Tuesday, September 30, 2008

The end...the beginning...

काही गोष्टी संपवाव्या लागतात, किंवा अर्ध्यावर सोडुन द्याव्या लागतात. कारण जेव्हा १ गोष्ट संपते तेव्हाच दुस-या गोष्टीला सुरुवात होते. cliche मारायचाच तर "प्रत्येक शेवट, एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात असते".

इथे आधी नवीन कहाण्या सुरु झाल्या आणि म्हणुन मग जुन्या गोष्टी... "hutt, I was so childish" म्हणत संपवल्या, संपवल्या म्हणण्यापेक्षा डोक्यातल्या कुठल्यातरी अडगळीच्या खोलीतल्या एका कोप-यातल्या जाड्जुड ट्रंकेत कुलुपबंद केल्या!

तिने तिच्या स्वतःची गोष्ट कधीच बदलली होती, त्याच्याविषयी काहीच माहित नव्हतं, काही दिवसांपुर्वी अचानक दोघे एकमेकांसमोर आले... :) तिने विचार केला होता तसं काहीच नाही झालं, तो प्लॅन अजुन १० वर्षांनंतरचा होता, आत्ताशी कुठे १-२ वर्षच झाली होती.

मुंबई भरपुर मोठी आहे... पण तरीही त्याच्याच उपनगरातल्या एका मॉलच्या बाहेर दुस-याच कोणाचीतरी वाट पाहत असताना तिला तो दिसला... त्याच्याबरोबर रेवा,

"huh, I knew this... हे तर होणारचं होतं, माझ्यानंतर तिच तर "best friend" होती"
best friend म्हणुन ती स्वतःशीच हसली... आपण इतके immature ही होतो कधीतरी!

ती: hey, hi! (मला ओळखतोस का?)

तो: Hellllooo.... तू इथे? कशी काय? कित्ती दिवसांनी... haah..m soo Happy to see u after so many days...

तिला ह्या आधी तो काय बोलतोय आणि त्याच्या मनात काय आहे हे दोन्ही कळायचं. पण आता त्या ultrasonic आवाजाचे बदलेले receivers त्याच्यासोबत होते.

ती: hi रेवा! :) u r looking cute...

तो: as usual

ती: yupp... (च्या मारी, काहीतरी लाज ठेव)... aahhaa.. somebody is blushing n all huh!

रेवा: अगं आत्ता काही दिवसांपुर्वीच आम्ही तुझी आठवण काढली होती...

ती: u want me to believe you babes? काय चालु आहे सध्या?

तो: यार मला वाटलं तू smart आहे, तू guess करू शकली असशील...

ती: हा हा ह... (हा प्रश्न मलाच विचारायचा होता का लेका?)

.......

रेवा: (त्याला) चल ना रे, m hungry! (तिच्याकडे बघुन) हिला पण घेउन चलु, चल ना आमच्यासोबत..

ती: नाही, माझी एक मैत्रिण येत्ये भेटायला, येईलच थोड्या वेळात आणि मला ’कबाब मधे हड्डी’ सारखं काही बनायची इच्छा नाहीये... ( यार निघा की आता... अजुन थोडावेळ तुम्हाला एकत्र नाही बघु शकत...)

तो: चल बे चुपचाप... पता नही नंतर कधी भेटु की नाही... तू तो जा रही है ना कही परदेस....

ती: ठीक आहे, चलो

त्या दोघांच्या पाठीमागे ती चालत होती
(परत कधीच भेटणार नाही? हो आता खरचं परत कधी भेटणार? पण भेटायचं तरी का आहे? २ वर्षांपुर्वी एकही दिवस असा जायचा नाही जेव्हा हा आपल्याशी बोलला नसेल. तेव्हा कोणी सांगितलं असतं की असाही एक दिवस येईल तर आपण त्यावर इतके हसलो असतो. इतक्या पटापट सगळं बदलतं आहे ह्यावर विश्वास नाही बसत...)

तो: hello, कहा खो गई? काय घेणार?

ती: १ कोक.. small ( as usual...)

तो: बास? इतकच? रेवा तुला?

रेवा: मला ना... आधी mcveggie, coke large नंतर बाकी सांगेन

तो: as usual!!

......

ती बसलेली, ती दोघं काहीतरी बोलत होती... १ कोक शेअर करत होती...
(thank god..दोन स्ट्रॉ नाही घालत्येत त्यात... घ्या की २ वेगवेगळे ग्लास, आख्खं जात नाही तर small घ्या की राव)

आता तिने आपला mobile काढला, ISD परवडत नाही पण आता तिने ठरवलचं होतं... (बास झालं, खुप पाहिलं आता.. मी पण काही "तेरे जुदाई मधे आसु वाहावत" नाहीये!)

ती: excuse me huh!

