Friday, December 10, 2010

Long Drive

त्याच्या थरथरत्या हातावर तिने तिचा हात ठेवला. त्याने तो हात झिडकारला आणि गाडीचं दार उघडुन बाहेर पडला. तिला कळलंच नाही आता काय करावं ते.. डोक्याला हात लावुन काही काळ ती तशीच बसुन राहिली. रोहित जास्त लांब नव्हता, गाडीच्या पलीकडे उभा असलेला कळत होता. अंधारामुळे दिसत नसला स्पष्ट, तरी गाड्यांच्या उजेडाच्या खुणा त्याच्या आकृतीवर दिसत होत्या. ती गाडीतुन बाहेर येत त्याच्या मागे येउन उभी राहिली...
"रोहित.."
त्याने मागेही वळुन पाहिलं नाही. तसाच वर आकाशात बघत उभा राहिला..
"रोहित.. मला माफ कर प्लीज.. मलाच नाही कळलं नक्की असं का झालं ते.. मुद्दाम नाही रे"
रोहित मागे वळला... ती तशीच उभी राहिली तिथे..
"जा गाडीत जाउन बस... सोडतो तुला घरी"

दोघंही गाडीत काहीच बोलत नव्हते. वायपर्सचा काय तितका आवाज चालु होता. रस्त्यावरच्या दिव्यांचे उजेड आता त्याच्या चेह-यावर दिसत होते. मधुनच वायपर्सची सावली, मधल्या झाडांची सावली.. दिव्याच्या अंतरानुसार काचेवरच्या थेंबांची बदलत्या आकारांची सावली. ती रोहितकडे बघत बसली.. रोहितचं नाक जरा वाकडं आहे हे तिला आत्ता जाणवत होतं. ती खिडकीतुन बाहेर बघायला लागली.
अनिकेतचा आवडता खेळ होता हा, उजेड-सावलीचा...अश्या पावसाळी संध्याकाळी अनिकेत तिला गाडी चालवायला सांगायचा आणि मग कित्तीतरी वेळ तिच्या चेह-यावर बदलणा-या सावल्या बघत बसायचा... "आयला.. तुझे डोळे काळे नाहीयेत अमु.. उजेड आला त्यावर की पिंगे दिसायला लागतात.." हा साक्षात्कार त्याला अश्याच एखाद्या वेळी कधीतरी झाला होता. त्यादिवशी परत येताना, अनिकेत मधेच म्हणाला होता, "अमु.. मला नकोय पिंगी बायको"..  आणि तिने लक्ष नव्हतं दिलं.. मग खूप वेळाने ती म्हणाली होती "आमच्याकडेही घारा-गोराच नवरा हवाय माझ्यासाठी.. तू नाहीच चालणार". अनिकेत हसला होता त्यावर, ती नाही. रोहितच्या डोळ्यांवर उजेड आला तरी त्याचे डोळे घारेच दिसतात हे जाणवलं अमृताला.

विचार करत असताना अमृता रोहितकडे एकटक बघत्ये हे रोहितला जाणवलं, पण तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त एकदा तिच्याकडे पाहिलं. किती शांत होतं सगळं... FM नाही, एखादी CD नाही. म्हणजे ह्या परिस्थितीत कोणीही नॉर्मल माणुस गाणी नाही ऐकणार... पण अनिकेत ऐकायचा.. गाडीत शिरल्यावर करायचं पहिलं काम म्हणजे गाणी सुरु करा, त्यानंतर तो अमृतासाठी दार उघडायचा.. गाणी ऐकणं सर्वात महत्वाचं.. "गाडीत ना अम्या, पेट्रोल नसेल तरी चालेल गं.. ८-१० तरी सीड्या हव्या..ए नवीन जॅसन म्रॅझ ऐकलं का?" म्हणुन तो नवीन आणलेली सीडी लावायचा. न ठरवता random गाणी ऐकता येतात म्हणुन कधीकधी तो FM लावायचा. लोणावळ्याच्या सिंहगड कॉलेजच्या भागात पुणे आणि मुंबई दोन्हीकडची रेडिओ स्टेशन ओव्हरलॅप होतात तिथे थांबायला आवडायचं त्याला. टॉर्चर असायचा तो प्रकार पण त्याला आवडायचा. काहीही आवडु शकतं अनिकेतला... काहीही आवडायचं अनिकेतला! रोहितच्या गाडीत एकही सीडी नव्हती. अमृताला खुप आश्चर्य वाटलं होतं संध्याकाळी ती गाडीत बसली तेव्हा...

संध्याकाळी फोन केला होता रोहितने "लॉन्ग ड्राईव्हवर येणार का?".. तिने नाही म्हणाल्यावर "का गं?" साठीही तिच्याकडे उत्तर नव्हतं.. " come on..पुढच्या महिन्यात साखरपुडा आला आता.. भेटलीच नाहीस तर कसं चालेल अमृता? चल यार.. परत आठवडाभर हार्डली भेटू शकतो आपण.. चल की". ती शेवटी हो म्हणाली, तो तिला घ्यायला येईपर्यंत ती गेटजवळ जाउन उभी राहिली. अनिकेत तिला तिथुनच पिक-अप करायचा ती कॉलेजमधे होती तेव्हा... तिला सोडुन मग अनिकेत पुढे कामावर जायचा, एकत्र जाण्या-येण्यामुळेच त्यांची ओळख वाढत गेली होती. दिवसातला तो सकाळचा थोडावेळ बेस्ट असायचा त्यांच्यासाठी. मग काहीवेळा लवकर कॉलेज सुटत असुन अमृता जास्तवेळ लायब्ररीत बसायची म्हणजे येतानाही अनिकेतबरोबर येता येईल. "आपलं लग्न झाल्यावर आपण ना गाडीतच राहत जाउयात का अमु? म्हणजे हवं तर मोठी गाडी घेउयात.." असे weird  प्रश्न विचारताना, अश्या काहीही कल्पना करताना अनिकेतचा चेहरा खुप उजळायचा. Xyloत राहण्याएवढी नसली तरी बरीच जागा असते की... अमृता मागे वळुन बघत होती गाडीत, रोहितने तिच्याकडे पाहिलं, "काय झालं आता?"..अमृताने फक्त नाही म्हणुन मान हलवली.

एक दिवस असंच अनिकेतनी विचारलं होतं "अमु चल गं, जाऊयात ना लांब कुठेतरी फिरायला.. येतेस का?" तिने आळशीपणा केला होता. अनिकेत मग रागावुन एकटाच निघाला होता. एक्स्प्रेसवे वर असंच लोणावळ्यापर्यंत जाऊन यायला... फाटलेला टायर.. पुढचा ट्रक, मागुन येणारी भरधाव गाडी.... अनिकेत दिसलाही नाही नीट कोणाला...त्यानंतर ती कायमच हे सगळं टाळत आलेली होती.. Long drives  नको,  Express way  नको... गाड्या नको.. प्रवास नको.. आज खुप कष्ट करुन बाहेर पडली होती ह्या सगळ्या "नको" मधुन... चांदणी चौकातच म्हणाली होती ती रोहितला.. "फिरुया परत आता?"...
रोहित पुढे जात राहिला.."चल गं अमृता.. एवढं काय?.. बोल ना काहीतरी.." असं म्हणुन रोहित स्वतःच गोष्ट सांगत बसला होता.. गुंग झाला होता लहानपणच्या कोणत्यातरी आठवणीत.. आठवणीच्या वेगानेच गाडी चालवायच्या प्रयत्नात.. इतक्यात पलीकडचा एक ट्रक अचानक वळला पेट्रोल पंपासाठी.. आणि धाडकन ह्याच्या गाडीसमोर आला.. रोहितने पटकन गाडी सांभाळायचा प्रयत्न केला.. ती जोरात ओरडली "अनिकेत... जपुन ".. रोहितने गाडी सांभाळली पण हे पुढचं त्याला सांभाळता येईना.. गाडी बाजुला लावुन तसाच थरथरत बसला...

गाडीला ब्रेक लागल्यावर ती पुन्हा भानावर आली. त्यांचा गेटपर्यंत येउन थांबले होते दोघं. तिनी दार उघडलं आणि बाहेर येउन उभी राहिली. रोहित तिच्याकडे बघत नव्हताच.
"रोहित..  I am sorry"
"ठीक आहे.. उद्या संध्याकाळी तयार रहा.. येईन आजच्याच वेळेला.."
तिला काहीच कळेना.. रोहितने तिच्याकडे पाहिलं... "उद्या येशिल long drive ला? ... माझ्याबरोबर...?"



 I 'll drive out memories, the evening air keeping me awake,
those I leave behind only make room for more to be made...

Thursday, December 2, 2010

प्रेमकथा वगैरे

विक्रांतने नवीन खुळ घेतलं आहे.. नेटबुक घेउन कुठेतरी जायचं आणि "मी लेखक आहे" ह्याची जाहिरात करत काहीतरी डेंजर लिहायचं.. हल्ली काही लोक डेंजर, बेक्कार, अगदी घाण वगैरे शब्दही चांगल्या अर्थाने वापरतात.. नगरला म्हणे "बेक्कार वडापाव" नावाचं दुकान आहे..मधे काका म्हणाला होता, त्याची होणारी बायको "भयंकर सुंदर" आहे. अरे भयंकर सुंदर काय? काहीही.. तर विक्रांत डेंजर काहीतरी लिहतो.

आत्ता परवा म्हणाला की " प्रेमकथा लिहील्ये मी".. मी अवाक होऊन पाहिलं त्याच्याकडे.. प्रे-म-क-था?? आणि तीसुद्धा वि-क्रां-त?? "नरेट करतो तुला" असं ऐकलं आणि अण्णानी डोश्याच्या तापलेल्या तव्यावर पाण्याचा हबका मारल्यावर जे काही होतं ते मला झालं. कारण विक्र्याची गोष्ट म्हणजे न तापलेल्या तव्यावर घातलेल्या डोश्यासारखी असते. " एक मुलगा असतो" असं म्हणत त्याने चाफेकळी (अंगठ्याशेजारचं बोट) ची नखुर्डी निघालेली खाल्ली.. बाकी आमचं काही पटो-ना-पटो, आमच्या खाण्याच्या आवडी-निवडी जुळतात भार्रीच! फक्त मी रवंथ करत बसत नाही, तो बसतो.. "एक मुलगा असतो" ह्याच्या पुढे "आणि एक मुलगी असते" हे वाक्य येणारे हे शेंबडं पोरही सांगेल, पण उगाच इतकं फुटेज खायचं ना ( मला ते पण खायला आवडतं) ..मग एक दशलक्ष क्षणांनी तो म्हणाला.. " आणि एक मुलगी असते".. आणि गायक-वादक समेवर दाद मिळवण्यासाठी जसं श्रोत्यांकडे बघतात तसं त्याने माझ्याकडे पाहिलं... अश्यावेळी एखादा बहिरा श्रोता जे करेल तेच मी केलं.. चेहरा जेव्हढा मख्ख ठेवता येईल तेवढा मख्ख ठेवला..

"आपण मॅकडी मधे जाउया, इथे मुड येत नाही" मॅकडी मधे प्रेमकथा नरेट करायचा मुड कसा येउ शकतो? मुळात विक्याला प्रेमकथा नरेट करायचा मुडच कसा येउ शकतो? तो ना "मी त्या गावाला जाउन आलोय, गाव लई बेक्कार आहे" गटात मोडतो. (बेक्कार चा इथला अर्थ आपल्याला हवा तसा लावावा).. एकदा कधीतरी प्रेमात पडुन उठल्यावर किंवा आपण प्रेमात पडलोय असं वाटुन मग आपला प्रेमभंग झालाय असं वाटुन झाल्यावरच्या लोकांचा गट असतो हा.. जवळ्जवळ सगळे सिंगल लोक ह्या गटात मोडतात :) ... तर ह्या लोकांचं कसं असतं की एकतर "दुरुन डोंगर साजरे" किंवा "कोल्ह्याला द्राक्ष आंबट" काहीतरी एक असतं.. म्हणजे ना..

गट १ : दुरुन डोंगर साजरे: प्रेमात पडलोय असं वाटल्यामुळे फक्त, "प्रेम" ह्या संकल्पनेबद्दल असल्या कायच्या काय भारी कल्पना करुन ठेवतात की बास्सच... माझा प्रियकर (हा शब्द नाही वापरत म्हणजे..) असा एकदम हिरो मटेरिअल असेल, तो स्मार्ट असेल, हुषार असेल, मनमिळाउ असेल, प्रेमळ असेल, आणि handsomeपण असेल, आणि शॉपिंगला पण येईल आणि पैसेही खर्च करेल.. किंवा माझी प्रेयसी (हा शब्दही नाही वापरत) हॉट असेल, सेक्शी असेल, पण कौटुंबिक टाईपची असेल, माझं ऐकेल, माझ्या आईचं ऐकेल वगैरे काय काय.. आम्ही कॉफी पिउ, पावसात भिजु, रात्री चांदण्यात फिरु आणि अजुन असं काय काय...

गट २: कोल्हयाला द्राक्ष आंबट: प्रेमभंग (अनेक केसेस मधे क्रश-भंग) झाल्यानंतर मग कोल्ह्याला तो क्रश आंबट लागायला लागतो.. द्राक्षांपेक्षा नासलेल्या द्राक्षांपासुन बनवलेले द्रवपदार्थ गोड लागायला लागतात.. मग ही लोकं "प्रेम" ह्या संकल्पनेला इतक्या शिव्या घालतात..आणि जनरलच प्रेमात पडलेल्यांना बावळट वगैरे मानायला लागतात.. बाय द वे रिसर्च सांगतं की हे गट mutually exclusive नाहीत... कोल्ह्याला डोंगर आंबट किंवा दुरुन द्राक्ष साजरी दिसु शकतात...

