Thursday, August 28, 2008

सावरी

कॉलेजच्या संपुर्ण आवारात मिळुन साधारण ५-६ सावरीची झाडं आहेत. आत्ता सगळ्यांच्या शेंगा फुटायल्या लागल्या आहेत, त्यामुळे सगळीकडे सावरीचा कापूस उडत असतो. सावरीला शेवरी म्हणतात बहुतेक, मला नक्की माहित नाही, तर सगळीकडे हा कापूस हवेवर तरंगत असतो.

आज मी लायब्ररीमधुन परत आमच्या डिपार्टमेन्टमध्ये यायला निघाले, आणि अचानक ह्या झाडांवर नजर गेली. त्या झाडाच्या सावलीतच एक जास्वंदाचं झाड आहे आणि बाजुला चाफ्याचं... अचानक वाटलं, ह्या झाडाला वाटत नसेल का की आपल्यालाही चाफा किंवा जास्वंदासारखी फुलं हवी. आपल्याला कशी फुलं येतात ह्याकडेही कोणाचं लक्ष नसेल... त्याच्या हिरव्या आणि मग फुटक्या वाळलेल्या शेंगा आणि आता त्यातुन बाहेर डोकावणारा कापूस. त्या झाडाला वाईट वाटत असेल ना त्याच्या रुपाबद्दल? झाडाला माणसासारखं नट्टाफट्टा करणं जमत नाही ना... नाहीतर सावरीच्या झाडाने नक्कीच काहीतरी makeup केला असता!

अरे.. असं का? झाडाला वाईट का वाटेल? ते सुंदर नाही असं मला वाटतं पण कदाचित ते झाड त्याच्या कापसात आणि शेंगांमध्ये आनंदी असेल. त्याला नक्कीच वाटत असेल की आपण छान दिसतो, आपल्यासारखा कापुस जास्वंदाला आणि चाफ्याला येत नाही ह्याचा त्याला अभिमान वाटत असावा...

कॉलेजच्या माळ्याने semiotics चा अभ्यास केला होता का? अचानक माझ्या डोक्यात काहीतरी "टिडींग" वाजलं...
समोरुन येणारा मुलींचा तो घोळका... सुंदर ची definition मला माहित नाही... cliche बोलायचं झालं तर "बघणा-याच्या नजरेत सौंदर्य आहे." आणि मानणा-याच्या मनात! ह्या सगळ्या मुली अतिनॉर्मल दिसणा-या होत्या, पण माझ्यासाठी! त्यातल्या प्रत्येकीनेच घरुन निघताना दहावेळा आरसा बघितला असेल, कोणी आपल्याला बघत नाही न हे बघुन स्वत:ला फ्लाईंग किसही दिलं असेल, कानातले बदलुन पाहिले असतील, ओढणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेउन पाहिली असेल, अनेकदा केस नीट केले असतील... आपण सुंदर आहोत आणि हे आपल्याला सांगणारा, आपलं सौंदर्य ओळखणारा कोणीतरी आपल्याला नक्की भेटेल ह्याचा त्यांना विश्वास असेल. मी कोण आहे हे म्हणणारी की ह्या मुली सुंदर नाहीत? सावरीचा कापुस छान दिसत नाही हे मी कोण म्हणणार?

हा विचार करताना मी कॅन्टीनपर्यंत आले होते, जगावेगळी गाणी लावण्यात अण्णा expert आहे. तो अनेक मुलींशी flirt करतो आणि ह्या बावळट मुली लाजतात... आज "लुटेला... जलवा तोरा, नखरा तोरा गोरी हमका लुटेला" लावलं होतं! पण मग लाजु देत ना त्या मुली, लाजताना छान हसतात त्या पोरी, काळ्या-मिळ्या असल्या तरी हसताना कोणीही मुली चांगल्याच दिसतात. कोणी flirt केल्यावर आपल्याला आता लाज वाटत नाही म्हणुन ज्यांना लाज वाटते त्या मुलींना बावळट म्हणणारी मी कोण? सावरीच्या झाडाने पाऊस पडल्यावर मोहरू नये असं मी का म्हणावं?

