Monday, August 31, 2015

कट्टी

"लहान असताना करंगळी दाखवून कट्टी घ्यायचो, कधी तर्जनी ओठांवर ठेवून शांत केलं जायचं , आता अंगठ्याने call कट करतो".. सारख्या काहीतरी दवणीय वाक्याने पोस्ट सुरु करायची असं मी ठरवलं आहे. आणि मी ते केलं आहे!  हुश्श.. ब्लॉगबद्दल ठरवलेलं एकतरी काहीतरी केलं मी... नाहीतर गेले किती दिवस "लिहायचं लिहायचं" ठरवत्ये आणि मग नाही लिहित. 

मला वाटतं vlog सुरु करावा कारण लिहित नसले तरी अखंड बोलत असतेच.. आणि हल्ली इतकं बोलते कि अधूनमधून अमोल मला "जरा शांत बस आता" सांगतो. vlog किंवा ऑडीओ ब्लॉग सुरु केला कि कसं माझं बोलणं आपोआपच कमी होईल. "बोलायचं बोलायचं" ठरवेन आणि मग बोलणारच नाही. whatever! 

Whatever पासून आमच्या (माझ्या) अबोल्याची सुरुवात होत असते खरं तर.. काहीतरी चिरीमिरी कारणावरून मी अमोलवर चिडते आणि मग तो चिडतो. मला हे अजिबात आवडत नाही , मला exclusively चिडायला आवडतं. तो चिडला कि मग माझ्या चिडण्याचं महत्त्वचं जातं ना राव.. He loves to steal a spotlight, I tell you! चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच कि आत्ता मी त्याच्याशी भांडून पोस्ट लिहायला बसल्ये. पण म्हंटल "का नाही?" त्यानिमित्ताने जरा इथली धूळ झाडली जात असेल तर "व्हाय नॉट ?" 

तर तो मला आत्ता थोड्यावेळापूर्वी म्हणाला "तेजू.. थोडावेळ एकदम गप्प बस आता". हां तो काम करत होता, मी त्याला डिस्टर्ब करत होते वगैरे वगैरे पण सरळ सरळ अपमान झालाय ना माझा.. म्हणून मी ठरवलं आहे कि मी काय आता आपणहून जाणार नाहीये त्याच्याशी बोलायला... इथेच बोलणारे बाबा मी ! काय काय आत्ता डोक्यात येतंय अमोलला सांगायचं ते..

१. श्रीखंड फ्रीझरमध्ये ठेवायचं नसतं. आईस्क्रीम नाहीये ते! आणि मी आत्ता खाल्लंय एक चमचा.. आणि तोच चमचा ठेवलाय परत श्रीखंडात घालून.. माझं आहे ते आता, तुला मिळेल ह्याची अपेक्षा न ठेवणं उत्तम! 

२. पावभाजी करत्ये.. तुला आवडतात म्हणून मटार घालणारे. (कमी घातलेत) तुला आवडत नाही म्हणून फ्लॉवर घालणार नाहीये (खूप घातलाय) . तू मला शांत बसवलंस तरी माझ्या प्रेमाला शांत बसवू शकत नाहीस, यु नो! (प्रेम..लोल)

३. लोकं बोलताना "लोल" का म्हणतात? शी असतं ना किती ते. सिरीअसली का? हसा न जोरात त्यापेक्षा.. लोल काय म्हणायचं? 

४. आजची गोळी घ्यायची राहिल्ये. मध्यंतरी वाचलं होतं कि रोज तासभर उन्हात घालवला तरी महिन्याभरात विटामिन डी भरून निघेल म्हणून.. जवळजवळ अर्ध्या भारतीय लोकांना विटामिन डीची कमतरता असते. माहित्ये? का ते माहित नाही, पण आहे. वाचलं होतं मी.. आता आठवत नाही. 