तर मुद्दा राहतोय बाजुला.. विक ह्या दोन्ही गटात अधुनमधुन फिरत असतो.. सो त्याने प्रेमकथा लिहावी म्हणजे जरा अतिच होतं... सो मग मॅक्डीच्या टेबलवर बसल्यानंतर त्याने रॉनल्ड मॅकडोनाल्डकडे पाहिलं.. "तेजु..." मी बाजुच्या मुलाच्या हॅप्पी मीलमधे मिळालेलं खेळणं बघण्यात बिझी होते.. त्याने परत हाक मारली "तेजु..." मग नाईलाजाने मला त्याच्याकडे बघावं लागलं.. ह्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना ओठांना, हनुवटीला खाताना काहीतरी लागणं ही कल्पना इतकी का आवडते? म्हणजे फिल्ममधे ठीक आहे... पण प्रत्यक्षातही का नं? का? पुसावं की तोंड बर्गरच चिज लागल्यावर.. विक्याच्या म्हणण्यानुसार ते चिज सांडलं नाही बर्गर खाताना तर त्याचं चिझ होत नाही.. "तेजु.. एकदा ना रजनीकांतने मॅक्डीत येउन इडली-सांबार मागवला आणि रोनाल्ड त्याला नाही म्हणाला तेव्हापासुन तो इथे बाहेरच बसतो"

मुळात एकतर आता रजनीकांत अजीर्ण झालाय ( माझा ब्लॉग ह्या विधानानंतर बंद पडु शकतो.. पण खरं खरं झालाय राव) आणि त्यात विक्याने "पाव किलो मैदा, अर्धा किलो साखर, अर्धा किलो चहा पावडर, एक हमाम" च्या चालीत हा जोक सांगितल्यावर कोणाला का हसु येईल? मग मी माझा मख्ख चेहरा २ दाखवला.. "तु आज हरवली आहेस तेजु.. जाउदे हा प्रेमकथा सांगण्यासाठी चांगला दिवस नाहीये" म्हणुन तो तिथुन निघतो.. मॅक्डीमधे टिप देणारा माझ्या ओळखीतला एकमेव माणुस आहे विक्या... हा फंडा नाही कळलाय मला कधी.. लोक टपरीवर कधी टीप देत नाहीत, आणि चांगला पगार मिळणा-या ठिकाणी वेटर्सना भरमसाठ देतात.

मग मी निघाले, रिक्षात बसल्यावर २ मिन्टांत विक्याचा एस्मेस आला " मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात. पण मुलगी त्याला सोडुन निघुन जाते. आणि तिचं लग्न ठरतं, लग्नाच्या दिवशी हिरो तिच्याकडे जातो आणि ती त्याला हो म्हणते आणि they live happily ever after"

कोल्हा, डोंगर, आंबट, साजरी, द्राक्षं, सगळे दुरवर पसरतात.. रिक्शावाला कुठे जायचंय विचारत असतो आणि मग मी माझा मख्ख चेहरा ३ दाखवते.

Sunday, October 10, 2010

She - Elvis Costello

She
May be the beauty or the beast
May be the famine or the feast
May turn each day into a heaven or a hell
She may be the mirror of my dreams
The smile reflected in a stream
She may not be what she may seem
Inside her shell 

विष्णुमयी!

आमच्याच मागच्या नाक्यावर खूप मोठी देवी बसते.! तिची मुर्ती इतकी इतकी सुंदर असते ना... इंटरनेटवर पसरतात लगेच तिचे फोटो..तिचं ते देखणं रुप डोळ्यांत बसतं... स्पीकरच्या भिंती बाजुला उभ्या असल्या तरी तिच्यासमोर उभं राहिल्यावर शांत होतं सगळं... सगळं व्यापुन टाकते ती..विष्णुमयी!

 अलिबागला कालीमॉं बसवायचे तिथले काही लोक.. तिचे ते अनेक हात, काजळानी भरलेले डोळे.. एका हातात असणारं मुंडकं, गळ्यातली माळ, लाल जीभ... तिचं ते रुपही विसरणं शक्य नाहीये.. भीती वाटते मला तेव्हा तिची! आजुबाजुला सगळं शांत असुनही मनाची चलबिचल चालुच राहते तिच्यासमोर... विष्णुमयी कसं म्हणावं हिला?
.................

 क्षुधा
तिचे हात पटापटा फिरत असतात पोलपाटावर.. तव्यावरची पोळी तशीच हाताने उचलते.. हातावर आलेल्या वाफेची कौतुकं करत बसायला वेळ नसतो तिला..१००-१५०-२००-२५०... तिची मुलगी मोजत असते पोळ्या.. गरम पोळीवर तुप सोडुन साखर भुरभुरवुन खायची आवड होती दोघींना लहानपणी.. पण आता पोळ्या बघुनही कंटाळा येईल इतक्या पोळ्या सकाळ-संध्याकाळ करायच्या असतात...एखाद्या दिवशी एखादा मुलगा महिन्याभराचे पैसे देताना म्हणतो.. "काकू, तुमच्या पोळ्या एकदम माझ्या आईसारख्या असतात..".. स्वतःचं पोट भरण्यासाठी अजुन किती लोकांची पोटं भरते ती!

ती, तिच्या फिगरकडे बघुन कोणत्याही मुलीला हेवा वाटावा इतका सुंदर बांधा... दिवसभर ऑफिसमधे इथुन-तिथुन फिरताना कित्येकजण मागे वळुन बघत असतील तिच्याकडे... पण आजवर कोणीही तिला खाताना पाहिलंच नाहीये! मधेच ती ऑफिसला येईनाशी होते.. काय झालं आहे कोणालाच कळत नाही.. मग कोणीतरी बातमी देतं.. आजारी पडल्ये ती.. कारण Bulimia Nervosa... भुकेचं अजुन एक रुप!
.....................

लक्ष्मी
"बेटी घर की लक्ष्मी होती है" हे ऐकत ती लहानाची मोठी झाली होती माहेरी..

"आपकी बेटी अब हमारे घरकी गृहलक्ष्मी है" असं ऐकत ती सासरी जगली.. लग्नात माहेरची लक्ष्मी घेउन आली होती ना सासरी!
.................

 क्षांति
"आपल्या पहिल्या डेटची अ‍ॅनिव्हर्सरी विसरायची म्हणजे काय?" म्हणत लटक्या रागाने बघते ती त्याच्याकडे... ती मग खिसा कापते त्याचा.. शॉपिंग, फिल्म, हॉटेलमधे जेवण.. एवढं सगळं वसुल करुन मग रात्री झोपताना हसुन बघते त्याच्याकडे.. माफ करते त्याला!

सकाळी तिची कामवाली येते... "पिउन आला होता तो.. मग काय घातले पाठीत दोन रट्टे.. रात्रभर कुडकुडत होता दाराबाहेर".. क्षमाच ही पण!
...................

 शक्ती
सकाळच्या ८:३२ फास्टच्या गर्दीत एक शाळेतली मुलगी ट्रेनमधे चढता चढता अडकते.. ट्रेन सुरु झालेली असते... आत शिरायलाही  जागा नाही आणि मुलगी अर्धवट लोंबकळते आहे दारात.. दारातच उभी असणारी ती, त्या मुलीचा हात गच्च धरते.. स्वतः फ़ुटरेस्टवर उभी असलेली ती सगळं बळ लावुन त्या मुलीला वर खेचते..पुढच्या स्टेशनपर्यन्त स्वतःचा श्वास रोखुन थरथरत्या हाताने मुलीला धरुन ठेवते...पुढच्या स्टेशनवर उभं राहायला व्यवस्थित जागा करुन देते त्या मुलीला.. आणि मग तिचा बांध फुटतो.."काय घाई होती का गं? पडुन मेली असतीस तर?"

संध्याकाळची ७:४८ ची परत येणारी ट्रेन.. मरणाची गर्दी.. दादरला ती पदर खोचुन उभी असते.. ट्रेन थांबायच्या आधीच त्यात घुसायच्या तयारीने.. आपण नाही शिरलो तर बाजुची बाई शिरेल.. दिवसभराचा थकवा गिळुन.. पर्स छातीशी कवटाळुन ती उभी असते.. ट्रेन आल्या आल्या तिला काहीही कळत नसतं... ती हात-पाय मारत ट्रेनमधे सुर मारते.. मागच्या बाईला कोपर लागल्याचं तिला सोयर-सुतक नसतं.. वा-याच्या बाजुची फोर्थ सीट मिळवल्याचा अभिमान चेह-यावर.. शक्तीच की ही पण!
..............................

चेतना
चेहरा रक्ताने भरला होता माझा. ती बाहेर पडत होती, मला बघुन पळतच माझ्याकडे आली.. तिनं मला धरलं आणि हॉस्पिटलच्या आत घेउन गेली. दिवसभराची दमुन रात्री ९:३०ला घरी निघालेली ती डॉक्टर माझ्यासाठी परत आत आली.. मला सांभाळत, रक्त पुसत, माझ्यावर ऑपरेशन केलं तिनं... हरपलेली शुद्ध परत आल्यावर तिचा मास्क घातलेला चेहरा पाहिला फक्त मी!चेतना देणारी...

त्यादिवशी ऑपरेशन थिएटरमधे आत नेलं तेव्हा असह्य वेदना होत्या... तेव्हा अजुन एक मुलगी आली मास्क घालुन.. "अगदी थोडं दुखेल हां" म्हणत तिने मुळीच न दुखावता एक सुई टोचली... "anesthesia देउन झालाय डॉक्टर" म्हणत ती मला दिसेनाशी झाली... योग्यवेळी चेतना काढुन घेणारी ती!
........................

छाया
ऑडिशनला जात असताना तिने "pollution" मुळे  "complexion" बिघडु नये म्हणुन काच वर केली गाडीची.. आणि तिच्या "Imported makeup kit"च्या "mirror"मधे स्वतःचं "reflection" बघत होती...

त्याच गाडीच्या काचेवर भर उन्हात सिग्नलवर गाडी थांबल्यावर तिथल्या खेळणी विकणा-या मुलीनी स्वतःला पाहुन घेतलं..
.......................

बुद्धी
ती एकदम हुश्शार बाई.. गोल्ड मेडालिस्ट मुंबई युनिव्हर्सिटीची, पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेली..अमेरिकेतुन डॉक्टरेट मिळवुन भारतात आली. एका मोठ्या मार्केटिंग कंपनीत खूप मोठ्या पदावर १० वर्ष काम करत होती. खूप मान मिळाला तिला... एक दिवस सोडलं तिनी सगळं आणि हा आश्रम चालवायला लागली... "ख-या अर्थाने आत्ता कुठे बुद्धिचा उपयोग करायला लागल्ये गं मी" असं म्हणत गोडसं हसते ती... बुद्धीचं रुप आहे ती एक!

तिच्याशी बोलत असताना एक आश्रमातली मुलगी पळत पळत येउन तिला बिलगते. तोंडातुन गळणारी लाळ पदरालाच पुसते तिच्या... "ताई.. ताई.. पाहुणे.. चॉकलेट?" असं काहीतरी बोलत माझ्याकडे बोट दाखवत हसते ती.. "अशी मंदबुद्धी मुलगी कोण सांभाळणार?" म्हणत काही वर्षांपुर्वी तिच्या घरच्यांनी तिला इथे आणुन सोडलं... १९ वर्षांच्या तिच्या शरीरात अजुनही ६ वर्षाच्या मुलीची बुद्धी आहे.. तीसुद्धा बुद्धीचंच एक रुप!
...........................

मातृ
"मेरको नही पता मेरी मॉ कौन है... वहा तलावपाळीके साईडमें मेरको फेक कर भाग गयी ****" ती तिच्या स्वतःच्या हॉटेल वजा खानावळीतल्या काऊंटरवर बसुन बोलते...

मागच्या फ्रेममधे Mother Mary  तिच्याकडे बघत हसत तिला आशिर्वाद देत असते.
...........................

निद्रा 
आई ओरडत्ये मला आत्ता "झोप आता" म्हणुन... लहान असताना तिच्या मांडीवर धबाबा थोपटायची मला... थंडी असताना तिच्या पांघरुणात घ्यायची मला, माझी झोप न मोडता... अनेकदा गायची मला झोपवताना.. "नन्ही कली सोने चली...हवा धीरे आना.. नींद भरे पंख लिये, झूला झूला जाना".. अजुनही झोप येत नसताना तिचा आवाज आठवला की झोप येते..

ती ओरडते पहाटे पहाटे "ताई उठ आता"... मग खोलीतली टुयब लागते फरफडत.. उघडलेले डोळे परत गच्च मिटतात.. तिने रात्रभर जागुन केलेली तिची आर्किटेक्चरची assignment  दाखवते मग ती! तिचं काम झालं असतं अर्ध्या तासाभरापुर्वीच, पण मग माझ्या उठण्याच्या वेळेपर्यंत थांबते, मला उठवुन मग उरलेल्या अर्ध्या तासासाठी झोपते ती!
...........................

जाति
तिचं नाव कॉलनीतल्या मुलांनी लायला ठेवलं होतं.. गावठी कुत्री होती... आमच्या वॉचमन काकांना तिची खूप सोबत असायची.. २-३दा चोरांना पळवुन लावलं होतं तिने.. पण कॉलनीतल्या कोणी मुलांनी तिला त्रास दिला तरी त्यांना कधी त्रास द्यायची नाही.. कळायचं तिला माणसासारखं

ती पण अशीच रात्र रात्र बाहेर असायची.. कॉलनीतले काही जण म्हणायचे की कॉलसेंटरमधे काम करते.. उरलेले सगळे तिला.. बिच म्हणायचे!
............................

इन्द्रियाणामधिष्ठात्री   भुतानां   चाखिलेषु   या   ।
भूतेषु   सततं   तस्यै   व्याप्तिदेव्यै   नमो   नमः   ॥

चितिरूपेण   या   कृत्स्नमेतद्व्याप्य   स्थिता   जगत्   ।
नमस्तस्यै   नमस्तस्यै   नमस्तस्यै   नमो   नमः   ॥

Tuesday, September 7, 2010

परिवलन- परिभ्रमण

घरी आल्या आल्या आईला सांगितलं मला ३९ मिळाले भुगोलात आणि इतिहासात ४०... इतिहासातल्या पैकीच्या पैकी मार्कांकडे दुर्लक्ष करत आईचा पहिला प्रश्न आला होता, "भुगोलात एक मार्क कुठे गेला?" .. दप्तर दिवाणावर टाकत, टीव्ही लावुन मग पाणी पित असताना मी म्हंटलं "एक कुठलीतरी रिकामी जागा भरायची चुकली".. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात असं मी लिहुन आले होते...
"अश्याच बावळटासारख्या चुका करतेस तू कायम" आईने शिकरण-पोळीबरोबर अजुन हे असं आंबट-तिखट तोंडी लावणं दिलं असणार तेव्हा...

