Wednesday, December 5, 2012

Hula Hoop..

कधीपासून हवा होता तिला तिचा स्वतःचा हुला हूप .. गोल गोल गोल गोल फिरायला त्याच्यामध्ये.. 
 काही तायांना खेळताना पाहिलं होतं त्याच्याशी.. किती मस्त खेळ होता तो.. आपल्याभोवती फक्त फिरवत बसवायचं ते हूप गोल गोल गोल गोल..

खूप हट्ट केल्यावर , रडल्यावर, चिडल्यावर आला एक दिवस तो हूप घरात.. वेगवेगळ्या फ्लोरोसेंट  रंगाच्या प्लास्टिकच्या कांड्या.. एकमेकांमध्ये अडकवून झाला कि हुला हूप तय्यार.. ती उभी राहिली पंख्याखाली.. पंखा तिच्या डोक्यावर फिरत होता.. कसा? गोल गोल गोल गोल.. खाली ती उभी राहून फिरणार होती.. कशी? गोल गोल गोल गोल.. 

डोक्यातून तो हूप खाली गेला.. दोन पायांमध्ये एक फुटाचं अंतर... अगदी त्या मापातून फुटपट्टी बनवून घ्यावी इतकं बरोब्बर एक फुटाचं.. जास्तच होतंय का हे अंतर? म्हणून मग २ इंच डावा पाय आत.. २ इंच उजवा पाय आत.. समोरच्या आरश्यात पाहून ती हसली.. म्हणजे हसत आधीपासूनच होती.. पण आता आरश्यात पाहून अजूनच हसली.. कधीपासून करायचं होतं तिला हे हुला हूप.. का? कारण फिरायचं होतं तिला त्यात..  कसं? गोल गोल गोल आणि गोल! 

एका बाजूने लावला तिने जोर.. कंबर हलवायला लागली त्याच दिशेने.. अर्धा गोल फिरून तिचा हुला हूप खाली.. हूल हूल हुप्प! 

शक्यच नाही.. बाकी माणसं किती सहज करतात ते.. त्या जाहिरातीत प्रियंका चोप्रा करते ना.. यु ट्यूबवर एक हजार ३७ विडीयो असतील लोकांचे हुला हूप करताना.. ११ तास हुला हूप करून रेकोर्ड केलाय लोकांनी.. आणि तिला का जमेना मग? 

पहिलाच प्रयत्न आहे.. जमेल कि.. प्रियांका चोप्रालाही पहिल्यांदाच नसेल जमलं.. मग सुरु झाला दुसरा प्रयत्न.. ह्यावेळी उजव्या बाजूला जोर देऊन हूप सोडला.. कंबर हलली.. हुप्प! 

हूल हुप्प..
हुप्प..
हूल हूल हुप्प..
हूल हुप्प.
हूल हूल हुप्प..
हुप्प हुप्प..
हुप्प हुप्प..

माकड फिरायचा प्रयत्न करत राहिलं.. पण काही जमेना.. काय जमेना? फिरणं.. कसं? गोल गोल गोल गोल हूल हूल हुप्प!

मग तिने ठेवला तो हूप दारामागाच्या खिळ्यावर.. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र.. दार बंद व्हायला लागलं आणि हुप्प हुप्प माकड उड्या मारत फिरत राहिलं.. पण गोल गोल गोल गोल मधला गो ही पूर्ण होईना म्हणून हिरमुसून रडायला लागलं.. 

आता गंग्नाम स्टायल ला मागे टाकेल असा व्हिडीओ बनू शकला असता तिचा.. एकदा फक्त कंबर हलत्ये.. हूप पडलं.. एकदा नुसतं हूप हललं.. कंबर मठ्ठ.. एकदा दोन्ही गडगड.. एकदा डावा पाय उगाच वर जातोय.. एकदा उजवा पाय.. हातांच काय करावं माहित नाही त्यामुळे हात अधांतरी.. म्हणजे नक्की काय तर? हूल हूल हुप्प! 

हूप गेला परत दारामाग्च्या खिळ्यावर.. आज.. उद्या.. परवा.. आज.. उद्या.. परवा... पृथ्वी फिरत राहिली.. सूर्य फिरत राहिला.. पण तिच्या कंबरेभोवती हुला हूप काही फिरेना.. न गोल.. न गोल.. न गोल.. न गोल.. 

मग? मग खूप दिवसांनी दार बंद झालं एकदा.. एक कोळीष्टक बाजूला करून हूप आलं परत तिच्या कंबरेभोवती.. हुल हूल हुप्प.. तिने मग ते घेतलं तिच्या मानेभोवती.. आणि काय? गोल गोल गोल गोल.. हूल हूल हूल हूल हूल हूल.. फिरत राहिलं कि ते हूप.. आनंद.. आनंद झाला तिला खूप.. आणि कएयट सारखा काहीतरी आवाज झाला.. पुढे ४ दिवस  उजवीकडे मान जाणं बंद.. मान नाही फिरत ना आपली गोल गोल गोल गोल.. 

सकाळी तिने हूप मधून सूर्य पहिला.. गोल

दुपारी तिने हूप मधून पोळी पाहिली.. गोल

संध्याकाळी तिने हूप मधून मारी पाहिलं.. गोल

रात्री तिने हूप मधून चंद पाहिला.. न गोल.. 

तिलाही वाईट वाटलं.. चंद्रालाही वाईट वाटलं.. हूपलाही वाईट वाटलं.. 

मग ती झोपली.. हुप्ला कुशीत घेऊन.. 

आणि रात्रभर स्वप्नात फिरत राहिली.. कशी?

गोल गोल गोल गोल.. 

कसं?

हूल हूल हूल हुप्प! 


