Monday, June 29, 2009

म्याव...१

त्या दिवसापर्यन्त मला काहीच दिसत नव्हतं... फक्त माझ्या आईचा, एका भावाचा आणि एका बहिणीचा आवाज ऐकु येत होता... त्या दोघांचे डोळे कदाचित माझ्या आधीच उघडले होते. "आई, हे काय आहे?", "आई मी हे खाऊ का?", "आई ही अजुन डोळे का उघडत नाहिये? " असे प्रश्न विचारुन ते आईला त्रास देत होते. पण आई शांतच असायची. मला आईचा आवाज ऐकायचा असायचा पण ती खुप कमी बोलायची. जेवढा वेळ आमच्याबरोबर असायची त्यातला बराचसा वेळ ती मला चाटण्यात घालवायची.

"आई तू आमच्यापेक्षा त्या पिल्लावरच जास्त प्रेम करतेस. त्याचे डोळेपण उघडले नाही आहेत. ते नीट दुध पीत नाही. ते काही बोलत नाही..ते आमच्यासारखं फिरतपण नाही पण तू त्यालाच चाटत बसतेस" माझा भाऊ म्हणाला. त्याचा आवाज खुपच खरखरीत होता. त्याची नखं पण लागायची. मी आईला सांगितलं नव्हतं पण ती बाहेर गेली होती तेव्हा त्याने माझ्या मानेवर जोरात मारलं होतं. खूप दुखत होतं. ती दोघं मिळुन मला वेगळं का पाडत होती माहित नाही. माझे डोळे अजुन उघडले नाही म्हणुन? त्यादिवशी आईनी मान चाटायला घेतली तेव्हा ती थांबली, तिने मला जवळ घेतलं आणि अचानक उठून निघुन गेली. आई मानेवरुन हात फिरवते, चाटते तेव्हा खुपच आवडतं मला. एकदम छान वाटतं. नंतर मला त्या दोघांनी सांगितलं की आई माझ्यामुळे रडत होती. माझे डोळे अजुन उघडले नाही त्याला मी काय करु शकत होते?

मी मनापासुन माझे डोळे उघडायचा प्रयत्न करत होते. खुप जोर लावत होते. माझे पंजे जमिनीत घट्ट रोवले होते मी... मला डोळे उघडायचे होते..मला आईला बघायचं होतं, माझ्या भावंडांना बघायचं होतं. इतके आवाज येत असतात त्या सगळ्यांना बघायचं होतं. दोन दिवसांपुर्वी म्हणे एक काळा राक्षस आला होता. त्याचा आवाज खरचं खूप भयानक होता. आई म्हणाली "ह्याचापासुन सांभाळुन राहा काही दिवस.. तुम्ही मोठे झाल्यावर प्रश्न नाही..मग तो तुम्हाला घाबरेल"... मला खुप भीती वाटत होती. मी आईला विचारलं "आई काळा म्हणजे काय गं?" आई तिथुन निघुन गेली. आई असं का करते कळतच नाही. भाऊ म्हणाला " तुला आत्ता जे काही दिसतयं ना ते म्हणजे काळं..." मला काहीच दिसत नाही.. म्हणजे काळा... तो राक्षस खुपच भयानक असणार म्हणजे. त्याला कावळा म्हणतात असं नंतर पिंगळी मावशी सांगत होती.

पिंगळी मावशी म्हणजे आईची बहीण. ती अधुन मधुन आमच्या इथे येते उन खायला. परवा ती आईला सांगताना मी ऐकलं "मोने, का लळा लावत्येस ह्या अशक्त पिल्लाचा? काय होणारे त्याने? किती दिवस पुरणारेस तू त्याला? बोक्याला दे गं... त्याची नजर आहेच इथे. निदान तुझ्या बाकी दोन पिल्लांचा जीव तरी वाचेल. तू ह्या पिल्लापायी तुझं काय करुन घेतलं आहेस ते बघ" आई नेहेमीप्रमाणे काहीच बोलली नाही. पिंगळी मावशी काय म्हणाली मला कळत नव्हतं पण ती जे काही म्हणाली त्याने जरा भीती वाटली. बोका कोण? अशक्त म्हणजे काय़? ती माझ्याबदल बोलत होती का? आता मला डोळे उघडायलाच हवे होते