बोलायला सुरुवात केली मोबाईलवर, खरं तरं love u, miss u वगैरे कधी बोलत नाही ती कोणासमोर पण आज बोलली. संपुर्ण वेळात एकदाही त्याचा उल्लेख केला नाही. मग call cut केला आणि रेवाकडे बघुन हसली... मग पुढची १०-१५ मिनीटं रेवाकडे बघुन "अगं माझा हा ना असा आहे, तसा आहे" types काहीतरी बोलली.

ती: खुप पकवलं का मी? (नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त नाही) मला निघायला हवं आता.. मैत्रिण वाट पाहत असेल माझी! चल मी निघते .. आणि तुम्हाला दोघांना congrats n futureसाठी all the best! :)
.....

ती उठुन चालायला लागली, आधी तिने ठरवलं की मगे वळुन बघायचंच नाही.. पण मग अचानक आठवलं अरे आपण आता ह्यापुढे त्याला आणि तिला कधीच भेटणार नाही. म्हणुन तिने एकदा मागे वळुन पाहिलं दोघांनाही हात केला... त्यांच्यासाठी आत्ता ही सुरुवात होती... त्यांच्या ह्या सुरुवातीने हिच्या डोक्यातली एक ट्रंक कायमची बंद झाली होती...

मुंबईहुन परत येताना बसमध्ये अनेक आठवणी तिने play केल्या. संपलेल्या आठवणी recycle bin मधे टाकल्या!
....

रद्दी टाकायच्या आधी सगळे पेपर पुन्हा एकदा चाळायची माझी सवय नाही जायची कधीच बहुतेक!

Friday, September 12, 2008

सहस्त्रावर्तन

श्री गणेशाय नम:
हरि ओम नमस्ते...

सुरु झालं... मी बाहेरच्या खोलीत बसले होते.
मी agnostic नाही अगदी, पण confused नक्की असते ह्या सगळ्या "देव-देवता-पुजाअर्चा" बाबतीत!

गणपती सण म्हणुन मला भारी आवडतो, दिवाळीपेक्षाही जास्त... पण "आज सहस्त्रावर्तन आहे हं संध्याकाळी" असं काकूनी सांगितल्यापासुन माझा mood गेला होता. म्हणा.. गणपतीत गावाला २च दिवसांसाठी गेले होते, त्यातही एक दिवस सहस्त्रावर्तन खाणार ह्याचा राग जास्त होता. आणि काकू बिचारी "पोरं २ दिवसांसाठीच आल्येत त्यातच सहस्त्रावर्तन करुन घेउ म्हणुन राबत होती". मस्तपैकी वड्या-घारग्यांचा बेत होता...हेच त्यातल्या त्यात बरं होतं!

आत माजघरातल्या देवघरासमोर सगळे बसले होते, आणि मी बाहेर पडवीतल्या झोपाळ्यावर झोके घेत होते. बाबांनी माजघरात लावलेल्या धुपाचा वास पडवीतही छान घमघमत होता... झोपळ्याचा ’किर्रर्र...खट्टक...किर्रर्र..." चा आवाज आतल्या आवर्तनाच्या सुरात होता... पण माझ्या मनात मात्र रामरक्षा सुरु झाली होती.

ह्या कोकणातल्या घरी वर्षातुन १५-२० दिवसच येणं होतं, पण लहान असल्यापासुन पडवीतल्या झोपाळ्यावर संध्याकाळी बाबांबरोबर बसुन परवचा म्हणायची सवयच लागली आहे. पुर्वी अनेकदा लाईट गेलेले असायचे गावात संध्याकाळी तेंव्हा बाबा झोपाळ्यावर येउन बसले रे बसले की मी पण त्याच्यासोबत बसायचे, बसायचे काय? त्यांच्या मांडीवर डोकं ठेवुन पडायचे, मग मला थोपटत थोपटत बाबा रामरक्षा सुरु करायचे. त्यांच्या आवाजात, त्यांच्या शब्दोच्चारात, त्या वातावरणात एक वेगळंच भारलेपण यायचं. रामरक्षा म्हणावी तर ती बाबांनीच आणि पडवीतल्या झोपाळ्यावर बसुनच... कंदीलाच्या प्रकाशात...झोपाळ्याच्या झोक्यांच्या सुरात!

रामरक्षा झाली की बाबा पाढे म्हणायला सुरुवात करायचे..."हं म्हण आता माझ्याबरोबर, एक मी म्हणेन, एक तू म्हण". इतका वेळ रामरक्षा ऐकताना समोरच्या भिंतीवर मोठया भावाचे सावलीचे खेळ बघत हसणारी मी एक्दम झोपेचं सोंग करायचे...पण बाबा उठवायचेच... मग मला नेमके १३,१७ सारखे वाईट पाढे यायचे. तेराचा पाढा म्हणताना मी "तेरा त्रिक एकु..." म्हणुन थांबायचे... तो आकडा ४९,५९,६९ जो काही आहे तो बाबांनी समजुन घ्यावा अशी अपेक्षा असायची... पण कायम ह्या दुष्ट "एक्कु" मुळे मला १३चा पाढा ५ वेळा म्हणायला लागायचा... तरी एकदाका १६चा पाढा झाला की खरी गंमत यायची, माझी लहान बहीण तर ओटीच्या पाय-यावर बसुन टाळ्या वाजवत म्हणायची... "आता ताई रडणार"... सतरा सत्ता काय असतं हे मला आजही आठवत नाही...

