|
अगं पकड... पळ पळ.. हट, खो दे.. इथे खो दे..."
"डावीकडे जा.. धर तिला... मुर्खा हात पसरता येत नाहीत का?... खो दे पटकन"
"लगेच वळायचं नाही... आधी सरळ रेषेत पळायचं मग भिडु कोणत्या दिशेला जातोय बघायचं मग आपली दिशा ठरावायची"
पीटी सर सांगत होते, आम्ही बघत होतो... खो-खो... सोप्पा नाहीये राव!! माझ्यापेक्षा सगळे मोठे, माझ्यापेक्षा जास्त अनुभवी, काही मुली इंटरनॅशनल लेवलवर खेळतील इतक्या भारी.... मग आम्ही ५-६वीतल्या चिल्ल्या-पिल्ल्या तिथे काय करत होतो? त्या सगळ्या तायांमधें आम्ही लिंबु-टिंबु... आम्हाला त्यांच्यासारखं पळता कुठं येणारे? त्याच्या ट्रिक्स कुठे माहित्येत?
सर म्हणाले.. "भिडु नाही पकडला गेला तरी चालेल.. पण खेळा, धडपडा, पळा...त्यातुनचं शिकाल!"
मेघना, संवेद, ट्युलिप, राज, निमिष, केतन, विद्या.... पटापट भिडु पकडणारी लोकं, त्यांचा खेळ बघत बसावा इतका सुंदर... खो द्यायची पद्धत अप्रतिम! आपल्याला ह्याची ट्रिक कळली बुवा म्हणुन आपण त्यांना पकडायला जाउ.. पण हि लोक कधीच नाही सापडायची!! मग मी लिंबु-टिंबु काय करत्ये इथे?मी इथे का आहे...का लिहित्ये?
नाही लिहायला जमलं, नाही सापडली उत्तरं-नाही पकडता येत हो नेहेमी भिडु...
पण लिहित्ये.. लिहायचा प्रयत्न करत्ये... चुकत्ये...आणि त्यातुनचं शिकत्ये!!!
yeah i guess इतक्या सिंपली मी हे म्हणु शकत्ये... मी इथे हा खेळ, ही कला म्हणा शिकायला आहे... अनेक फालतु.. अनेक फिलॊसोफिकल, अनेक emotional प्रश्नांची उत्तरं सापडवत्ये... लिहिल्यामुळे जराशी organize होतायंत उत्तरं इतकचं!! so म्हणुन लिहित्ये...
..........................................................................................
काही दिवसांपुर्वी लहान मुलं आणि लिहिणं ह्याबाबतीत काहीतरी वाचत होते. एका बाईनी तिचा एक अनुभव लिहिला होता... ती तिच्या कामात होती, अचानक तिची मुलगी तिथे आली , घराबाहेर एक लहान चिमणी पडल्ये आणि तिला मुंग्या त्रास देताय्त हे आईला सांगायला लागली... आईला मुळ्ळीच वेळ नव्हता.. आईनी तरी एकदा बाहेर येउन चिमणी पाहिली.. मुलीला सांगितलं... "बाळ, ती चिमणी आता देवाघरी गेल्ये... तु आत येउन खेळ" आई परत आपल्या कामात बुडाली... मुलीने तिच्या एका मैत्रिणीला बोलावुन आणलं आणि दोघींची काहीतरी खुडबुड सुरु झाली.. घरातुन बाहेर.. बाहेरुन आत सतत काहीतरी चालू होतं... आईनी खिडकीतुन बाहेर ह्या मुलींकडे पाहिल्यावर त्या झाडाखाली काहीतरी करताना दिसल्या, आई तिथे गेली... तिथे एक खड्डा खणुन तो परत बुजवल्याच्या खुणा होत्या, त्याच्या आजुबाजुला पांढरे दगड ठेवले होते... काड्यांचा एक क्रॉस त्या खड्यावर लावला होता आणि त्यावर एक कागद लावला होता ज्यावर लिहिलं होतं "we had to let everyone know, how we felt"
एक छोटासा पक्षी.. कधीतरी जिवन्त असणारा, आता या जगात नाही... कदाचित आपल्या मोठ्यांसाठी इतकी महत्वाची गोष्ट नसेल ही.. पण त्या पिल्लांसाठी नक्कीच होती... आणि त्यांनी ती लिहुन व्यक्त केली... लिहायचं मन मोकळं करण्यासाठी... स्वतःला express करण्यासाठी!!
.......................................
काल रात्री ह्याबाबतीत भरपुर विचार करत होते... नेहेमी सारखी उत्तरं तर सापडत नव्हतीच... अचानक आयपॉड वर युफोरियाचं हे गाणं सुरु झालं.... यार हेच तर उत्तर आहे!! का लिहित्ये ह्याचं... हे सगळे प्रश्न मलाही तर रोज पडताय्त! blogging is just an attempt of ascertaining My Mantra....
माझा ’खो’ संवादिनीला