कित्ती काय झालं दोन वर्षात. ४ सेमिस्टर्स, असंख्य प्रोजेक्ट्स, एक प्रेमप्रकरण, २ जॉब इंटर्व्युज आणि काय काय... पण ह्या देवाचा संबंध नाही आला कशाशीच! तो जेव्हा जेव्हा ह्या देवळात आला त्याने कायम "वक्रतुंड महाकाय" म्हण्ट्लं, आज त्याला गंमत वाटली त्याच्याच वागण्याची.. त्याने प्रयत्न केला ह्या देवाचा श्लोक आठवायचा पण त्याला रामरक्षाच आठवत होती. नंतर शुज घालताना त्याला "उडाला उडाला कपि तो उडाला" आठवलं.. पण त्याला काही हा श्लोक विशेष आवडला नाही.

चालत चालत तो बस स्टॉपवर आला. आजवर एकदाही तो इथे आला नव्हता. त्याला ह्या शहरातल्या बसेस नाही आवडायच्या.. धुळकट्ट, मळलेल्या, गर्दीने भरलेल्या, कधीही वेळेवर न येणा-या, खिळखिळ्या... आणि त्यातुन त्याला कधीच नीट बसायला मिळायचं नाही आणि धड उभंही राहता यायचं नाही... तरी आज तो इथे येउन उभा राहिला. स्टेशनला जाणा-या ३ बसेस त्याने सोडल्या कारण त्यात गर्दी होती भरपुर, त्याने आज ठरवलं होतं गर्दी नसलेल्या बसमधुन मी बसुन जाणार. चौथ्या बसमधे चढला आणि त्याला जागा मिळाली. त्याच्या शेजारच्या बाकावरच्या मुलीने मोजुन सहावेळा त्याच्याकडे वळुन पाहिलं. " what is it? my post breakup glow or is it my black shirt?" त्याने विचार करत बाहेर पाहिलं.

post breakup glow..त्याला हसु आलं. ह्याच सिग्नलवरुन डावीकडे गेल्यावर कॉफी शॉप लागतं.. तिथेच यादवच्या बाईकवर बसुन ते अश्या काही आर्बिट गोष्टींवर बोलत बसायचे. दोन वर्षात तिथे येणारे बरेच चेहरे त्याच्या ओळखीचे झाले होते.. तिथे कोणी कॉफी प्यायला येत नसत..तिथे आल्यावर गप्पा मारताना काहीतरी म्हणुन लोक कॉफी घ्यायचे... मग तरी इकडेच का यायचे? यादव म्हणायचा तसं.." इथे फक्त नावाला महत्व आहे.. i think this is the most brand-conscious city... तुमच्या पॅटिस, श्रीखंडापासुन बायकांचे परकर, मुलांची शाळेची दप्तरं.. सगळ्याला ह्या शहरात brands आहेत". त्याला यादव आवडायचा, यादवच्या ह्या विचारमौक्तिकांच्या बदल्यात तो त्याला कॉलेजचे प्रोजेक्टस करुन द्यायचा... यादव त्याच्या रुमवर पडिक असायचा पण स्वतःच्या घरी त्याला दोनदाच बोलवलं यादवनं, शहराचं नाव राखलं त्यानं!

प्रेमप्रकरणात यादवने मदत केली होती त्याला.. "साले, इश्क-विश्क तेरे बस की बात नही... अभी छोड दे.. बादमे रोयेगा भाई.."... आज त्याला तिची आठवण यायला हवी होती, पण नव्हती येत. तो मुद्दामहून तिच्याबद्दल विचार करायचा प्रयत्न करत होता.. पण त्याला नेहेमीसारखं ग्लुमी वाटत नव्हतं आणि त्याला तसं आज मनापासुन वाटुन घ्यायचं होतं. स्टेशनवर उतरला. ह्या शहराबद्दलचा तिटकारा इथपासुनच सुरु झाला होता २ वर्षापुर्वी... लाईनीने उभे असणारे बिर्याणीवाले त्याला नाही आवडायचे.. स्टेशनमधे आल्यावर त्याने नेहेमीच्या टपरीवरचा चहा घेतला आणि बसला.

दर शुक्रवारी दुपारी तो इथे यायचा घरी जाण्यासाठी.. सोमवारी पहाटे घरुन निघायचा. सोमवारी घरुन निघताना त्याला जे वाटायचं ते आज इथुन घरी जाताना वाटतं आहे म्हणुन त्याला थोडं विचीत्र वाटलं. स्टेशनवर जोरात रेडिओ लागला होता. नीट मराठी येत असुन मुद्दाम अशुद्ध मराठी बोलणारी आरजे त्याच्या कायम डोक्यात जायची, ते एकमेव रेडिओ स्टेशन होतं तो इथे आला तेव्हा. "मी जात्ये गोव्याला माज्या holidays साठी.. पण my dear listeners, i will miss you.. n i will miss this awesome city, पण २ weeks मधे return येईन..." ती बोलत होती, तो ऐकत होता.. त्याने विचार केला, "miss this city? आपण काय मिस करणार? मला हे शहर नाही आवडत, कधीच नाही आवडलं , मी काय मिस करणार” तो हसला आणि ट्रेनमधे चढला..

शहर असं नाही.. पण माझी रुम नक्कीच मिस करेन.. किचनमधुन दिसणारी नदी.. यादव नाला म्हणतो त्याला! इथली थंडी, indeed most romantic winters ह्या शहरात होते...कॉलेज, प्रोजेक्ट्स, यादव नक्कीच मिस करेन.. कॉफी, कुलकर्णी काका-काकु त्याच्या बाल्कनीत उभं राहुन गप्पा मारायचे आणि आपण ते शांत उभं राहुन ऐकायचो.. ते पण मिस करेन... देउळ, आणि त्यातल्या नवसाच्या घंटा, आपण मागितलं नाही कधी पण मागितलं तर दिलं असतं त्याने, इतकी ओळख होती आता त्याच्याकडे..इथले दाबेलीवाले, इथले रिक्षावाले, इथल्या बेशिस्त ट्रॅफिकमधली शिस्त, मराठीपण आणि मराठीपण "pretend" करणारी रेडिओस्टेशन्स.. तो अजुन नवीन गोष्टींचा विचार करत होता.. त्याला हे शहर आवडायचं नाही.. अजिबात नाही.. आणि ह्या शहराचं न आवडणंच तो सर्वात जास्त मिस करणार होता. घाटात ट्रेन आली. बोगद्यातुन ट्रेन बाहेर आली... नेटवर्क परत आल्यावर त्याचा मोबाईल वायब्रेट झाला. त्याने मोबाईल काढला, पटपट कॉल लावला.. " य़ादव.. you were right.. damn you.. I hate your city.. I really hate it.. But you know what? I will miss that bloody city of urs.. no not u saale.. ur city.."