त्या दिवशी मी खुप वेळ झोपले होते. आईने मला चाटुन चाटुन उठवलं...मी उठले आणि डोळे उघडले... क्काय्य? मी डोळे उघडले? मी परत डोळे बंद केले आणि परत उघडले... कित्ती मज्जा होती... मी आता बघु शकते. पण काही दिसत का नाही आहे? मी डोळे उघडले ना? मला भीती वाटायला लागली... अजुनही सगळं काळंच का? मला कावळ्याने तर धरलं नाही आहे? मी पंजे मारायला लागले आणि अचानक डोळ्यांवर काहीतरी जोरात आलं... काळं नव्हतं ते... मला काहीतरी दिसतयं. आई... ती आईच होती... सुंदर, तिचे डोळे कसले मोठे होते. बहिणीने सांगितलं होतं मला... आई पांढरी आहे, आणि आपण सगळे करड्या रंगाचे आहोत. पांढरी... काळ्याच्या एकदम विरुद्ध... "आई मी बघु शकत्ये... मला तू दिसत्येस आई.. पां-ढ-री". मग माझा भाऊ पुढे आला... "छोट्या दिसायला लागलं तुला? छान झालं" त्याचा चेहे-यावर काळे पट्टे होते. बहीण खेळत होती, ती सुंदर होती. मी खुपच लहान होते त्या दोघांच्या मनाने..म्हणुन मला ते छोट्या म्हणायला लागले होते.

मग मी पिंगळी मावशी पाहिली. बोका पाहिला.. आमची आई त्यासगळ्यांच्या मनाने खुपच छोटी होती.. मी पण छोटी होते... अशक्त...पिंगळी मावशी म्हणाली होती... अशक्त! त्यादिवशी झोप येत होती तरी मी झोपले नाही कारण मला डोळे बंद करायचेच नव्हते. डोळे बंद केले आणि मग ते परत उघडलेच नाही तर? मी आजुबाजुला बघत होते. नवीन नवीन काही काही कळत होतं. मग अचानक बाहेरही काळं होयला लागलं. मी घाबरले... आई म्हणाली "रात्र झाली". मी दुध प्यायलं, आईला चिकटुन बसले होते. आईने मला चंद्र दाखवला. मला अजुन जवळ घेतलं आणि म्हणाली.

"छोट्या, तुझे डोळे उघडायची वाट बघत होते मी. आज तुझे डोळे उघडले, मी मोकळी झाले. बाब्बा सांभाळुन राहा हं. काही वाटलं ना तर रात्र झाल्यावर ह्या चंद्राला सांग... मी तिथेच असेन कुठेतरी.. बाळा तू खुप अशक्त आहेस रे, आणि मी तुझ्याहुन जास्त... मला तुला सांभाळणं खुप कठीण जाणारे रे. मला इथे राहाणंच कठीण जाणारे. मी कदाचित परत येणार नाही छोट्या... करड्या आणि ताई कदाचित तुला त्रास देतील, पण त्यांच्याबरोबरच राहा. मोठ्ठी हो हं बाळा... मला निघायला हवं" माझ्या कानांवर फक्त शब्द येत होते..मला काही कळत नव्हतं..दिवस्भर जागी राहिले होते त्यामुळे आता झोप येत होती. आई म्हणाली त्याचा अर्थ आईला उद्या विचारु म्हणुन मी झोपले.

सकाळी उठल्यावर आईच्या बोलण्याचा अर्थ कळला. खूप खूप उशिर झाला होता. आईला शोधण्यासाठी आता चंद्र येईपर्यन्त थांबावं लागेल.