Sunday, January 13, 2013

जांभाचं झाड


“आपलं जांभाचं झाड गेलं” आईनी सांगितलं.  मी नुसती बघत राहिले.. दीपिका रडायला लागली.. आईच्या डोळ्यांतही पाणी होतंच.. माझ्या आत काहीतरी हललं.. उगाचच स्वयपाकघरात जाऊन मी पाणी पिऊन आले.. “मावशीचा फोन आला होता आत्ता.. आपलं बाजूचं अंगण त्यांच्या हद्दीत येतं.. ते तिथे कुंपण घालणार आणि मग ती जमीन विकणार.. ते झाड त्यांच आहे आता”

अर्धी नारळा-पोफळीची वाडी ते विकणार हे माहित होतंच.. तेव्हाही वाईट वाटत होतंच.. पण आता जास्त त्रास व्हायला लागला.. बाजूचं अंगण म्हणजे कित्ती काय काय आहे तिथे माहित्ये का??

शेकत्याच्या शेंगांचं झाड, मधुनाशिनिचा वेल, कांचनचं झाड, तुळशीची कित्येक सदैव उगवणारी रोपं, मी लावलेलं तगरीचं झाड, कित्तीतरी जुनं जास्वंदाच झाड, दिपूचं लीम्बाचं झाड, केवडा, बिटकी आंबा, गुंजेचा वेल... आप्पांनी लावलेली, बाबांनी जगवलेली नारळ आणि सुपारीची झाडं, बांबूचं बन आणि माझं, दीपिकाचं, आईचं, बाबांचं, आप्पा-आजीचं, दादा-ताईचं, मावश्या-मामांच, इंदू आजीचं जांभाचं झाड..

सगळं बदलणार आता.. थळचं घर आता नेहमीसारखं नाही राहणार... घरा शेजारून आता अजून एक कुंपण जाणार.. ह्यात चूक कोणाचीच नाही.. जमीन विकायला काढलेल्या मावश्यांची नाही, त्यांच्या आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित मुलींचीही नाही.. चूक असेल तर माझ्या आप्पांची आहे.. त्यांनी कधी माझं-तुझं केलंच नाही.. त्यामुळे आम्हालाही हा जमिनीचा भाग त्यांचा, हा आपला हे कधी माहीतच नव्हतं..

आप्पा महानगरपालिकेत होते मुंबईला.. शनिवारी सकाळी लवकर निघायचे ते अलिबागला यायला.. त्या काळात रस्तेही इतके चांगले नव्हते.. कधी बसने, कधी बोटीने, कधी कोणाच्या गाडीने आप्पा नियमित यायचे.. त्यांच्या दोन मुली, म्हणजे माझी आई आणि मावशी.. अजूनही तक्रार करतात “आप्पा सुट्टीला घरी नसायचेच..” कारण त्यांना वेध असायचे त्यांच्या थळच्या घराचे.. घर पडायला आलं होतं, झाडं सुकून चालली होतं.. आणि म्हणून आप्पा दर आठवड्याला येत होते त्यांच्या पूर्वजांची ठेव वाचवायला.. ज्या वयात नवर्याकडे नवीन दागिन्यांचा हट्ट करायचा त्या वयात माझ्या आजीने तिच्या पाटल्या ठेवल्या होत्या सावकाराकडे हे घर आणि जमीन वाचवायला.. आप्पांनी खूप कष्ट घेतले ह्या घरासाठी, ह्या झाडांसाठी..

खूप प्रेमानी लावलं असेल त्यांनी हे जांभाचं झाड... का लावलं, कसं लावलं, कधी लावलं माहित नाही मला.. कारण मला कळायला लागलं तेव्हा हे उंच झाड फळांनी बहरून येत होतं.. शाळेत मी आंब्यापेक्षा जांभ किती बेस्ट असतो हे सांगायचे लोकांना.. पांढराशुभ्र जांभ येतो ह्या झाडाला, एकदम गोड फळ... उन्हाळ्यात इतके जांभ येतात कि एखाद फांदी तरी वजनाने मोडून पडते ह्या झाडाची.. पिशव्या भरून जांभ घेऊन जातात आमच्याकडून लोक.. पोपटांचे थवे येतात जांभ खायला.. कधी न पाहिलेले पक्षीही जमतात ह्या झाडावर.. ऐसपैस पसरलेलं झाड आहे.. माजघरातून दिसतं, स्वयपाकघरातून दिसतं.. न्हाणीघरातूनही दिसतं.. लहानपणापासून आम्ही बघतोय हे झाड आणि तेही बघतं आहे आम्हाला आमच्या लहानपणापासून..