Sunday, October 11, 2009

तन्याच्या डायरीतली काही पानं

तन्मय बापट
चौथी अ
रोजनिषी
.........................................
७ सप्टेंबर २००८

आज मला कंटाळा आला. मी बाबाला म्हणाला मी शाळेत जाणार नाही. बाबा म्हणाला नको जाऊस, खाली गाड्या पुसायला लागतील कॉलनीतल्या लोकांच्या. बाबा वाईट् आहे. असंच म्हणतो कायम. बाबा मला आवडत नाही. मला म्हणाला की मी आता मोठा झालाय, आता मी शुरवीरासारखा एकटा झोपायला पाहिजे. मला तो एकटा पाडतो. तू झोप की शुरवीरासारखं दुस-या खोलीत. मी आणि आई झोपु एका खोलीत. आई पण बाबाच्या बाजुने बोलते. मी आजीला सांगणारे. मला आजीच आवडते. मी आज दाबेली खाल्ली. गणिताचा गृहपाठ राहिला आहे.
आता झोपेन एकटा. बाबाच्या आईला उद्या फोन करेन आता.
.............................................

२ ऑक्टोबर २००८
आजी आली आहे. मला सायकल घेउन देणार आहे ती ह्यावेळेला. बाबा नको म्हणाला पण आजी देणारे. बाबा म्हणाला, तनु लहान आहे.. मला कळतच नाही काही बाबाचं. मी पक्यासारखी सायकल घेणार आहे, गिअरवाली.. झूम..झूम शाळेत जाता येईल. रिक्षानी जायला जाम बोर होतं. त्या स्टुपिड मुली काहीही बडबडत असतात. त्या सायलीला बहिण झालीये म्हणे नवीन. पकाऊ..त्याबद्दलच सांगत असते. आणि सगळ्या मुली क्युट, स्वीट, कित्ती गोड म्हणत असतात. मी आणि आलोक त्यांच्या बॅगांचे पट्टे तोवर बांधुन ठेवतो. तेवढीच मज्जा येते. मी झोपतो आता आजीजवळ.
................................................

३० ऑक्टोबर २००८
आज काहीतरी घरात सॉलिड झालं आहे. मला कळलं नाही नीट. मी खेळुन आलो तर कोणी मला हात-पाय पण धुवायला सांगितले नाहीत. मी बाबाच्या लॅपटॉपवर जवळ बसलो तरी त्याने लक्ष दिलं नाही. जाम काहीतरी झालं होतं. आई आतल्या खोलीत होती. बाबा आणि आजी बाहेर.. आई बाहेर आली तेव्हा वेगळीच दिसत होती. रडल्यासारखी. मी सायलीला परवा ढकललं तेव्हा सायली अशीच दिसत होती. आजी लगेच मला घेउन आत आली. तनु आता ७ वर्षाचा आहे, कळतं का तुला? असं काहीतरी आई बोलत होती. बाबा काय बोलत होता ऐकु येत नव्हतं. काय झालं असेल? आजी पण काही सांगत नाही नीट.
.....................................................

९ नोव्हेंबर २००८
आज मी आणि आईने मज्जा केली खुप. आई शाळेत घ्यायला आली होती. मग आम्ही संभाजीपार्कात जाउन भेळ खाल्ली. तिच्यातल्या २ पाणीपु-यापण मी खाल्ल्या. नवीन टीशर्ट घेतले २. आईस्क्रिम खाल्लं. आणि हे सगळं झाल्यावर ती विचारत होती की बर्गर खायचा आहे का मेकडोनल्डमधला. मी नाही म्हणणार होतो पण मग आम्ही गेलो. आई वेगळीच वागते आता काही दिवस. मला काहीही विचारत होती. मला म्हणाली तुला एकट्याला झोपायला भीती वाटते ना? तर तुझ्याबरोबर झोपायला कोणी आलं तर? काहीही बोलत होती. पण मज्जा आली आज. आजीने अजुन सायकल आणली नाही आहे. बहुतेक आम्ही रविवारी जाउ.
......................................................

१३ नोव्हेंबर २००८
मी कोणाशीही बोलत नाही आहे. राग आलाय मला सगळ्यांचाच. सगळे खुप वाईट आहेत. मी नाही वागत का शहाण्यासारखा? मी त्रास देतो का कधी त्यांना? मी शाळेत जातो. मी ते सांगतात ते सगळं ऐकतो. सायकलचा हट्ट पण मी केला नाही सारखा सारखा. आजी आपणहुन म्हणाली मी देते म्हणुन. आणि आता हे म्हणतात की ते अजुन एक लहान तनु घेउन येणार म्हणे. मी त्याला येऊच देणार नाही. आला तरी मी त्याला माझ्या खोलीत घेणार नाही. माझं घर आहे. माझे आई-बाबा आहेत. हा कोण नवीन येणार आता माझ्या घरात? साऊ परवाच सांगत होती तिची आई साऊ ला जवळ घेत नाही जास्त त्या बाळालाच जवळ घेते सारखी. एक बाळ असताना दुसरं बाळ का आणतात?
.........................................................

२९ नोव्हेंबर २००८
मी आज एकटा रिक्षापर्यन्त गेलो. मी आज माझ्या बुटांची लेस स्वतः बांधली. आता कोणाला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ होणारच नाही ना. मी सवय करुन घेणार होतो पण सायली म्हणाली की इतक्यात नाही येणारे तुमच्याकडे बाळ. मे महिन्यात येईल असं तिची आई म्हणत होती. तिच्या आईला काय माहित? आमचं बाळ आहे. आम्हाला हवं तेव्हा हॉस्पिटलात जाउ आणि आणु आम्ही बाळ. आजी म्हणाली उद्या जाऊ सायकल आणायला. मी गंमत करणारे. माझ्याकडेपण खुप पैसे आहेत. मी आजीला पुस्तक घेउन देणारे तिनी सायकल घेऊन दिल्यानंतर. उद्या आजी झोपली की मी पिगी बॅन्क उघडेन. आजीच माझी लाडकी आहे.
..........................................................

४ डिसेंबर २००८
बाबा हल्ली उशिरा घरी येतो आणि आई खूप लवकर घरी येते. ती आता जास्त क्लास घेत नाही. आई माझी चित्रकार आहे. ती म्हणाली आहे की ती माझी खोली सजवुन देणारे. मला माहित्ये ती खोली माझ्यासाठी नाही, नवीन बाळासाठी सजवणारे. आजीनी परवा सायकलच्या दुकानातुन परत येताना मला सांगितलं की आता आईला त्रास द्यायचा नाही. तिच्याकडे हट्ट करायचा नाही. तीला कामात मदत करायची. पण मी कधीच आईला त्रास दिला नाही. आलोक म्हणतो लहान भाउ आल्यावर मोठा भाऊ आई-बाबांना वाईट दिसायला लागतो. साऊने पण तसच सांगितलं होतं. पण माझी आई चांगली आहे. ती असं वागणार नाही. बाबाचं माहित नाही. मी आज एकट्याने सोसायटीच्या गेट्पर्यंत सायकल चालवली.
...........................................................

