तो: काय झालं गं तुला?
ती: I donno re... m feeling blue today!
तो: ब्ल्यु? मला तर चांगली काळी-सावळी दिसत्येस!
ती:...
तो: बरं बरं कशामुळे feeling blue?
ती: माहित नाही
तो: सांगत होतो... उजाला इन्संट व्हाईट्नींग वापर... नीळ नको वापरु, पण ऐकायचं म्हणुन नाही!
ओके... जोक्स अपार्ट, मग आता काय करणारेस?
ती: माहित नाही...
तो: तुला काहीच माहित नसतं... बरं हे तरी महित्ये का, तो ब्लु कोणता आहे ते? नेव्ही ब्लु आहे या फिर स्काय ब्लु आहे?
ती: गप रे!
तो: बरं .. मी अजुन त्रास देत नाही... ऐक जा जरा पिवळ्या उन्हात जाउन उभी रहा...
ती: ??
तो: निळा अधिक पिवळा...हिरवा होतो ना... सदाहरित होशील उन्हात, पण evergreen हौन हसत हसत परत ये काय... Green with envy वाली हिरवी नको होऊ!
ती: डोक्यात जाऊ नको!
तो: नाही गं... डोकं कुठे? तुझ्या पायांशी जागा मिळाली तरी खुप आहे... शंकर, कृष्ण आणि विष्णु नंतर निळी झालेली तुच ना... हे देवी..
ती: बास काय आता....
तो: तुझं आडनाव "फुले" असायला हवं होतं गं.. मग आपण तुला निळी फुले म्हंटलं असतं
ती: माझी चिडचिड करतो आहेस...
तो: तेच तर हवंय... माझ्याकडचा जांभळा रंग संपलाय, रागाने लाल होशील, आणि मग तुझ्या feeling Blue मधे तो लाल मिसळुन जांभळा तयार होईल... है किनई?
ती: जा.. मी तुझ्याशी बोलत नाही आहे...
तो: असं नको करु गं... मला ना आज सोसायटीतल्या लहान पोरांबरोबर खेळायला जायचं आहे.. आम्ही ना "crocodile crocodile, what colour do you want?" खेळणारोत! तुमच्या मराठीत "पिंकी पिंकी कोणता रंग?" असं काहीतरी... तू पण चल... निळा रंग आल्यावर तुला रंग शोधत धावायची गरज पडणार नाही...
ती: बर्र्रर्र
तो: अगं पण काय झालं... असं वाटायला?
ती: अखेर विचारावसं वाटलं..
तो: हो गं.. तसं मला खुप दिवसांपासुन हेच सांगायचं होतं गं... एक तर ओर्कुटींग कमी कर... किंवा करायचं आहेच तर एवढ्या स्कीन आहेत तिथे... किती दिवस निळी स्कीन ठेवणारेस? rodies ठेव त्यापेक्षा...
ती: झालं परत सुरु?
तो: sorry... एक request आहे... आज प्लीज चंद्रकोर नको लावुस.
ती: क्काय्य?
तो: मला "निले निले अंबरमे चांद जब..." गावं लागेल..
ती: चल, मी निघत्ये...
तो: आज कोणत्या फिल्मवर काम करु नको.. नको ती फिल्म व्हायची!
ती: बडबड करु नको.. बाय
तो: अगं थांब... जाता जाता मला ते गाणं देउन जा ना..."निली आस्मानी छत्री"...
ती: कसं आणि कुठुन देउ? हेच गाणं हवं असणार तुला, पिडायचं आहे ना मला...
तो: नाही गं पोरी... "ई" कर जरा... तोंड उघड की बये... मी पण माझं ब्लु-टुथ ऑन करतो...
ती: माझं चुकलं... मला माफ कर! मला अजिबात काही वाटत नाही आहे... m not feeling blue.. ठीक आहे? झालं समाधान?
तो: बरं अजुन २ सेकंद ब्लु फील कर.. मी एक कविता केल्ये तुझ्यावर...
Roses are Red... sky is new,
friends like you, are very blue....
आता थांबव ते feeling...
चल आता नवीन रंग, आता बाबा मी फ़ील करणार...
"मेरावाला orange"
........
Saturday, May 16, 2009
Saturday, May 2, 2009
दूर राहिले माझे खेडे...
नागमोडी वळणं घेत, काजु-आंब्यांच्या बागांमधुन उतरल्यावर समोरचं दिसते आमच्या गावची छोटीशी नदी. आणि गोड्या पाण्याचा एक १२ महिने वाहणारा झरा. नारळ-सुपारीची काही झाडं सुगरणीची घरटी मिरवत उभी असतात. खंड्या, कोतवाल,बगळा, टिटवी सारखे पक्षी पाण्याच्या आजुबाजुला दिसतात. मध्येच एखादा पोपटांचा थवा आकाशातुन उडत जातो. झ-यावर पाणी भरायला आलेल्या ३-४ बायका "ही कोण पाहुणी मंडळी आली" म्हणुन आमच्याकडे बघत असतात...त्यातच समोरुन आमच्याघरी काम करणारा विजुभाऊ गुरं नदीवर धुवायला घेउन येताना दिसतो. बाबा गुरांकडे कौतुकाने बघतात... "पाडी कित्ती मोठी झाली..." म्हणत एखाद्या गायीवरुन हात फिरवतात.