त्यानंतर पृथ्वीची परिवलनं-परिभ्रमणं होतं राहिली... आमचंही स्वतःभोवती फिरता फिरता दुस-यांभोवती फिरणं चालुच होतं.. कधी आई-बाबांभोवती, कधी आमच्या idols भोवती, मित्र-मैत्रिणींभोवती.. कधी एखाद्याच मित्राभोवती... दिवसांच्या रात्री झाल्या, रात्रींचे दिवस झाले...गोल फिरणं चालु राहिलं. केन्द्रबिंदुतला तारा बदलत राहिला..नवीन ता-यांबरोबर नवीन संदर्भ आले.. नवीन संदर्भांची नवीन स्पष्टीकरणं आली..कधी तारा तोच राहिला पण माझ्याच कक्षा बदलत गेल्या.. बुधापेक्षापण जवळ फिरले कधी तर कधी इतकी लांब गेले की मला प्लुटो ठरवत त्या सिस्टीमनी माझ्या ग्रहपणावरच घाला घातला..

२४वं परिभ्रमण सुर्याभोवतीचं पुर्ण व्हायला आलं आहे आता...पाव आयुष्य संपलं म्हणणार होते.. पण कोण जगतंय १०० वर्ष? श्या... १/४ पेक्षा जास्त आयुष्य संपलं की..च्यायला आत्ता कुठे कळायला लागलं आहे की दरवेळी परिवलन करताना परिभ्रमण करणं गरजेचं नसतं... इतके दिवस लागतात होय ह्या गोष्टी कळायला?? मग आजुबाजुच्या मैत्रिणींचे साखरपुडे साजरे करत फिरताना वाटतं आता परत कुठे नवीन कक्षा अ‍ॅड करा स्वतःसाठी? एखाद्या तुटलेल्या ता-यासारखं भटकु की जरा दिशाहीन...

पण असा संपतोय थोडीच हा भिंग-यांचा खेळ? मग ह्या भिंग-यांच्या खेळात नवीन भिंगरी येणार आता.. म्हणजे आई-बाबा लागलेत शोधायला.. भिंग-याची कित्ती ती दुकानं आणि कित्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भिंग-या...भिंग-यांच्या बाजारात भाव जास्त मिळावा म्हणुन मग नटुन-थटुन फोटो काय काढा, नोक-या काय बदला अन काय काय अजुन! त्यात scientific भिंग-यांना मागणी जास्त.. arts वाल्या भिंग-या फिरतच नाहीत जणु काही.. फिरत राहायचं पण आपण.. कधीतरी कुठेतरी कोणतीतरी सूर्यमाला आपल्याला घेईल त्यांच्यात, त्यांच्या सूर्याभोवती फिरायला..

हे सगळं डोक्यात चालु असताना, रात्री अंगणात उभं राहिल्यावर व्याध दिसतो मग आकाशात.. Sirius..सर्वात तेजस्वी तारा आपल्याकडुन दिसणारा... मग अचानक लहानपणी आकाशदर्शनाला गेले असतानाचा राम काकांचा आवाज ऐकु येतो "व्याध बायनरी स्टार आहे.. आपल्याकडुन एकच तारा दिसत असला तरी मुळात ते दोन तारे आहेत एकमेकांभोवती असणारे.. पण साध्या डोळ्यांना एकच दिसणारे" .. मग माझ्या चेह-यावर smile येतं.. मी घरात येते आणि झोपुन जाते.

उठते तेव्हा नवीन परिवलन सुरु झालं असतं.. पृथ्वीचं आणि आमचंही...
तेव्हा गेलेला १ मार्क मिळतोय की आता परत...



Wednesday, July 28, 2010

Lost in Translation

उपद्व्यापी खो खो सुरु झाल्यावर खूप मनापासुन वाटत होतं "राव मला खो नका देउ"... जरा लाट ओसरल्यावर मिळाला तरी चालेल. पण अगदीच लवकर मिळाल्यावर जामच टेन्शन आलं. त्यात सगळ्यांनी खो खोवर तुटुन पडुन उड्या मारलेल्या बघुन अजुनच लाज वाटायला लागली स्वतःच्या अज्ञानाची. मला मराठी कविताही जास्त माहित नाहीत.. मावसबोलीतल्या म्हणजे अशक्यच! हिंदी-इंग्रजी गाणी माहित्येत म्हणा तशी, पण अनुवाद, भाषांतर, रुपांतर.. स्वैर-अस्वैर काही जमणार नाही हे पहिल्यापासुन माहित्ये. जेव्हा श्रद्धाने खो दिला, तेव्हा मग मी "पख.. आता करायलाच पाहिजे काहीतरी" म्हणुन मावसबोलीतल्या कविता आठवायला लागले.

पहिलीच कविता आठवली, ती फक्त दिसत होती... धुक्याने भरलेल्या एका सकाळी, मणिपुरमधल्या, ब्रह्मदेशाच्या बॉर्डरजवळ असणा-या खारासोमच्या सन्डे हॉलमधे बसलेले असताना, तिथे चहा बनवणारी २ मुलं दिसत होती.. मी त्यांच्याशी गप्पा मारायला म्हणुन गेले. आम्ही इथल्या तिथल्या गप्पा मारत असताना, "भारतातुन" आलेले एक काका तिथे आले आणि टिपीकल प्रश्न विचारायला लागले. "तुम्हाला भारताबद्दल काय वाटतं?, "तुम्ही स्वातंत्र्यदिनाला काय करता?", "तुम्हाला राष्ट्रगीत येतं का?".. आईचा घो! त्या दोघांनी मान डोलावली.. आणि मणिपुरीमधे काहीतरी गुणगुणायला लागली.. काही शब्द कळले, पण नीट नाहीच.. काका त्या शब्दांवर समाधान मानत अजुन एक चहा घेउन तिथुन निघुन गेले. काका गेल्यावर ही दोघं मुलं हसायला लागली. कुछ तो बात है म्हणुन मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

त्यांनी गायलेलं वंदे मातरम होतं: ऐनौ वंदे मातरम

लालमिनै लैनागंपा लां, अफ्स्पा (AFSPA) ना पान्ब लैबाक
ओट-नैरिब लंदम, लौइलम-गी लंदम,
नुंग्तम्ब फुंगले-गायनु, शक्लु-घी-देने औजी ऐनौ वंदे मातरम


पुनचीन-बिरंगदं खौन्ग-खुत, सारंगी मन्नुंग्दा
अपुन्चीग-बिरंगदं शोर-से लेप फौब केच्डीदा (custody)
न-अंग-खी-गदरा ऐबु, जन गण मन अधिना.. भारत भाग्य विधाता



मला समजलेला, त्यांनी समजावलेला अर्थ:

सैनिकांची सत्ता असणारा देश,
AFSPAने गोंजारुन ठेवलेला देश,
पेटुन उठला तरी विझलेला देश,
तोंड दाबुन जगणारा हा माझा देश,
स्वातंत्र्य मिळालं म्हणे ह्या देशाला...
सांगा खरंच मी,
वंदे मातरम गायचं कशाला?

हात पाय बांधा माझे,
टाका मला तुरुंगात..
मारा मला, झोडा मला
कस्टडीत फोडा मला..
सांगा मला, स्वातंत्र्य मिळालं आहे आता...
गायचं का मग मी?
जन गण मन भारत भाग्यविधाता?


ह्या मावसभाषेत, मणिपुरीत.. निसर्गाच्या, प्रेमाच्या, राधा-कृष्णाच्या, जिझसच्या कविता आहेत, एकही शब्द कळत नसताना त्यांची गाणीही गोड वाटतात ऐकायला.. पण हेच गाणं घेतलं कारण तिथे नक्की काय चाल्लय हे कळायला हवं आपल्याही भाषेत म्हणुन.

नोट्स: AFSPA: The Armed Forces Special Powers Act of 1958. ह्याच्या कायद्या अंतर्गत सगळ्या सिक्युरिटी फोर्सेस ना काहीही प्रतिबंध न लावता पॉवर दिल्या जातात त्या भागात हवी ती ऑपरेशन्स घडवुन आणण्यासाठी. हा कायदा लागु असताना नॉन कमिशन्ड ऑफिसरलाही "shoot to kill" अधिकार मिळतो.

______________________________________________


मी अजुन एका भाषांतराला, डायरेक्ट ओमर खय्यामच्या एका रचनेच्या.. सुरुवात केली होती.. पण मग Translation करता करता मी त्या गाण्यात वाजणा-या रुबाबमधे हरवुन गेले... मी जे काही किडे केले ते नाही टाकणारे इथे...ह्या खो-खो मुळे न लिहीते जागे झाले हे एक बरंच झालं आणि मला "श्या कित्ती काय ऐकायचं राहिलाय आयुष्यात" हे पुन्हा एकदा जाणवलं हे त्याहुन बरं झालं...

माझा खो शाल्मली आणि पुनमला..

Monday, July 19, 2010

जब व्ही मेटची करिना

"छ्या... मला कधी कळतच नाही यार ती"
विक्र्याने खूप जास्त दीर्घ पॉज नंतर हे वाक्य टाकलं. "ओह.. ओके.. असं काय? हं असेल बुवा.." छाप रिअ‍ॅक्शन देउन लोकांचा नजरेत न येता ग्लासला लागलेला कोल्डकॉफीचा फेस कसा चाटता येईल, ह्याच्या मी विचार करायला लागले.
"तुला माहित्ये का? मला एका क्षणाला ती जाम गोंडस वाटते.. जब व्ही मेट मधली करिना आहे नं तशी.. म्हणजे इंटरव्हलच्या आधीची.. चुलबुली टाईप"
शी बाबा "चुलबुली" शब्द नाही आवडत मला.. नो स्पेसिफिक रिजन.. पण नाय आवडत.. पण ना क्लिनीक प्लसची जाहिरात होती ना चुलबुलीची अ‍ॅनिमेशनवाली.. ती जाम आवडली होती...
"पण ना अगं.. मला ना ती काही वेळेस जाम सिरिअस वाटते.. म्हणजे कशी सांगु का?"
मग त्याने परत एक त्याचा ’फेमस सायलन्स एन ऑल’ टाकला...
"हा... जब व्ही मेट मधल्या करिना कपुरसारखी... पण म्हणजे इंटरव्हलनंतरची"
मी तोंडातला स्ट्रॉ ग्लासमधे फुंकत त्याच्याकडे पाहिलं.. ’बाबा-पुता-तुझ्या-आयुष्यात-त्रास-काये-लुक’ दिला त्याच्याकडे...मी त्याला म्हणाले "गुड है ना भाऊ... सो नाऊ यु नो [क्नो.. :) ] तुझी ती मुलगी गीत सारखी आहे" त्याने शुन्य भाव चेह-यावर ठेवत मला विचारलं..
" करिना कपुरचं नाव गीत होतं का जब व्ही मेट मधे?"
मग मी एक रिअ‍ॅक्शन दिली... म्हणजे नक्की कशी ते मला लिहीता नाही येते.. मी आत्ता आरश्यात तसं तोंड करुन पाहिलं पण तरी शब्दात नाही बा उतरवता येते.. पुढच्या वरच्या दातात बडिशोप अडकल्यावर ती काढताना चेहरा जसा होतो तशी थोडीफार.. म्हणजे त्यातल्या त्यात जवळची! पण कोणाच्या पुढच्या वरच्या दातात बडिशोप का अडकेल? व्हाटेव्हर...

"तू काही खाणारेस का?"
विक्रांतने घड्याळात बघत मला विचारलं... ह्या लोकांचा प्रॉब्लेम मला कळत नाही. म्हणजे हातावर घड्याळ बांधा.. वेळ कळायलाच हवी,पाळली नाही तरी चालते एकवेळ! पण दशसहस्त्रवेळा घड्याळात काय बघायचं? लोकं सतत त्यांच्या मोबाईलमधेही बघतात... मी ही बघते म्हणा मला कंटाळा आला समोरच्याच्या बोलण्याचा की.. किंवा काही वेळेस कळतच नाही ’आता कुठे बघायचं’ तेव्हा मोबाईल धावुन येतो! "तुला घाई आहे का विक्र्या? नको खाऊया काही.. तसंही २ कॉफी प्यायल्यावर कोणी काही खात नसेल" मी बोलले.. त्याने उगाच एक स्माईल दिलं..
" भेळ खाऊया.. बिसलेरीचं पाणी वापरतात हे"..
ओक्के.. हा माणुस गंडला आहे... साफच.. प्लीजंच.. सॉरींच.. सगळंच... "विक्रांत हे लोक भेळेत पाणी घालतात??.. बिसलेरीचं?" .. शुन्य भाव... आयुष्यभर काल प्रेमभंग झाल्यासारखा वागतो हा माणुस... शेल्डन लेनर्डला ’देअर देअर’ म्हणतो ते उगाच आठवलं मला, तसं म्हणावंस वाटलं त्याला.. आणि एकदम लेनर्ड आणि विक्रांतमधलं साम्य जाणवायला लागलं.. हेअरस्टाईल, चीज इनटॉलरन्स आणि डोकं सोडल्यास विक्रांत बराच तसा आहे. ( पाहा: बिग बॅंग थेअरी नावाची सिटकॉम [ सिटकॉम वरुन आठवलं.. मला सिटकॉम स्टॅण्डअप कॉमेडीच्या विरुद्धार्थी शब्द वाटायचा,, म्हणजे मला वाटायचं की सिटकॉम मधे ते लोक जास्त वेळ बसलेले असतात बार किंवा कॉफीशॉप किंवा सोफ्यावर वगैरे.. म्हणुन सिट-कॉम { ओके.. हे बळंच होतं.. पण मला वाटायचं, आणि जेव्हा खरा अर्थ कळला.. मला माझा बावळटपणा क्षणभर आवडला होता} ] )