२४ डिसेंबर २००८
आज आईचे पाय खूप दुखत होते. मी विचारलं चेपुन देऊ का? तर जवळ घेत म्हणाली. नको रे तन्या, तू खेळायला जा. मी गंमत केली. कोणाला न सांगता माझ्याकडचे पैसे घेउन सायकल ने सोसायटी बाहेर गेलो. एकट्याने रस्ता क्रॉस केला आणि पाय दुखायचा औषध घेउन आईला आणुन दिलं. आई तर रडायलाच लागली. मला कळलं नाही काहीच. मग म्हणाली तनू मोठा झाला माझा. मी मोठा झालोच आहे. आणि आजीचा ऐकायचं असं ठरवलं आहे. आईला त्रास नाही देणारे मी. आईने बाबाला सांगितलं तेव्हा बाबाने पण कौतुक केलं. बाबा म्हणालाय ह्या रविवारी पिक्चर बघायला जाऊ. बाबा पण तसा चांगला आहे.
...............................................................

१६ जानेवारी २००९
बाळ कसं होतं? मला कोणी सांगितलंच नाही आज मी सगळ्यांना विचारलं. मला आणि आलोकला वाटायचं हॉस्पिटलमधे मिळतं बाळ. पण सायली म्हणाली आईच्या पोटातुन येतं बाळ. पोटातुन कसं काय येईल? सायली येडी आहे. माझ्या आईचं पोट कापतील ते? आईला काही होणार नाही ना माझ्या? आईला हल्ली कुठे कुठे दुखतपण असतं. मला वाईट वाटायला लागलं आहे. मला आई आवाडते माझी. प्लीज देवा, माझ्या आईला काही करु नकोस. मी त्या नवीन बाळाशी चांगला वागेन. रविवारी सोसायटीतल्या सुरेखा कुत्रीला ५ पिल्लं झाली. बाबा म्हणाला आपल्याकडे एकच बाळ येणारे. मी घाबरलोच होतो. ५ भाऊ-बहिणी झाले असते तर आम्ही "मोठे कुटुंब- दु:खी कुटुंब" झालो असतो.
.............................................................

२८ जानेवारी २००९
बाबाने सांगितलं की लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी देव बाळ देतो आई-बाबांना. जर त्यांनी चांगला वाढवलं पहिल्या बाळाला तर अजुन एक बाळ देतो. म्हणजे देवाला वाटलं माझे आई-बाबा मला चांगलं वागावतात तर! बाळ पोटातुन बाहेर येतं. पण बाबा म्हणाला आईला काही होणार नाही. मग ठीक आहे. पण बाळ पोटात जातं कसं हे विचारलं तर म्हणाला आजीला विचार. बाबा इतका मोठा झालाय तरी त्याला खुपश्या गोष्टी माहित नाहीत.
आजी शहाणी आहे. आजीने बरोबर सांगितलं. माझ्या डोक्यात बुद्धी आहे. कुठुन गेली कळलं का? नाही ना. तसचं बाळ येतं. आजीने बाबांना काही शिकवलं नाही बहुतेक. बाबाला तर हनुमान स्तोत्रपण पुर्ण येत नाही. पण तो कठीण कठीण श्लोक म्हणु शकतो.
..................................................................

६ फेब्रुवारी २००९
सायलीची आईपण येडीच आहे सायलीसारखी. तिने सायलीला सांगितलं की प्रसाद खाल्ल्यामुळे बाळ होतं. हनुमानच्या आईने नाही का आकाशातुन पडलेला प्रसाद खाल्ला आणि मग हनुमान झाला. मलाही आता वाटतं आहे तसं. आलोक तर घाणेरडा आहे. तो घाण काहीही सांगतो पिक्चरमधल्यासारखं. मी आणि सायली बोलत नाहीयोत त्याच्याशी. काल आई विचारत होती, भाऊ झाला तर नाव काय ठेवायचं? मी आईला सांगितलं, भाऊ झाला तर म्हणजे काय? मला भाऊच हवा. मुली नाही आवडत मला. बावळट असतात. मी विचार करतोय आता भावाच्या नावासाठी. सचिन किंवा राहुल किंवा रिहितीक किंवा शाहिद असं काहीतरी पाहिजे. महेन्द्र नाही आवडत नाव मला आणि धोनी तर आडनाव आहे.
.......................................................................

२९ मार्च २००९
मी आणि बाबा आणि आजी आम्ही तिघंच आहोत आता. आई मुंबईला गेल्ये तिच्या आईकडे. मी पण जाणार होतो पण माझी वार्षिक परीक्षा आहे. आईला सांगितलं आहे मी, मी आल्यानंतरच बाळ आण. आई म्हणाली मे महिन्यात आणेल. साऊची आई हुशार आहे म्हणजे, ती म्हणाली होती. बाबा आणि मी खुप धमाल करतो. आम्ही दोघं परवा सकाळी सायकल चालवत ग्राउंडवर गेलो होतो. बाबा खुप मस्त आहे. तो विडीओ गेम पण घेउन देणारे. बाबा असा वेगळा वागतो ना कधी कधी कळतच नाही. आजीपण माझ्या आवडीच्याच भाज्या करते. आईसारखं वांगं नाही खायला लावत. पण खरं सांगु? मला आईची आठवण येते. मला आईच्या कुशीत झोपायचं आहे. तिचे पाय दुखत असतील तर तिथे तिला कोण औषध देत असेल? परीक्षा झाली की त्या च्या त्या दिवशी मी मुंबईला जाणार.
.................................................................

५ एप्रिल २००९
माझी परीक्षा संपली. मला आजच मुंबईला जायचं होतं पण बाबा वाईट आहे. तो म्हणाला रविवारी सोडेल तो मला मुंबईला. मी आईला रोज फोन करतो. आईपण मला करते फोन. आलोक मला म्हणाला. बघ बाळ यायच्या आधीच आई लांब गेली तुझ्यापासुन. असं खरचं असेल का? आई माझ्यावर प्रेम करेल ना? मला रडुच येतं रात्री झोपताना. सायलीची बहिण साऊचे केस ओढते आता आणि सायलीने तिला मारलं तर तिची आई सायलीलाच ओरडते. माझा भाऊ मारकुटा असेल तर? मला कोणी धड कसलं उत्तरच देत नाही. कोणालाच काही माहित नाही.
......................................................................