Monday, November 5, 2012

सकाळ

आस्था कुशीवर वळली.. खिडकीतून सुर्याचा उजेड आता डायरेक्ट तिच्या चेहऱ्यावर येत होता..
"दिनभर जलाते हो.. और रात होनेसे पहले खुदही बुझ जाते हो.. ये कौनसी  रीत है?"
तिने जरा जोरातच हा प्रश्न सुर्याला विचारला.. दारात बसलेल्या कुमुदने ते ऐकलं..
"तू सुरजको भी नही छोडेगी... येडी ..."
"ए कुमी.. मी कधीच सोडलयं त्या सुर्याला.. च्यायला तोच नाही सोडत मला.. आजवर एकपण दिवस असा नाही गेल जेव्हा तो मला भेटायला आला नसेल.. मी उठायच्या आधीचं पायाशी घुटमळत बसलेला असतो.."
आस्थाने पायांकडे बोट केलं.. पडद्याच्या एका भोकातून थेट तिच्या पैंजणांवर एक कवडसा पडत होता.. .. कुमुद लगेच उठून तिच्याजवळ आली.. तिच्या पायांना हात लावत म्हणाली..
"साली.. ये किसको लुटा तुने? चांदी आहे?"
"नाहीतर काय अल्मेनीम? तो गणेश आहे ना.. बांद्रावाला.. त्याने दिले.."
कुमुद तिच्याकडे टोवेल फेकत म्हणाली.." प्रेम करायला लागला की काय तुझ्ज्यावर?"
आस्थानी चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला..
खिडकीतून खाली बघत ओरडली "अस्मद.. दो चाय ..आते हुये पार्लेजी लेके आना"
आस्था आरश्यासमोर उभी राहून स्वतःकडे बघत म्हणाली..
"प्रेम.. प्यार.. इस आस्थासे हर कोई प्यार करता है कुमी.. कोई कुच मिन्टोके लिये..कोई कुच घंटोके लिये.. कोणी काही रात्री.. आणि हे असे चुत्ये काही दिवस.."
कुमुद् तिच्याकडे बघत उभी राहिली..
"अबे.. डायलॉग आहे .. मलापण वाटायला लागलं आहे की त्याचं प्रेम बसतं आहे माझ्यावर..ह्या वयात होतंच असं.. आत्ता कुठे मर्द बनायला लागलाय पोरगा.. साला अस्मद  कुठे मेला? "

चहा पित असताना आस्थाने दाराबाहेर घुटमळत उभ्या असलेल्या अस्मदला आत बोलावलं..
"क्या हुआ मेरे अमिताभ बच्चन? आज तू अन्ग्री यंग म्यान नही है क्या?"
अस्मद आत्तापर्यंत जणू वाटच पाहत होता आस्थाने काही बोलायची.. तो लगेच आत शिरला
 "दीदी मेर्को स्कूल जाना है.. पपा नही बोलता है|"
त्यावर कुमुद फिस्स्क्कन हसली..
"अस्मुद्दिन  शहेनशहा.. आपको अब तक २ बार स्कूलमें भरती किया गया .. और आप भाग लिये वहासे.. नही? आस्था.. हा पोरगा असाच करतो " कुमुदने दोन्ही ग्लास उचलून अस्मदच्या हातात दिले
"ए तुम्हे पता नही है तो बोलो नही.. दीदी.. मुझे पपा स्कूल नही भेजते.. गावमें मेरे बडे चाचाजान है.. उनके होटेलमें काम करने जाता हुं मै.. पपा बोलते है, वही अपनी स्कूल है.. सौ-पाचसौका हिसाब माथ्सकी किताब बिना पढेभी आता है ,चायमें चीनी कितनी डलनी है ये सायन्स नही सिखाता..पपा बोलते है.. पढोंगे तो आस्था दीदी जैसे बन जाओगे.. "
आस्थाने चमकून पाहिलं..

काळी-सावळी, बारीकशी आस्था.. आता २४ची झाली असली ती दिसायला मात्र १७-१८चीच.. कपाळावरचं गोंदण टिकलीनी लपवणारी.. बारीक डोळे, लहानसे ओठ, नाक मात्र अगदी चाफेकळी.. हसताना तिचा एक दात खूपच मोठा दिसायचा..  बोलण्यात तिचा हात कोणीच धरू शकणार नाही.. तिच्या आईच्यामते  मोठा दात आणि बोलणं तिला तिच्या वडिलांकडून मिळालं होतं.. तिच्या वडिलांच्यामते ते तिचे वडील नव्हतेच!

आस्था.. एका सामाजिक संस्थेच्या दीदीनी हे नाव ठेवलं होतं..वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायकांच्या मुलांसाठी काम करणारी संस्था होती त्यांची.. दीदी कायम यायची आस्थाच्या  घरी.. आस्थाला पुस्तकं आणून द्यायची, खेळणी द्यायची.. आईकडे गिऱ्हाईक आलं कि आई पडदा लावून घ्यायची.. पडद्यापलीकडे बसून आईचा आवाज ऐकत आस्था पुस्तक वाचत बसायची ..
त्यादिवशी शिव्या ऐकू आल्या.. किंचाळण्याचा आवाज आला.. मारायचा आवाज आला.. ambulanceचा आवाज आला.. रडायचा आवाज आला.. तरी आस्था पुस्तक वाचत बसली ..
 दीदी आस्थाजवळ आली "आस्था.. तुम्हारी मां.."
"अच्छी नही थी...इसलिये चली गयी..दीदी आप मुझे और किताब दोगे?"
आजूबाजूच्या जगातून बाहेर पडायला पुस्तकं तिला मदत करत होती.. पुस्तकं वाचताना ती खुश असायची.. पुढे दीदीचं लग्न झालं.. आणि त्यांच्या संस्थेचं काम ह्या वस्तीत कमी झालं.. दुसर्या एका संस्थेने पुस्तकं वाचते म्हणजे हुशार आहे समजून तिला शाळेत घातलं.. आस्था शाळेत जायला लागली.. आणि तिथेच तिचं पुस्तकांवरचं प्रेम मेलं..

शाळा, अभ्यास, गणितं, शिकवताना नाकात बोटं घालणारे सर नंतर एखाद्या मुलीच्या स्कर्टला हात पुसायचे.. वह्यांवर काही आगाऊ मुलं घाणेरडी चित्रं काढायची .. धक्क्यांची हळू हळू सवय होत होतीच..  शाळेत मराठीच्या चव्हाण बाई तिला खूप आवडायच्या.. त्या तिच्याकडे कधीच बघायच्या नाही तरीही.. त्या वर्गात आल्यावर मस्त गोड वास यायचा.. त्यांना बघून आस्थाला "बाई" व्हावंस वाटायला लागलं होतं..
आस्थाचं घर आता कुमुद्च्या आईला मिळालं होतं..  कुमुद्ची आई आता धंद्यातून बाहेर पडली होती... खूप आजारी असायची.. शेजारी ठेवलेल्या  एका पत्र्याच्या डब्यात दर थोड्यावेळानी थुकत बसायची..
"मावशी.. डॉक्टरकडे जाउया का गं? " आस्था विचारायची..
"पैसे कोण तुझी मेलेली आई भरणार का?" मावशी खाकरत प्रतिप्रश्न करायची..

