Sunday, January 30, 2011

पत्रिका

काही मुलं शाळेत असताना कायच्या काय हुशार असतात.. एकदा का शाळेतुन बाहेर पडली की पुढे कुठे हरवुन जातात कळत नाहीत.. ब-याचश्या high school starsचं असंच काहीसं होतं.. पण केतकी अशी नव्हती.. मेरिट होल्डर, ह्या-त्या अश्या ४-५ स्कॉलरशिप्स, भारीतल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधे अ‍ॅडमिशन.. तिच्यावेळेपर्यंत मुलींनी इंजिनीअरींगला जायचा ट्रेण्ड नव्ह्ता इतका... मोजुन३-४ मुली असतील फक्त तिच्याबरोबर.. पण तिथेही चमकली होती ती.. मुलं एकतर लेक्चरर्ससोबत पॉप्युलर असतात नाहीतर वर्गातल्या इतर मुलांबरोबर.. दोन्हीकडे स्थान टिकवणं जरा कठीण असतं.. पण तिला तेही जमायचं..

बरं.. गायची पण छान.. बोलायला तर इतकी मधाळ.. कॅम्पस इंटरव्ह्युमधे २ ठिकाणी सिलेक्शन झाल्यावर तिने ठरवलं.. मास्टर्स करायला हवं.. म्हणुन अजुन भारीतल्या कॉलेजमधुन ती पुढे शिकायला गेली.. तिथेही सेमिनार्स आणि पेपर्समधे चमकली... १-२ महिन्यांतुन एकदा कुठल्याश्या NGOसोबत काम करायची... सुंदर लिहायची, गाढा व्यासंग वगैरे... लईच अशक्य मुलगी, केतकी म्हणजे! आदर्श अगदी सगळ्याच बाबतीत... छान जॉब मिळाला, तिथेही उत्तम परफॉर्मन्स देत होती.. मग घरच्यांनी लग्नाबद्दल विचारलं... तिने लाजुन हो म्हंटलं..

आई-बाबा आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना सांगायला लागले.. "कोणी असेल तर सांगा हं.. केतकीसाठी बघतोय आता"... केतकीची एक आवडती काकू होती.. ती आली एक दिवस एका उमद्या मुलाचं स्थळ घेउन.. "अमेरिकेत असतो, अगदी गुणाचा आहे अगं.. आई-वडील डॉक्टर आहेत..पुण्यात प्रभात रोडवर घर..." केतकीच्या आदर्शपणाला स्पर्धा असणारं आदर्श स्थळ आलं होतं.. "अगं केट्या.. पत्रिका आहे ना तुझी? मुलाकडच्यांना पत्रिका बघायच्ये.. पत्रिका जुळली तरंच पुढे जातील म्हणालेत".. केतकीने आई-बाबांकडे पाहिलं.. आई-बाबांनी काकुकडे... "वाटलंच होतं... काही नाही.. उद्या येत्येस माझ्याबरोबर तू.. माझ्या ओळखीचे आहेत एक गुरुजी.. दाखवुनपण घेउ आपण"