"विक्र्या.. सांगायचं आहे का तुला तिच्याबद्दल अजुन? तू बोलु शकतोस... मी ऐकत्ये" मी स्वतः माझ्या डोक्यात गेले हे म्हंटल्यावर.. पण त्याला बरं वाटलं असावं... त्याने पहिल्यांदाच प्लेटवर चमचा न वाजवता भेळेचा घास घेतला. प्लेटवर चमचा वाजणं ठीक आहे.. लोकांच्या दातांवरही चमचे वाजतात.. त्रास होतो त्या आवाजाचा खूप!
"तिचं हसणं सुर्यप्रकाशासारखं असेल... पण जेव्हा ती जवळ मिठीत येईल तेव्हा रात्र होऊन जाईल"...
एक मिनीट ..एक मिनीट... मला हे माहित्ये...मला हे माहित्ये....हे असं काहीतरी गुलजार, अख्तर वगैरे मंडळी लिहु शकतात.. विक्र्या नाही.. विक्र्या ते चुकीच्या ठिकाणी चुकीच्या शब्दात दॅट टू मराठीत करुन बोलु शकतो... मी डोळे मिटुन आठवायचा प्रयत्न केला.. मग टेबलावर हात आपटुन पाहिला.. कपाळावर बोटं वाजवली ह्यातलं काहीच वर्क नाही झालं.. मग त्यालाच माझी दया आली..
"यहा मधलं गाणं आहे.. नाम अदा लिखना... जब तुम हसते हो दिन हो जाता है, जब गले लगो तो दिन सो जाता है...."
हा..... चोर साला...
मास्टर्स नाही करत ही लोक.. मग त्यांना ’रिसर्च मेथेडोलोजी’ छाप पेपर नसतात.. त्यामुळे सोर्सेसना ड्यु क्रेडिट देत नाहीत.. सोर्स सांगतच नाहीत... आता मला शंका आली म्ह्णुन नाहीतर गुलझार, अख्तर नंतर विक्रांत आला असता की राव... तसं मधे त्याची एक झब्बा फेज होतीच.. ज्यात तो जुने-मळके झब्बे घालुन फिरायचा.. तोंडात कायम एक सिगरेट.. ती अजुनही असते पण आता तो माणसाने घालायचे कपडे घालतो... त्याने आत्ताही सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं.. माझ्यासमोर धरलं... मी स्वतः ओढते की नाही ओढत ह्या कन्फ्युजनमधे जावं इतक्या कॉन्फिड्न्टली त्याने ते पाकिट पुढे केलं होतं.. "मी नाही व्यसनं ठेवत... विडी-काडी-बाई-दारु वगैरे काही नाही..." मला वाटलं ह्यावर हसेल तो.. काही न म्हणता त्याने पाकिट आत टाकलं स्वतः सिगरेट न ओढता [ अशीच शंका... फिल्म सारखं ब्लॉगवरही ’नो स्मोकिंग’ आलं असतं तर? मला आत्ता ह्या पॅरा नंतर "वैधानिक इशारा" टाकावा लागला असता ना विक्र्याने सिगरेट ओढली असती तर]

"सुंदर पण त्यापेक्षा स्मार्ट!.. बडबडी पण खूप उथळ नाही, आणि थोडी वेडी...."
तो परत सुटला... मी मनातल्या मनात म्हंटलं जब व्ही मेट्च्या करिनासारखी... हा माणुस त्या करिना कपुरमधुन बाहेरच येत नव्हता...मला वाटतं अजुनही अनेक मुलं, मुली तिच्या त्या "गीत" मधे अडकुन आहेत. पोरींना उगाच वाटायला लागलं आपणही गीत असावं, आपण गीत आहोत... "मै अपनी फेवरेट हुं।", "पता चल जाता है।", "बचपना ट्राय किया था ना.. अब पागलपन ट्राय करते है।" वगैरे वाक्यं पोरी अजुन टाकतात... आणि त्यांना वाटत असतं कुठेतरी शाहिद बसलाय त्यांचा... अन पोरांना माहित असतं ’आपली पोरगी काय गीत नाही, पण असती तर चालली असती राव’... पण विकसारख्या माणसाने पण तिच्यात अडकुन राहावं हे जरा मला पचणं कठीण होतं... एक्वेळ बिसलेरीचं पाणी ओतलेली भेळ पचेल..
"घे लिहायला मग..."
मी त्याच्याकडे आता शुन्य भाव चेह-यावर ठेवुन बघितलं.. "काय? काय लिहायला घ्यायचं? फिल्म?? हिरोईन जब व्ही मेटची करिना आहे एवढचं सांगितलं आहेस.. ह्यावर मी काय करु?".... "मग-त्यात-काय-एवढं-लुक" देत विक्र्या माझ्याकडे बघायला लागला...
"नाही जमणार का?.... अगं हं आणि तिच्या गालाला खळ्या पडत असतील..."
मेरा बस चलता तो विक्र्याच्या गालावर खड्डे पाडले असते... अरे मनुष्या.. असं कसं करु शकतोस तू? विक्रांत उठला, १२० रुपयाच्या बिलवर १२१ रुपये ठेवुन...माझ्याकडे न बघता सरळ चालायला लागला. मग एक्दम थांबुन परत आला...
"२ आठवडे देतो तुला.. आणि तेजु प्लीज टिपीकल फिल्मी काहीतरी लिहु नको"
विक्र्याण्णा..नारायणा... एका फिल्ममधलंच कॅरेक्टर उचलुन देउन एक फिल्मच लिहायला सांगतोयस तिच्या भोवती आणि म्हणे ते फिल्मी नको..."ओके.. आय विल ट्राय माय बेस्ट विक्रांत"

अश्या रीतीने "आपण-एक-फिल्म-लिहुया" ची १८वी मिटींग संपवत तो निघतो... गेल्या मिटींग्जच्या जोरावर आता माझ्याकडे फिल्म लिहीण्यासाठी शांतारामसारखा हिरो, गीत सारखी हिरोईन आहे, नॉटिंग हिल सारखं काहीतरी पाहिजे हा रेफरन्स आहे, एक गाणं वाळवंटात शुट करता येईल (वाचा: तडप तडप, ह.दि.दे.चु.स) असं काहीतरी घडायला हवं ही त्याची मागणी आहे, फिल्म टिपीकल फिल्मी नकोय ही सुचना आहे आणि सर्वात महत्वाचं गुलजारचं गाणं मराठीत करुन स्वतःचं म्हणुन खपवु शकणारा डिरेक्टर आहे... अजुन काय पायजेल? विक्रांत मोठा डिरेक्टर होणार एक दिवस... त्याची फिल्म हिट जाणार ब्वा...

Monday, July 5, 2010

Just a Day before...

तू काय विचार करतो आहेस, तुझा निर्णय काय असणारे, काहीच माहित नव्हतं त्यादिवशी. सकाळी उठलेच नाही मी लवकर... पडुन राहिले होते बेडवरच.. मी उठले नाही तर दिवस जसं काही थांबणारच होता माझ्यासाठी... उठुन बसले, समोर मॉनिटरवर आपल्या दोघांचा वॉलपेपर! ’लॉट लाईक लव’ बघुन तसा फोटो काढायचा होता मला.. त्याचा आपण केलेला खरोखर बालिष प्रयत्न.. जेव्हा जेव्हा हा फोटो बघायचो तेव्हा ते फोटो काढतानाचं सगळं आठवुन कमीत कमी ५ मिनीटं तर हसायचोच आपण. आत्ता ही हसले मी हलकंच, कारण नसताना दाढी वाढवत होतास तेव्हा.. एकदा वाटलं मेल करावा हा फोटो तुला.. कदाचित निर्णय बदलेल तुझा.. तु निगेटीव्हच निर्णय घेणार हे माहितच होतं जवळजवळ मला!

दात घासत असताना आरश्यात मागच्या खिडकीत तू दिलेला टॅट्टी टेडी बसलेला दिसला. तो प्रकार मला कायमच द्यनीय वाटत आलेला होता.. जखमी टेडी बिअर कसा क्युट असु शकतो? पण तू दिला होतास म्हणुन त्याला समोरच ठेवलं होतं. रोज रोज बघुन त्याच्यातलं क्युटत्व जाणवायला लागलं होतं मलाही.. मग तशीच जाऊन बसले त्या टेडीसमोर.. त्याला विचारलं, "काय म्हणेल तो? त्याचं काय असेल उत्तर?" त्याला नाही कळलं काही, ढिम्मच राहिला.. तोंडात ब्रश असताना बोललेलं कोणाला कळतंय? भरपुर वेळ बसले मग तिथेच.. तोंड झोंबायला लागलं त्या पेस्टने इतका वेळ होते तिथेच...

सुजलेले लाल डोळे, त्यांवर पाणी मारुन मारुन ते नॉर्मल होतायत का पाहिलं पण नाही झालं काहीच.. दार उघडलं दुधाची पिशवी आत घेण्यासाठी. त्या दुधवाल्याला सातशेवेळा सांगितलं असेल की बाबा दुधाची पिशवी नीट ठेव कठड्यावर.. पडली आजपण खाली.. दारात दुध सगळीकडे. समोर देशपांड्यांकडे पोपट आहेत पाळलेले म्हणुन मांजर पाळायला बंदी इथे.. मांजरं असती तर लादी पुसा-धुवाचे कष्ट नसते पडले.. लोळल्याच असत्या त्या दुधात. आपले किती वाद झालेत ना मांजर पाळायची की नाही.. कुत्रा पाळायचा की नाही त्यावरुन.. माणसांसाठी बांधलेल्या घरात प्राणी का बंद करायचे हे तुझं नेहेमीचं बिनबुडाचं अर्ग्युमेंट... वाद घालण्यात तू एक्सपर्टच आहेस!

समोरच्याला त्याचाच केराचा डबा विकु शकशील तू इतका स्मार्ट वगैरे... कोणीतरी म्हणालं तू एमबीए करणं गरजेचं आहे. इंजिनीअरींगचे ४ वर्ष, २ वर्षाचा टेक्निकल अनुभव इतका पाण्यात ओतुन... एमबीए करुन फायनान्स किंवा मार्केटींगला जाणार.. किती वेडेपणा असतो हा.. मला नाही पटलं कधीच ते... पैसे मिळतील वगैरे ठीकच होतं...पेपर मधल्या जॉबच्या जाहिराती वाचत मी जमिनीवर बसुन होते. पुण्यात १४ सिव्हील ईजिनीअर, १८ डीटीपी ऑपरेटर ह्व्येत आज... माझी आजपण कोणाला गरज नव्हती.. पेपर उडु नये म्हणुन त्यावर मोबाईल ठेवलेला, सारखं त्याकडे लक्ष जात होतं, वाटत होतं आजच सांगशील काय ठरवलं आहेस ते...मधेच वायब्रेट झाला मोबाईल, एअरटेलच्या दिवसाची सुरुवात झाली होती. भजन्स डाऊनलोड करण्यासाठी डायल करा...

टीव्ही लावला मग थोडावेळ..डान्स इंडिया डान्स लागलं होतं.. काय नाचतात ती माणसं.. एकदम भारी! कॉलेजच्या एका फेस्टमधे मी आणि पृथा नाचलो होतो कथक-हिप हॉप फ्युजन वगैरे. तूला आत सोडलं नव्हतं तू दुस-या कॉलेजचा म्हणुन.. मग रात्री ११ वाजता आम्ही दोघी पुन्हा एकदा आपल्या ग्रु्पसाठी नाचलो कॉलेजच्या मागच्या रस्त्यावर... मज्जा आलेली.. आज कोणी फोन करणार नाही त्यातलं मला.. सगळ्यांना माहित्ये मी डोकं खाणार.. तुम्हाला सगळ्यांना मीच चुक दिसते ना कायम... देशपांडे काकुंनी दार वाजवलं.. त्यांच्या कामवाल्या बाईला दारासमोरची लादी धुवायला सांगितली त्यांनी.. चिकट होईल नाहीतर म्हणे.. तेव्हा जाणवलं नाही प्यायलाय चहा-कॉफी काही अजुन.. काय करावं आधी बाहेर जाऊन दुध आणावं? की अंघोळ करावी?

बाल्कनीत येउन उभी राहिलेले, कालचे वाळत घातलेले कपडे पहाटेच्या दवात परत भिजलेले होते. अगदी ओले नाही पण मधलंच काहीतरी. कपडे बदलल्यावर लक्षात आलं इस्त्री करायची गरज आहे. माणसाने घातलेले कपडे का नाही इस्त्री करता येत तसेच्या तसे? आरश्यात पाहिलं.. डोळे नॉर्मल दिसत होते. ओशोच्या चपला घातल्या.. तुला त्या चपला घराबाहेर घातलेल्या आवडत नाहीत.. घरातल्या चपला वाटतात ना..बिल्डींगमधुन उतरताना रवी दादा भेटला, म्हणाला मी दिसत नाही हल्ली जास्त बाहेर.. खरंच रे, जातच नव्हते मी बाहेर कुठे.. उद्या तू सांगशील तुझं काय म्हणणं आहे ते.. मग पडेन बाहेर.. काय ठरवलं असणारेस तू, त्याचा विचारच डोक्यात होता. मधे घारपुरे काका बघुन हसले माझ्याकडे , मी हसले की नाही आठवत नाहीये आता.. दुकानात गेल्यावरही आठवलं नाही काय घ्यायला आले आहे ते.. जरा काही सेकंदांनी आठवलं. पाव लिटर दुध म्हण्टल्यावर तो कुच्कट माणुस विचारतो, "बास? इतकंच पुरतं?" आमच्यात हा डायलॉग इतक्यांदा झालाय. घरी परत येताना आभा होती लिफ्टमधे. तिला आता मेडिकलला जायचं आहे म्हणुन तिने कुठले कुठले क्लास लावल्येत, किती वेळ असतात ते सांगत होती. ग्राऊंडला जात नाही हल्ली!

आपण टीटीला जायचो ते आठवतय का तूला? मी घरी आल्यावर दुध तापत ठेवलं आणि शोधत बसले टेनिसचा बॉल... मिळाला लगेच, आश्चर्यच वाटलं मला जरा... मग दुध वर आलं, गॅसला मिळालं.. पातेल्याची कडा काळी झाली.. कोणाकडे तरी दुध उतू गेलं आहे असं म्हणाले मी.. अन भिंतीवर टॉक-टॉक खेळत राहिले.. वास आपल्या स्वयपाकघरातुनच येतोय हे जाणवलं.. मग पळत जाऊन गॅस बंद केला आ्णि परत सुरु केलं खेळणं.. हल्ली आपलं हे टॉक-टॉक फेसबुक, जीमेलवरच चालतं ना, पिंगचा आवाज एकदम तसाच येतो ना रे... बघु तू उद्या काय ठरवतोय्स.. जायला हवं परत टीटी खेळायला..