"मी पैसे भरले तर?" एक दिवस कुमुद हातात पैसे घेऊन आली... आईने नाही विचारलं तिला, कुठून पैसे आले ते.. छातीची कवटाळून रडली फक्त.. त्यादिवसापासून कुमुद बदलली.. साधीच असणारी कुमुद अचानक लिपस्टिक लावायला लागली, गजरे घालायला लागली.. तिचे कपडे लहान झाले.. तिच्याकडे पैसे यायले लागले, नवीन दागिने यायला लागले.. आस्थासोबत ती अजूनही जुनी कुमुद्च होती.. पण आस्था आता तिच्यासोबत जुनी आस्था राहिली नव्हती.. पूर्वी आस्थाला आपण कुमुद्पेक्षा चांगल्या आहोत असं वाटायचं..कुमुद्च्या कायम पुढे आहोत वाटायचं.. आणि आता अचानक कुमुद खूप पुढे गेल्यासारखी वाटायला लागली.. आस्था आता कुमुदसमोर जरा सांभाळून वागायला लागली.. कुमुद्चे नखरे, तिचे दागिने, कपडे बघून आस्थाला "बाई" व्हावसं वाटायला लागलं होतं..

"कहां खो गई आस्थाजान? शाळेत जायचं नाही का? पोरं वाट बघत असतील.. "  आस्था खिडकीतून बाहेर बघत बसली होती..
"वाट लावाणार्याची वाट कोणी का बघेल?" आस्था कुमुदकडे बघत म्हणाली..
"त्या अस्मदच्या बोलण्यात आलीस कि काय? आस्था.. सून.. ना तू किसीकी वाट लगाती है.. ना तेरी वाट लगी है.. जा अंघोळ करून घे.. "

पडदा ओढून घेत आस्था मोरीत उभी राहिली.. समोरच्या भिंतीवर मुंग्याची रांग बघून तिला लहानपणचा खेळ आठवला.. तिने एक तांब्या डोक्यावर ओतला आणि तशीच ताठ उभी राहिली.. एका संस्थेने त्यांच्या वस्तीची ट्रीप काढली होती.. तेव्हा ते गेले होते  श्रवणबेळगोळाला.. तिथल्या गोमटेश्वराच्या मूर्तीकडे आस्था एकटक बघत बसली होती.. वरून येणारं पाणी कसं खालपर्यंत पोचायचं नाही, मग आज्जीने रुईच्या पानातून आणलेलं दुध कसं खालपर्यंत आलं वगैरे गोष्टी ऐकत एकटक बघत बसली होती.. अंघोळ करताना नंतर बरेच दिवस ती हाच विचार करत असायची.. मुंग्यांना आपण असेच मोठे दिसत असू.. आपल्या डोक्यावरचं पाणी खालपर्यंत कसं पोचतं.. ह्याचा विचार करत ती अशीच उभी राहायची..

ती तयार होण्यासाठी आरश्यासमोर उभी राहिली.. आरश्यातून तिला मागे दारात उभी असणारी कुमुद दिसली.. अजूनही सुंदर दिसणारी.. छान कपडे घालणारी.. आता escort बनली होती.. वस्तीतल्या बायकांपेक्षा वरचा जॉब होता तिचा.. भरपूर पैसे मिळत होते.. आता ती चांगल्या सोसायटीत राहात होती.. कंटाळा आली कि आस्थाकडे यायची..

"आस्था.. त्या बांद्र्यावाल्याचं काय आहे? क्या हो रहा है?"

"पता नही.." आस्था केस बांधत म्हणाली..

"आस्था.. तुला आठवतं? तू म्हणाली होतीस.. "जैसी सुबह होती है.. दिनभी वैसेही कटता है"

"हां.. होतं असंच.. सकाळ छान गेली कि दिवस मस्त जातो.. का?"

"आस्था.. तुझी सकाळ चांगली झाली आहे.. खूप चांगली नसली तरी माझ्यापेक्षा चांगली आहे..  आणि तुझा दिवसही तू चांगला घालवू शकतेस.."

"कुमि.. मी असं  बोलायचं असतं.. तू कळेल अश्या भाषेत बोलायचं असतं.. आम्लेट खाणार? मी घेऊन येते खालून.."

आस्था लगेच बाहेर पडली.. कुमुद आता काय सांगणार हे तिला माहित होतं.. वस्तीतल्या शाळेत शिकवणं खूप महत्वाचं काम आहे हे तिला माहित होतं.. शाळेतूनच ती मुलं बाहेर पडू शकतात हेही तिला माहित होतं.. तिला खूप बाहेर पडता आलं नसलं तरी काठावर उभं राहून ती मदत करू शकत होती.. अन काठावर उभं असणार्याला पाणी किती खोल आहे माहित असलं तरी त्यात उडी मारून डुंबायचं असतंच.. ही बाई बनल्यावर आदर आहे पण पैसा नाही.. हुशारी आहे पण नट्टा-फटटा नाही..गेल्या २४  वर्षात पहिल्यांदा तिला भेट मिळाली होती आत्ता.. आस्था विचार करत करत अस्मद्च्या टपरीवर आली.. अस्मद धावत आला तिच्याजवळ
"दीदी मुझे पता था.. आप मुझे स्कूल लेके जाने आओगे.." त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून आस्था त्याच्या पपाकडे वळली..
"चाचा.. आप क्या बोल रहे थे?  चाचा.. सौ-पाच्सौ के लिये माथ्सकि बुक नही लगती.. पर क्या आप ये चाहते हो कि अस्मद जिंदगीभर सिर्फ सौ-पाचसौ में बंद रहे? पढेगा तो मेरे जैसे होगा..तो  क्या बुरा है?"

आस्था परत वर आली.. कुमुद्ला मिठी मारत म्हणाली.. "आजकी सुबह अच्छी है.. जिसके दिलमें सुरज बसता हो.. उसके जिंदगीमे अंधेरा कहां?"

....



Tuesday, October 9, 2012

आत्महत्या

नाव डेंजर आहे पोस्टचं .. पण बाकी काही डेंजर नाहीये.. मी पोस्ट लिहित्ये त्याचा माझ्या आत्ताच्या मनस्थिती वगैरेशी काडीमात्र संबंध नाहीये. मी काय स्वतःहून मरणार नाहीये..