१० मे २००९
मी मुंबईत आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमधे बाळ मिळत असताना आई मुंबईला का आली? मी आईबरोबर आज हॉस्पिटलमधे गेलो होतो. तिथे २-३ बाळं पाहिली ठेवलेली. किती लहान होती. छोटी एकदम. सुरेखाच्या पिल्लांसारखी क्युट. मी क्युट म्हणालो तर आई हसली. पण बाळं खरचं क्युट असतात. तिथल्या डॉक्टरकाकु मला म्हणाल्या. काय मग दादा होणार ना तू आता? मज्जा करणार ना? . मला असली धमाल वाटली. इतके दिवस लक्षातच नव्हतं आलं. मी दादा होणारे.’तन्मय दादा’ म्हणेल मला माझा भाऊ. कसलं भारी. मला खूप आनंद झाला आहे. मी आईला सांगितलं मी चिन्मय नाव ठेवणारे भावाचं आणि त्याला चिनु म्हणायचं. चिनुला मी सायकलवर शाळेत नेईन.
.....................................................................

१ जुन २००९
ढीपाडी डिपांग.. ढीपाडी ठिपांग... मी दादा झालो. मी तन्मय दादा झालो. आम्हाला बाळ झालं आहे. मुलगा बाळ. गोरं आहे एकदम सायलीसारखं. मी काल त्याच्याशी बोलत होतो तर हसला तो. आणि त्यानी बोटचं धरलं माझं.
त्याला मी आवडतो. मला तो आवडतो आणि आई-बाबांना आम्ही दोघं आवडतो. जरा मोठा झाला तो की मी त्यालाच विचारणारे तू कसा झालास नक्की? मला माझा जन्म आठवत नाही. चिन्या विसरायच्या आधीच त्याला विचारणारे.

Friday, September 25, 2009

साबणाचे फुगे

गेले २-३ दिवस खूप कंटाळ्यात घालवले, कंटाळा म्हणण्यापेक्षा अस्वस्थतेत घालवले. अंगावर आलं होतं सगळं, लोकं बेजबाबदार, unreasonable वागत होती. सगळ्यातुन बाहेर यायचं होतं ... पण तरीही बाहेर पडायचा मुड नव्हता. त्यातुन आमच्या एरिआत नवरात्रीमधे जत्रा असते. ९ दिवस माणसंच माणसं, गर्दी, फेरीवाले, गाड्या आणि सगळ्याचा आवाज.. भयानक कंटाळा आला होता!

पण तरीही बाहेर पडले...गर्दीतुन वाट काढत, माणसांमधुन चालत मी पुढे जात होते. I hate it when people walk real slow and that too in groups! चमचमत्या साड्या नेसुन, नटुन-थटुन आलेल्या मुलींचे घोळके डोक्यात जातात राव.. अगं बायांन्नो मज्जा करा, खरेदी करा, धमाल करा, खा-प्या.. वाट्टेल ते करा.. पण अशी वाट अडवु नका गं.. जरा, म्हणजे अगदी जर भराभर चाला की.. बरं slow चालायचं आहे? चाला.. हळू चाला. पण मग निदान रस्त्याच्या कडेने तरी चाला ना पोरीन्नो.. राग राग होतो अगदी!

असे मंद घोळके पाहिले की आमचं पुणं आठवतं ( कसलं सहजपणे आमचं पुणं लिहीलं मी.. आवडलं मला) . तुळशीबागेत, मंडईत, लक्ष्मी रोडवर असे मंद घोळके फिरत असतात पण तिथे कोणालाच विशेष घाई नसते त्यामुळे कितीही हळू चाललं तरी त्रास होत नाही. तिथल्या हवेत आहे तो मंदपण, पण छान असतो तो.. पुण्याबाहेरच्या लोकांनांच त्रास असतो.. उगाच नावं ठेवत असतात. आई गं, पण मी तरी कुठे पुण्याची आहे? हे असं confusion कायम होतं माझं मी कुठली आहे हे ठरवताना.

तोच विचार करत मी पुढे चालले होते. तेव्हा एका कपड्यांच्या दुकानासमोर एक आई आणि सुप्पर्रगोड छोटीशी मुलगी, त्या मुलीसाठी छानसा, cuteसा, छोटासा स्कर्ट घेत होत्या. ते इतकं cute होतं की नकळतपणे मी जरा मोठयानेच म्हणाले "कसलं गोड" . ती आई मा्झ्याकडे बघुन हसली. व्यवस्थित घारी-गोरी असुन हसली ह्याचं मला आश्चर्यच वाटत होतं. मी पण हसले मग...

तिथुन पुढे वळल्यानंतर पाणीपुरी-भेळपुरीच्या गाड्या दिसायला लागल्या आणि एकदम भुक लागल्याचं जाणवलं. भुक म्हणजे अगदी भुक नाही पण शरीराला पाणीपुरी-शेवपुरी-भेळ वगैरे अश्या उघड्यावरच्या अन्नाची deficiency जाणवायला लागली. १-२ प्लेट पाणीपुरी कोणीही खातं राव.. म्हणजे खायलाच पाहिजे. पण एका पाणीपुरीवाल्याकडुन २ प्लेट खाउन "तिखा बनाया भैय्या" सारखं हिंदी फाडत त्याच्यासमोर दुस-या पाणीपुरीवाल्याकडुन मिडीयम पाणीपुरी खायला मज्जा येते. पाणीपुरी खाल्यानंतर डोळ्यांतुन पाणी आलं तरचं ती पापु best असते. तृप्ती आणि आनंदाश्रु at their best असतात तेव्हा!

थोडं पुढे गेल्यावर गर्दी वाढली. खुप फेरीवाले होते. काय काय भारी भारी विकत होते. खेळणी, गाड्या, फुगे, पिपाण्या, धनुष्य-बाण, टोप्या, खोटे दागिने, घड्याळं, पिना-बिना, दिवा लागणारं पेन, रेडियम ची खेळणी, पिसांची पेन्सिल, शाकालाकाबुमबुमच्या पेन्सिली आणि खूप काही. भविष्य सांगणारे रोबो होते, आकाशपाळणे, टोरो-टोरो, ट्रेन, आकाशात उंच उडणारे आणि दिवा लागणारे चेंडु फेरीवाले उडवुन दाखवत होते, मेंदीचे ठसेवाल्या बायका, फुलंवाले, खाजा, सुतारफेणी, बदाम हलवा आणि तत्सम मिठाईवाले, सगळीकडे गलका.. सगळे आपापली वस्तु जोरजोरात ओरडुन विकायचा प्रयत्न करत होते. मी हरखुन गेले होते, माझ्यातली लहान तेजु उड्या मारुन मला सांगत होती "बाबा नाहीयेत ना आत्ता इथे.. घे की तुला हवं आहे ते बिन्धास्त.." काय काय होतं तिथे. इथे तिथे बघत असताना अचानक माझं लक्ष गेलं साबणाच्या फुग्यांकडे.. लहानपणापासुन आत्तापर्यंतचा माझा सर्वात आवडता खेळ.. साबणाचे फुगे. त्या बाईच्या दिशेने जायला लागले आणि दिपीकाने आडवलं "ताई उगाच काय काहीतरी? वेडी आहेस का? लहान आहेस का आता?" मी इतरवेळी तिला दचकुन असले तरी मी ह्यावेळेला तिचं ऐकलं नाही मी त्या बाईकडुन ८ रुपयांची साबणाच्या द्रावणाची डबी घेतली. बाबा पुर्वी घेउन द्यायचे तेव्हा जसा आनंद व्हायचा तसाच आनंद झाला.. भारी वाटलं, एकदम भारी!