कॅन्टीनच्यावर कॉमन रुम आहे, सध्या कसल्यातरी फेस्टची तयारी चालू आहे. आवाज चोरुन गायल्यावर त्यांना आपण छान गातोय ह्याचं समाधान वाटत असेल तर काय हरकत आहे? "देस रंगीला रंगीला" वरच्या सगळ्या स्टेप्स त्यांना पाठ आहेत, आणि त्या आणि तत्सम गाण्यांवर त्या आत्मविश्वासाने नाचु शकतात.. चांगलंच आहे ना? काजोल आणि राणी मुखर्जीच्या त्या भक्त आहेत आणि त्यांच्यासारखे पंजाबी ड्रेस घालतात... कारण त्यामुळे त्या स्वत:ला काजोल आणि राणी समजतात... मग वाईट काय आहे? माझी मैत्रीण म्हणते "इन लोगोंको फॅशन समझताही नही है।"
ओह प्लीजच...कदाचित त्यांना तुझी फॅशन कळत नसेल, त्यांच्यासाठी तुळशीबागेत displayला असलेले कपडे "in vogue" असतात. सावरीचं झाड स्वत:पाशी कापसाचा सडा पाडतं, शेंगा सजवतं... चाफ्याची सर कदाचित ह्याला येणार नाही आणि चाफाही कधी सावरीला समजु शकणार नाही!

होम सायन्सच्या मुली आहेत ह्या... इतरांनी कायम हिणवलेल्या, "पुढे जाउन काय मोठे दिवे लावणारेत? घरंच तर सांभाळणार ना किंवा काहीतरी छोटी-मोठी कामं, काय मिळवणारेत भविष्यात? लग्नं करुन आया होतील आणि मग संपलं त्याचं अस्तित्व..." त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं कोणाला दिसल्येत पण? आकाशात उडायची स्वप्नं... उंच उंच जायची स्वप्नं... स्वत: सुंदर होऊन, जग सुंदर करायची स्वप्नं... सावरीच्या कापसाने वा-याबरोबर घेतलेली आकाशझेप कोणी पहिल्ये का?

मी आता माझ्या डिपार्टमेन्ट पर्यन्त आले होते. आमच्या डिपार्टमेन्टजवळ सावरीचं झाड नाहीये, पण तिथपर्यंत सावरी उडुन आली होती. तेवढ्यात सुष्मा बाहेर आली, अमरावतीची सुष्मा... माझी सिनीअर, तिला एका मोठ्या NGOमधे जॉब लागला त्याचे पेढे द्यायला! पेढा खात खात माझी मैत्रीण म्हणाली "यार, कही और नही मिला क्या जॉब? किसी प्रोडक्शन कंपनीमे try किया होता..." सावरी उडावी अश्या नाजुकतेने सुष्मा हसली...गेल्या वर्षभरात तिच्या गालावरची खळी मला दिसलीच नव्हती! ती सुंदर आहे. गेल्यावर्षी welcome partyमधे ती ’ताल से ताल’ मिला वर नाचली होती, तो नाच फालतु नव्हता!

NGO बद्दल सुष्मा सांगत असताना माझी मैत्रिण cellवर gossip करण्यात busy होती. जास्वंदी, चाफा, गुलाब आणि बाकी सगळी फुलं सुंदर आहेत. कायमच सगळ्यांना आवडतात! पण आकाशाची स्वप्नं प्रत्यक्षात जगते ती सावरी... उंच भरारी घेते ती सावरीच!

खुप वेळ मनात चाललेली ही सगळी विचार चक्र एकदम थांबली... आता मन शांत झालं होतं, कधी नव्हे ते आमच्या कॉलेजात आज इतक्या सुंदर मुली दिसत होत्या... हातावरची सावरी मी हळुच फुंकरली, आता ती तिची वाट शोधत होती... वा-याबरोबर उंचच उंच जायच्या बेतात होती!