आत्ताही बाहेर अंगणातल्या काळोखात बघत मी सतरा सत्ता काय आहे आठवत होते...इतक्यात बाबांची आतुन हाक आली, मला ते आत बसायला बोलावत होते. मी शांतपणे त्यांच्यामागे जाऊन बसले, माझ्या मागेच एका सतरंजीच्या घडीवर आमची मांजर येऊन झोपली होती. मग काय, मला मज्जाच होती... माझे तिच्याबरोबरचे खेळ सुरु झाले. पण मी काय करत्ये हे बाबांना दिसत नसलं तरी स्वयंपाकघरातुन काकुने पाहिलं होतं... तिने मला डोळ्यांनीच दटावलं! त्यामुळे आता वेगळं करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं, गणपती आणि माझ्यामधेच सगळे बसले होते, गणपतीही दिसत नव्हता...

मग मी डोळे मिटुन घेतले, बघणा-याला वाटावं, काय अगदी ध्यान लावलं आहे...
आधी तो आला डोळ्यांसमोर, पण त्याला FF [fast forward] केलं, दुस-या दिवशी निघायचं आहे, त्याची तयारी..FF, काकुनी गौरीची काढलेली पाउलं..FF, काही वर्षांपुर्वी माझं आणि बहिणीचं गौरी आणण्यावरुन झालेलं भांडण...FF, मोटरसायकलवर बाबांच्या पुढे बसायला म्हणुन आम्ही केलेली नाटकं...FF, फक्त मी आणि बाबा कुठेतरी जात होतो, मी खणाच्या कापडाचा cute फ्रॉक घातलेला... मी ह्या scene पाशी थांबले...
मी पहिली-दुसरीतली असेन... दोन बो घातलेले, फ्रॉकला आईने रुमाल पिनने लावुन दिलेला. बाबांचं बोट धरुन मी कोणत्यातरी घरात गेले... आत्ता बसल्येत तसे १०-१२ लोक तिथे बसले होते, सहस्त्रावर्तनच चालु होतं... अलिबागला दर संकष्टीला कोणा ना कोणाकडे होणारं सहस्त्रावर्तन!
मी बाबांना चिकटुन बसलेले, एक आवर्तन झाल्यावर एकदम बाबांनी ’हरि ओम नमस्ते गणपतये...’ ला सुरुवात केली... आपले बाबा सगळ्यांपेक्षा जोरात म्हणताय्त ह्याचा मला कित्ती आनंद झाला होता, आणि अचानक एक गोष्ट लक्षात आली, अरे हे तर लाईनीने सगळे एक-एक काका अथर्वशीर्ष म्हणतायत की... आता बाबांनंतर कोणीच उरलं नव्हतं. म्हणजे बाबांनंतर मी म्हणायचं की काय? आधी मला थोडी भीती वाटली पण मग मी ताठ बसले... बाबांचं "श्री वरदमुर्तये नमो नमः" म्हणुन झालं, आणि मग मी लगेच माझ्या अथर्वशीर्षाला सुरुवात केली. सगळे काका कौतुकाने माझ्याकडे बघत होते. मी चुकेन की काय अशी भीती असल्याने मी पण माझी "चुक होण्याआधी संपवुया" ची सुपरफास्ट ट्रेन सोडली...माझं म्हणुन झालं, सगळ्यांनी एकदम "अरे व्वा.." "शाब्बास" वगैरे दाद दिली. कित्ती छान वाटत होतं... ज्या काकुंच्या घरी आवर्तन होतं त्यांनी बक्षीस म्हणुन मला एक छोटी कापडी पर्स दिली होती... घरी आल्यावर बाबांनी आईला माझं कौतुक सांगितलं होतं...


एकदम डोळे उघडले, बाबांचा आवाज आला... का माहित नाही पण माझे डोळे भरुन आले होते. फलश्रुती सुरु झाली होती. ’ओम सहनाववतु सहनौभुनक्तु’ सुरु झालं, ह्या श्लोकात माझं नाव येतं म्हणुन हा माझा आवडता आहे. आजही हे कुठेही ऐकलं तरी माझ्या चेहे-यावर हसु उमटतं!

काकुनी आतुनच मला खुणेने "आता पानं घ्यायला ये" म्हणुन बोलावलं. मी अनिच्छेनेच उठले... पण माझ्यातली छोटी मुलगी अजुनही बाबांना चिकटुन बसली होती. rather ती तिकडुन कधी उठलीच नाही...
झोपाळ्यावर असतानाही नाही आणि आत्ताही नाही. आणि पुढे कधीही त्या छोट्या मला, मी तिथुन उठवणार नाहीये... मोठी वाईईट्ट मी त्यांच्यापासुन कितीही दुर गेले तरी!