लहान मुलांसारखं ते विकत घेतल्यावर रस्त्यावर फुगे उडवणं बरं नसतं दिसलं म्हणुन पटापट घरी चालत आले. घरी आल्या आल्या चपला उडवुन पिशवीतुन डबी काढली आणि साबणाचे फुगे बनवायला सुरुवात केली.. कसली मज्जा आली राव.. काय ना त्या फुग्यांचं आयुष्य.. काही क्षणाचं.. माझ्या बदलत्या मुड्सप्रमाणे.. कंटाळा, राग, confusion, आश्चर्य, आनंद... एक फुगा फुटुन लगेच दुसरा उडणार..
काही वेळासाठीच पण खुप आनंद देणारे आणि मग काही हवेत विरुन जाणारे तर काही फुटुन जाणारे.. डोक्यातल्या असंख्य विचारांसारखे..
त्यांच्यातल्या वेगवेगळ्या रंगांच्या छटा, लहान मोठे आकार, काही खुप दुर उडणारे काही जवळ्जवळ राहणारे.. माझ्या आजुबाजुच्या लोकांसारखे.. त्यांच्या आठवणींसारखे!
जोरात फुंकर घातलीत तर भर्रकन अनेक लहान फुगे उडतील. हळुवार नाजुकपणे फुंकर मारलीत तर मोट्ठा छान जास्त वेळ टिकणारा एखादा फुगा तयार होईल. Time, patience, commitment आणि relationship ची गणितं एका क्षणात समजावुन सांगणारे फुगे.

असाच एक मोठ्ठा फुगा मी हळुवार फुंकर घालुन तयार केला आणि मग तो उडायच्या आधीच त्याला माझ्या हातानी फोडला... माझा २-३ दिवसांचा कंटाळा हवेत विरुन गेला.

(ही पोस्ट अपुर्ण आहे, random आहे, पण तरीही publish करावीशी वाटली म्हणुन..)

Wednesday, September 16, 2009

आनंद

मी त्याला एकदाच भेटले. तेसुद्धा फक्त २ तास बोलणं झालं... म्हणजे २ तास तो बोलत होता मी ऐकलं. पण उसमें कुछ बात थी! भन्नाट माणुस होता. मला इतके दिवस गर्व होता की मी कितीही बडबडु शकते... खूप खूप बोलु शकते अगदी non-stop वगैरे.. पण साडेसाती संपता संपता शनिने आनंदला भेटवुन माझं गर्वहरण केलं. Boss.. 2 तास एका अनोळखी माणसाशी बोलणं, ते सुद्धा अगदी प्रामाणिकपणे.. परीक्षेच्या दिवशी..महान होतं ते! काही माणसं बघुनच कशी आहेत ते कळतात..म्हणजे त्यांच्या डोळ्यांना खोटं बोलताच येत नाही..तसे आनंदचे डोळे होते. कित्ती प्रामाणिक, साधे... किती भोळा माणुस आहे तो!

परीक्षेसाठी मी सेंटरवर गेले आणि नोटिस बोर्डावर माझा नंबर बघत होते. तो तिथे बाजुलाच उभा होता.. अगदी कोणाचंही त्याच्याकडे लक्षसुद्धा जाणार नाही असा दिसणारा.. मी नंबर बघुन माझ्या exam hall कडे निघाले.. तो पण मागुन आला... "कुठे आलाय तुमचा वर्ग?"
मी वळुन पाहिलं फक्त.. "बेसमेन्ट"...
त्याला लगेच आनंद झालेला दिसला.. "माझा पण तिथेच आलाय नंबर.. कुठे असतं ते माहित्ये का?"
म्हणजे मी शिष्ठ नाहीये आणि मुद्दामहुन पण तसं करत नाही पण माझी एक भुवई उंचावली गेली.. बब्बा.. तू इथे इतकी मोठी परीक्षा द्यायला आला आहेस.. बेसमेन्ट नाही माहित? .. " हे काय इथे खाली जाउन.. लिहीलं आहे तिथे बेसमेन्ट म्हणुन".. तो हसला आणि म्हणाला "हो का? असेल.. कोणत्या वर्गात आलाय तुमचा नंबर?"
"तीन नंबर खोली".. तो परत हसला... त्यांच्या हसण्यामधे काहीतरी वेगळं जाणवलं मला.. पण तेव्हा कोणाचं analysis करण्याचा mood नव्हता..
"अभ्यास झाला का तुमचा? माझा नाही झालाय नीट.. पत्रकारितेचा इतिहास वाचलात का? महत्वाचा भाग आहे.. त्यावर येतात प्रश्न.. काय वापरुन केलात तुम्ही अभ्यास?"
" मी college notes फक्त"
तो परत हसला...

मी माझ्या जागेवर येउन बसले.. त्याची जागा खरं तरं खूप पुढे होती पण तोसुद्धा आला माझ्या बाजुच्या बाकावर.
" अश्या ओळखी झाल्या ना की बरं असतं.. contacts निर्माण होतात. एकमेकां साह्य करु म्हणतात ना..तसं , म्हणजे आता उद्या विद्यापीठात काही काम असेल तर मला सांगु शकतेस.. मला काही मदत हवी असेल तर मी तुला विचारु शकतो.. मला ना ह्या क्षेत्रातलं काही माहित नाही..म्हणुन मी मैत्री केली तुझ्याशी..नवीन गोष्टी कळतात नवीन माणसं भेटली की"... मी बघत होते फक्त त्याच्याकडे.. गाडी तुम्ही वरुन तू वर आली.. मैत्री पण केली? मला खरं तरं हसुच येत होतं.. पण मी फक्त "हो बरोबरे" इतकंच म्हणाले.
"माझं नाव आनंद.. तुझं काय आहे?" असं म्हणुन त्याने हात पुढे केला.. मी (again m not at all शिष्ठ) हात नाही पुढे केला फक्त माझं नाव सांगितलं.. आता तो बिचारा हसला आणि पुढे केलेल्या हाताचं काय करायचं ह्या विचारात पडला.. मग मलाच वाईट वाटलं आणि मी handshake केला. मग तो परत मोठ्ठं हसला... हां, आता कळलं त्याच्या हसण्यात काय वेगळं आहे ते.. तो हसताना त्याचे खालचे-वरचे सगळे दात दिसतात.. (माझे फक्त वरचेच दिसतात.. तुम्ही पण हसुन बघा.. म्हणजे पाहिलं असेलचं एव्हाना :P )