तर हे का लिहावंसं वाटलं?  कॉलेजमधल्या  एका मुलाने परवा स्टडी टूरला आत्महत्या केली. आगापिछा मला जास्त ठाऊक नाही, काही म्हणतात त्याला सिगरेट ओढू दिली नाही म्हणून, काही म्हणतात नशा करत होता, काही म्हणतात सर ओरडले म्हणून, तो सिगरेट ओढतोय हे कोणीतरी घरी कळवलं म्हणून... नक्की कारण माहीत नाही.. पण ऐकलेल्या ह्या कारणांपैकी कोणतंही कारण असेल किंवा ह्याच्या जवळपास जाणारंही काही असेल तरी २१ वर्षाच्या , आई-बाबांच्या एकुलत्या एक मुलानं रात्री तिस-या मजल्यावरून उडी मारावी?
उडी मारली.. पण त्याआधी फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं "so this is my last status ,  im signing off, cant handle life anymore.. bye everyone" अश्या अर्थाचं.. परवा ऐकल्यावर धक्का बसला, त्याची प्रोफाईल पाहिली तर त्याचं हे स्टेटस साधारण ३००हुन अधिक लोकांनी "लाईक" केलं होतं.. इथे फेसबुकबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, पण त्यात नको शिरायला.. हगल्या-पादल्या अपडेट्सना  लोकं लाईक करतात ते माहीत होतंच , पण कोणाच्या सुसाईड नोटमधेही लाईक करण्यासारखं काही असावं, हे विचित्र आहे. घरी आई-बाबा काय करतील आपण गेल्यावर हा विचार नाही करता आला त्याला, पण त्याच्या फेसबुक फ्रेंड्ससाठी जाता जाता स्टेटस अपडेट करणं जास्त महत्त्वाचं वाटलं असावं त्याला.. हेही विचित्रचं आहे!

आत्महत्या वगैरे माझ्या एका मित्राचा आवडता विषय आहे.. तो खूप बोलतो ह्यासगळ्याबद्दल... मी जसं स्वतःहून मरणार नाही म्हणाले तसं तो एकदा म्हणाला होता "संतांनी स्वतः समाधी घेणेच उचित!" (स्वतःबद्दल.. मला संत नाही म्हणू शकत कोणीच) .. काही लोकांना तिरकं बोलायची सवय असते , म्हणजे वाकड्यात शिरून नाही.. तिरकं बघत.. आपण पूर्वेकडे बसलेले असू तर ईशान्य किंवा आग्न्येयेकडे बघत बोलतात ती लोकं, हा तसं बोलतो..अन् बोलायला लागला की साधारण अर्धा तास सलग बोलतो.. तर "मृत्यू" वर त्याने मला अनेकदा (तेचतेच) प्रवचन दिलं आहे.. मला एकदा फूड पोईज्निंग झालं होतं, तेव्हा ह्या पठ्ठ्याने "तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.. काय खाल्लंस? एवढ्या लवकर  giveup करतेस?" वगैरे विचारलं होतं..

तो प्रश्न असेच आर्बिट काहीतरी विचारतो.. एकदा त्याने विचारलं होतं "तू मृत्युपत्रात काय लिहिशील?".. त्याचं तयार आहे म्हणे मृत्यूपत्र.. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या माणसांसाठी एक-एक पान लिहिलं आहे काहीतरी.. त्याला काय करायला आवडलं असतं, ह्याची यादी केलीये म्हणे..
मी खूप विचार केला होत्या ह्या प्रश्नाचा तेव्हा.. मला टेन्शनही आलं जरासं ,
आपण लिहिलेलं शेवटचं काहीतरी असेल ते.. ते चांगलं असायला हवं ना..
किंवा आपण ना श्रीमंत झाल्यावर असं लिहायची वेळ आली तर फिल्मी पद्धतीनं वाटणी करू, "सहा महिने लग्न टिकलं तर १० कोटी रुपये.. " सारखं..
सावरकरांसारखं काही लिहिणं ह्या जन्मात आणि ह्या मृत्युतही शक्य नाही.. प्रबोधिनीत जेव्हा "की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..." म्हटलं जातं तेव्हा अनेकदा अंगावर काटे उभे राहिल्येत..
सरळ शांतपणे " No one is to blame" असं लिहायचं नाहीतर..



अगदी सुरुवातीला मी एक गोष्ट लिहिली होती.. ठाण्या-कळव्याच्यामधल्या ट्रेनच्या ब्रीजजवळ कायम एखादातरी पोलीस असतोच.. नुसता एकटा बसलेला.. तिथे का असतो माहीत नाही.. पण आम्हा मैत्रिणींचा समज असा की तिथे आत्महत्या करायला येणा-या माणसांसाठी बसतो.. तेव्हा मी लिहिली होती गोष्ट.. "एका नदीकाठी  popular suicide pointवर पोलीस एक चौकी बसवतात.. आणि तिथे काम जास्त नसल्याने एका हवालदाराला ठेवतात.. तिथे येणा-या पहिल्या काही  माणसांना तो यशस्वीरित्या परतही पाठवतो.. एकदा एका माणसाला खिशातल्या ३ पैकी २ नोटाही देतो.. पण मग हळूहळू जास्त काम नसल्यानं रिकामं डोकं तिथे आलेल्या लोकांच्या भावनांच्या ओकारीने भरत जातं (किळसवाणी उपमा आहे किती).. नदीच्या दुसऱ्या काठावरून लोकं अजूनही उड्या मारत असतात.. तिथल्या एका नावाडी पोऱ्याला हवालदार डब्बा देत असतो रोज आणि त्याबदल्यात त्या पोराने कोणी उडी मारली की लगेच हवालदाराला येऊन कळवायचं असतं..हवालदार लगेच रिपोर्ट तयार करत असतो.. असेच दिवस जात असतात.. एक सीजन येतो, जो अतीच चांगला असतो जगासाठी.. कोणी येतंच नाही तेव्हा मरायला.. समजवायलाही कोणी नाही अन् रिपोर्ट बनवायलाही कोणी नाही.. एक दिवस नदीत एक इसम उडी मारतो.. नावाडी धावत-पळत चौकीत येतो.. तिथे हवालदार नसतो पण रिपोर्ट तयार असतो.." असंच काहीतरी..

आत्महत्या म्हटलं की मला तो मित्र आठवायचं अजून एक कारण हे आहे की सर्वात घाण आत्महत्या त्याने केली.. फेसबुकवर स्टेटस अपडेट न देता.. प्रचंड creativity असणारा, फिल्म्ससाठी जगणारा.. वयाच्या २५व्या वर्षापर्यंत इतकी मस्त adventurous life  जगलेला तो, फिल्म इंडस्ट्रीत नक्की काहीतरी चांगलं काम करेल असा सगळ्यांना विश्वास होता..मुली काळजी घेणार नाहीत इतका सांभाळायचा स्वतःला .. अचानक काय झालं माहीत नाही.. हल्ली त्याच्या वडलांच्या गारमेंटच्या धंद्यात फायली आणि samples मध्ये बुडलेला असतो.. त्याच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं बघते आणि त्याचं मृत्युपत्र शोधत बसते..

