Thursday, January 21, 2010

शाळा आणि करिष्मा (२)

मी शाळेत पोचले तेव्हा गडबड चालु होती. पोरं बाहेर हैदोस घालत होती, पोरी कडेला उभं राहुन गप्पा मारत हसत होत्या. त्यातल्या एका मुलाला मी ७वीचा वर्ग कुठे आहे असं विचारल्यावर तो चक्क तिथुन पळुन गेला. मग एका मुलीला धरलं आणि विचारलं. ती सरळ चालायला लागली, मला कळेना काहीच. मग ती पुढे गेल्यावर मागे वळुन म्हणाली "चला नं, दाखवते आहे की".. मी वर्गापाशी गेल्यावर आधी बाहेरच उभी राहिले होते. छोटी सुट्टी संपायची होती अजुन.. काही मुली लाजत लाजत माझ्याकडे बघत होत्या. मी त्यांच्याकडे बघुन हसले की अजुन लाजत होत्या. मी करिष्माला शोधत होते.पण ती काही दिसत नव्हती.

सुट्टी संपल्याची घंटा वाजली तेव्हा सर आले वर्गात आणि मग "अरे बापरे.. उशिर झाला" भाव चेह-यावर दाखवत, जीभा बाहेर काढत "सर आत येउ?" करत ५-६ मुली आल्या..त्यातच करिष्मा होती. तिने तिच्या हातातली चिंच हळुच दाखवली मला. मी लगेच मनातल्या मनात प्रार्थना सुरु केली "please let her be the girl.. जी बाईंना impress करायला चिंचा-आवळे आणुन देते". तेवढ्यात सर बोलायला लागले.." आज आपल्याकडे ही आलेली आहे.. (माझं नाव विसरले होते ते).. लेले.. ही जाहिराती आणि लहान मुलांवर संशोधन करत्ये. तर आता ही शिकवेल तुम्हाला तिच्या संशोधनाबद्दल".. मला फिस्सकनी हसु आलं. मी शिंक आली आहे असं दाखवायचा प्रयत्न केला.. सर वर्गातुन बाहेर निघाले आणि मग मी फळ्यासमोर जाउन उभी राहिले.

२५-३० डोकी..लाल रिबीनीच्या वेण्या घातलेली.. काहींच्या डोक्यांत गजरे, चमकीवाले.. एखाद-दोनच डोकी केस कापलेली! सगळी माझ्याकडे बघत होती टक लावुन.. "आता काय सांगणारे ही बया" असे भाव सगळ्यांच्या डोळ्यात! काही काळ सगळं शांत होतं.. मी एक मोठ्ठा श्वास घेतला आणि म्हणाले "तर.. मग ..आता सुरु करुयात?" मुलींनी फक्त माना हलवल्या.. अजुन काय करणार म्हणा.. मला उगाचच पण लई टेन्शन आल्यासारखं वाटलं. पुण्याला आगाउ पोरांना शिकवायची सवय होती.. तुम्ही एक शब्द बोलाल तर ती over smart कार्टी १० शब्द बोलतात.. इथे पोरी बोलल्याच नाही तर? तरी मी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात शाळेतल्या २ शिक्षीका मागच्या बाकावर येउन बसल्या. एक कालच्या ओरडणा-या बाई होत्या त्यात.
मग पुढे अर्धा तास मी जितके प्रश्न विचारले तितक्या सगळ्यांची उत्तरं मला त्या दोन बाईंनी दिली.

मी: तुम्ही टीव्हीवर काय काय बघता?
बाई१: सांगा.. काय काय बघता ते.. अवघाची संसार, कुंकू, गोजिरवाण्या घरात, सारेगमप..
बाई२: हिंदी पण बघतात.. MTV, cartoon network.. सगळं बघतात.. TVच तर बघतात.. अभ्यास नको कोणाला!
मी: अरे वा.. हे सगळं बघता का? फिल्मस पण बघता ना?
बाई२: तर काय? अलिबागला फिल्म लागली की न चुकता बघतात.. सीडी-डीव्हीडीवरही बघतात..
मी: ( मनात: ओह बाई गपा की हो आता) हो का? चांगलं आहे .
तुम्हाला "जाहिरात" म्हणजे काय माहित्ये ना?
बाई १: सांगा गं.. लाजु नका.. जाहिरात म्हणजे वस्तु विकतात ते.. आपल्याला वस्तुंची माहिती देतात.. हो की नाही?
मी: (yeah right!) हा.. तुम्ही द्या की उत्तर.. असं सारखं सारखं बाईन्ना नाही काही उत्तर द्यायला लावायचं! आता ह्या पुढे बाई नाही हं मदत करणार तुम्हाला.. तुमचं उत्तर तुम्ही द्यायचं!