5'5''-6'' वगैरे उंची, दाढीचे खुंट वाढलेले, मिशी, बारीक डोळे, व्यवस्थित कापलेले केस, पांढरा सदरा आणि मातकट पॅंण्ट... त्याच्यासारखी दिसणारी ६७ माणसं असतील एखाद्या ST standवर... पण त्या ६७ माणसांपासुन ह्याला काही वेगळं करत असेल तर त्याचं मनापासुनचं मोठ्ठं smile..
"वडील काय करतात तुझे?.. ओह चांगलं आहे.. भाउ-बहिण कोण? फक्त एक बहिण? आधुनिक दिसता म्हणजे तुम्ही..चांगलं आहे. मी सोलापुरचा आहे.. आमची शेती आहे तिथे. मी आधी मराठीत MA केलं आहे.. आणि आता पत्रकारिता" हा माणुस बोलतच राहिला.. मी फक्त उत्तरं देत होते तो विचारत होता त्याची.. आणि "हो बरोबरे" एवढंच.. म्हणजे त्या पलीकडे मला बोलायला काही chanceच नव्हता. घरुन निघतानाचं परीक्षेचं tension ह्याच्या बडबडीमुळे कुठच्या कुठे गेलं होतं. तो त्याच्या बाकावर जायला निघाला आणि एकदम थांबुन म्हणाला.. "तुझी पिशवी आहे ना? माझी वही ठेव त्यात"... दिपीकाला मी अजुन सांगितलं नाही आहे की तिच्या नवीन trendy college bag ला एक मु्लगा पिशवी म्हणाला... "best of luck.. पेपर झाला की बसुया एकत्र म्हणजे जरा चर्चा करता येईल नं" असं म्हणाला तो पुन्हा एकदा सगळे दात दाखवुन.. मी जरासं smile दिलं.. "best of luck"... त्याच्या बाकावर बसल्यावर परत एकदा त्याने मागे वळुन पाहिलं आणि हसला... मी किती sad आहे म्हणजे मी किती कमी हसते ते मला एकदम तेव्हा जाणवलं.

माझा पेपर तसा लवकर झाला.. मी बसले होते अशीच. आनंद लिहीत होता, मधेच त्याने इथे-तिथे पाहिलं ..मी तशीच बसल्ये हे पाहिल्यावर त्याचे बारीक डोळे जेवढे मोठे होऊ शकतात तेवढे मोठे करुन .. "झाला?" असं विचारलं. मी मान हलवली.. ती सुद्धा किती थो्डीशी...आणि त्याचा पेपर लिहीणं सुरु असुनसुद्धा तो किती मनमोकळं हसला... त्याच्या आई-बाबांनी अगदी बरोबर नाव ठेवलं आहे त्याचं.
एक पेपर झाल्यावर दुसरा पेपर सुरु व्हायला दिड तास वेळ होता. बाहेर पडतानाच त्याने विचारलं.. "शेवटच्या प्रश्नाचं काय लिहीलं उत्तर?" मला दडपणचं आलं.. बापरे आता हा चर्चा करणार की काय? पण मी उत्तर द्यायच्या आधीच तो बोलायला लागला " मी तिसरा पर्याय लिहीला.. तोच आहे बरोबर पण म्हणजे वर्तमानपत्र आणि त्याचे संपादक पाठ केले होते.. तसा चांगला होता नं पेपर? आता पुढचा कसा जातो बघायचं, वेळ आहे अजुन.. बसुया कुठेतरी.. काही खायचं आहे का तुला? मला नकोय काही.. एखादं फ्रुटी प्यायलं तरी बास होतं.. पण आत्ता बसुया जरा.. जरा बोलु आणि मग बघुयात. तू बस मी आणतो एक पुस्तक मित्राकडुन.. तो दुस-या वर्गात होता...." आणि मी म्हंटलं.. "हं..ये"

"आमचं गाव अक्कलकोट, पंढरपुर आणि तुळजापुर पासुन प्रत्येकी ४० किमीवर आहे. ये कधी गावाला आमच्या.. अक्कलकोट्ला घेउन जाईन तुला.. तिथे गेल्यावर काहीतरी वेगळंच वाटतं बघ.. म्हणजे सांगता येत नाही. आपल्याबरोबर कोणीतरी असल्यासारखं.. माझी स्वामींवर खुप श्रद्धा आहे. आपण कष्ट करतो पण शेवटी फळ मिळण्यासाठी बरोबर कोणीतरी असावं लागतं. स्वामी मदत करतात, मी गावाला गेलो की जाउन येतो दोस्तांसोबत स्वामींच्या दर्शनाला"... मला एकदम तो टिळा लावुन वगैरे दिसायला लागला "तू धार्मिक दिसतेस.. घरी आई-वडिल, आजी-आजोबा करत असतील ना देवाचं.. म्हणजे रामायण-महाभारत वाचत असतील ना?" इतका वेळ मी हसले नव्हते पण आत्ता हसले.. "नाही मी इतकी नाही.. बाबा वाचतात".. रामायण-महाभारत.. :)

