आस्था कुशीवर वळली.. खिडकीतून सुर्याचा उजेड आता डायरेक्ट तिच्या चेहऱ्यावर येत होता..
"दिनभर जलाते हो.. और रात होनेसे पहले खुदही बुझ जाते हो.. ये कौनसी रीत है?"
तिने जरा जोरातच हा प्रश्न सुर्याला विचारला.. दारात बसलेल्या कुमुदने ते ऐकलं..
"तू सुरजको भी नही छोडेगी... येडी ..."
"ए कुमी.. मी कधीच सोडलयं त्या सुर्याला.. च्यायला तोच नाही सोडत मला.. आजवर एकपण दिवस असा नाही गेल जेव्हा तो मला भेटायला आला नसेल.. मी उठायच्या आधीचं पायाशी घुटमळत बसलेला असतो.."
आस्थाने पायांकडे बोट केलं.. पडद्याच्या एका भोकातून थेट तिच्या पैंजणांवर एक कवडसा पडत होता.. .. कुमुद लगेच उठून तिच्याजवळ आली.. तिच्या पायांना हात लावत म्हणाली..
"साली.. ये किसको लुटा तुने? चांदी आहे?"
"नाहीतर काय अल्मेनीम? तो गणेश आहे ना.. बांद्रावाला.. त्याने दिले.."
कुमुद तिच्याकडे टोवेल फेकत म्हणाली.." प्रेम करायला लागला की काय तुझ्ज्यावर?"
आस्थानी चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला..
खिडकीतून खाली बघत ओरडली "अस्मद.. दो चाय ..आते हुये पार्लेजी लेके आना"
आस्था आरश्यासमोर उभी राहून स्वतःकडे बघत म्हणाली..
"प्रेम.. प्यार.. इस आस्थासे हर कोई प्यार करता है कुमी.. कोई कुच मिन्टोके लिये..कोई कुच घंटोके लिये.. कोणी काही रात्री.. आणि हे असे चुत्ये काही दिवस.."
कुमुद् तिच्याकडे बघत उभी राहिली..
"अबे.. डायलॉग आहे .. मलापण वाटायला लागलं आहे की त्याचं प्रेम बसतं आहे माझ्यावर..ह्या वयात होतंच असं.. आत्ता कुठे मर्द बनायला लागलाय पोरगा.. साला अस्मद कुठे मेला? "
चहा पित असताना आस्थाने दाराबाहेर घुटमळत उभ्या असलेल्या अस्मदला आत बोलावलं..
"क्या हुआ मेरे अमिताभ बच्चन? आज तू अन्ग्री यंग म्यान नही है क्या?"
अस्मद आत्तापर्यंत जणू वाटच पाहत होता आस्थाने काही बोलायची.. तो लगेच आत शिरला
"दीदी मेर्को स्कूल जाना है.. पपा नही बोलता है|"
त्यावर कुमुद फिस्स्क्कन हसली..
"अस्मुद्दिन शहेनशहा.. आपको अब तक २ बार स्कूलमें भरती किया गया .. और आप भाग लिये वहासे.. नही? आस्था.. हा पोरगा असाच करतो " कुमुदने दोन्ही ग्लास उचलून अस्मदच्या हातात दिले
"ए तुम्हे पता नही है तो बोलो नही.. दीदी.. मुझे पपा स्कूल नही भेजते.. गावमें मेरे बडे चाचाजान है.. उनके होटेलमें काम करने जाता हुं मै.. पपा बोलते है, वही अपनी स्कूल है.. सौ-पाचसौका हिसाब माथ्सकी किताब बिना पढेभी आता है ,चायमें चीनी कितनी डलनी है ये सायन्स नही सिखाता..पपा बोलते है.. पढोंगे तो आस्था दीदी जैसे बन जाओगे.. "
आस्थाने चमकून पाहिलं..
काळी-सावळी, बारीकशी आस्था.. आता २४ची झाली असली ती दिसायला मात्र १७-१८चीच.. कपाळावरचं गोंदण टिकलीनी लपवणारी.. बारीक डोळे, लहानसे ओठ, नाक मात्र अगदी चाफेकळी.. हसताना तिचा एक दात खूपच मोठा दिसायचा.. बोलण्यात तिचा हात कोणीच धरू शकणार नाही.. तिच्या आईच्यामते मोठा दात आणि बोलणं तिला तिच्या वडिलांकडून मिळालं होतं.. तिच्या वडिलांच्यामते ते तिचे वडील नव्हतेच!