माझ्या आईला, मामा-मावश्यांनाही पाहतं आहे हे झाड लहानपणापासून... आमची बार्शी पाहिल्येत ह्या झाडाने, आमचे वाढदिवसही.. मी हात धुवायला जायचे ह्या झाडाखाली.. ह्या झाडाला पाणी मिळावं म्हणून.. कित्येक भातुकलीचे डाव मांडलेत ह्या झाडाखाली.. कित्येक भांडण झाल्येत आणि मिटली आहेत इथेच.. ह्या अंगणात badminton खेळायचो आम्ही.. फुल ह्या झाडात अडकल्यावर, दगडही मारले आहेत आम्ही.. पण झाड कधी चीडलं नाही आमच्यावर.. दरवर्षी हजारो जांभ देतच राहिलं.. दर आठवड्याला जाणारे आम्ही आता महिन्यातून एकदा जातो अलिबागला.. तेव्हा आम्हाला जितका आनंद होतो तितकाच आनंद होत असेल का ह्या झाडाला?? आप्पा गेले त्यावर्षी जांभ किडले हा फक्त योगायोग असतो का?? बाबा खूप विश्वासाने चढतात ह्या झाडावर जांभ उतरवायला.. झाडही तितकाच विश्वास ठेवत असेल का बाबांवर ते दुखवणार नाहीत ह्याचा?? आमची चिंगी मांजर सरसर चढायची ह्या झाडावर, कधीही पाडलं नाही तिला ह्या झाडाने.. पण जेव्हा ती समोरच्या विहरीत पडली तेव्हा ह्या झाडाला वाईट वाटलं असेल का आपल्याला पाय नाहीत त्याचं?? झाडाला पाय असते, झाडाला हलता आलं असतं तर हे कुंपण पडायच्या आधी ते आलं असतं का आमच्या हद्दीत??

बाबा नेहमी सांगतात, आपलं काहीही नसतं.. पूर्वपुण्याईतून आपल्याला जे मिळतं ते आपल्या वंशासाठी आपण सांभाळून आणि जमल्यास वाढवून पुढे पाठवायचं असतं.. आप्पांनी तेच केलं.. त्यांनी केलेल्या कष्टांची फळ आता दुसर्यांचे वंश चाखणार म्हणून काय झालं.. कुंपण घालणार्यांवर, स्वतः कधीही कष्ट न घेतलेली जमीन विकणार्यांवर माझा राग नाही.. फक्त त्यांनी खूप उशीर केला.. आठवणी तयार व्हायच्या आधीच ह्या मातीची किंमत व्हायला हवी होती..  आता हि जमीन कोण विकत घेणारे माहित नाही.. तो हे झाड काढेल, ठेवेल, काय करेल माहित नाही.. काय माहित कदाचित आमच्यापेक्षा जास्त प्रेम करेल तो ह्या झाडावर..पण हे झाड मात्र आता त्याचं होणार.. कुंपणाची नजर चुकवत जांभ नक्की पडतील आमच्या भागात.. पण मग त्या जांभावर आता माझ्या-तुझ्या, आपल्या-त्यांच्या खुणा असणार..

रात्री मीपण रडले.. बाजूच्या अंगणासाठी नाही, वाडीसाठी नाही.. जांभाच्या झाडासाठीही नाही... माझ्या मुलांसाठी, माझ्या मावशीच्या नातवंडान्साठी .. त्यांना ह्या जाम्भाची गोडी कधीच कळायची नाही आता..