मी आईला कॉल केला मधेच.. बोलुन झाल्यावर हा सुरु झाला "तुला सांगतो तेजश्री... (मला सॉलिड्ड राग आला होता. पण काही बोलले नाही) आमच्या गावात अजुन वीज नाही. कोम्प्यूटर सोड मला मोबाईलही अजुन वापरता येत नाही. म्हणजे आजच्या भाषेत MA करुनही मी अशिक्षीत आहे बघ. मी मराठीत MA केलं.. पण पुढे काय करणार? phd करुनही पुढे काय? म्हणजे उगाच इतकं शिका..आणि पुढे काय उपयोग? म्हणुन हा पत्रकारितेचा कोर्स केला.. विद्यापीठात राहतो मी.. आमची शेती आहे ६ एकर उसाची.. भाऊ नोकरी करतोय त्यामुळे शिकु शकतोय.. म्हणजे तसं चांगलं आहे. पण अपराधी वाटत राहातं.. रोजचा बस, जेवणाचा खर्च वगैरे धरुन २५-३० रुपये होतात. आई आठवड्यातुन एखादवेळा फोन करते.. विचारते कसं चालु आहे? नीट जेवतोय्स ना?.. खुप वाईट वाटतं. ते आपल्यासाठी इतकं राबतात आपण काहीतरी करायला हवं.. म्हणुन मला प्राध्यापक होयचं आहे. तेवढाच आईला अभिमान पोरगा प्राध्यापक झाला! गावात असं शिक्षणाचं वातावरण नसतं.. झालाच तर पोरगा शिक्षक होतो. पण इतक्या शिक्षकांना नोक-या द्यायला शाळापण हव्यात ना.. मला दहावीत असताना ७२% मिळाले. तेव्हाच ठरवलं प्राध्यापक व्हायचं, काहीतरी करायला हवं.. त्यांच्यासाठी." त्याच्या डोळ्यांत कळवळ दिसत होती. किती वेगळी जगं आहेत आमची...मी काही बोलणार तेवढ्यात तो परत सुरु झाला..
"अगं पण हे कळत नाही आजच्या मुलांना.. तुला सांगतो तेजु ( तेजश्रीपेक्शा तेजु बरं होतं) विद्यापीठातलं वातावरण इतकं वाईट आहे.. परवाची गोष्ट आहे..आम्ही कॅण्टीनमधे बसलो होतो. एक मुलगी रडत होती आमच्या बाजुच्या टेबलवर तिचा प्रियकर असावा सोबत. तो तिला काहीतरी सांगत होता, आणि ती रडत होती.. ह्या पोरींना उध्वस्त होण्यात काय मिळतं? त्या शिकायला आलेल्या असताना प्रेमात पडतात.. त्यांना कळत नाही जेवढं उडाल तेवढं जोरात आपटाल.. कळत कसं नाही ह्यांना? माझी बहीणीने असं काही केलं असतं तर मी तिला एक दिली असती लगावुन.. उध्वस्त होण्याची ओढ.. दुसरं काय?" माझा चेह-यावर मी सिरिअस भाव ठेवले होते.. पण मनात ह्सत होते.. मला आवडलं.. ’उध्वस्त होण्याची ओढ’
"माझ्या मागे लागली होती एक मुलगी.. विश्वास नाही बसणार तुझा" hehe.. आता हे interesting होतं.. " अगं, माझ्या मागे लागली.. मी संयमाने वागुन होतो. कारण मला माहित होतं एकदा ह्यात पडलो की उध्वस्त होऊनच बाहेर पडतो माणुस.. मी तिला जरा चांगल्या गोष्टी सांगायला लागलो.. तिला म्हणालो.. अभ्यास कर.. मी friendship देउ शकतो. पण १४ फेब्रुवारी ला प्रपोजचं मारलं कि तिनं मला... " बाबाबाबास्स्स... मला sollidd हसु यायला लागलं.. तो कसला blush होत होता हे सांगताना..किती निरागस..
" मी आधी नाहीच म्हणालो.. पण मग म्हणालो.. माझ्यामुळे सुधारेल मुलगी...पण कुठचं काय? अगं एक दिवस म्हणाली बागेत जाउया.. तिथली जोडपी बघुन मला कसंतरीच वाटलं.. शिकायला येता विद्यापीठात का आसं काही करायला? मी निघुन आलो तिथुन.. तिला म्हणालो जरा दिवस थांबुया.. प्रेम खरं असेल तर काही होणार नाही.. २-३ महिने गेले मधे.. मी सुट्टीसाठी गावाला गेलो.. शेवटी मी पण माणुस ना.. मला पण तिच्याबद्दल वाटायला लागलं.. परत आलो तेव्हा मित्र म्हणाला ती दुस-याबरोबर असते..आणि त्याच संध्याकाळी दिसली ना दोघं एकत्र.. मी सरळ गेलो आणि थोबाडीत मारली तिच्या.." काय्य? मी त्याला परत विचारलं.. "काय केलंस तू?" म्हणजे हे भन्नाटच होतं..
"मारलं.. आणि हेसुद्धा म्हणालो.. तुझा अपमान झाला असेल तर ह्यापेक्षा जास्त गर्दी असताना दोन्ही गालांवर मार माझ्या.. बदलाच घ्यायचा असेल तर.. पण तुला परत काही करता येत नाही.. प्रेम पण परत नाही करता आलं.. पण आत्ता मी तुझं प्रेम तुला व्याजासाकट परत केलं... आणि निघुन आलो तिथुन मी" मला एकदम आदर वाटायला लागला त्याचाबद्दल.. कसला माणुस आहे.. काहीही करतो..आणि कोण कुठली मी .मला अगदी लहान मुलं गोष्ट सांगतात तसं सगळं सांगत होता.

"तुझा नंबर देउन ठेव.. संपर्कात राहुया आपण" तेवढ्यात पेपरची बेल वाजली, आम्ही आत गेलो.. त्याने सगळे दात दाखवुन परत एकदा best of luck दिलं. मी पण हसुन बघितलं. पेपर झाल्यावर खुप जोरात पाऊस पडत होता. बाबा घ्यायला आले होते मला.. त्याला म्हणाले चल स्टॅण्डपर्यन्त सोडते तुला.. बाबांनी विचारलं मला "कसा होता पेपर?" मी म्हणाले "चांगला होता".. तेवढ्यात आनंद लगेच म्हणाला "पुढच्या वेळी नक्की पास होईन हा विश्वास आहे मला"... मग मी बाबांशी बोलत राहिले. त्याची उतरायची जागा आली.. तो उतरला..पाउस होता त्यामुळे पळत पळत आडोश्याला जाउन उभा राहिला... आणि तिथुन हात हलवला.. मला एकदम लक्षात आलं की त्याला आपण फोन नंबर दिलाच नाही.. पण तेव्हा उशिर झाला होता. मी पण फक्त हात हलवला.. त्याने त्याचं मोठ्ठं smile दिलं..

पुन्हा कधी तो भेटेल माहित नाही.. जेव्हा कधी भेटेल तेव्हा मी आपणहुन जेवढं मोठं smile देउ शकते तेवढं देईन.. :)



Thursday, July 30, 2009

म्याव २

करड्या आणि ताई जोरजोरात ओरडत होते. आई कुठे गेली आहे, का गेल्ये हे त्यांना अजुन कळलं नव्हतं. मी त्यांना सांगणार होते, आई आपल्याला सोडुन गेल्ये म्हणुन पण त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नसता. मी त्यांच्याकडे बघत शांतपणे बसुन होते. पिंगळी मावशीची वाट बघत होते मी. आई तिला नक्कीच सांगुन गेली असेल. मावशीला माहित असेल बहुतेक सगळं!