गुरुजींकडे जाताना केतकीने अचानक गाडी थांबवली.. "काकू.. गरज आहे का गं खरंच ह्याची? माझा नाहीये विश्वास अश्या कश्यावर.. शेकडो मैलांवरचे ग्रह-तारे का ठरवणारेत माझ्या आयुष्यात काय होणार ते? मी जन्माला आले तेव्हाच्या ग्रह-ता-यांच्या स्थितीचा आणि माझ्या आत्ताच्या आयुष्याचा काय संबंध? पत्रिका बघायची तर बघा म्हणावं.. आपण दुसरा मुलगा बघु.."
 काकुने तिच्याकडे रागाने पाहिलं.. "तुझा विश्वास नाही नं? नको ठेवु मग.. पण पत्रिका बनवल्याने, पाहिल्याने काही नुकसान होणारे का? जुळत असेल तर इतकं चांगलं स्थळ नाही का मिळणारे केट्या? आणि नसुदे विश्वास.. पण इतकी वर्ष चालत आलेलं शास्त्र म्हणजे काहीतरी तथ्य असणारच ना... माझ्या अल्पमतीला इतकंच कळतं की चंद्रामुळे येणारी भरती-ओहोटी इतक्या प्रचंड महासागरांना चुकत नाही.. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणापलीकडे महाकाय पृथ्वीही जाऊ शकत नाही.. तर आपल्यासारख्या चिलटांची काय दशा?"
केतकीने गाडी सुरु करत पुन्हा काकुकडे पाहिलं.. " महान आहेस तू काकू... तुझ्याशी वाद घालण्यापेक्षा पत्रिका करुन घेउ आपण"

पत्रिका करुन झाल्यावर दोघी बसल्या गुरुजींसमोर.. "चांगली आहे...." गुरुजी सांगायला लागले.. बाकी गोष्टींमधे, कोणत्या स्थानात कोण आहे आणि कोणाचं बळ किती आहे त्यात केतकीला काही रस नव्हता..."करिअरबद्दल काय आहे?" तिने त्यांना जवळ्जवळ अडवतच विचारलं.. कितीही विश्वास नाही- विश्वास नाही म्हंटलं तरी भविष्यात डोकावुन पाहायची उत्सुकता असणारच ना शेवटी...ते खरं असो वा नसो! गुरुजी पत्रिकेत बघत म्हणाले "ठीक आहे".. केतकी जरा ओरडलीच "ठीक?.. फक्त ठीक? ".. गुरुजींनी तिला मग परत पत्रिका समजावयला घेतली...

गाडीत येउन बसल्यावर ती तणतणायला लागली.. "काकू.. असं काय हे? तू बघत्येस.. मी इतकं काम करते.. इतकं छान चालुये सगळं.. आणि म्हणे ठीक फक्त? काही विशेष नसणार?? शक्य आहे का? मी असं कोणासमोर नव्हते बोलले पण काकू खुप मोठं व्हायचं आहे गं मला.. खुप ब्राईट करिअर असेल असं वाटत होतं मला पत्रिकेत.. चाळीशीपर्यंत कारकुनासारखं रडतखडत विकेण्डची वाट बघत पाट्या टाकायच्या आणि मग व्हीआरेस घ्यायची असं करिअर नकोय मला.. नाहीये माझा विश्वास यावर.. मी घडवणारे भारी करिअर"
.. काकू फक्त म्हणाली "नाहीये ना विश्वास.. नको करुन घेउन मग त्रास.. अगं पत्रिका जुळत्ये ना त्या मुलाशी.. चांगली बाजु बघ ना"


दुस-यादिवशी ऑफिसमधे गेल्यावर पुर्णवेळ त्याच विचारात होती.. "नाहीये माझा विश्वास.. नाही होणारे असं काही" म्हणत स्वतःला समजावत काम करत राहिली.. पण तरीही लक्ष लागत नव्हतं कामात तिचं..दोन दिवसात बातमी आली एका प्रोजेक्टसाठी तिच्याबरोबरच्या मुलाला अमेरिकेत पाठवताय्त.. ती तडक कारण विचारायला गेली.. "मी का नाही? तो का?".. " अगं, मुलगी आहेस तू.. एकटी का जाणारेस? आणि वरुन मला कळलं लग्नाचं बघताय्त तुझं.. मग तुझ्यात इतकी इन्व्हेस्टमेंट करणं वर्थ आहे का कंपनीने.. तू लग्न करुन गेलीस तर?" इतकं डायरेक्ट उत्तर ऐकल्यावर तिच्याकडे बोलायला काहीच उरलं नाही... "खरंच नाहीये का माझ्या करिअरमधे काहीच?" हा प्रश्न डोकं खात बसला तिच..