दुपारी २ वाजता मी दिवसातला पहिला चहा पित होते. तसंही भुक नव्हतीच.. काय करावं? ऑनलाईन जावं की झोपावं परत? तू असलास ऑनलाईन तर गोंधळायला होईल पण.. काय करावं कळणार नाही...झोपुयाच.. पण झोप कुठे लागणारे? तुच आठवणार.. बेडवर पडले ना की वरती पंख्याला एक लाल कागदाचा तुकडा चिकटलेला दिसतो. माझ्या वाढदिवसाला तुम्ही सरप्राईज दिलं होतं, सगळी रुम डेकोरेट केली होतीत.. त्याची आठवण म्हणुन उरलेला तो कागदाचा तुकडा.. समोर बाथरुमचं दार दिसल्यावर आठवलं अंघोळ नाही केलीये अजुन.. कंटाळा आला होता अंघोळीचा! पण जर तुला एक दिवस आधीच येउन मला काय ठरवलं आहेस ते सांगायचं असेल तर? अश्या अवतारात कुठे येणार तुझ्यासमोर? म्हणुन अंघोळीला गेले. आमचा गिझर गंडला आहे.. जरा जास्तच गरम पाणी होतं, मग ते नॉर्मल करायला गार.. मग जास्त गार झाल्यावर थोडं गरम.. मग परत थोडं गार.. बाहेर आले बाथरुममधुन तेव्हा ४ वाजले होते. अंघोळ केल्यावर जगातली बेस्ट झोप लागते. मग झोपले. ७:३० ला मानसी आली तिने उठवलं.. "तू किती निष्काळजी आहेस, जॉब शोध, ओटा पुस, डब्बा आण, बहिरी आहेस" वगैरे वगैरे मारा सुरु केला.. ते ८:३० ला तिने स्वतः जाऊन डबा आणला आणि मला वाढुन दिलं तेव्हा शांत झाली.

दोडक्याची भाजी आपण करावी असं बायकांना का वाटतं? पण सकाळपासुन काही खाल्लं नव्हतं सो चालली मला ती भाजी आज... प्रेमात किंवा जुदाईमधे वगैरे लोकं भुक-प्यास विसरतात असं म्हणतात.. मला नाही झालं तसं काही रे.. मी दोडक्याची भाजी पण खाल्ली, म्हणजे बघ! मानसी चिडली होती अजुनही.. ती चिडली असेल कोणावर की फ्रेण्ड्स लावते लॅपटॉपवर.. मग मी जाउन बसले तिच्या बाजुला "द वन विथ द लिस्ट".. जमत आलेलं त्यांचं परत तुटतं.. चॅण्डलरच्या लिस्टच्या आयडिआमुळे. आपलं काय होणार? मानसी बघता बघता माझ्या खांद्यावर डोकं ठेवुन झोपली.. दमुन जाते दिवसभर ती.. मग लॅपटॉप बंद केला आणि येउन बसले परत माझ्या बेडवर...

कपडे धुतले.. हल्ली कपडे धुताना रेडिओ लावुन ठेवते मी! रात्री तिथे ते छपरी लव-गुरु असतात.. ते ऐकत होते.. काहीही असतात ब्वा .. असे कसे प्रॉब्लेम असू शकतात? आपल्यातही प्रॉब्लेम अ‍ॅज सच नव्हता ना रे.. ते फक्त तुझं टु बी ऑर नॉट टु बी चा घोळ... कपडे वाळत घालताना नाकावर दोनदा.. खांद्यावर अगणित वेळा पाण्याचे थेंब पडले.. मानसी झोपली होती म्हणुन बरं नाहीतर परत पिळावे लगले असते कपडे.. कपडे धुतल्यावर हात मस्त होतात... मऊ, गुलाबी वगैरे..

येउन झोपले मग बेडवर..झोप नाही आली.. कानात आयपॉडवर कोणीतरी गात होतं.. मी ह्या कुशीवरुन त्या कुशीवर वळत तुझा उद्याचा डिसीजन काय असेल त्याचा विचार करत राहिले.. हे सगळं काय होतं, मी सांगितलं ते? काही नाही... असंच something about " a day before THAT day!!"

Tuesday, June 8, 2010

पहिल्या पावसात अजुन काय लिहीणार?

तू लांब गेल्यानंतरचा पहिलाच पाऊस हा! नाही.. नाही म्हणजे आभाळ भरुन आल्यावर माझं मन दाटुन वगैरे आलं नाही. किंवा पावसाचे थेंब आणि माझे अश्रु वगैरे असंही काही झालं नाही. अगदी खरं सांगु तर तुझी आठवणही आपणहुन आली नाही... आत्ता तासभर पागोळ्यांशी खेळत पडवीत बसले होते, पावलांवर पावसाचं पाणी झेलत..

माहित्ये? पहिला पाऊस.. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला पाऊस ह्याच पडवीतुन पाहिला होता. मला काय आठवणारे का? पण आई खूप कौतुकाने सांगते.. "८ महिन्यांची होतीस तू तेव्हा तेजू, धो धो पाऊस पडायला लागला.. आम्ही आपलं तुला थंडी वाजेल म्हणुन कपड्यांवर कपडे चढवत होतो. पण मग आप्पा आले आणि आज्जीला ओरडले. पाऊस पडतोय बाहेर आणि आत काय बांधुन ठेवताय तिला?... आप्पा मग तुला घेउन पडवीत येउन उभे राहिले.. तुला पाऊस दाखवत.. किती वेळ ते तसेच तुला कडेवर घेउन उभे होते. तुझ्या इवल्याश्या हातावर मग त्यांनी पावसाचा एक थेंब दिला आणि तुझ्या चेह-यावरचे गोंधळलेले भाव बघुन कितीतरी वेळ हसत बसले... "एका मुलीनी पाऊस काय असतो ते अजुन पाहिलंच नाहीये मुळी".."पाऊस आम्हाला माहितच नाही" असं कितीवेळ तुला सांगत बसले होते " .. पहिला पाऊस म्हंटलं ना की अजुनही मला माझे आजोबा छोट्या बाळाला कडेवर घेउन पडवीत उभे आहेत असं दिसतं..

आप्पाची मोठी काळी छत्री असायची आणि आज्जीची एक लाल-गुलाबी डिझाईनची छत्री.. अजुनही आहे ती कुठेतरी कपाटावर ठेवलेली. मला कायम छत्री हवी असायची पावसात, रेनकोट नाही आवडायचा मला.. बाबा आणि मी जायचो पावसाळा शॉपिंगसाठी! बालवर्गात असताना शाळेसाठी म्हणुन बाटाचे काळे पावसाळी बुट, चंदेरी रेनकोटवर हिरवे बेडुक वगैरे असं काहीसा रेनकोट आणि मग फक्त माझा हट्ट म्हणुन ती रेनबोची छत्री बाबांनी घेतली होती. बाबा तेव्हाच म्हणाले होते मला "छत्री हरवशील तेजू तू" .. बाबांना कसं खोटं पाडणार? तरी ४-५ दिवस टिकवली होती हां मी ती छत्री. अजुनही बाबांना खोटं पाड्त नाही मी कधी.. कायम बाबांबरोबर आमच्या येझदीवरुन जाताना जोरदार पाऊस यायचा. मग तोंडावर, हातांवर सणसणीत मारा होयचा थेंबांचा.. आम्ही थांबायचे मग आडोशाला कुठेतरी, बाबा मला रेनकोट घालायचे, स्वतःला रेनकोट चढवायचे आणि आम्ही परत निघालो की पाऊस थांबायचा. मग कोरड्या रेनकोटच्या आत भिजलेले आम्ही घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायचो...आई खसाखसा डोकं पुसुन द्यायची.. आल्याचा गरमागरम चहा किंवा मग वाफाळलेलं हळद दुध... bliss!

पाऊस आणि गरम चहा, कांदा भजी cliche झालं का रे आता? एका पावसाळ्यात आई आजारी असताना मी आणि बाबांनी केली होती भजी... हल्ली मी आणि दिपीका करतो! बाकी मी दिपुकडे जास्त लक्ष नाही द्यायचे कधी पण मला ती पावसात भिजलेलं मुळीच आवडायचं नाही. मीही कधी भिजायचे नाही आणि तिला भिजु द्यायचे नाही! तिच्याकडे कायम छत्री आहे ना, ती रेनकोट घालते ना हे सगळं मी सतत बघत असायचे. शाळेतुन घरी येताना ते पिल्लु नेम धरुन रस्त्यावरच्या सगळ्या खड्ड्यांतुन छपाक्क छप्पाक चालत यायचं.. डोक्यावरच्या छत्रीच्या काहीच उपयोग नसायचा. मी पाऊस पडायला लागला की खेळायला गेलेल्या तिला शोधुन घरी आणायचे. आज सकाळी ती कॉलेजात निघाली तेव्हा मात्र छत्री सापडलीच नाही रे... मी शोधणार होते पण पहिला पाऊस ना.. आईची शिकवण.. लगेच देवांसमोर दिवा लावला.. पावसाला नमस्कार केला, त्याला ओवाळलं... काय धम्माल कल्पना असतात ना आपल्या...

पुण्यातुन सोमवारी सकाळी मुंबईला निघायचे ना मी कॉलेजसाठी तेव्हा मी मनापासुन प्रार्थना करायचे... "देवा प्लीज भरपुर पाऊस पडु दे..आणि मग आई म्हणु दे की नको जाउ मग आज".. पाऊस, ट्रेनची खिडकी आणि लोणावळा.. आह.. च्यायला पण एकदाही ट्रेनमधे समोरच्या सीटवर चांगला दिसणारा मुलगा नव्हता आमच्या नशिबात..

तसं आम्ही एक वर्ष कोकण रेल्वेने गेलो होतो जुनमधे रत्नागिरीला.. बाहेर खरं तर सगळं खूप सुंदर होतं पण तेव्हा त्या मनस्थितीमधे नव्हतो.. आज्जी गेली तेव्हा! आधी २ दिवस पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता.. आजीला नेलं तेव्हा ४-५ तास पाऊस थांबला होता अगदी सगळं कळत असल्यासारखा आणि परत सुरु झाला. आज्जीला किती काय काय गमती सांगायच्या होत्या अरे मला त्या पावसाआधीच्या सुट्टी्तल्या...

तुला सांगितलं होतं ना मी.. हिमालयातल्या पावसाबद्दल? दुपारचे ३-४ वाजले की ढग यायचे आणि मग पाऊस... मी आणि रेणुका एकदा अडकलो होतो पावसात.. नदीच्या काठा-काठाने आम्ही जात होतो. पाण्याचा गोड खळखळाट, पाईनचा वास, लख्ख सूर्यप्रकाश पण तरीही हवेत गारवा... वाट हळुहळु नदी पासुन दूर जायला लागली... खळखळाट कमी होत गेला... आम्ही वर वर चढत होतो, सूर्यप्रकाशही कमी होत गेला. धो-धो पाऊस सुरु झाला..इतका की समोरची वाटही नीट दिसेना... आम्ही मधल्या काही चहावाल्यांच्या तंबुत थांबलो. पाऊसाचा आवाज कमी झाला म्हणुन मी आणि रेणुका तंबुतुन बाहेर आलो. अवर्णनीय, अप्रतिम, सुरेख किंवा कदाचित एकच शब्द बरोबर असेल त्या क्षणासाठी.... "स्वर्गीय". ढग खाली उतरलेले... त्यांचा आडुन दिसणारा सूर्य..दुरवर चमकणारी बर्फ़ाची शिखरं... डोळ्यांत जितकं साठवता येईल तितकं साठवुन घ्यावं... सूर्यानेही त्या दिवशी घरी जाऊन आरश्यात पाहिलं असेल.. इतका सुंदर दिसत होता... मला कदाचित हे शब्दांत नाही सांगता येते ...मी आणि रेणुका शांतच होतो... ते अनुभवताना आम्ही काहीही बोललो नाही... पण तरीही आम्ही एकमेकींबरोबर होतो. ती moment spoil न केल्याबद्दल मी तिची आयुश्यभर ऋणी राहेन!

ए आपण कधी एकत्र पावसात भिजलोच नाही ना? CCDच्या काचेतुन एकदा पाऊस बघत बसलो होतो आपण.. कसले unromantic होतो यार आपण.. म्हणुन कदाचित नाही आठवलास लगेच... पण मला पहिला snowfall आठवतो आहे तू अमेरिकेत गेल्यावरचा... तू आयुश्यात पहिल्यांदाच बर्फ पडताना बघत होतास. माझ्या रात्रीचे २ वाजले होते, तू मला ऑनलाईन बोलावलंस. मी खूप चिडचिड करुन आले.. तू वेबकॅम ऑन केलास तेच बाहेरचा बर्फ दिसायला लागला.. आप्पांच्या कडेवर ८ महिन्यांचं बाळ पहिल्यांदा पाऊस बघताना कसं दिसत असेल ते तुला पाहुन तेव्हा कळलं मला...

चल.. खूप बोलले आता.. पाऊसही थांबला..जाऊन छत्री शोधायच्ये.. सापडणं अशक्य आहे, नवीनच घ्यावी लागणार... नवीन पावसाळा आहे नं ह्यावर्षी

Thursday, May 13, 2010

अम्येइशॅंग

मणिपुरच्या एका लहानश्या गावातली ती सकाळ... थंडगार वा-याची मधुनच झोंबुन जाणारी झुळुक.. शाल अजुन घट्ट लपेटुन घेत.. तोंडातुन वाफ काढत, वाफाळलेल्या चहाच्या गरम कपातुन जितकी उब मिळेल तितकी घेत मी समोरच्या द-या बघत बसले होते. इथे सकाळ खुप लवकर होते, इथलं वेळेचं तंत्र अजुन शरीराला उमगलेलं नव्हतं. कदाचित मी उशिराच उठले होते जरा, बाहेर सगळे कामाला लागले होते.

