(गुढी पाडव्याला लिहिली होती.. आज पब्लिश केली)
आज गुढी पाडवा आहे.. माझ्या ह्या सणाबद्दल तश्या विशेष काही भावना नाहीयेत.. म्हणजे मला दिवाळी लै अशी नाही आवडत.. गणपती प्रचंड आवडतो.. दसरा चांगला असतो.. ख्रिसमस टीव्हीवर आणि इंग्लिश फिल्म्समध्ये आणि ठाण्यात चरई मध्ये जाम आवडतो.. तसं गुढी पाडव्याबद्ल काहीच भावना नाहीयेत.. त्यामुळे ही पोस्ट गुढी पाडव्याबद्दल नाहीये. ही पोस्ट अशीच जनरल "आता ह्यावर्षी तरी लिहायला हवं आणि सुरुवात आजपासूनच करायला हवी" म्हणून लिहिली गेलेली आहे. आणि as usual सुचत वगैरे नाहीत विषय म्हणून सुरुवात आपण गुढी पाडव्याने केलेली आहे.
मगाशी माझ्या आईने असं उगाच पुऱ्या लाटत असताना विचारलं.. "आज गुढी उभारतात ना? मग आजच्या दिवसाला गुढी 'पाडवा' का म्हणतात?" मग मी आणि दीपिकाने ऐकू न आल्यासारखं दाखवून "एका लग्नाची दुसरी गोष्ट' चे आढावे एपिसोड्सबद्दल बोलणं सुरु केलं..मला ना ती सिरीयल बघताना भीती वाटते जाम.. २ कारणं आहेत..
१. कधी टचकन डोळ्यात पाणी येईल सांगता येत नाही.. मग उगाच लाजायला होतं
२. ही सिरीयल ताणली जायची भीती वाटते... ही सिरीयल प्लीज प्लीज जास्त ताणू नको देत.. लोकं नावं ठेवायला लागेपर्यंत नको चालवू देत.. हुरहूर लागून संपवू देत..
ते चार दिवस सासूचे प्रकार काय डेंजर आहे ना .. अजूनही लोकं बघतात आणि ती सिरीयल.. माझ्या ओळखीतले एक आजोबा आहेत ते चा.दि.सा ची वेळ झाली की आजीला बोलवतात "अगं सासूची वेळ झाली..सासू लावायचं आहे ना" ते क्रिकेट सोडूनपण चा.दि.सा बघतात.
गुढी पाडवा ... नीट बोल गाढवा
सुपारी.. तुझं लग्न दुपारी
सांग... तुझी दाढी-मिशी लांब
काय.. तुझ्या नाकात दोन पाय.. तुझ्या सासुच नाव काय? खाली डोकं वर पाय..
म्हण्जे... वाघाचे पंजे.. कुत्र्याचे कान अन् उंटाची मान..
अजून काय काय असायचं नं ह्या टाईपमधलं.. "तुझ्या नाकात दोन पाय" हे माझ्यामते सर्वात गलिच्छ वाक्य होतं.. माझ्या नाकात अजूनही हुळहूळतं हे ऐकल्यावर.. हां.. आणि ते ऐकून तोंडात घाण चव येते "दे टाळी.. खा पोळी.. दे विडा.. खा किडा.."
ह्या सगळ्यावरून खेळतानाची लहानपणाची वाक्यं आठवली.. आमचे खेळ पण डेंजर असायचे सुट्टीतले..
१. झुंजुमुंजू: ह्या खेळात दोन बाजूना माती असते आणि मधे राज्य घेणारा माणूस.. आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूला राज्य घेणाऱ्या माणसाला चुकवून जाऊन परत यायचं.. बरं, तुम्ही " झुंजुमुंजू- झुंजुमुंजू" म्हणत जात असाल तर राज्य घेणारा माणूस तुम्हांला पकडू शकत नाही.. पण अट अशीये की तुम्ही एकाच ट्रीपमध्ये झुंजुमुंजू वापरू शकता.. म्हणजे जाताना वापरलं असेल तर येताना वापरू शकत नाही..
२. इंदिप्ना पंचरसी: हा मंत्र माझ्या भावाने काढला होता.. तर ह्या खेळांत आम्ही सगळे भिडू आमच्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसायचो.. राज्य घेणारा माणूस बाहेर उभा असायचा.. त्याचा aim हा असायचा की in any case झोपाळ्यावर चढायचं आणि झोपाळवरच्या भिडूंनी त्याला चढू द्यायचं नाही.. आणि हा खेळ चालू असेपर्यंत "इंदिप्ना पंचरसी-इंदिप्ना पंचरसी-इंदिप्ना पंचरसी" हा मंत्र म्हणत बसायचा.. जो थांबेल त्यावर पुढचं राज्य..
३. खांब-खांब-खांबोरी: हा अंगणात मांडव असताना खेळायचा खेळ.. मांडवाच्या खांबाला धरून भिडू उभे राहतात.. राज्य घेणारा माणूस मधोमध उभा राहतो.. आता त्याला चुकवत बाकीच्यांनी खांब अदला-बदली करायचे असतात.. राज्य घेणाऱ्याने मग खांबांवर लक्ष देता देता प्रत्येक खांबाजवळ जाऊन म्हणायचं असतं
राज्य देणारा: फफम्मबाई ताक दे..