Tuesday, August 28, 2012

युबिकीरी..

"दीदी.. आप मिलने आओगे?" मी फक्त हसले..
"पिंकी प्रॉमिस?" म्हणत त्या पिल्लाने तिची करंगळी पुढे केली..मी  माझी करंगळी तिच्या करंगळीला लावली..
"पक्का?" मी होकारार्थी मान हलवली..

माणूस खोटं बोलू शकतो पण त्याचं शरीर खोटं बोलत नाही असं  body languageवाले सांगत असतील.. पण काहीवेळा जेव्हा तोंडही खोटं बोलायला लाजत असतं तेव्हा हसणं, मानेची हालचाल वगैरे खरं लपवू शकतात.. मी नव्हते भेटणार कधीच तिला परत , तिच्या आईने मला तसंही जास्त  entertain  नव्हतं केलं.. फक्त १८ तासांच्या प्रवासात मुलगी आपल्या एकटीच्या डोक्याला कटकट करणार नाहीये म्हणून जरा बरं वाटलं असेल तिला! मी ट्रेनमध्ये त्यांच्या समोरच्या सीटवर बसल्यावर बराच वेळानी त्या पिल्लाशी बोलायला लागले होते, भारी गोड पोर होती.. खरं सांगू तर मला अजिबात नाव आठवत नाहीये तिचं.. होशंगाबाद किंवा तत्सम गावची होती बहुतेक.. तेही नाही आठवत.. आठवतं फक्त इतकंच आहे की तिने उतरताना माझ्याकडून पिंकी प्रॉमिस घेतलं होतं पुन्हा भेटायचं आणि मी ते पूर्ण नाही केलं.. आणि भविष्यात कधी पूर्ण व्हायचा चान्स नाही..

आज गाजर किसताना करंगळी जराशी किसली गेली.. कोशिम्बिरीला काहीही झालं नाही..ती छान झाली .. पण मला अचानक आठवलं.. पिंकी प्रॉमिस.. करंगळीला करंगळी लावून केलेलं प्रॉमिस.. ते पूर्ण करता आलं नाही की करंगळी कापायची असते म्हणे..खूप काढीव नियम असतात ह्या अश्या शपथ-वचन टाईप गोष्टींना .. आणि तितक्याच काढीव पळवाटाही! आज करंगळीवर बांधलेली पट्टी पाहून न पूर्ण केलेली वचनं आठवत होते..

एकदा जाऊन आल्यावर पुन्हा नाही गेल्ये मणिपूरला अम्येला दिलेलं वचन पूर्ण करायला..

वरची २ सोडल्यास नाही आठवली.. खरोखरच नाही आठवली.. आणि even इथे लिहायला  literary value असणारी काही पूर्ण न केलेली वचनं सुचलीही नाहीत.. माझा प्रोब्लेम्च तो आहे.. मी लाख वचनं देईन, पण ती लक्षात राहायला हवी ना.. आपण काहीतरी विसरतोय हेही कधीतरी आठवायला हवं ना.. मुळात लहान असताना ६७९ वचनं आणि शपथा मोडल्या असलीत "कुणाला सांगू नको हं" पासून सुरु होणाऱ्या.. त्यातून एखादी गोष्ट  top secret  आहे म्हंटल्यावर ती तर exclusively  सगळ्यांना कळायलाच हवी ना.. किती वेगवेगळ्या प्रकारच्या दोऱ्या असायच्या ह्या.. त्यांच्या तीव्रतेनुसार घट्ट - सैल गाठी..
 promise < god promise < mother die promise ..

 पिंकी प्रॉमिस फक्त एक पद्धत आहे.. आमच्यावेळी नव्हती इतकी फेमस..हल्लीच्या जपानी कार्टूनच्या पुरामुळे आपल्याकडे वाहून आली असावी.. जपानीत "युबिकीरी" म्हणतात त्याला.. आवडला मला हा शब्द खूप जास्त.. मी तर वाट बघत्ये युबिकीरी करायची कोणाबरोबर तरी..  तसं स्वतःला रोज किमान २४ वचनं देत असेन मी.. उदाहरणार्थ
: आपण.. ( मी माझ्याशी बोलताना मला आपण म्हणते.. आदर म्हणून.. multiple personality  नाही) तर .. आपण एकदातरी सलग २४ तास झोपू .
: आपण हे वर्ष संपायच्या आत बारीक होऊ
:आपण सगळ्यांच्या विरोधाला सामोरे जात मांजर पाळूच
वगैरे वगैरे.. आणि हे संकल्प नाहीयेत हां.. ही वचनं आहेत..

 हां.. इथेही माझा एक त्रास आहे.. शपथ कधी घ्यायची, वचन कधी द्यायचं हे नाही कळात अजून मला.. पण कोणीतरी म्हटलंचं आहे ना.. "कसमे-वादे  वगैरे सगळं ठीक आहे.. पण त्याचं काय?" मला ना  actually  झोप येत्ये.. मी काय लिहित्ये त्याला तसा काही अर्थ मला स्वतःला लागत नाहीये.. टाईप करताना करंगळी लागत नसली तरी ती ठणकते आहे आता.. त्यामुळे मी इथेच थांबते आहे..

पण अश्या रीतिने ब्लॉगवर पोस्ट टाकत सकाळी "मी आज काहीही करून ब्लॉग लिहेन..  yes yes indeed why not sure sure" म्हणून केलेलं virtual pinky promise पूर्ण करते आहे.. ब्लॉगशी नाही पण युबिकीरीशी इमान राखलं आहे मी ..

Monday, April 2, 2012

खिडकी

प्रिय जोन डो,

आज मी आले इथे.. आल्या आल्या खिडकी उघडली. कधीतरी ती खिडकी उघडणार होतीच, उघडायला हवीच होती... आठवतं का कधी बंद केली होती ते? खिडकी उघडल्यावर बाहेरच्या छज्ज्यावरची कबुतरं फडफडली.. सुखलेल्या, काड्या झालेल्या २-३ गुलाबाच्या कुंड्या आहेत  तश्याच.. धुळीत , कबुतरांच्या घाणीत बरबटलेल्या... आपण एकदा लाईट गेल्यावर मेणबत्तीचं मेण सांडवून आपलं नाव लिहिलं होतं खिडकीत आठवतंय? ते आहे अजून मस्तपैकी .. धुळीमध्ये अजून उठून दिसतं आहे.. माहित्ये तू लगेच विचारशील "बसून नाही दिसते का?".. असे किती पकाऊ जोक मारले असशील ना ह्या खिडकीत बसून.. आणि मीही कितीदा "फेकून दिन हा तुला खिडकीतून ..अजून बडबड केलीस तर" अशी धमकी दिली असेन..