आस्था.. एका सामाजिक संस्थेच्या दीदीनी हे नाव ठेवलं होतं..वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायकांच्या मुलांसाठी काम करणारी संस्था होती त्यांची.. दीदी कायम यायची आस्थाच्या घरी.. आस्थाला पुस्तकं आणून द्यायची, खेळणी द्यायची.. आईकडे गिऱ्हाईक आलं कि आई पडदा लावून घ्यायची.. पडद्यापलीकडे बसून आईचा आवाज ऐकत आस्था पुस्तक वाचत बसायची ..
त्यादिवशी शिव्या ऐकू आल्या.. किंचाळण्याचा आवाज आला.. मारायचा आवाज आला.. ambulanceचा आवाज आला.. रडायचा आवाज आला.. तरी आस्था पुस्तक वाचत बसली ..
दीदी आस्थाजवळ आली "आस्था.. तुम्हारी मां.."
"अच्छी नही थी...इसलिये चली गयी..दीदी आप मुझे और किताब दोगे?"
आजूबाजूच्या जगातून बाहेर पडायला पुस्तकं तिला मदत करत होती.. पुस्तकं वाचताना ती खुश असायची.. पुढे दीदीचं लग्न झालं.. आणि त्यांच्या संस्थेचं काम ह्या वस्तीत कमी झालं.. दुसर्या एका संस्थेने पुस्तकं वाचते म्हणजे हुशार आहे समजून तिला शाळेत घातलं.. आस्था शाळेत जायला लागली.. आणि तिथेच तिचं पुस्तकांवरचं प्रेम मेलं..
शाळा, अभ्यास, गणितं, शिकवताना नाकात बोटं घालणारे सर नंतर एखाद्या मुलीच्या स्कर्टला हात पुसायचे.. वह्यांवर काही आगाऊ मुलं घाणेरडी चित्रं काढायची .. धक्क्यांची हळू हळू सवय होत होतीच.. शाळेत मराठीच्या चव्हाण बाई तिला खूप आवडायच्या.. त्या तिच्याकडे कधीच बघायच्या नाही तरीही.. त्या वर्गात आल्यावर मस्त गोड वास यायचा.. त्यांना बघून आस्थाला "बाई" व्हावंस वाटायला लागलं होतं..
आस्थाचं घर आता कुमुद्च्या आईला मिळालं होतं.. कुमुद्ची आई आता धंद्यातून बाहेर पडली होती... खूप आजारी असायची.. शेजारी ठेवलेल्या एका पत्र्याच्या डब्यात दर थोड्यावेळानी थुकत बसायची..
"मावशी.. डॉक्टरकडे जाउया का गं? " आस्था विचारायची..
"पैसे कोण तुझी मेलेली आई भरणार का?" मावशी खाकरत प्रतिप्रश्न करायची..
"मी पैसे भरले तर?" एक दिवस कुमुद हातात पैसे घेऊन आली... आईने नाही विचारलं तिला, कुठून पैसे आले ते.. छातीची कवटाळून रडली फक्त.. त्यादिवसापासून कुमुद बदलली.. साधीच असणारी कुमुद अचानक लिपस्टिक लावायला लागली, गजरे घालायला लागली.. तिचे कपडे लहान झाले.. तिच्याकडे पैसे यायले लागले, नवीन दागिने यायला लागले.. आस्थासोबत ती अजूनही जुनी कुमुद्च होती.. पण आस्था आता तिच्यासोबत जुनी आस्था राहिली नव्हती.. पूर्वी आस्थाला आपण कुमुद्पेक्षा चांगल्या आहोत असं वाटायचं..कुमुद्च्या कायम पुढे आहोत वाटायचं.. आणि आता अचानक कुमुद खूप पुढे गेल्यासारखी वाटायला लागली.. आस्था आता कुमुदसमोर जरा सांभाळून वागायला लागली.. कुमुद्चे नखरे, तिचे दागिने, कपडे बघून आस्थाला "बाई" व्हावसं वाटायला लागलं होतं..
"कहां खो गई आस्थाजान? शाळेत जायचं नाही का? पोरं वाट बघत असतील.. " आस्था खिडकीतून बाहेर बघत बसली होती..
"वाट लावाणार्याची वाट कोणी का बघेल?" आस्था कुमुदकडे बघत म्हणाली..