मी ज्यांच्याकडे राहत होते त्यांचा एक भला मोठ्ठा केसाळ कुत्रा माझ्याजवळ येऊन बसला.. सकाळी उठले तेव्हा पायाशी मांजर बसुन होती, मी सवयीप्रमाणे दोघांशीही मराठीत बोलले. आणि दोघांनीही सगळं कळल्यासारखं माझ्याकडे बघितलं. (अनेकदा "काय येडी बोलुन राहिल्ये" असा लुकपण देतात प्राणी). इतक्यात एक लहान मुलगा तिथे आला. मणिपुरीमधे काहीतरी ओरडला कुत्र्याकडे बघुन आणि कुत्रा तिथुन उठुन गेला. मी त्या मुलाकडे पाहिलं तर माझ्याकडे हसत बघितलं त्याने आणि कुत्र्याकडे बोट दाखवुन काहीतरी बोलला. मला काही कळेना.. माझ्या चेह-याकडे बघुन त्याला ते कळलं असावं. मग तो दोन मिनीटं थांबला, त्याने शब्द जुळवले "Dog.. Danger.. Bites" .. ओह.. असं झालं काय.. मी त्याच्याकडे बघुन मग त्याला "Thank you" म्हंटलं, त्याचं नाव विचारलं... "अम्येइशॅंग"...

"अम्येइशॅंग".. त्याने ११व्यांदा त्याचं नाव सांगितलं आणि मी ते उच्चारायचा प्रयत्न केला. त्याने कपाळावर हात मारुन घेतला. मग माझ्याकडे बघत म्हणाला "अम्ये".. कित्ती गोड गं.. मी हसले.. "अम्ये..right?" . त्याने मोठ्या माणसासारखी मान हलवली, माझ्याकडे बोट केलं.. माझं नाव.. मी म्हणाले "तेजस्विनी".. आणि एकदम थांबले.. "uhh.. my name is Teju" .. त्याचे बारीक डोळे अजुन बारीक करत तो हसला, तो सहावीत होता, सहावीच्या मानाने बराच लहान दिसत होता. त्याने मला विचारलं मी कितवीत आहे ते. मी बोटं मोजली आणि सांगितलं, सतरावीत आहे! त्याला विश्वासच बसेना. एवढ्यात त्याला त्याच्या आईने बोलावलं म्हणुन तो धावत गेला. मधे एका दुस-या मुलाने त्याला अडवलं, माझ्याकडे बघत दोघंही काहीतरी बोलली, अम्येने मला हात केला मी सुद्धा त्याच्याकडे बघुन हसले आणि अम्ये पुढे गेला.

साडे सहाच वाजत होते सकाळचे.. घरी असते तर आत्ता साखरझोपेतली स्वप्नं बघत असते.. म्हणा समोर जे दिसत होतं ते एखाद्या लई सुंदर स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. कोवळ्या उन्हात चमकणा-या समोरच्या टेकड्या.. दरीत साचुन राहिलेले ढग आणि धुकं... इतक्यात अम्ये खिदळतच परत माझ्या बाजुला येउन उभा राहिला. कोवळ्या उन्हाची लहान मुलाच्या हसण्याशी केलेली तुलना मला कायम ओढुनताणुन केल्यासारखी वाटायची. आज नाही वाटली तशी! त्याने त्याची बंद मुठ पुढे केली. मी काय आहे विचारल्यावर त्याची ती लहानगी मुठ उघडत, हातातला आवळा दाखवला.मी हात पुढे केल्यावर गड्याने परत मुठ बंद केली आणि "there is tree" म्हणत मला लांबचं आवळ्याचं झाड दाखवलं. मला खरं तरं मुळीच उठायची इच्छा नव्हती, पण आवळ्यांनी लगडलेलं झाड समोर दिसत असताना बसुन कसं राहावं माणसानी? मी शाल काढत उठले. अम्ये शाल परत हातावर टाकत "you will.. get cold" म्हणुन झाडाच्या दिशेने चालयला लागला.

मी, अम्ये आणि त्याचा मगासचा मित्र.. आम्ही तिघं कित्तीतरी वेळ झाडाखाली आवळे खात बसलो होतो. काही काही वेळा जिथे शब्द संपतात तिथे ख-या गप्पा सुरु होतात. आम्ही तिघंही एकमेकांकडे हसत बघत एक एक आवळा संपवत होतो. मधेच त्याचा मित्र माझ्याकडे बघत काहीतरी बोलायचा मग अम्येच त्याला उत्तर द्यायचा आणि माझ्याकडे बघुन "dont worry..मी त्याला समजावलं आहे" look द्यायचा!

"Hot water ? " अंघोळीसाठी निघाल्यावर अम्येनी मला विचारलं आणि मी काही म्हणायच्या आत एक लहानशी बादली आणुन ठेवली समोर गरम पाण्याची... जेवायला बसल्यावर मी शाकाहारीच खाते हे कळल्यावर त्याचा चेहरा जाम पडला होता. त्याने आईला फिश बनवायला मदत केली होती.जेवण झाल्यावर मला तो फुटबॉल बघायला बोलवत होता. पण त्याची आई त्याला ओरडली म्हणुन मला बाय करुन खेळायला गेला.

आज एक विश्रांतीचा दिवस होता त्यामुळे आठवड्याभराची डायरी लिहीत मी दुपारी पाय-यांवर बसले होते. मस्त शांत वाटत असताना अचानक जोरजोरात जोजोचं गाणं सुरु झालं. इथे जोजो? अम्ये त्याच्या मोठ्या भावांबरोबर आला. त्याच्या हातातल्या म्युझिक प्लेयरवर जोजो गात होती. दोघंही भाऊ आत गेले. अम्ये माझ्यासमोर उभा राहिला "are you teacher?" .. मला प्रश्न विचारताना तो घरात बघत होता. मी मागे वळुन पाहिलं, अम्येचे दोन्ही भाऊ माझ्याकडे बघत होते. " No dear.. " त्याचे भाऊ हसायला लागले... आणि अम्ये हिरमुसला होऊन तिथुन पळुन गेला. त्याचा एक भाऊ पुढे आला आणि त्याने सांगितलं, अम्येला वाटत होतं की मी त्याला शाळेत शिकवायला आले आहे आणि मी त्यांच्याच घरी राहणारे. नवीन टीचर आमच्या घरी राहतात हे तो सगळ्या मुलांना सांगुन आला होता. त्यानंतर कितीतरी वेळ मला तो दिसलाच नाही.

संध्याकाळी काळोख्या गावातलं एकटंच झगमगणारं चर्च बघत मी उभी होते. पक्क्या बांधकामाची घरंही नाहीत ज्या गावात तिथे दोन मजली चर्च उभं कसं राहतं ह्यावर विचार करत मी मोबाईलची रेंज शोधत फिरत होते. इतक्यात समोर अम्ये दिसला. त्याने माझ्या हातातल्या मोबाईल कडे पाहिलं आणि शांतपणे एका उंचवट्याच्या ठिकाणी जाऊन उभा राहिला माझ्याकडे बघत. तिथे मरतुकडी रेंज मिळत होती. मी घरी फोन केला. मी फोनवर बोलत असताना अम्ये एकटक माझ्याकडे बघत होता. बोलता बोलता मी बहिणीला म्हणाले " and I have got a new friend here.. Amye" .. तो खुद्कन हसला. अंधारातुन परत घरी येताना त्याने माझा हात धरला. मी त्याला घरी नीट आणलं की त्याने मला.. हे नाही ठाऊक!

दुस-या दिवशी सकाळी निघायच्या वेळी माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. अम्ये त्याच्या आईच्या मागे मागेच उभा होता. त्याच्या मित्राने मला लांबुनच बाय केलं. अम्येने काहीतरी विचारलं इतक्यात.. मला शब्द नाही कळले.. पण मी उत्तर दिलं " I will come back.. I will come back as your teacher" .. त्याने डोळे मिचकावले आणि हसला.. आता मी माझं वचन पुर्ण करणारे .... आमच्या गप्पांची, आवळ्यांची आणि त्या केसाळ कुत्र्याची शप्पथ!!

Thursday, March 25, 2010

लपाछपी..

दादर प्लॅटफॉर्मवर, कल्याण लोकलसाठी.. संध्याकाळी ७:३०-८:०० ची वेळ.. मरणाची गर्दी. मला ती म्हणाली CST end ladies ला ये.. मी कल्याण endला.. त्या गर्दीतुन चालत्ये चालत्ये.. ट्रेन येणार म्हणुन सगळे सरसावल्येत. लोकांचे घोळके उभे.. मधेच सामानाचे ढिग.. बाई माईकवर बोलत्ये.. "प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येणारी लोकल बारा डब्यांची कल्याणला जाणारी धिमी लोकल आहे." समोरुन येणारी ट्रेन मला दिसत्ये.. मी अजुन middle ladies ला.. मी आता जीव खाऊन धावायला लागते.. ट्रेन आलीये.. गर्दीची हालचाल सुरु झाल्ये.. आता तिथे पोहोचणं अशक्य आहे. ट्रेन सुरु होते. मी धपापत शेवटच्या डब्यापर्यंत पोचल्ये आता.. पण बायका चढु देत नाहीत.. "मरायचं आहे का? पुढची ट्रेन आहे".. मी निराश होऊन जाणा-या ट्रेन कडे बघत बसते.. दारातुन एक जाडंस धातुचं कडं घातलेला हात "बाय" करतो.. तीच! मला असं चिडवायला काय मज्जा येते? तिचा एसमएस येतो.. " Darling.. ya missed me again" .. मी माझा राग शांत करायचा प्रयत्न करत तिला रीप्लाय करते "Tomaar maa" आणि मग स्वत:शीच हसते. बाजुची बाई माझ्याकडे बघत असते पण आत्ता खरंच मला त्या बाईला काय वाटेल ह्याची काळजी नाहीये..


ठाणे-पुणे Volvo मधे आयपॉडवर गाणी ऐकत मी शेजारच्या सीटवर कोणी नसल्याने मस्त मांडी घालुन ऐसपैस झोपले असताना अचानक मोबाईल दणदणीत वायब्रेट होतो.. "me punyaat ahe"! मी कुठे आहे हे कळायला मला काही क्षण जातात. पलीकडच्या सीटवरचा माणुस उतरलासुद्धा.. म्हणजे नक्कीच वाकडच्या पुढे आल्ये. बाहेर बघुन अंदाज घेण्यात अजुन काही क्षण.. चांदणी चौकातुन बस खाली उतरते. मी मेसेज करते.. "mee pan punyaat ahe". इतके दिवस ती मुंबईत असताना भेट नाही झाली. पुण्यात काय डोंबलाची भेट होणार म्हणुन मी उगाच काळ-वेळ-स्थळ ठरवण्यात माझी शक्ती वाया घालवत नाही आणि माझ्या कामाला लागते. पण तरीही तिच्या मेसेजची जाम आतुरतेने वाट बघते! ती काहीच रीप्लाय करत नाही. असं कसं चालेल? खडुस कुठली.. एक रिप्लाय करायला काय जातं? दर थोड्यावेळानी मोबाईलकडे बघत मी माझं काम आटोपते. आणि तिला sms करते..
"listening to The Corrs..
To sweet beginings
and bitter endings
In coffee city
we borrowed heaven"
बराच वेळ तसाच जातो. "५ मिनीटात तिचा sms आला नाही तर आपण निघायचं" असं ठरवत तासभर मी कॉलेजमधे पाय-यांवर बसुन राहते. मोबाईल वायब्रेट होतो.. समोर एक ज्युनिअर मुलगी रडवेली होऊन "कॉलेजमधे कशी मारतात" हे सांगत असुन मी तिच्यासमोर निर्लज्जासारखा sms वाचुन हसते. "LOL.. teju, koi bhi irrelevantsi lines ko kahipehi relevant kar marti ho.. OK! Coffee at Nal stop CCD.. catch ya in 15 mins"

अवेळी पडणारा पुण्यातला पिरपिरा पाऊस, गुलाबी संध्याकाळ ह्याहुन मस्त वेळ कोणती असु शकेल तिला भेटायला.. पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटायला? मी पावसाची पर्वा न करता पळत पळत नळस्टॉपवर पोचले. नेहमीपेक्षा heartbeats नक्कीच जास्त होत्या.. तिथल्या मिनी-कबुतरखान्याला पार करत मी शौकीनपर्यंत आले. अजुन २५ पाउलं आणि मग मी तिला बघणार.. एवढ्यात परत एक मेसेज आला तिचाच.. "
tomake jeno dekhechhi" म्हणजे काय? तिनी मला बघितलं का? मला काही कळलंच नाही.. मी काही रीप्लाय करणार त्या आधीच तिचा अजुन एक मेसेज.. "client has some problem with my design.. i have to go.. sorry.. I was waiting for you at CCD..dont bliv me? I hv left my scarf there..pink floral. njoy" मी खुप गोंधळुन ते परत दोनदा वाचलं.. काय? ती बाई तिचा स्कार्फ तिथे ठेवुन गेली? फिल्मी आहे किती येडी.. दुस-या दिवशी तिच्या ब्लॉगवर तिने आमच्या न झालेल्या भेटीबद्दल लिहीलं.. तिला आधीच माहित होतं तिची मिटींग आहे, उगाच मज्जा म्हणुन तिने हे सगळं केलं होतं. मला आधी राग आला थोडा पण मग ह्या मुलीची गंमत वाटायला लागली.. तिने तळतीप लिहीली होती.. "Now please बंगाली शिवी नको घालु.. तुला बंगाली शिवी देता येत नाही.. तु बंगालीलाच शिवी देतेस बंगाली बोलुन!"

हिची आणि माझी ओळख झाली तिच्या ब्लॉगवर. आधी मला ती typical emo वाटली ब्लॉगकडे बघुन.. पण वाचायला लागल्यावर आवडायला लागली. भारी सुंदर काहीतरी लिहुन जायची एखादंच वाक्य, पण ते वाक्य आख्खी पोस्ट खाऊन जायचं.. आणि मुळात नेहमी लिहीणारी. इतर बन्गाली मुलींसारखी स्वतःच्या डोळ्यांच्या प्रेमात असणारी, पुण्यात वाढलेली त्यामुळे बन्गाली मराठी बोलणारी.. ते तिच्या english blog मधुन पण जाणवायचं! मी एकदा कमेंट केली तिच्या ब्लॉगवर. त्यावर ती काहीतरी बोलली..मग मी.. मग परत ती. असं खूप वेळ झाल्यावर मग आम्ही मेला-मेली सुरु केली. तेव्हा जाणवलं "च्यायला ही पोरगी भन्नाट आहे.".. मला जे वाटायचं, मी जशी जगते त्याच्या सगळं विरुद्ध हिला वाटतं, ती तशी जगते. तिच्या एका एका फंड्यांच्या प्रेमात मी पडायला लागले.

