नाव डेंजर आहे पोस्टचं .. पण बाकी काही डेंजर नाहीये.. मी पोस्ट लिहित्ये त्याचा माझ्या आत्ताच्या मनस्थिती वगैरेशी काडीमात्र संबंध नाहीये. मी काय स्वतःहून मरणार नाहीये..
तर हे का लिहावंसं वाटलं? कॉलेजमधल्या एका मुलाने परवा स्टडी टूरला आत्महत्या केली. आगापिछा मला जास्त ठाऊक नाही, काही म्हणतात त्याला सिगरेट ओढू दिली नाही म्हणून, काही म्हणतात नशा करत होता, काही म्हणतात सर ओरडले म्हणून, तो सिगरेट ओढतोय हे कोणीतरी घरी कळवलं म्हणून... नक्की कारण माहीत नाही.. पण ऐकलेल्या ह्या कारणांपैकी कोणतंही कारण असेल किंवा ह्याच्या जवळपास जाणारंही काही असेल तरी २१ वर्षाच्या , आई-बाबांच्या एकुलत्या एक मुलानं रात्री तिस-या मजल्यावरून उडी मारावी?
उडी मारली.. पण त्याआधी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं "so this is my last status , im signing off, cant handle life anymore.. bye everyone" अश्या अर्थाचं.. परवा ऐकल्यावर धक्का बसला, त्याची प्रोफाईल पाहिली तर त्याचं हे स्टेटस साधारण ३००हुन अधिक लोकांनी "लाईक" केलं होतं.. इथे फेसबुकबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, पण त्यात नको शिरायला.. हगल्या-पादल्या अपडेट्सना लोकं लाईक करतात ते माहीत होतंच , पण कोणाच्या सुसाईड नोटमधेही लाईक करण्यासारखं काही असावं, हे विचित्र आहे. घरी आई-बाबा काय करतील आपण गेल्यावर हा विचार नाही करता आला त्याला, पण त्याच्या फेसबुक फ्रेंड्ससाठी जाता जाता स्टेटस अपडेट करणं जास्त महत्त्वाचं वाटलं असावं त्याला.. हेही विचित्रचं आहे!
आत्महत्या वगैरे माझ्या एका मित्राचा आवडता विषय आहे.. तो खूप बोलतो ह्यासगळ्याबद्दल... मी जसं स्वतःहून मरणार नाही म्हणाले तसं तो एकदा म्हणाला होता "संतांनी स्वतः समाधी घेणेच उचित!" (स्वतःबद्दल.. मला संत नाही म्हणू शकत कोणीच) .. काही लोकांना तिरकं बोलायची सवय असते , म्हणजे वाकड्यात शिरून नाही.. तिरकं बघत.. आपण पूर्वेकडे बसलेले असू तर ईशान्य किंवा आग्न्येयेकडे बघत बोलतात ती लोकं, हा तसं बोलतो..अन् बोलायला लागला की साधारण अर्धा तास सलग बोलतो.. तर "मृत्यू" वर त्याने मला अनेकदा (तेचतेच) प्रवचन दिलं आहे.. मला एकदा फूड पोईज्निंग झालं होतं, तेव्हा ह्या पठ्ठ्याने "तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.. काय खाल्लंस? एवढ्या लवकर giveup करतेस?" वगैरे विचारलं होतं..
तो प्रश्न असेच आर्बिट काहीतरी विचारतो.. एकदा त्याने विचारलं होतं "तू मृत्युपत्रात काय लिहिशील?".. त्याचं तयार आहे म्हणे मृत्यूपत्र.. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या माणसांसाठी एक-एक पान लिहिलं आहे काहीतरी.. त्याला काय करायला आवडलं असतं, ह्याची यादी केलीये म्हणे..
मी खूप विचार केला होत्या ह्या प्रश्नाचा तेव्हा.. मला टेन्शनही आलं जरासं ,
आपण लिहिलेलं शेवटचं काहीतरी असेल ते.. ते चांगलं असायला हवं ना..
किंवा आपण ना श्रीमंत झाल्यावर असं लिहायची वेळ आली तर फिल्मी पद्धतीनं वाटणी करू, "सहा महिने लग्न टिकलं तर १० कोटी रुपये.. " सारखं..
सावरकरांसारखं काही लिहिणं ह्या जन्मात आणि ह्या मृत्युतही शक्य नाही.. प्रबोधिनीत जेव्हा "की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..." म्हटलं जातं तेव्हा अनेकदा अंगावर काटे उभे राहिल्येत..
सरळ शांतपणे " No one is to blame" असं लिहायचं नाहीतर..
अगदी सुरुवातीला मी एक गोष्ट लिहिली होती.. ठाण्या-कळव्याच्यामधल्या ट्रेनच्या ब्रीजजवळ कायम एखादातरी पोलीस असतोच.. नुसता एकटा बसलेला.. तिथे का असतो माहीत नाही.. पण आम्हा मैत्रिणींचा समज असा की तिथे आत्महत्या करायला येणा-या माणसांसाठी बसतो.. तेव्हा मी लिहिली होती गोष्ट.. "एका नदीकाठी popular suicide pointवर पोलीस एक चौकी बसवतात.. आणि तिथे काम जास्त नसल्याने एका हवालदाराला ठेवतात.. तिथे येणा-या पहिल्या काही माणसांना तो यशस्वीरित्या परतही पाठवतो.. एकदा एका माणसाला खिशातल्या ३ पैकी २ नोटाही देतो.. पण मग हळूहळू जास्त काम नसल्यानं रिकामं डोकं तिथे आलेल्या लोकांच्या भावनांच्या ओकारीने भरत जातं (किळसवाणी उपमा आहे किती).. नदीच्या दुसऱ्या काठावरून लोकं अजूनही उड्या मारत असतात.. तिथल्या एका नावाडी पोऱ्याला हवालदार डब्बा देत असतो रोज आणि त्याबदल्यात त्या पोराने कोणी उडी मारली की लगेच हवालदाराला येऊन कळवायचं असतं..हवालदार लगेच रिपोर्ट तयार करत असतो.. असेच दिवस जात असतात.. एक सीजन येतो, जो अतीच चांगला असतो जगासाठी.. कोणी येतंच नाही तेव्हा मरायला.. समजवायलाही कोणी नाही अन् रिपोर्ट बनवायलाही कोणी नाही.. एक दिवस नदीत एक इसम उडी मारतो.. नावाडी धावत-पळत चौकीत येतो.. तिथे हवालदार नसतो पण रिपोर्ट तयार असतो.." असंच काहीतरी..
आत्महत्या म्हटलं की मला तो मित्र आठवायचं अजून एक कारण हे आहे की सर्वात घाण आत्महत्या त्याने केली.. फेसबुकवर स्टेटस अपडेट न देता.. प्रचंड creativity असणारा, फिल्म्ससाठी जगणारा.. वयाच्या २५व्या वर्षापर्यंत इतकी मस्त adventurous life जगलेला तो, फिल्म इंडस्ट्रीत नक्की काहीतरी चांगलं काम करेल असा सगळ्यांना विश्वास होता..मुली काळजी घेणार नाहीत इतका सांभाळायचा स्वतःला .. अचानक काय झालं माहीत नाही.. हल्ली त्याच्या वडलांच्या गारमेंटच्या धंद्यात फायली आणि samples मध्ये बुडलेला असतो.. त्याच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं बघते आणि त्याचं मृत्युपत्र शोधत बसते..