.... कितीत्तरी वेळ झाला होता. आता मी जिथे बसले होते...तिथे माझ्या अंगावर उन यायला लागलं होतं. ओरडुन ओरडुन करड्या आणि ताई दमले. करड्या तर माझ्या जवळ येउन ऊन खात झोपला. ताई जागीच होती पण ती नुस्ती बसुन होती, काहीही न बोलता. एकदम शांत! मला एकदम ती आईसारखी वाटली..मला आता रडु येणार होतं म्हणुन मी ताईच्या जवळ जाऊन बसले. तिला चिकटुन बसले अगदी. मी जवळ आलेलं तिला मुळ्ळीच आवडायचं नाही पण आत्ता ती काहीच बोलली नाही. माझ्याकडे एकदाच पाहिलं...मग डोळे मिटले आणि दुसरीकडे मान फिरवली. थोडी आक्रसुन बसली आणि एकदा जोरात शेपटी हलवली. मला ती लागली. बहुतेक तिला सुचवायचं असेल की जरा लांब बस. पण मी तिला चिकटुनच बसले. अजिबात हलले नाही. आईची आठवण येत होती आता मला खूप... खूप म्हणजे खूप जास्त...मी ताईच्या अजुनच जवळ सरकले, तिच्या पोटात माझं डोकं घासत जवळ गेले. आईसारखी ती पण उबदार होती..पण आई नव्हती... आई काल रात्री नक्की काय सांगत होती आपल्याला? आई परत येणारे ना? ती परत येईपर्यन्त आता मी ताई आणि करड्याचं ऐकायचं असं ठरवलं होतं.

आम्ही बसुन होतो. मधेच २-३ कावळे उडत जायचे. कावळा गेला की ताई फक्त एकदा माझ्याकडे आणि करड्याकडे बघायची. मग परत डोळे बारीक करुन बसायची. कावळ्यांना आम्ही दिसत नसणार. आईने आम्हाला अश्याच जागी ठेवलं होतं..जिथुन आम्हाला सगळं दिसायचं पण आम्ही कोणाला सहज दिसत नसु. आम्ही एका माणसाच्या घरात राहत होतो. त्याच्या खिडकीपाशी आईने ठेवलं होतं आम्हाला. पण मी आजवर माणुस हा प्राणी पाहिला नव्हता. कारण आम्ही राहत होतो त्या घरात कोणीच माणुस राहायचा नाही. पिंगळी मावशी मात्र एका घरात राहायची जिथे माणसं पण असायची. करड्या म्हणाला होता "माणसांनी पाळलं आहे तिला". म्हणजे काय ते मला कळलं नव्हतं. करड्याने समजावलं होतं मग..."अगं म्हणजे ना...माणसं आपल्याला खायला-प्यायला आणुन देतात. आपल्याला खेळण्यासाठी कोणीतरी मिळतं. आपला वेळ चांगला जातो. आपण आराम करायचा..काही हवं असेल तर माणुस करतो. हवं तेव्हा फिरुन या, हवं तेव्हा उन्हात मस्त एखादी झोप काढा...ते नको असेल तर माणसांच्या जवळ जाऊन झोपा... कसली काळजी नाही..काही काम नाही." मी विचार करत होते...आपल्याला पण माणसांनी पाळायला हवं ना... तेवढ्यात करड्या म्हणाला होता " मला नकोय पण कोणी माणुस-बाणुस..मी स्वतः खाणं शोधेन, शिकार करेन, माझ्या जागेत राहेन... असं सगळं काम करायला माणुस काय ठेवायचा?.. आपलं आपलं मस्त जगायचं" मी आपलं बघत बसले त्याच्याकडे... तो किती हुशार होता. ताई किती मोठ्या मांजरी सारखी वागायची... मीच अशीच... ते म्हणतील तसं वागणारी...तसा विचार करणारी!

आता भुक लागत होती. सूर्यपण दिसत होता खिडकीतुन. आई नाही तर आपण खाणार काय? अरे बापरे...हा विचार मी केलाच नव्ह्ता की... ताई आणि करड्याला पण भुक लागली असावी आता. ताई एकदा इथे-तिथे फिरुन आली. करड्या बाजुच्या एका दोरीशी खेळत होता. "साप-जनावरं वगैरे पकडायची सवय करतोय" असं म्हणणं असायचं त्याचं. त्या दोघांनी ह्याआधी किडे खाल्ले होते. मीच अजुन आईचं दुध सोडुन काही खाऊन पाहिलं नव्हतं. मला काही खाताच आलं नाही तर? काय होईल माझं? मला दुध कसं मिळणार? मला एकदम भीती वाटायला लागली. आई कुठे गेली असणारे? मला अचानक वाटायला लागलं, एखाद्या माणसाने येऊनच आपल्याला न्यायला हवं.

तेवढ्यात पिंगळी मावशी आली. आम्ही तिघंही टुणकन उड्या मारुन बसलो. ती खास काही बोल्ली नाही. माझ्याकडे पाहिलं फक्त तिनं..एकदम विचीत्र नजरेनं. ताईजवळ जाऊन तिने ताईला चाटलं. मग करड्याकडे बघत म्हणाली. "भुक लागली का?", मला खरं तिच्याजवळ जायचं होतं. तिला सांगायचं होतं.."मावशी तुला माहित्ये ना... ते मलाही माहित्ये बहुतेक"..पण ती तिथुन गेली. "मी येते काहीतरी खायला घेउन..मग पुढे काय करायचं ते बघु आपण... मी आल्यावर आपण इथुन निघणारोत" असं सांगुन गेली.

करड्या एक्दम गुरकावला... "म्हणजे काय? आई कुठे आहे? काय झालं आहे? आपण का जायचं इथुन?" त्याचे डोळे मोठ्ठे झाले. अंगावरचे सगळे केस उभे राहिले. शेपुट फुगली त्याची..त्याने नखं बाहेर काढली... "ही मावशी वाईट्ट आहे" . ताई एकदम ओरडली त्याच्यावर.. "करड्या... शांत बस. आई आपल्याला सोडुन गेली आहे. ती आता अशक्त झाली होती. आपल्याला सांभाळू शकत नव्हती. स्वतःला सांभाळायची शक्ती नाहीये तिच्यात...कदाचित परत येईल, कदाचित... आजपासुन मावशी आणि मी आहोत आई येईपर्यन्त!" मी बघतच बसले. ताईला कसं कळलं हे? ताईने माझ्याकडे बघितलं. पहिल्यांदा आपणहुन माझ्या जवळ आली. मला चाटलं... "छोट्या, जागी होते मी काल रात्री. मला माहित्ये सगळं..काळजी नको करु बाळा... मी आहे" मी माझी मान तिच्या अंगावर घासली आणि मला तिच्या डोळ्यात पाणी दिसलं.

...