मग आम्ही चॅट करायला लागलो. "mon diye shunun" म्हणुन ती किस्से सांगायला सुरुवात करायची.. मधेच बंगाली गुगल्या टाकायची.. आणि टाटा-बायबायचे प्रकार झाल्यावर "bishwe shanti biraj koruk" (let there be peace on earth) वगैरे म्हणायची काही वेळेस.. काहीही आहे तो प्रकार..मी मनापासुन काही सांगायला लागले तर मधेच मला अडवत "eta baje katha..i have better things to tell" म्हणत तिची गोष्ट अर्धवट सांगायची.. मग अर्ध्यावर आल्यावर म्हणायची " I am talking agdam bagdam.. your story was better.. go ahead".. आम्ही असं तासंतास बोलायचो.. दोघींकडे एकमेकींचे नंबर होते..पण आधी कोण फोन करणार म्हणुन कोणीही फोन केला नव्हता.. sms-sms चालायचे फक्त कायम.. तिच्यामुळे मी बंगाली शिकायला लागले. आमचे फिल्म्स वरुन वाद होयला लागले.. मला आवडणा-या फिल्म्स तिला नाही आवडत.. KKR आणि MI वर आम्ही एकमेकींमधे पैजा लावायचो.. आणि असं बरंच काही..खुप मज्जा केली आम्ही, अर्थात ऑनलाईन! आणि फोनवर.. भेटायचं आहे यार एकदा असं ठरवुन ठरवुनही भेट होत नव्हती.. कायम लपाछपी खेळल्यासारखं होत होतं..आणि कायम त्या भेटीला filmy effect देत ती असं काहीतरी करत होती.. कडं काय, स्कार्फ़ काय.. एकदा म्हणाली "मी sndtमधे येते आहे. मोरपिसचे कानातले घातले आहेत.. बघ येतं का ओळखता" मी लक्षच नाही दिलं तेव्हा.. नंतर officeमधे एक Graphics Designer आली होती.. माझ्याविषयी विचारत होती असं माझ्या वर्गातल्या मुलीनी सांगितलं.. मी तिला विचारलं "तिनी कानात काय घातलं होतं?.. "अरे इतना Awesome था..".. श्या.. ती खरंच आली होती, तिचं कार्ड ठेवुन गेली होती!


"तेजु, हिरो खुद नही बनता उसे बाकी लोग हिरो बनाते है" असं मधेच एखादं random वाक्य टाकायची.. किंवा मधेच sms करुन "saajan film ka woh chai ke baagonme kaunsaa gana hain sanjay dutt n madhuri ka?" ..किंवा मग काही वेळेस अगदीच त्यांच्या लॉ कॉलेजच्या गेटवर बसुन रिकामी असल्यागत मला updates देत बसायची..
"abhi woh banda aya.. he is interested in crime ya...sahi na?"...
"usake eyes blue hain! n hes wearing white shirt"...
"m thinking of taking up crime now"

मुलीसारखी मुलगी.. पण तरीही हुशार आणि emo नाही! हे असुनही सुंदर.. हे असुनही practically relationship मधे.. आणि तरीही कुठेही बिघडलेली नाही.. आणि तरिही कुठेही काकुबाईपण नाही! जुन्या एखाद्या जन्मीची ओळख असल्यागत आमची मैत्री झाली होती.. वाढत होती.. एक दिवस तिनी पिंग केलं .. म्हणाली..
ti: now lets make it real
mi: aan?
ti: milate hain re abhi realmein..
tomar katha amar mone pore
mi: aan?
ti: yaar.. natak mat kar! kal eternity mall, Thane.. mi ani Ori yetoy tithe.. tu ye 7 vajta..
mi: tum donome aake main kya karu? bf-gf khush raho!
ti: tu ye.. bbye

आणि गायबच झाली. मी दुस-या दिवशी ५ वाजल्यापासुन तयार होऊन बसले. परत एकदा वाढलेले heartbeats, वेगळीच काहीतरी feeling.. teen-agerish BFF असल्यागत काहीतरी वाटत होतं मला..तिचा मेसेज आला " we are here.. m wearing green, he is wearing white.. box office" मी घरातुन निघाले. तिच्या वाचलेल्या पहिल्या ब्लॉगपासुनची ती आठवायला लागली. ती कसली perfect होती.. मॉल जसजसा जवळ आला मी अजुन अस्वस्थ होत गेले. रिक्षाला दिड मिनीटांचा सिग्नल लागल्यावर मला कायम चिडचीड होते पण आज बरं वाटलं.. आजवरची सर्वात छान मैत्रिण.. एकदम मनमोकळी आणि जिच्याशी आपल्यालाही मन मोकळं करता येईल अशी.. आजवरची सर्वात विचीत्र मैत्रिण.. जेवढी लहान मुलासारखी वागणारी तितकीच मोठ्यांसारखं सांभाळणारी.. थोडक्यात too good to be real! मला एकदम धस्स झालं.. मी असं का म्हणाले? too good to be real??

मी रिक्षातुन उतरुन चालत होते. गेटमधुन आत गेले.. नेहमीप्रमाणे आजही लपाछपी व्हावी असं वाटायला लागलं आणि तितक्यात एक पांढरा शर्ट घातलेला मुलगा आणि त्याच्या समोर एक हिरवा स्कर्ट घातलेली मुलगी दिसली.. ती पाठमोरी होती.. मी पुढे चालत होते पण माझा वेग आता मंदावला होता.. ती मागे वळत होती.. हातात कडं, कानात मोरपिसं.. त्या क्षणाला पुढे टाकण्यासाठी उचललेलं पाउल मी थांबवलं.. क्षणभर तसंच अधांतरी ठेवुन परत मागे आणलं.. त्या दोघांकडे हसुन पाहिलं आणि मागे वळले.. परत वेगाने चालत येत रिक्षात बसले. तिचा कॉल आला.. पहिल्यांदाच ती कॉल करत होती.. "तेजु.. wait.. what was that?"
"तू मला तिनदा असं चुकवुन गेलीस.. माझं राज्य होतं.. आता राज्य तुझ्यावर आलं आहे..you missed me.. "
"चोले जावो.. कालके आबार ऑनलाईन देखा होबे" ती म्हणाली आणि आम्ही दोघीही हसायला लागलो...

dont know about this लपाछपी.. the only thing I know is बास्तब कल्पकाहिनीर ठेक्यो बिष्मयकार..
कल्पनेत आणि वास्तवात खूप अंतर असतं राव.. ती मला माझ्या कल्पनेमधलीच आवडते .. तिच्या त्या imageला मला धक्का द्यायचा नाहीये.. आणि तिलाही माझ्या बाबतीत हेच वाटतं.. आज नजरानजर झाली.. उद्या कदाचित भेटही होईल.. पण तोवर आम्ही आमच्या आमच्या मनातल्या if unreal is the word त्या unreal प्रतिमांना जपुन ठेवु!

based on a true story and The real friend ;)



Thursday, January 21, 2010

शाळा आणि करिष्मा (२)

मी शाळेत पोचले तेव्हा गडबड चालु होती. पोरं बाहेर हैदोस घालत होती, पोरी कडेला उभं राहुन गप्पा मारत हसत होत्या. त्यातल्या एका मुलाला मी ७वीचा वर्ग कुठे आहे असं विचारल्यावर तो चक्क तिथुन पळुन गेला. मग एका मुलीला धरलं आणि विचारलं. ती सरळ चालायला लागली, मला कळेना काहीच. मग ती पुढे गेल्यावर मागे वळुन म्हणाली "चला नं, दाखवते आहे की".. मी वर्गापाशी गेल्यावर आधी बाहेरच उभी राहिले होते. छोटी सुट्टी संपायची होती अजुन.. काही मुली लाजत लाजत माझ्याकडे बघत होत्या. मी त्यांच्याकडे बघुन हसले की अजुन लाजत होत्या. मी करिष्माला शोधत होते.पण ती काही दिसत नव्हती.

सुट्टी संपल्याची घंटा वाजली तेव्हा सर आले वर्गात आणि मग "अरे बापरे.. उशिर झाला" भाव चेह-यावर दाखवत, जीभा बाहेर काढत "सर आत येउ?" करत ५-६ मुली आल्या..त्यातच करिष्मा होती. तिने तिच्या हातातली चिंच हळुच दाखवली मला. मी लगेच मनातल्या मनात प्रार्थना सुरु केली "please let her be the girl.. जी बाईंना impress करायला चिंचा-आवळे आणुन देते". तेवढ्यात सर बोलायला लागले.." आज आपल्याकडे ही आलेली आहे.. (माझं नाव विसरले होते ते).. लेले.. ही जाहिराती आणि लहान मुलांवर संशोधन करत्ये. तर आता ही शिकवेल तुम्हाला तिच्या संशोधनाबद्दल".. मला फिस्सकनी हसु आलं. मी शिंक आली आहे असं दाखवायचा प्रयत्न केला.. सर वर्गातुन बाहेर निघाले आणि मग मी फळ्यासमोर जाउन उभी राहिले.

२५-३० डोकी..लाल रिबीनीच्या वेण्या घातलेली.. काहींच्या डोक्यांत गजरे, चमकीवाले.. एखाद-दोनच डोकी केस कापलेली! सगळी माझ्याकडे बघत होती टक लावुन.. "आता काय सांगणारे ही बया" असे भाव सगळ्यांच्या डोळ्यात! काही काळ सगळं शांत होतं.. मी एक मोठ्ठा श्वास घेतला आणि म्हणाले "तर.. मग ..आता सुरु करुयात?" मुलींनी फक्त माना हलवल्या.. अजुन काय करणार म्हणा.. मला उगाचच पण लई टेन्शन आल्यासारखं वाटलं. पुण्याला आगाउ पोरांना शिकवायची सवय होती.. तुम्ही एक शब्द बोलाल तर ती over smart कार्टी १० शब्द बोलतात.. इथे पोरी बोलल्याच नाही तर? तरी मी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात शाळेतल्या २ शिक्षीका मागच्या बाकावर येउन बसल्या. एक कालच्या ओरडणा-या बाई होत्या त्यात.
मग पुढे अर्धा तास मी जितके प्रश्न विचारले तितक्या सगळ्यांची उत्तरं मला त्या दोन बाईंनी दिली.

मी: तुम्ही टीव्हीवर काय काय बघता?
बाई१: सांगा.. काय काय बघता ते.. अवघाची संसार, कुंकू, गोजिरवाण्या घरात, सारेगमप..
बाई२: हिंदी पण बघतात.. MTV, cartoon network.. सगळं बघतात.. TVच तर बघतात.. अभ्यास नको कोणाला!
मी: अरे वा.. हे सगळं बघता का? फिल्मस पण बघता ना?
बाई२: तर काय? अलिबागला फिल्म लागली की न चुकता बघतात.. सीडी-डीव्हीडीवरही बघतात..
मी: ( मनात: ओह बाई गपा की हो आता) हो का? चांगलं आहे .
तुम्हाला "जाहिरात" म्हणजे काय माहित्ये ना?
बाई १: सांगा गं.. लाजु नका.. जाहिरात म्हणजे वस्तु विकतात ते.. आपल्याला वस्तुंची माहिती देतात.. हो की नाही?
मी: (yeah right!) हा.. तुम्ही द्या की उत्तर.. असं सारखं सारखं बाईन्ना नाही काही उत्तर द्यायला लावायचं! आता ह्या पुढे बाई नाही हं मदत करणार तुम्हाला.. तुमचं उत्तर तुम्ही द्यायचं!

हे बोलल्यावर मला माझा अभिमान वाटला.. आणि बाईसुद्धा गप्प झाल्या. भारी वाटलं मला जाम! मी शाळेत शिकत होते तेव्हापासुन मला आगाऊ बाईन्ना गप्प बसवायला मज्जा येते! मग त्या बाई आपापसांत गप्पा मारायला लागल्यावर मी आणि मुली एकमेकींशी बोलायला लागलो. मुली हळुहळू खुलत होत्या.. हसत होत्या.. एखादी गंमत सांगितल्यावर डोळे मोठे करुन बघत होत्या.. मलाही छान वाटायला लागलं! मी मग त्यांना मधेच "आता तुम्ही जाहिरात बनवुन दाखवणार का?" असं विचारलं.. तर पोरी इतक्या जोरात "हो sss" ओरडल्या.. मला जाम कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं, धक्का बसला.. prejudices.. prejudices.. नाही बोलणार खेड्यातल्या मुली, जाहिराती नाही करता येणार त्यांना.. लाजतील, शांत बसुन राहतील.. असं काहीसं माझ्या डोक्यात होतं! मी त्यांना "products" दिले आणि सांगितलं .."जा मज्जा करा, १५ मिनीटं.. हवी तशी जाहिरात बनवा!"