Thursday, August 21, 2008

इयत्ता पहिली, पहिल्यांदाच लांब कुठेतरी आई-बाबांशिवाय जाणार होते. आमच्या शाळेची ट्रीप होती शहाड-टिटवाळ्याला, जरी सकाळी जाउन संध्याकाळी परत यायचं होतं तरी खुप वेगळं वाटत होतं. आजही आई-बाबा बसपाशी सोडायला आलेले आठवताय्त. पहाटे पाच वाजता, अंधुकश्या प्रकाशात आई-बाबांचे चेहरे...त्यांच्या चेहेर-यावरचं कौतुक आणि काळजी... नाही, शब्दात नाहीच बसवता येणार तो प्रसंग... आपण जिथे जाणार आहोत तिथे खुप मज्जा येणारे, काहीतरी नवीन असणारे ह्याचा आनंद आणि त्याच वेळेला आई-बाबांपासुन लांब जाणार म्हणुन डोळे भरुन आलेले, गळा जड झालेला...

त्यानंतर हा प्रसंग खुपदा आला, संदर्भ बदलत गेले. मोठी झाल्यावर अनेकदा मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळल्यावर आई-बाबांकडे बघायला सवडही नाही मिळाली. परवा अलिबागहुन परत आले तेव्हा आई-बाबा सोडायला आले होते स्टॅंडवर, खूप दिवसांनी आज गळा दाटुन आला, रडायचं नव्हतं म्हणुन बस लवकर सुटायची प्रार्थना करत होते. अचानक लक्ष गेलं, असं होणारी मी एकटी नव्हते. अलिबागहुन पुण्याला शिकायला आलेली भरपुर मुलं आहेत आणि परवा आख्खी बस अश्या students नीच भरलेली होती. बाहेर अनेक आई-बाबा उभे होते, काळजी आणि कौतुक डोळ्यांत... अनेक सुचना!

१२वी, CET, results, प्रवेश प्रक्रिया आणि अशी अनेक दिव्यं पार केल्यावर, तावुन-सुलाखुन झाल्यावर एक नवं पर्व सुरु होतं. अनेकांना आपलं घर, आपलं गावं सोडावं लागतं... आमच्या अलिबागेत तर जवळ जवळ सगळेच शिकायला बाहेर पडतात. जुन महिना उजाडला की अनेक नवीन प्रश्न उभे असतात. कुठे ऍडमिशन मिळेल? नवीन कॉलेज कसं असेल? नवीन शहर कसं असेल? तिथली मुलं आपल्याशी चांगलं वागतील ना? आपण अलिबागहुन आलो आहोत हे सांगितल्यावर आपल्याला हसतील का? इथल्या सारखे तिथेही नवीन मित्र-मैत्रिणी मिळतील ना? घरची, अलिबागची जास्त आठवण तर येणार नाही ना? आपण एकटं राहु शकू ना? अनेक अनेक प्रश्न सारखे डोक्यात येत असतात... आणि मग एक दिवस शिकायला घराबाहेर पडायची वेळ येतेच! नव्या जगात जातोय याचा आनंद आणि आपल्या जगातून बाहेर येतोय याचं थोडं दुखः... बसपाशी सोडायला आलेले आई-बाबा... अगदी तसेच दिसत असतात जसे ते टिटवाळ्याच्या ट्रीप साठी सोडायला आलेले तेव्हा दिसत होते.

आईच्या डोळ्यांत पाणी येतं असतं आणि ती ते लपवायच्या प्रयत्नात असते. आपलं बोटं धरुन चालणारं आपलं बाळ इतकं मोठं कधी झालं हे तिला समजलंच नसतं. आपल्या बाळाबद्दलचा विश्वास तिला असतो पण शेवटी काळजी डिपार्टमेंटही तिलाच सांभाळायचं असतं ना. मग २७व्यांदा ती लोणचं कुठे ठेवलं आहे, चिवडा लवकर संपव, वड्या काळ्या बॅगेत आहेत. चादरी, स्वेटर्स, कपडे सगळयाविषयीच्या काहीतरी सुचना असतात. बाबांनी पैसे दिलेले असले, ATM card दिलेलं असलं तरी आईनेही वरखर्चाला हळुच दिलेले पैसे असतात, अजुन हव्येत का म्हणुन विचारत असते! बाबांना तोवर त्यांच्या ओळखीचं कोणितरी भेटलेलं असतं ते जास्त emotional न होता दुस-या काकांशी गप्पा मारण्यात बिझी होतात!

हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे,ते दुर दुर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यांतील आडवुन पाणी,हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता...अन तुम्हास नियती हसते


संदीप खरेच्या या ओळी आत्तापर्यंत जितक्यांदा ऐकल्यात हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर आलयं आणि समोरचं सगळं धुसर होत गेलयं!

इतके दिवस हे निरोप घेणं सोप्पं होतं हे आता वाटायला लागलं आहे, जेव्हा मी पुढच्यावर्षीचा विचार करत्ये!
बसच्या खिडकीमधुन आईशी बोलता यायचं, बाबा दिसायचे... नजरे आड होईपर्यंत टाटा करता यायचा... आता ते विमानाच्या खिडकीतुन कसं जमणार?
शाळेची सहल रात्री परत यायची... एका दिवसभराच्या गमती जमती पुढे आठवडाभर सांगायचे!
मुंबईला शिकायला आल्यावर दर शनिवार-रविवार घरी जायचे तेव्हा आठवड्याभरच्या गोष्टी २ दिवसात सांगुन संपवायला लागायच्या!
पण आता पुढे...?


(संवादिनीने आजच थोड्याफार अश्याच आशयाचं लिहीलं आहे. माझंही हे पोस्ट अनेक दिवस अर्ध ड्राफ्ट्मधे पडुन होतं, आज तिचा ब्लॉग वाचल्यावर पब्लि्श केलं)

Friday, August 8, 2008

बंडु, पिंगी आणि आई!

"पांढरा... तिचा आवडता रंग! आणि म्हणुनच तिची आख्खी खोली पांढरीशुभ्र फक्त फ्लॉवरपॉटमधलं ते पिवळं सूर्यफुलचं काय ते वेगळ्या रंगाचं. छोटुश्या पिंगीच्या हातात असतं तर तिने सूर्यफुलही पांढरं रंगवलं असतं. खाली अंथरलेल्या फरच्या पांढ-याशुभ्र गालिच्यावर बसुन पिंगी पुस्तक वाचत होती. तिच्या शेजारी तिचा बंडु बसला होता, बंडु म्हणजे किनई तिचा "white stuffed toy" आहे. पण शूsss त्याला असं म्हंटलेलं तिला आवडत नाही बरं का... तिच्या साठी तो तिचा मित्र आहे, बंडु ससुला!

पिंगी पुस्तकातलं एक एक चित्र बंड्याला दाखवत होती. काय लिहीलं आहे ते वाचता कोणाला येत होतं? म्हणजे खरं तरं बंड्याला वाचता यायचं पण तो काही बोलायचा नाही, शांतच असायचा! पिंगी आणि बंडु आज हे पुस्तक ९८व्यांदा बघत होते. Childcraft part 2! सगळी काय ती झाडं-झाडं आणि झाडं... तीच तीच चित्रं बघुन बंड्याला आता झोप यायला लागली होती. त्याने एकदा जांभई देण्याचा प्रयत्नही केला पण त्याला माहित्ये, अभ्यास करत असताना जांभई द्यायची नसते. नाहीतर पिंगीची आई जसं पिंगीला मारते तसं पिंगी त्याला मारेल. म्हणुन तो ती चित्रं परत पाहायला लागला. त्यातल्या एका चित्रात same 2 same बंड्याच्या जुन्या घरासारखी एक जागा होती, एक भलं मोठ्ठं झाड आणि त्याच्या मुळाशी एक छोटुकलं बीळ! बंड्याला घरची आठवण यायला लागली... त्याला घरी जायचं होतं, त्याला रडु येत होतं पण शहाणी मुलं रडत नाहीत म्हणुन तो नाही रडला.... त्याने पिंगीकडे पाहिलं. पिंगी पुस्तक तसचं उघडं ठेवुन कधीच झोपी गेली होती.. वेड्डी मुलगी, पुस्तक कधी असं उघडं ठेवतात का?