शेठ काकूंनी लगेच चहा आणि त्यांच्या कमी साखरेच्या बदामी कुकीज आणून दिल्या.. बसणार होत्या गप्पा मारायला आणि गेल्या २ वर्षातल्या सोसायटीतल्या "महत्वाच्या घडामोडी" सांगायला..पण तितक्यात शेखर आला .. अरे तू विश्वास नाही ठेवणार.. शेखर २ वर्षात २ फुट वाढला असेल..मिश्या ठेवल्यात आता..सायंस घेतलं आहे.. तू अभ्यास घ्यायचास त्याचा ,अभ्यास कमी आणि पोकेमोनच्या चर्चा जास्त चालायच्या... आता खुपच वेगळा वाटला रे.. आपल्या खिडकीची काच फोडली होती त्याने क्रिकेट खेळताना .. आणि आपण ती परत कधी बसव्लीच्च नाही आपल्या आळसाला "कवडसा मस्त दिसतो" हे नाव देऊन.. आत्ता त्या काचेला लागलेला पेपर पिवळा झालाय.. तुला आवडत नाही तसा.. काढूनच टाकेन आता आणि पतंगी कागद नक्षी कापून लावेन नंतर.. रंगीत नक्षीदार कवडसा पडेल म्हणजे..

चहा पित एकटीच बसले मग खिडकीत.. उद्या जाऊन पडदा घेऊन येईन म्हणते... आठवतं? आपण भुलेश्वर पालथं घातलं होतं.. आपल्याला घरी बनवायचे होते पडदे.. बनवलेही होतेच कि आपण.. आकाशी नेटवर काचेच्या टिकल्या आणि तुझे आवडते लाल भडक पडदे आणि त्यावरची पांढरी तूच काढलेली नक्षी.. तसं पडद्यांचा जास्त  उपयोग नव्हताच झाला कधी.. सताड उघडी असायची ना खिडकी.. समोरच्या बिल्डिंगमधल्या ६ पैकी ४ खिडक्या  बंद आहेत आज..माधुरी दीक्षितच्या खिडकीत बाळाचे कपडे वाळत घातलेले दिसतायत. अब्राहम लिंकनच्या खिडकीत नेहमीप्रमाणे त्याचे आतले कपडे वाळत घातलेत. आजी-आजोबांची खिडकी बंदच असावी बरेच दिवस कारण कबुतरांची कोलनी झाल्ये तिथे..वरच्या मजल्यावर डावीकडे कोण राहायचं रे? अन्ना कि वझलवार? मला ना आठवतच नाहीये नक्की..दोघं वर राहायचे इतकं माहित्ये. त्या रंग दे बसंतीवाल्यांकडे मगाशी मुलगी होती एक ..

ही सगळी माणसं कोण आहेत काय माहीत न खर्या-खुर्या आयुष्यात? आपण इथे राहत असताना किती गोष्टी बनवल्या ह्यांच्या.. सुंदर दिसते, गोरी आहे, एकदा मराठी बोलताना ऐकलं म्हणून ती नववधू आपली माधुरी दिक्षित झाली.. बारीक, दाढीवाला अमेरिकेच्या झेंड्याची चड्डी घालतो म्हणून अब्राहम लिंकन झाला..पोलिसात असणारा वझलवार झाला.. लुंगीमुळे अन्ना बनला.. थोराड दिसणारी, कदाचित नापास होणारी  कॉलेज न सोडणारी मुलं रंग दे बसंती झाली.. आजी-आजोबा मात्र तेच राहिले.. चहा पितानाचा आपला  आवडता टाईमपास त्याच्या आयुष्यात काय होतं आहे हे ठरवायचा असायचा .. आपण खर तर ३ वर्षापूर्वीच माधुरीला प्रेग्नंट घोषित केलं होतं रे.. पण आत्ता बाळाचे कपडे दिसतायत..अन्नाचा लिंकनच्या बायकोवर डोळा आहे हे तुझं ठाम मत होतं..तशी ती होती ढिंच्याकच, मी तेव्हा मान्य नाही केलं कधी.. पण आता म्हणायला काय जात? तू तश्या बायकांमध्ये रुची ठेवत नाहीस हे कळलं आहे ना आता..

१०० रुपयांचं घासाघीस करून २० रुपयात आणलेलं छोटेखानी झुंबर कुठे आहे रे? ते मस्त दिसायचं खिडकीत.. wind chyme का नाही आवडायचं रे तुला? किती मस्त किंकिण असते त्याची.. झाडही नाही लावू द्यायचास तू मला जास्तीच.. फक्त गुलाब लावायचं असायचं तुला..उगाच काहीही ना? पाउस प्यायला लावला होतास खिडकीत उभं राहून..फुटलेल्या काचेतून बरोबर चंद्र समोर  येईल तसं  झोपायचं असायचं तुला तो प्रकाश उघड्या अंगावर पाडत.. दिवाळीत सोडलेल्या दिव्यांच्या माळा Christmas झाल्यावर उतरवाय्चास तू.. माळा बघून चुकून santa clause येऊ शकतो म्हणून दुध आणि कुकीज ठेवल्या होत्यास.. मी मग रात्री खाली उतरून एक गिफ्ट आणून ठेवलं.. मला सकाळ आवडायची इथली, आणि तुला संध्याकाळ..तसा cliche माणूस होतास तू कायमच.. तुझे अर्धे प्रोफाईल फोटो ह्याच खिडकीतले असतील ना रे? माझेही किती फोटो काढले असशील तू इथे.. त्यांना black and white करून अपलोड करायचे मग.. आणि अगणित सावल्यांचे खेळ केले असतील ना आपण..