घोळके-घोळके जाहिरातींबद्दल विचार करण्यात गुंगले होते. कोणीतरी जिंगल बनवत होतं, कोणी रेडिओसाठी जाहिरात बनवत होतं, कोणी स्कीट करत होतं.. करिष्मा मात्र एकटीच बसली होती तिच्या ग्रुपपासुन लांब. मी तिला खुणेनेच "काय?" म्हणुन विचारलं.. ती लगेच उठुन माझ्याकडे आली.. "तुम्ही बोलला नाहीत आल्यापासुन माझ्याशी काहीच!.. मला वाटलं विसरलात मला" .. ओह असा फंडा आहे काय.. ह्यावर काय बोलायचं मला माहित नव्हतं.. मी आपला direct बाईपणा केला, "बरं मग तू जाहिरात नाही करणार का? कोणत्या ग्रुप मधे आहेस तू?" . तिने एका ग्रुपकडे बोट दाखवलं "पण त्या मुली खुप साधीशी जाहिरात बनवताय्त.. माझ्या डोक्यात चांगली जाहिरात आहे त्यांच्यापेक्षा.. मी एकटी करु का?" (Oh My God.. मी शाळेत असताना अशी आगाऊ होते का? म्हणजे मला जे भारी वाटायचं ते असं आगाऊ असायचं का? oh ohf)

मी मागच्या बेन्चवर जाऊन बसले.. एक एक ग्रुप येउन जाहिराती सादर करायला लागला..
Group 1: ( कोरस:(गाणं वगैरे) मला होयचं आहे गोरं.. मला दिसायचं आहे सुंदर..
एक मुलगी: मग वापरा डॅश डॅश क्रीम.....)
Group 2: ( १: ह्या महागाईच्या दिवसात काय करावं बाई?
२: मी सांगते.. ही पावडर विकत घ्यावी कारण ह्याबरोबर मिळतं हे तेल एकदम मोफत...)
Group 3: ( ती बघ किती गोरी आहे.. काय राज आहे गं तिच्या गोरेपणाचा?
ती: माझ्या गोरेपणाचं रहस्य ते क्रीम... )
करिष्मा: (माझ्यासारखं सुंदर व्हायचं आहे? मग वापरा ही पावडर.....)

मी आधी कौतुकाने, मग आश्चर्याने, मग अजुन आश्चर्याने, मग blank हौन, मग मान तिरकी करुन, मग डोळे मोठ्ठे करुन.. मग तोंडाचा मोठ्ठा आ करुन, मग एक भुवई वर करुन.. मग एका बोटाचं नख चावत त्या जाहिराती पाहिल्या.. जाहिराती संपल्या.. मी हसले सगळ्यांकडे बघुन..(स्वत:ला.. बाय माझी तेजू, काय शिकवुन राहिली तू ह्या पोट्ट्यांना? Advertising and body-image म्हणे.. शिका काहीतरी ह्यांच्याकडुन) मग how those ads mislead you.. वगैरे सांगितलं, मुलींना जाहिराती बनवायचे विडीओ दाखवले... मग "self-image enhancement" वगैरे प्रकार केले. You are Beautiful वालं एक motivational speech दिलं! उद्या भेटू म्हणुन त्यांना मग मी तश्याच feel good noteवर सोडुन दिलं.

करिष्मा वर्गातुन बाहेर पडताना माझ्या मागे पळत पळत आली. "तुम्हाला खरंच वाटतं आम्ही सुंदर आहोत?" मी फक्त मान हलवली.. तिनी अविश्वासाने बघत मला विचारलं "सगळ्या? खरंच? सुंदर?"
मी आजुबाजुला कोणी नाही ना पाहिलं.. तिला म्हणाले.." कोणाला सांगणार नाहीस?..बरं, मग सांगते.. सगळ्या सुंदर आहेत.. सुंदर.. पण तुझ्याएवढं सुंदर नाही कोणी" डोळे चमकले मग करिष्माचे. ती अजुन काही बोलणार तेवढ्यात मागुन सर आले म्हणुन ती पळुन गेली. सर तिच्याकडे बघत मला म्हणाले " सांभाळता येतोय ना हा वर्ग? पोरी जरा डॅम्बिस आहेत! अभ्यास काहीही नाही.. नुसत्या उनाडक्या.. ही आत्ता गेली ती पोरगी २दा नापास झाल्ये. अजुन एकदा नापास झाली की मग शाळेतुन तिचं नाव निघणार मग काय लग्नं करुन पोरं सांभाळणार.. हे असंच होतं गं ह्यातल्या अनेक मुलींचं..." सर पुढेही काहीतरी बोलले पण माझं खरंच लक्ष नव्हतं. करिष्मा लांबुन मला टाटा करत होती आणि मगाशी आणलेल्या चिंचा माझ्यासाठी टेबलावर ठेवत होती. तेव्हा ती खरोखर सुंदर दिसत होती..

Monday, January 11, 2010

शाळा आणि करिष्मा (१)

अलिबागला जाताना मधेच खिंडीत उतरुन साधारण एक किमी चालत गेलं की टमटम (6 सीटर) स्टॅन्ड आहे.. तिथे अर्धा एक तास थांबलं दुपारच्या वेळेला की मग माणसं गोळा होतात एक टमटम भरण्यासाठी..पुण्यासारखं एका टमटममध्ये १०-१२ माणसं नाही भरत इथे.. ६-७ जमली की निघतात. वळणावळणांचा रस्ता.. पण सुंदर वगैरे नाही..रुक्ष ब-यापैकी! माझ्या डोक्यात अनेकदा रेडिओ वाजत असतो. ह्या प्रवासात स्वदेसचं थीम म्युझिक आहे ना, ते ऐकत होते. भारी वाटत होतं. मी काही खास करायला चालले नव्हते पण अचानक मोहन भार्गव सारखं भन्नाट वाटलं. गावाच्या नावाची पाटी दिसल्यावर मी उतरले . टमटमवाल्याने लांब एके ठिकाणी बोट दाखवत "तिथे बघा शाळा" म्हणुन शाळा दाखवली आणि तिथे जायचा शॉर्टकट सांगितला. दगड-धोंडे आणि रानातला रस्ता.. मज्जा वाटली अजुनच मला!

शाळा समोर दिसत होती.. बैठी, टुमदार, कौलारु! बाहेर सायकली लावुन ठेवलेल्या १०-१२... चुन्याने रंगवलेल्या विटांचं एक तकलादू कुंपण, आत शोभेची झाडं.. सकाळीच शिंपण केलं असावं बहुतेक शाळेसमोरच्या मैदानावर..अजुनही हलकासा मातीचा वास येत होता. शाळेसमोरचं मोट्ठं आंब्याचं झाड मोहोरलेलं आणि त्याच्या पारावर ३ पिंपं ठेवलेली पाण्याची. एक लहान मुलगी तिथे पाणी पित होती..भांड्याला तोंड लावुन आणि ते भांडं न विसळता तसचं उपडं ठेवुन बाहीला तोंड पुसत पळुन गेली आत!

७ खोल्यांची शाळा.. पिवळ्या कार्डबोर्डवर लाल मार्करने "संगणक कक्ष" लिहीलेली खोली सर्वात डावीकडे. आत जुनी २ कपाटं आणि ३ नवीन कॉम्प्युटर! त्याच्या बाजुला निळ्या कार्डबोर्डवर "प्रयोगशाळा" लिहीलेला एक वर्ग.. हेच स्टाफरुम पण! २ शिक्षक आत पेपर वाचत बसलेले होते. एक सर फळ्यावर "आजचा प्रयोग..साहित्य, निरीक्षण" वगैरे लिहीत होते. कोणाचं माझ्याकडे लक्षचं गेलं नाही. बाहेर भिंतीवर रवींद्रनाथांची कविता चिकटवलेली. त्याच्याबाजुचा फळयावर "आजचा सुविचार" लिहीलेला कोरा फळा. एका वर्गाचं दार होतं मग.. आतमधली सगळी पोरं-टोरं मला बघत होती.. "हे कोण आलं आहे?" नजरा. एक मुलगी माझ्याकडे बघत असताना मी तिच्याकडे बघुन हसले तर असली मस्त लाजली ती.. इयत्ता कुठली ते लिहीलेलंच नव्हतं..कदाचित ७-८वी असेल. एक बाई वह्या तपासत होती.. "नवीन शब्द ऐका रे ह्याने बनवलेला.. आ-र-कु-ती.." मग मुलगा ओशाळुन बाईंकडे बघायला लागला.. बाई त्यांच्या अंगावर खेकसत म्हणाल्या. "आकृती लिहीत येत नाही हो अजुन साहेबांना". मी पटकन पुढे गेले.. शाळेचे "दैदिप्यमान यश" नावाचा फळा.. श्लोक पाठांतर स्पर्धेत शाळेची ८ मुलं निवडली गेली होती. त्यावर दहावीत शाळेतुन पहिल्या आलेल्या मुलांची यादी.. ६० ते ७५% मधली मुलं. गेल्यावर्षी ७९% मिळाले होते एका मुलीला.. तीच आत्तापर्यन्तची सर्वात जास्त टक्के मिळवलेली मुलगी होती.

पुढे एक एक वर्ग बघत मुख्याध्यापकांच्या खोलीत येउन बसले त्यांची वाट पाहत. तिथल्या शिपायाने लगेच टेबल फॅन माझ्या दिशेला फिरवला आणि लावला..खटार-खटर आवाज येत होता त्यातुन. एक बाई ओरडत होत्या. एका वर्गात कोणी शिक्षक नाही म्हणुन वर्ग उठलेला. बाजुच्या वर्गात एक शिक्षक कसल्यातरी सुचना देत होते. बाहेर एका झाडावरचा कावळा ओरडत होता. समोर प्लॅस्टिक कव्हर घातलेली सरस्वती, वह्यांचे ८-१० गठ्ठे, २००९ डिसेंबर- कालनिर्णय, तांब्या-भांडं.. मी तांब्यातुन पाणी घेतलं भांड्यात पण मग बाहेरची मुलगी आठवली.. तांब्यातुनच वरुन पाणी प्यायलं. घड्याळात ३ वाजलेले दिसले भिंतीवरच्या..

बसल्या जागेवरुन मला व्हरांडा दिसत होता. बाहेर कागदाचे बोळे पडलेले होते मधेच, पेन्सिलचे तुकडे आणि टरफलं, मधेच एखादी चॉकलेटची चांदी.. तितक्यात तो शिपाई परत आला घाईघाईने आणि घंटा वाजवली. शाळा सुटली! मुलं बाहेर आली वर्गातुन.. कोणी हसत-खिदळत..कोणी शांतपणे.. काही मुली पळाल्याच..काही मुलं इथे-तिथे बघत उभी राहिली. माझ्याकडे बघत मग आपांपसात काहीतरी बोलली.. आम्हीपण असंच करायचो, शाळेत कोणी नवीन दिसलं की त्या माणसाकडे बघत त्यावर कमेन्टस मारत बसायचो. कमेन्टच्या ह्या टोकाला उभं राहुन कसं वाटतं ते आत्ता कळत होतं मला.

तितक्यात सर आले. सगळी मुलं पळाली. सर मला पाहुन अगदी आनंद झाल्यासारखे हसले. "काय कसं करायचं?", "कधी येत्येस वर्ग घ्यायला?" .. मी सरांना विचारलं "उद्यापासुन येऊ?" सरांनी मान डोलावली.
मी तिथुन बाहेर पडताना मुलींकडे एकदा पाहिलं समोरच्या .. आमच्या चव्हाण बाई बघायच्या आमच्याकडे वर्गात शिरण्याआधी तसं.. "अब मुझसे बचके कहा जाओगे?" सारखं. पुण्याला एका शाळेत जात असले आधी शिकवायला तरी on my own असं पहिल्यांदा शिकवणार.. तेही इथे मला ह्या पोरी "बाई" किंवा "मॅडम" म्हणणार.. मी जरी २च दिवस येणार असले तरी फुलटू त्यांना गृहपाठ देणार असं मी ठरवलं होतं... एक्दम बाई टाईप वागणार.. मारणार किंवा ओरडणार नाही कदाचित पण धाक-दरारा वगैरे असा विचार करत होते मी.

परत रस्त्यापर्यन्त चालत आले आणि टमटमची वाट बघत उभी राहिले. अर्धा-एक तास लागणार ह्या तयारीनेच उभी होते. माझ्या शेजारी एक मुलगी उभी राहिली मागुन येउन.. माझ्या इतकीच उंची, वर बांधलेल्या २ घट्ट वेण्या पण कपाळावर एका बाजुने फ्लिक्स.. व्यवस्थित युनिफॉर्म, पायात स्लिपर्स.. माझ्याकडे बघुन ती हसली. मी पण हसले.. " तुम्ही शिकवायला येणार आम्हाला?" अचानक तिचा प्रश्न आला.. "कितवीत आहेस तू? मी ६वी-७वीचे तास घेणार २ दिवस." मग ती अजुन हसली.. "म्हणजे आमच्यावरच". मग ती लगेच म्हणाली.. " माझं नाव करिष्मा आहे. ७वीत आहे मी.." मी शिकवायला येणारे म्हणुन इतक्या आनंदाने आणि उत्साहाने कोणी माझ्याशी बोलेल असं वाटलं नव्हतं मला..

"तू पण टमटमसाठी थांबली आहेस?" मी विचारलं तिला. "नाही मैत्रिणीसाठी" तिनी गोंधळुन उत्तर दिलं. मागे २ मुली उभ्या होत्या गप्पा मारत. "तुम्ही टीव्ही-फिल्म्ससाठी काम करता ना? सर म्हणाले आम्हाला.. मला पण काम करायचं आहे एकदा असं" मी मनातल्या मनात सरांना नमस्कार केला, त्यांनी सॉलिडच काहीतरी सांगितलेलं दिसतं आहे.. मला ह्या पोरीला काय म्हणावं कळेना.. "अरे वा.. कर की" सारखं एक पाचकळ उत्तर मी टाकलं. ती अजुनही माझ्याकडे एकटक बघत होती मी पुढे काय सांगत्ये ऐकण्यासाठी थांबुन..मी मागे वळुन पाहिलं तर त्या दोन मुली गायब.. मी तिला म्हणाले "मैत्रिण गेली की गं तुझी". तिने मागे न वळता "हा.. जाऊ दे.. तुमच्याशीच बोलायला आले" असं प्रामाणिक उत्तर दिलं मग! "मला काजोल आवडते" ती म्हणाली.. मी हसले .."अरे वा.. मला पण!"

तितक्यात एक टमटम आला जो मी घालवु शकत नव्हते. मी तिला म्हणाले.. "उद्या भेटु गं आपण.. तेव्हा बोलु" ती हिरमुसली. "मॅडम.. करिष्मा नाव लक्षात ठेवा हं.. उद्या ओळखाल ना ? मी लगेच पुढे येईन तुम्ही आल्यावर..उंचीमुळे मागे बसावं लागतं." ती बोलत होती मी टमटममधे चढल्यावरही.. मी हात हलवुन तिला अच्छा वगैरे केलं. पुढे खिंडीत पोचेपर्यन्त डोक्यातल्या रेडिओवर "मेरे ख्वाबोंमें जो आए.." वाजत राहिलं!