पिंगीचे डोळे अचानक काहीतरी आवाज झाला आणि उघडले. "अरे माझ्या खोलीची वरची भिंत निळी कशी झाली? आणि हे कानात काय टोचतयं?" ती लगेच उठुन बसली. आणि बघते तर काय? ती तिच्या पांढ-याशुभ्र खोलीत नव्हतीच मुळी, ती होती गवतात पडलेली, तिचा पांढराशुभ्र फ्रिल फ्रिलचा फ्रॉक मळला ना त्या गवतामुळे! आणि हे काय ससुला कुठे, दिसतच नाहीये की! ओह, ते भलं मोठ्ठं झाडं...अगदी पुस्तकात आहे तसं... हं, बंड्या नक्की त्या बिळात गेला असणार...त्याचं घर आहे ना ते..तसं म्हणाला होता तो पिंगीला एकदा... पिंगी दबकत दबकत बंड्याच्या घरापाशी गेली, पिंगीला गंमतच वाटली... बंड्याच्या घराला किनई दारचं नव्हतं... तिने बाहेरुनच हाक मारली "बंड्या ए बंड्या... ये ना रे बाहेर.. तू आत काय करतोयस रे?" बंडु त्याचे लांब कान सांभाळत बाहेर आला आणि पिंगीला म्हणाला "पिंगू चल ना माझ्या घरी... मी इतके दिवस तुझ्या घरी राहिलो ना.. आता तूही काही दिवस माझ्याकडे राहा... मला दोन भाऊ पण झाल्येत छोटे छोटे. आपण सगळे मज्जा करु" पिंगी मग खाली वाकली आणि बंड्याच्या घरात गेली.

तिला खुपचं गंमत वाटत होती. सगळं कसं छोटं छोटं होतं बंड्याच्या घरात! घरातल्या छोट्या टी.व्ही.वर ससा-कासवाची शर्यत चालली होती, आणि ससा ह्यावेळी जिंकला होता. बंड्या म्हणाला "पिंगी जो जिंकला ना तो माझा ससे काका आहे. हो किनई रे बाबा?" बंड्याने त्याच्या टी.व्ही बघत असणा-या बाबांच्या मांडीवर चढून विचारलं. "पिंगी माहित्ये का? माझा बाबा ना मला ह्या रविवारी पोहायला शिकवणारे". पिंगीला एकदम तिच्या बाबाची आठवण झाली, तिला रडुचं येणार होतं पण तितक्यात बंड्याची आई आली "चला जेवण तयार आहे". पिंगीलाही खुप भुक लागली होती म्हणुन ती पळत पळत येउन बसली आणि बघते तर काय गवताची पोळी आणि गाजराची कोशिंबीर? पिंगीने गवताची पोळी कधीच खाल्ली नव्हती आणि गाजराची कोशिंबीर तिला मुळ्ळी म्हणजे मुळ्ळीच आवडायची नाही. मग मला भुक नाहीये, मला नको म्हणुन ती नुस्ती बसुन राहिली. आणि तेवढ्यात बंड्याच्या आईने गाजराचा हलवा आणला. पिंगीला तो हवा होता पण मगाशी भुक नाही असं सांगितल्यामुळे कोणी तिला विचारलंच नाही. बिच्चारी पिंगी!

रात्री झोपायची वेळ झाली. आज सोमवार होता, सा रे ग म प बघायचं म्हणुन ती टी.व्ही समोर येउन बसली पण ते सगळे सश्यांचं स रे ग म प बघत होते. पिंगीला परत रडु यायला लागलं, तिच्या आजुबाजुला सगळे ससेच होते. आई-बाबाची आठवण यायला लागली आता. रात्री झोपताना तिला वाटलं बंड्या तिच्या जवळ झोपेल, पण तो झोपला त्याच्या आई-बाबांबरोबर आणि पिंगीला एकटीला बाहेरच्या खोलीत ठेवुन दिलं. ती खुप खुप रडली. तिला अंधाराची खुप खुप भीती वाटत होती. आई-बाबांची पण खुप आठवण येत होती. पण आता काय करणार? तिला झोप येत नव्हती, मग अचानक विचार करताना तिच्या लक्षात आलं, अरेच्या, आपण असं एक दिवस राहिलो तर आपल्याला इतका त्रास होतोय... बंड्या तर रोज असं राहतो. आपण त्याला काहीही खायला देत नाही. आपण आई बरोबर झोपतो तेव्हा तो कपाटात एकटाच झोपतो. त्याला कुठे सश्यांचा टी.व्ही पाहायला मिळतो? आपण खुपचं हाल करतो ना बंड्याचे! तिला परत रडु यायला लागलं आणि रडता रडताच तिला झोप लागली.