तू माझ्याआधी घरी यायचास .. मला उशीर व्हायला लागला कि खिडकीत बसून राहाय्चास गेटकडे बघत.. आता आंबा मोठा झालाय खालचा.. गेट नाही दिसत हा..मला शेठ काकू कायम म्हणायच्या "नवरा मिळत नाही हो असा बायकोआधी घरी येऊन तिची वाट बघत बसणारा".. मी मनातल्या मनात म्हणायचे "मलातरी कुठे मिळाला आहे".. सगळ्यांना नवरा-बायकोच वाटायचो आपण.. आणि ह्या सोसायटीत राहायला मिळावं म्हणून आपणही तसंच दाखवत होतो.. आता का खोटं बोला? मला आपलं लग्न पुढे-मागे होणारच ह्याची खात्रीच होती.. म्हणून तर live in साठी एका पायावर तयार झाले होते..तेव्हा कुठे माहीत होतं खिडकीत उभा राहून तू फोनवर बोलतोस ते सगळे फोन कामाचे नसतात म्हणून.. खिडकीत तुला बिलगून फोटो काढताना हे फक्त फोटोपर्यंतच आहे हे कुठे माहीत होतं? १-२ दिवस नसले कि खिडकीत रचून ठेवलेल्या बाटल्या आवरताना वाटायचं माझ्या जुदाईत प्यायलास.. तेव्हा कुठे माहीत होतं तुला company  असायची ते?

तुझ्या आताच्या घरात आहे का रे आपल्यासारखी खिडकी? ती तुला खिडकी हवी तशी सजवू देते का? कुंड्या ठेवल्यात तुम्ही? कोणती झाडं आहेत? चहा पिता का खिडकीत बसून? काच फुटल्यावर तशीच ठेवू देईल का ती? तुमच्या खिडकीत बाळाचे कपडे वाळत घालायची वेळ आली का? तुम्ही बनवता का समोरच्या घरामधल्या गोष्टी? तिला तू दात घासत खिडकीत आल्याचं चालतं का, दाढी केल्याच चालतं खिडकीत ? तू तिची वाट बघतोस? कि ती तुझी? चंद्र दिसतो का? उन येतं का? असे एक हजार प्रश्न आहेत अजून.. तू तिच्यापाठी गेल्यावर मीपण सोडलं होतं हे घर.. आज परत मुंबईत आल्यावर आले इथे.. आता काही दिवस रोज विचारेन असेच अनेक प्रश्न.. संपवून टाकेन विचारून एकदाचे.. अश्याच कागदावर लिहेन ते.. मग तुझा आवडता प्रकार करेन.. ह्या कागदांचे बारीक बारीक तुकडे करून खिडकीतून बाहेर उधळेन.. ठिणग्यान्सारखे चमकतील मग ते कपटे.. त्यातच जराशी जळेन आणि मग खिडकी बंद करून टाकेन..

-जेन रो


Sunday, March 25, 2012

नीट बोल गाढवा..

(गुढी पाडव्याला लिहिली होती.. आज पब्लिश केली)

 आज गुढी पाडवा आहे.. माझ्या ह्या सणाबद्दल तश्या विशेष काही भावना नाहीयेत.. म्हणजे मला दिवाळी लै अशी  नाही आवडत.. गणपती प्रचंड आवडतो.. दसरा चांगला असतो.. ख्रिसमस टीव्हीवर आणि इंग्लिश फिल्म्समध्ये आणि ठाण्यात चरई मध्ये जाम आवडतो..  तसं गुढी पाडव्याबद्ल काहीच भावना नाहीयेत..  त्यामुळे ही पोस्ट गुढी पाडव्याबद्दल नाहीये. ही पोस्ट अशीच जनरल "आता ह्यावर्षी तरी लिहायला हवं आणि सुरुवात आजपासूनच करायला हवी" म्हणून लिहिली गेलेली आहे. आणि as usual  सुचत वगैरे नाहीत विषय म्हणून सुरुवात आपण गुढी पाडव्याने केलेली आहे.

मगाशी माझ्या आईने असं उगाच पुऱ्या लाटत असताना विचारलं.. "आज गुढी उभारतात ना? मग आजच्या दिवसाला गुढी 'पाडवा' का म्हणतात?"  मग मी आणि दीपिकाने ऐकू न आल्यासारखं दाखवून "एका लग्नाची दुसरी गोष्ट' चे आढावे एपिसोड्सबद्दल बोलणं सुरु केलं..मला ना ती सिरीयल बघताना भीती वाटते जाम.. २ कारणं आहेत..
१. कधी टचकन डोळ्यात पाणी येईल सांगता येत नाही.. मग उगाच लाजायला होतं
२. ही सिरीयल ताणली जायची भीती वाटते... ही सिरीयल प्लीज प्लीज जास्त ताणू नको देत.. लोकं नावं ठेवायला लागेपर्यंत नको चालवू देत.. हुरहूर लागून संपवू देत..

ते चार दिवस सासूचे प्रकार काय डेंजर आहे ना .. अजूनही लोकं बघतात आणि ती सिरीयल.. माझ्या ओळखीतले एक आजोबा आहेत ते चा.दि.सा ची वेळ झाली की आजीला बोलवतात "अगं सासूची वेळ झाली..सासू लावायचं आहे ना"  ते क्रिकेट सोडूनपण चा.दि.सा बघतात.

गुढी पाडवा ... नीट बोल गाढवा
सुपारी.. तुझं लग्न दुपारी
सांग... तुझी दाढी-मिशी लांब
काय.. तुझ्या नाकात दोन पाय.. तुझ्या सासुच नाव काय? खाली डोकं वर पाय..
म्हण्जे... वाघाचे पंजे.. कुत्र्याचे कान अन् उंटाची मान..

अजून काय काय असायचं नं ह्या टाईपमधलं.. "तुझ्या नाकात दोन पाय" हे माझ्यामते सर्वात गलिच्छ वाक्य होतं.. माझ्या नाकात अजूनही हुळहूळतं हे ऐकल्यावर..  हां.. आणि ते ऐकून तोंडात घाण चव येते "दे टाळी.. खा पोळी.. दे विडा.. खा किडा.."

ह्या सगळ्यावरून खेळतानाची लहानपणाची वाक्यं आठवली.. आमचे खेळ पण डेंजर असायचे सुट्टीतले..

१. झुंजुमुंजू: ह्या खेळात दोन बाजूना माती असते आणि मधे राज्य घेणारा माणूस.. आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूला राज्य घेणाऱ्या माणसाला चुकवून जाऊन परत यायचं.. बरं, तुम्ही " झुंजुमुंजू- झुंजुमुंजू" म्हणत जात असाल तर राज्य घेणारा माणूस तुम्हांला पकडू शकत नाही.. पण  अट अशीये की तुम्ही एकाच ट्रीपमध्ये झुंजुमुंजू वापरू शकता.. म्हणजे जाताना वापरलं असेल तर येताना वापरू शकत नाही..