जरा पुढे गेल्यावर आमची वाडी दिसायला लागते... वाडी म्हणजे खरं तरं चारचं लेले कुटुंबांची घरं आहेत. आमचं घर सर्वात शेवटी आहे... घराच्या वाटेवर तीन चाफ्यांची झाडं लागतात... तीनही चाफे वेगळ्या रंगांचे. चाफ्याचा वास मनात साठवत असतानाच झाडांआडुन आमचं घर दिसायला लागतं. घराच्या गडग्याजवळची गुलबक्षी आणि जास्वंद आमच्या स्वागताला फुललेली असते. सारवलेलं अंगण आणि अंगणातली तुळस, अंगणात घातलेली वाळवणं..आमसुलं, आंबोश्या, काजुच्या बिया, उन्हं खायला बसलेली दोन मांजरं, आणि दारात दुध-पाणी घेउन उभी असलेली काकु! ह्याला म्हणतात घरी येणं... लिफ्ट्मधुन उतरुन दारावरची बेल वाजवल्यावर सेफ्टीडोर मधुन डोकावुन मग कोणीतरी दार उघडणार, त्यात कुठे ही कोकणातल्या स्वागताची मज्जा?
घरी आत आल्या आल्या पडवीतला झोपाळा खुणावत असतो. पण काकु आतुन कोकम सरबत प्यायला बोलावत असते. माजघरात बसुन सरबत पित मी कौलातुन येणा-या कवडश्यासोबत खेळत राहते... इतक्यात आजोबा आत येतात, "पानं घेतलीस का गो? मुलींना भुका लागल्या असतील!" असं म्हणत नैवेद्य दाखवायला स्वयंपाकघरात जातात. फणसाची भाजी, कुळिथाचं पिठलं, अळुची भाजी, आमरस ह्यातलं त्या सिझन मध्ये मिळत असेल ते पानात असतं. पोळी सोडल्यास सगळं काही घरच्या धान्य, फळं, भाज्यांनी बनवलेलं. आपल्याला हवी ती भाजी शेतातुन आणुन ती बनवुन खायची मज्जा बिग बझारच्या packed vegetables मध्ये कशी यायची?
दुपारच्या भरगच्च जेवणानंतर थोडावेळ आराम केल्यावर आजुबाजुच्या बागांत, शेतांत भटकायचा अनुभव वेगळाच असतो. सगळीकडे शांतता असते. मधुनच एखादा पक्षी ओरडत असतो... झाडंही दुपारची डुलकी घेत आहेत असं वाटावं इतका मंद वारा असतो. मगाशीच नदीवरुन स्वच्छ होऊन आलेली गुरं गोठ्यात रवंथ करत बसलेली असतात. मधुनच घरावरुन जाणारा एखादा माणुस "ओअ..काका" अशी आजोबांना हाक मारुन जातो. मग कोणीतरी "मुंबईकडची पाहुणी कधी आली?" म्हणत विचारपुस करतो. गावातली सगळी माणसं आपल्या आजोबांना ओळखतात ह्या गोष्टीचा मला लहानपणापासुनचं खुप अभिमान वाटत आलाय...आणि त्याचमुळे असेल कदाचित, पण आमच्या लहानश्या सोसायटीतलेही सगळे आम्हाला ओळखत नाहीत ह्याचं वाईटही वाटतं.
दिवेलागणी झाली की आम्ही झोपाळ्यावर बसतो. अथर्वशीर्ष, रामरक्षा आणि पाढे म्हणत... आजही मला वाटतं की रामरक्षा म्हणावी तर ती कोकणातल्या एखाद्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसुनचं! आणि मग जमणारा गप्पांचा फड... रात्रीच्या मऊ खिचडी किंवा पिठलं भातानंतरचं ताक... आणि रातकिड्यांच्या किरकिरीत कधीतरी गप्पांमध्येच लागलेली झोप! डोक्यावर पंखा नसला तरी तिथे शांत झोप लागते.
सकाळी उठल्यावर खोपटातल्या चुलीजवळ बसायला मस्त वाटतं... चुलीवर मोठ्ठालं पितळ्याचं पातेलं पाणी उकळवत ठेवलेलं असतं. स्वयंपाकघरामागच्या चुलीवरही असंच एक पातेलं असतं, त्यात मऊभात रटरटत असतो. मऊ भात,मेतकुट, लिंबाचं लोणचं किंवा फोडणीची मिरची, चुलीत भाजलेला पोह्यांचा पापड, दह्याची कवडी....आह्ह, पंचपक्वान्नं गेली उडत अश्या मऊभातासमोर! आत्ता हे नुस्तं लिहीतानाही मला भुक लागल्ये. भातावर सोडलेल्या साजुक तुपाच्या धारेचा वास येतोय...
आंब्यांचा मोहोर दिसतोय, माडीवर लावलेली आंब्यांची आढी दिसत्ये...बागेतल्या एका रायवळ आंब्याची चव जिभेवर रेंगाळते आहे, सारवलेल्या अंगणाचा, गोठ्यामागच्या बकुळीचा, पाटातल्या पाण्याचा वास दरवळतो आहे. सकाळ-संध्याकाळचे वेगवेगळे पक्षी, पडवीतल्या झोपाळ्याचा "टकर्रर्र-कट्ट" आवाज, मधुनच गोठ्यातल्या वासराचं हंबरणं ऐकु येतं आहे. समोरची कंप्युटर स्क्रीन आता धुसर होत्ये... गदिमांचं "दुर राहिले माझे खेडे" गाणं सारखं वाजतं आहे. आता फक्त सुट्टीची वाट बघायची!
Subscribe to:
Posts (Atom)