सकाळी जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा ती चक्क तिच्या खोलीत होती.पण बंड्या कुठेच दिसत नव्हता! हं बहुतेक तो त्याच्याच घरी राहिला वाटतं! पण आपली पिंगी शहाणी झाली होती, बंड्या नाही म्हणुन ती मुळ्ळीच रडली नाही. कारण तिला माहित होतं बंड्या त्याच्या घरी, त्याच्या आई-बाबांबरोबर आनंदात असणारे. तर ही होती गोष्ट शहाण्या पिंगु आणि बंड्याची!"

आईने गोष्ट सांगुन संपवली. पिंगुला अजुन हिंदी कळतं नव्हतं म्हणुन तिच्या आईने बाबाला डोळा मारत म्हंट्लं "एक पुराना toy फेकने के लिये you have to make sucha long story! next time its ur turn re baabaa! उसका वो प्लॅस्टिक elephant stinks now!"

पिंगु आणि बंड्या एकमेकांची आठवण काढत झोपी गेले!

Friday, August 1, 2008

आणि प्रथम क्रमांक....

हातांची घट्ट मुठ! नाव ऐकायला प्राण कानात गोळा झालेले...
ओठांमध्ये एक हल्की थरथर, पोटात आणि छातीत काहीतरी विचित्र हालचाल...
डोळे त्या बक्षिस जाहीर करणा-या बाईकडे...
बक्षिस घ्यायला कुठून जायचं तेही ठरवलेलं...
देवा हे बक्षिस मलाच मिळायला हवं, बाजुची मुलगी माझ्याकडे बघते..मी तिच्याकडे बघुन एक स्माईल देते! मला काहीही tension नाहीये हे दाखवायचा एक असफल प्रयत्न... आणि माझं नाव ऐकु येतं...
yes! i knew this!! मलाच मिळणार होतं हे बक्षिस!
इतका वेळ रोखुन धरलेला श्वास आता मोकळा होतो, मी आता चेह-यावरचा जास्तीचा आनंद लपवत पुढे जाते, एकदम आत्मविश्वासाने! सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे, मी हसुन सगळ्यांकडे बघत्ये... चला अजुन एक स्पर्धा माझी झाली!!

हा अनुभव कितीदा घेतलाय... आणि आता खुप मिस करत्ये!... वक्तृत्व स्पर्धा
पहिल्यांदा कधी भाग घेतल होता आठवत नाही... कदाचित पहिलीत असताना..हो, पहिलीत होते तेव्हा!
कथाकथन स्पर्धा होती... मी शि्रीषकुमारची गोष्ट सांगितली होती.लहान गटात माझा पहिला नंबर आला, मी खुश, आता ती मोठ्ठी ट्रॉफी मिळणार, शाळेत फळ्यावर नाव लिहीणार म्हणुन! पण माझं नाव जाहीर केल्यावर वेगळंच काहीतरी घडलं, आख्ख्या भरलेल्या मोठ्ठ्य़ा हॉलसमोर मला ती गोष्ट परत सांगायची होती. सगळ्या गटातल्या पहिल्या क्रमांकांची सर्वोत्तम पुरस्कारासाठी स्पर्धा... आई-बाबा तर घाबरलेच होते, मी पहिल्यांदाच माईकवर बोलणार होते... आता खास काही आठवत नाही, पण तो टाळ्यांचा कडकडाट आठवतोय....
त्या आवाजासाठी तेव्हापासुनच वेडी झाले, मला तो आवाज सारखा सारखा ऐकायचा होता... माझ्यासाठी वाजणा-या टाळ्या मला हव्या होत्या, लोकांच्या कौतुकाच्या नजरा...आई-बाबांच्या चेह-यावरचं समाधान...आह्ह... त्यानंतरच्या सगळ्या स्पर्धा मला जिंकायच्या होत्या, हे क्षण वारंवार जगायचे होते! (म्हणा तेव्हा हे कळत नव्हतं, पण तेव्हा जे वाटत होतं ते असचं होतं, आज त्याला शब्दरुप मिळतयं इतकचं!)