आदर्श मुलाशी लग्न ठरलं तिचं.. आता लग्न करुन अमेरिकेत जायचं.. जॉब सोडला इथला.. लग्न करुन तिथे गेली... "आपल्या घराण्यात कोणा बाईला नोकरी करायची गरज नाहीये.. शिकायचं तर शिक ना पुढे... आमचा विरोध नाही नोकरीला, पण अगदी घरादाराला वा-यावर सोडुन नोकरी नाही केली तरी चालणारे एवढंच...वेळ घालवायला कर काहीतरी हवंतर" असं सासुबाई म्हणाल्यावर तर तिला धक्काच बसला होता...पण तरीही तिने हार मानली नव्हती.. इथे-तिथे प्रयत्न करत होती.. पण काही ना काही कारणाने मधेच परत मागे फिरायची वेळ यायची... सासुबाईंची बोलणी, नव-याची बदली, २ बाळंतपणं आणि सतत काम करताना ऐकु येणारी आकाशवाणी "काही विशेष नाही.. ठीकच करिअर आहे".. मनापासुन काहीतरी करायला जावं आणि शेवटच्या क्षणी सगळं आठवावं.. "मी इतका वेळ देत्ये कामाला.. सगळ्यांचा विरोध पत्करुन हे करत्ये.. पण रिझल्ट्स येणारेत का चांगले.. आणि आले तरी मला रिटर्नस मिळणारेत का?" सततचा डोक्याला त्रास.. शेवटी एकदा नव-याने विचारलं.. " Do we really need all these pains? just leave it.."

चाळीशीपर्यंत पाट्या टाकायचं कामही नाही केलं मग तिने.."मुलींसाठी सोडलं करिअर" असं पुढे अनेक वर्ष सांगायची मग ती... मधे भारतात आली होती तेव्हा काकुकडे गेली होती.. "काकू...माझ्या पोरीसाठी बघायच्येत आता मुलं.."  काकू हसत म्हणाली "पत्रिका नसेलच केलेली ना? मॉ-ड-र-न लोक तुम्ही.. म्हणा हल्ली कोण बघतं आहे? असु दे हो नसली तरी चालेल" ..केतकी म्हणाली "आणि कोणाला हवी असेल तरी नाही बनवणारे मी पत्रिका.. पत्रिका बनवली, पाहिली आणि माझ्या करिअरचं काय झालं पाहिलंस ना तू? पत्रिका बघायचा हट्ट नसता धरला तर असं कधीच झालं नसतं.. पत्रिकेमुळे झालं हे सगळं.. नाहीतर सगळं सुरळीत झालं असतं"

काकू परत हसली "वेडे.. काय नाहीये मग आता सुरळीत? आणि पत्रिका बघितल्याने तुझं करिअर बुडलं असं नाहिये केतकी... तुझ्या नियतीत उत्तम करिअरपेक्षा उत्तम नव-याला जास्त झुकतं माप होतं... ती नियती प्रत्यक्षात यायचं कारण पत्रिका बनली इतकंच.. त्याशिवाय कोण अडवणार होतं तुला? चांगल्यासाठीच घडलं की ते.. मुलींना आई मिळाली जास्तवेळ.. आता त्या तुला अभिमान वाटेल असं काम करताय्तंच ना? केतक्या... पत्रिका पाहिल्याने करिअर नाही संपलं तुझं.. करिअर संपणारच होतं, नियतीने त्याला कारण म्हणुन तुला पत्रिका दाखवली इतकंच.. शेवटी तिच्या मनात आहे तेच घडणार, मग त्याला कारण आपलं कर्म असो किंवा शेकडो मैलांवरच्या ग्रहता-यांचं कर्तव्य "


(काल्पनिक आहे हे.. आणि पत्रिका आणि कुंडल्याबद्दल माझा stand  हाच आहे असंही नाही..  I am a convenient believer)