२. इंदिप्ना पंचरसी:  हा मंत्र माझ्या भावाने काढला होता.. तर ह्या खेळांत आम्ही सगळे भिडू आमच्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसायचो.. राज्य घेणारा माणूस बाहेर उभा असायचा.. त्याचा aim  हा असायचा की  in any case  झोपाळ्यावर चढायचं आणि झोपाळवरच्या भिडूंनी त्याला चढू द्यायचं नाही.. आणि हा खेळ चालू असेपर्यंत "इंदिप्ना पंचरसी-इंदिप्ना पंचरसी-इंदिप्ना पंचरसी" हा मंत्र म्हणत बसायचा.. जो थांबेल त्यावर पुढचं राज्य..

३. खांब-खांब-खांबोरी: हा अंगणात मांडव असताना खेळायचा खेळ.. मांडवाच्या खांबाला धरून भिडू उभे राहतात.. राज्य घेणारा माणूस मधोमध उभा राहतो.. आता त्याला चुकवत बाकीच्यांनी खांब अदला-बदली करायचे असतात.. राज्य घेणाऱ्याने मग खांबांवर लक्ष देता देता प्रत्येक खांबाजवळ जाऊन म्हणायचं असतं
राज्य देणारा: फफम्मबाई ताक दे..
खांबावरचा: डेरा फुटला.. उद्या ये..

४. प्रोजेक्ट चंद्रभागा: आमच्या घरामागे एक पाण्याचा पाट वाहतो. उन्हाळ्यात पाण्याचा फोर्स कमी झाला कि पाणी यायचं बंद व्हायचं .. मग मी आणि माझा भाऊ तो पाट स्वच्छ करायचा खेळ खेळायचो. त्याला आम्ही प्रोजेक्ट चंद्रभागा म्हणायचो.. आम्ही pretend  करायचो कि आम्ही कोणीतरी मोठे वैज्ञानिक आहोत आणि पाट म्हणजे चंद्रभागा नदी आहे आणि तिला स्वच्छ करायची जबाबदारी आमच्यावर आहे.. ह्यात actually मंत्र वगैरे नव्हते पण पूर्णवेळ आम्ही मोठमोठ्या योजना आखायचो, बातम्या द्यायचो, मग मधेच पूर यायचा तेंव्हा नदीतल्या मुंग्यांना वाचवायचो.. etc etc.

५. नोटे आटे काटे ठोम: (not at home) आम्ही सगळी भावंड, आत्या वगैरे पडवीत बसून हा खेळ खेळायला लागलो कि अख्खी दुपार मस्त जायची.. आपल्याकडे मागितलेला पत्ता आपल्याकडे नसल्यावर "नोटे आटे काटे ठोम" म्हणायला तर असला आनंद व्हायचा..आणि मग लगेच "आता तू.. मला दे.. " म्हणत त्या माणसाने घेतलेले सगळे पत्ते मागायचे..अजून मज्जा यायची ते इतरांकडचे पत्ते पाठ करण्यात "सुजय..दश्शी .. नववी.. आरती एक्का, दीपिका राजा, गोटू" तरी माझा एक लहान भाऊ त्याच्याकडे असलेलं पान दुसऱ्याकडे मागितलं कि स्वतःच ओरडायचा "नोटे आटे काटे ठोम"

६. रुपांझेल रुपांझेल: आमच्याकडे एक तिरकं नारळाचं झाड होतं, त्यावर बर्यापैकी वर चढता यायचं.. आम्ही मग त्यावर चढून rapunzelची गोष्ट enact करायचो.. केसांच्या ठिकाणी एखादी वाळलेली फांदी वगैरे असायची.. सुजयला शाळेत तिचं नाव रुपांझेल सांगितलं होतं आणि तिला प्रेमाने रुपा म्हणायचे ते लोक.. मग आम्हीपण कोणीतरी खाली उभं राहून "रुपा.. रुपा तुझे सोन्यासारखे केस सोडतेस का ग खाली?" म्हणूनमग मराठीतून खेळायचो सगळा खेळ.. मग चेटकीण आणि राजकुमाराच युद्ध म्हणजे आमच्यात मारामाऱ्या आणि रडारड होईपर्यंत जायचं..

आत्ता हे लिहीत असताना मंचची "शोर ना मचाया तो मजा नही आया" जाहिरात आठवली.. खरंय किती.. आता पटली ती जाहिरात.. किती आवाज करायचो आम्ही खेळताना .. खेळायच्या आधी सुटताना तर अजून विचित्र काय काय म्हणायचो .. "इनि मिनी अल्कोसा.. टीप टोप नाकोबा.. नाकोबा का बकाबू.. फ्रांस".. हे फ्रेंच असावं कदाचित.. म्हणजे आम्हाला तरी वाटायचं आणि शेवटी फ्रांस येतं.. फ्रांस ज्यावर येतं तो सुटतो..

"आटली बाटली फुटली" हे मात्र माझं सर्वात नावडतं वाक्य.. लपाछपीमध्ये राज्य आलेलं कोणालाच आवडत नसेल आणि त्यात चुकीच्या माणसाचा धप्पा केल्यावर "आटली बाटली फुटली" होणं किती वाईट ना..पुण्यात काही लोक ह्याला "अंड फुटलं" म्हणतात .. पुण्यात generalच कशालाही काहीपण म्हणतात... "आटली बाटली फुटली" ची मला कायमच भीती वाटायची.. अजूनही वाटत असतेच.. तेव्हा राज्य लपाछपीपुरतं होतं आता "इनि मिनी" न करताही राज्य कायमच असतं.. आणि दिसणाऱ्या माणसाच्या आत नक्की कसा माणूस लपलाय हे अजूनही शोधता नाही येत मला.. आपण काहीतरी बोलून जायचो आणि समोरच्याने "आटली बाटली फुटली" करायचं.. ह्या भीतीने हजारो गोष्टी बोलायच्या टाळल्या आहेत मी.. 'नोटे आटे काटे ठोम" मधल्यासारखं मनातल्या मनात त्या गोष्टी घोळवत बसते मग.. "इंदिप्ना पंचरसि" आणि "झुंजुमुंजू" सारखे मंत्र शोधत बसते मग.. जरा risk घ्यायला नको.. पण मग आज सकाळी उठल्यावर स्वतःच स्वतःला म्हणून घेतलं.. "आज आहे गुढी पाडवा.. आता तरी नीट बोल..वाग अन् खेळ गं गाढवा"