५. स्टार्टअप आयडिया: टेस्ट आणि परीक्षा , शाळा-कॉलेज संपल्यानंतर काही परीक्षा नसल्याने आपण वाचलेलं लक्षात ठेवायचे कष्ट घेत नाही. गुगलवर आपण किती काय काय रोज सर्च करून वाचत असतो पण त्यातलं अर्ध-अधिक शोर्टटर्म मेमरीतून परस्पर गायब होतं. तुमचा गुगलचा सर्च डेटा वापरून (प्रायव्ह्सी..लोल) काही दिवसांनी त्यावर प्रश्न टाकायचे. क्विझ " १५ ऑगस्टला तुम्ही तिरंगी बर्फी रेसिपी सर्च केली होतीत. त्यात खवा आणि साखरेचे प्रमाण काय होते?"  आणि मग त्याबदल्यात त्याच्या संदर्भातले कुपन्स वगैरे.. किंवा त्यासंदर्भातल्या पुस्तकांवर डिस्काऊंट.. म्हणजे जरा डीपमध्ये वाचाल. लिहायचा कंटाळा आलाय अजून, बोलायला लागल्यावर बोलूयात ह्यावर.. 

६. ए..ए.. मी आत्ता एका बटाट्याचं साल अखंड सोललं आहे. म्हणजे कळलं ना? टाकलं मी, नाहीतर दाखवलं असतं. न तुटता.. अखंड.. 

७. actually  का सोल्ल? मला कुकरला लावायचे होते बटाटे.. 

८. हेहे.. मगाशी किती स्टाईल मारत होतास रे कॉफी टेबलवर laptop ठेवून बसून काम करत होतास.. घेतलास नं परत मांडीवर? 

९. लोकं हल्ली laptop desk वर वापरतात.. मग त्या laptop चा desktop होतो का? सच आयडेंटीटी क्रायसिस ना.. तू लहान असताना डेस्कटॉप ला डेक्सटोप म्हणायचास? मी म्हणायचे.. 

१०. चप्पल वाजवू नकोस. तुला माहित्ये मला त्रास होतो त्या आवाजाचा.. अजिबात वाजवू नकोस ||||/ ||||/ ||

११. वाईट ह्याचं वाटतं आहे कि तू चप्पल वाजवतो आहेस हे तू माझं लक्ष वेधून घ्यायलाही करत नाहीयेस. मी मुद्दाम ६ शिट्टया करवल्या म्हंटल सांगशील मला, खूप होतायत म्हणून.. पण त्या स्क्रीनवरून लक्ष हटेल तर न.. attention seeking behaviour माझ्याकडून शिक जरा नंतर..

१२. तुला माहित्ये behaviour.. (English, Not American) मध्ये ५ ही अलंकार येतात. AEIOU 

१२ अ. अलंकार कि स्वर? 

१३. उद्या मटकी संपवूयात हं. फ्रीजमध्ये मागे गेलो होती. 

१४. आत्ता कांदा चिरत होते पावभाजीवर घालायला तेव्हा जाणवलं कि आत्ता भारतात पावभाजीवर कांदा कसली लक्झरी आहे नं.. आणि आपल्याला कसा खीच फरक नाहीये. मला नं थोडं गिल्टी वाटतं हा विचार करून.. तुला माहित्ये कांदा इश्श्यू वाचून मला कायम ठाणे स्टेशनवरची भेळ आठवते. दोन वर्षापूर्वी जेव्हा असाच महाग झाला होता कांदा तेव्हा भेय्यानी भेळेत कांद्याऐवजी कोबी घातला होता. कसं न? शेतकरी, दर, महागाई वगैरे गोष्टी त्रास न देता मला भेळेत कांद्यांऐवजी कोबी असणं त्रास देतं. मी किती सेल्फिश आहे ना.. 

१५. मस्त वास येतोय भाजीचा.. अल्मोस्ट डन.. भारी झाल्ये. तुला चव दाखवणार नाहीये पण.. डायरेक्ट वाढेन. 

१६. मी खरंच खूप बडबड करते का रे? कीबोर्डला पावभाजीचा वास येतोय. 

ओके भूक लागल्ये.. कट्टी कटाप.. पानं घे, मी पाव भाजते. 

घे न.. ओके.. थांब बोलतेच!