"त्या अस्मदच्या बोलण्यात आलीस कि काय? आस्था.. सून.. ना तू किसीकी वाट लगाती है.. ना तेरी वाट लगी है.. जा अंघोळ करून घे.. "
पडदा ओढून घेत आस्था मोरीत उभी राहिली.. समोरच्या भिंतीवर मुंग्याची रांग बघून तिला लहानपणचा खेळ आठवला.. तिने एक तांब्या डोक्यावर ओतला आणि तशीच ताठ उभी राहिली.. एका संस्थेने त्यांच्या वस्तीची ट्रीप काढली होती.. तेव्हा ते गेले होते श्रवणबेळगोळाला.. तिथल्या गोमटेश्वराच्या मूर्तीकडे आस्था एकटक बघत बसली होती.. वरून येणारं पाणी कसं खालपर्यंत पोचायचं नाही, मग आज्जीने रुईच्या पानातून आणलेलं दुध कसं खालपर्यंत आलं वगैरे गोष्टी ऐकत एकटक बघत बसली होती.. अंघोळ करताना नंतर बरेच दिवस ती हाच विचार करत असायची.. मुंग्यांना आपण असेच मोठे दिसत असू.. आपल्या डोक्यावरचं पाणी खालपर्यंत कसं पोचतं.. ह्याचा विचार करत ती अशीच उभी राहायची..
ती तयार होण्यासाठी आरश्यासमोर उभी राहिली.. आरश्यातून तिला मागे दारात उभी असणारी कुमुद दिसली.. अजूनही सुंदर दिसणारी.. छान कपडे घालणारी.. आता escort बनली होती.. वस्तीतल्या बायकांपेक्षा वरचा जॉब होता तिचा.. भरपूर पैसे मिळत होते.. आता ती चांगल्या सोसायटीत राहात होती.. कंटाळा आली कि आस्थाकडे यायची..
"आस्था.. त्या बांद्र्यावाल्याचं काय आहे? क्या हो रहा है?"
"पता नही.." आस्था केस बांधत म्हणाली..
"आस्था.. तुला आठवतं? तू म्हणाली होतीस.. "जैसी सुबह होती है.. दिनभी वैसेही कटता है"
"हां.. होतं असंच.. सकाळ छान गेली कि दिवस मस्त जातो.. का?"
"आस्था.. तुझी सकाळ चांगली झाली आहे.. खूप चांगली नसली तरी माझ्यापेक्षा चांगली आहे.. आणि तुझा दिवसही तू चांगला घालवू शकतेस.."
"कुमि.. मी असं बोलायचं असतं.. तू कळेल अश्या भाषेत बोलायचं असतं.. आम्लेट खाणार? मी घेऊन येते खालून.."
आस्था लगेच बाहेर पडली.. कुमुद आता काय सांगणार हे तिला माहित होतं.. वस्तीतल्या शाळेत शिकवणं खूप महत्वाचं काम आहे हे तिला माहित होतं.. शाळेतूनच ती मुलं बाहेर पडू शकतात हेही तिला माहित होतं.. तिला खूप बाहेर पडता आलं नसलं तरी काठावर उभं राहून ती मदत करू शकत होती.. अन काठावर उभं असणार्याला पाणी किती खोल आहे माहित असलं तरी त्यात उडी मारून डुंबायचं असतंच.. ही बाई बनल्यावर आदर आहे पण पैसा नाही.. हुशारी आहे पण नट्टा-फटटा नाही..गेल्या २४ वर्षात पहिल्यांदा तिला भेट मिळाली होती आत्ता.. आस्था विचार करत करत अस्मद्च्या टपरीवर आली.. अस्मद धावत आला तिच्याजवळ
"दीदी मुझे पता था.. आप मुझे स्कूल लेके जाने आओगे.." त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून आस्था त्याच्या पपाकडे वळली..
"चाचा.. आप क्या बोल रहे थे? चाचा.. सौ-पाच्सौ के लिये माथ्सकि बुक नही लगती.. पर क्या आप ये चाहते हो कि अस्मद जिंदगीभर सिर्फ सौ-पाचसौ में बंद रहे? पढेगा तो मेरे जैसे होगा..तो क्या बुरा है?"
आस्था परत वर आली.. कुमुद्ला मिठी मारत म्हणाली.. "आजकी सुबह अच्छी है.. जिसके दिलमें सुरज बसता हो.. उसके जिंदगीमे अंधेरा कहां?"
....