खांबावरचा: डेरा फुटला.. उद्या ये..
४. प्रोजेक्ट चंद्रभागा: आमच्या घरामागे एक पाण्याचा पाट वाहतो. उन्हाळ्यात पाण्याचा फोर्स कमी झाला कि पाणी यायचं बंद व्हायचं .. मग मी आणि माझा भाऊ तो पाट स्वच्छ करायचा खेळ खेळायचो. त्याला आम्ही प्रोजेक्ट चंद्रभागा म्हणायचो.. आम्ही pretend करायचो कि आम्ही कोणीतरी मोठे वैज्ञानिक आहोत आणि पाट म्हणजे चंद्रभागा नदी आहे आणि तिला स्वच्छ करायची जबाबदारी आमच्यावर आहे.. ह्यात actually मंत्र वगैरे नव्हते पण पूर्णवेळ आम्ही मोठमोठ्या योजना आखायचो, बातम्या द्यायचो, मग मधेच पूर यायचा तेंव्हा नदीतल्या मुंग्यांना वाचवायचो.. etc etc.
५. नोटे आटे काटे ठोम: (not at home) आम्ही सगळी भावंड, आत्या वगैरे पडवीत बसून हा खेळ खेळायला लागलो कि अख्खी दुपार मस्त जायची.. आपल्याकडे मागितलेला पत्ता आपल्याकडे नसल्यावर "नोटे आटे काटे ठोम" म्हणायला तर असला आनंद व्हायचा..आणि मग लगेच "आता तू.. मला दे.. " म्हणत त्या माणसाने घेतलेले सगळे पत्ते मागायचे..अजून मज्जा यायची ते इतरांकडचे पत्ते पाठ करण्यात "सुजय..दश्शी .. नववी.. आरती एक्का, दीपिका राजा, गोटू" तरी माझा एक लहान भाऊ त्याच्याकडे असलेलं पान दुसऱ्याकडे मागितलं कि स्वतःच ओरडायचा "नोटे आटे काटे ठोम"
६. रुपांझेल रुपांझेल: आमच्याकडे एक तिरकं नारळाचं झाड होतं, त्यावर बर्यापैकी वर चढता यायचं.. आम्ही मग त्यावर चढून rapunzelची गोष्ट enact करायचो.. केसांच्या ठिकाणी एखादी वाळलेली फांदी वगैरे असायची.. सुजयला शाळेत तिचं नाव रुपांझेल सांगितलं होतं आणि तिला प्रेमाने रुपा म्हणायचे ते लोक.. मग आम्हीपण कोणीतरी खाली उभं राहून "रुपा.. रुपा तुझे सोन्यासारखे केस सोडतेस का ग खाली?" म्हणूनमग मराठीतून खेळायचो सगळा खेळ.. मग चेटकीण आणि राजकुमाराच युद्ध म्हणजे आमच्यात मारामाऱ्या आणि रडारड होईपर्यंत जायचं..
आत्ता हे लिहीत असताना मंचची "शोर ना मचाया तो मजा नही आया" जाहिरात आठवली.. खरंय किती.. आता पटली ती जाहिरात.. किती आवाज करायचो आम्ही खेळताना .. खेळायच्या आधी सुटताना तर अजून विचित्र काय काय म्हणायचो .. "इनि मिनी अल्कोसा.. टीप टोप नाकोबा.. नाकोबा का बकाबू.. फ्रांस".. हे फ्रेंच असावं कदाचित.. म्हणजे आम्हाला तरी वाटायचं आणि शेवटी फ्रांस येतं.. फ्रांस ज्यावर येतं तो सुटतो..
"आटली बाटली फुटली" हे मात्र माझं सर्वात नावडतं वाक्य.. लपाछपीमध्ये राज्य आलेलं कोणालाच आवडत नसेल आणि त्यात चुकीच्या माणसाचा धप्पा केल्यावर "आटली बाटली फुटली" होणं किती वाईट ना..पुण्यात काही लोक ह्याला "अंड फुटलं" म्हणतात .. पुण्यात generalच कशालाही काहीपण म्हणतात... "आटली बाटली फुटली" ची मला कायमच भीती वाटायची.. अजूनही वाटत असतेच.. तेव्हा राज्य लपाछपीपुरतं होतं आता "इनि मिनी" न करताही राज्य कायमच असतं.. आणि दिसणाऱ्या माणसाच्या आत नक्की कसा माणूस लपलाय हे अजूनही शोधता नाही येत मला.. आपण काहीतरी बोलून जायचो आणि समोरच्याने "आटली बाटली फुटली" करायचं.. ह्या भीतीने हजारो गोष्टी बोलायच्या टाळल्या आहेत मी.. 'नोटे आटे काटे ठोम" मधल्यासारखं मनातल्या मनात त्या गोष्टी घोळवत बसते मग.. "इंदिप्ना पंचरसि" आणि "झुंजुमुंजू" सारखे मंत्र शोधत बसते मग.. जरा risk घ्यायला नको.. पण मग आज सकाळी उठल्यावर स्वतःच स्वतःला म्हणून घेतलं.. "आज आहे गुढी पाडवा.. आता तरी नीट बोल..वाग अन् खेळ गं गाढवा"