नंतर कित्ती स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, किती भाषणं केली... सुरुवातीला २ वर्ष सुदैवाने असेल किंवा नाही पण मी ज्यात भाग घेतला त्यात जिंकले. मग ४थीत मात्र जे व्हायलाच हवं होतं ते झालं.... आमचा फुगा फुटला... उत्तेजनार्थ बक्षिसही मिळु नये म्हणजे काय? त्यादिवशी रात्रभर रडले होते...आता ह्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा नाही हे ठरवुन टाकलं होतं.
पुढच्याच महिन्यात शाळेत एका स्पर्धेची नोटिस आली, मला न विचारता माझं नाव शाळेने देउन टाकलं, कारण शाळेला बक्षिसं मिळवुन द्यायला मी हक्काची मेंबर होते! मग परत एकदा सगळं सुरु झालं...

’मला भावलेला ईश्वर’ असो किंवा ’मराठीला पर्याय IT'...’माझे आदर्श व्यक्तिमत्’ असो किंवा ’नको असलेले पाहुणे’
कित्ती वेग-वेगळे विषय, वेगवेगळे स्पर्धक, कधी ३ मिनीटं, कधी ५, कधी ७... वेळ संपायच्या आधी अर्धा मिनीट वाजणारी ती बेल! भाषणाच्या आधीची तयारी, उत्सुकता, निराशा, आनंद, समाधान, भीती, आत्मविश्वास, कोणाचं खोटं खोटं हसणं, कोणाचं रडणं, परीक्षकांनी केलेलं कौतुक, कधी एकदा घरी जाउन आईला सांगत्येची घाई.... सगळं सगळं वातावरण काय सही असायचं!

आधीचा स्पर्धक बोलत असताना, माझ्या भाषणाच्या मुद्द्यांकडे टाकलेली एक नजर... देवाकडे भाषण चांगलं होऊ दे, म्हणुन केलेली प्रार्थना...त्याचं भाषण संपल्यावर माझं नाव...खोटं का बोलु, पाय पहिली काही सेकंद थरथरायचे,मग हात मी घट्ट पकडायचे, सगळीकडे एक नजर फिरवायचे...बेल वाजली की बोलायला सुरुवात... सगळी लोकं माझ्याकडे बघताय्त आणि फक्त मी बोलत्ये , सगळे माझंच ऐकताय्त चा आनंद अपार असायचा....

काही बाबतीत मी स्वतःला खुप आवडते... म्हणजे मी माझ्या प्रेमातच आहे आणि त्यातली ही एक गोष्ट! आपल्याला बोलता येतं ही खुप सही गोष्ट आहे!

आज हे लिहायला कारण म्हणजे आज १ तारीख.. (लिहायला सुरु केलं तेव्हा १ तारीख होती :P) टिळक पुण्यतिथी, दरवर्षी शाळेत स्पर्धा असायची...आता काहीही नस्तं :(, आता स्पर्धा नाहीत, आता ती मजा नाही! दर आठवड्याला प्रेझेन्टेशन्स होतचं असतात...पण त्यात तो उत्साह नाही!

मला मोठं व्हायचंच नव्हतं!
मी छान भाषण देते म्हणुन मी चांगली पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकते ह्याच विश्वासात जगायचं होतं मला!
एक स्पर्धा जिंकल्यावर आख्खं जग जिंकल्याच्या आनंदातचं राहायचं होतं मला!!
पुन्हा एकदा आणि प्रथम क्रमांक.... च्या पुढे मला माझं नाव ऐकायचं आहे, थोडा वेळ का होईना जग्गजेता बनायचं आहे!
ते माझं, छोटंस जग असलं म्हणुन काय झालं?!