हे बोलल्यावर मला माझा अभिमान वाटला.. आणि बाईसुद्धा गप्प झाल्या. भारी वाटलं मला जाम! मी शाळेत शिकत होते तेव्हापासुन मला आगाऊ बाईन्ना गप्प बसवायला मज्जा येते! मग त्या बाई आपापसांत गप्पा मारायला लागल्यावर मी आणि मुली एकमेकींशी बोलायला लागलो. मुली हळुहळू खुलत होत्या.. हसत होत्या.. एखादी गंमत सांगितल्यावर डोळे मोठे करुन बघत होत्या.. मलाही छान वाटायला लागलं! मी मग त्यांना मधेच "आता तुम्ही जाहिरात बनवुन दाखवणार का?" असं विचारलं.. तर पोरी इतक्या जोरात "हो sss" ओरडल्या.. मला जाम कौतुक वाटलं, आश्चर्य वाटलं, धक्का बसला.. prejudices.. prejudices.. नाही बोलणार खेड्यातल्या मुली, जाहिराती नाही करता येणार त्यांना.. लाजतील, शांत बसुन राहतील.. असं काहीसं माझ्या डोक्यात होतं! मी त्यांना "products" दिले आणि सांगितलं .."जा मज्जा करा, १५ मिनीटं.. हवी तशी जाहिरात बनवा!"

घोळके-घोळके जाहिरातींबद्दल विचार करण्यात गुंगले होते. कोणीतरी जिंगल बनवत होतं, कोणी रेडिओसाठी जाहिरात बनवत होतं, कोणी स्कीट करत होतं.. करिष्मा मात्र एकटीच बसली होती तिच्या ग्रुपपासुन लांब. मी तिला खुणेनेच "काय?" म्हणुन विचारलं.. ती लगेच उठुन माझ्याकडे आली.. "तुम्ही बोलला नाहीत आल्यापासुन माझ्याशी काहीच!.. मला वाटलं विसरलात मला" .. ओह असा फंडा आहे काय.. ह्यावर काय बोलायचं मला माहित नव्हतं.. मी आपला direct बाईपणा केला, "बरं मग तू जाहिरात नाही करणार का? कोणत्या ग्रुप मधे आहेस तू?" . तिने एका ग्रुपकडे बोट दाखवलं "पण त्या मुली खुप साधीशी जाहिरात बनवताय्त.. माझ्या डोक्यात चांगली जाहिरात आहे त्यांच्यापेक्षा.. मी एकटी करु का?" (Oh My God.. मी शाळेत असताना अशी आगाऊ होते का? म्हणजे मला जे भारी वाटायचं ते असं आगाऊ असायचं का? oh ohf)

मी मागच्या बेन्चवर जाऊन बसले.. एक एक ग्रुप येउन जाहिराती सादर करायला लागला..
Group 1: ( कोरस:(गाणं वगैरे) मला होयचं आहे गोरं.. मला दिसायचं आहे सुंदर..
एक मुलगी: मग वापरा डॅश डॅश क्रीम.....)
Group 2: ( १: ह्या महागाईच्या दिवसात काय करावं बाई?
२: मी सांगते.. ही पावडर विकत घ्यावी कारण ह्याबरोबर मिळतं हे तेल एकदम मोफत...)
Group 3: ( ती बघ किती गोरी आहे.. काय राज आहे गं तिच्या गोरेपणाचा?
ती: माझ्या गोरेपणाचं रहस्य ते क्रीम... )
करिष्मा: (माझ्यासारखं सुंदर व्हायचं आहे? मग वापरा ही पावडर.....)

मी आधी कौतुकाने, मग आश्चर्याने, मग अजुन आश्चर्याने, मग blank हौन, मग मान तिरकी करुन, मग डोळे मोठ्ठे करुन.. मग तोंडाचा मोठ्ठा आ करुन, मग एक भुवई वर करुन.. मग एका बोटाचं नख चावत त्या जाहिराती पाहिल्या.. जाहिराती संपल्या.. मी हसले सगळ्यांकडे बघुन..(स्वत:ला.. बाय माझी तेजू, काय शिकवुन राहिली तू ह्या पोट्ट्यांना? Advertising and body-image म्हणे.. शिका काहीतरी ह्यांच्याकडुन) मग how those ads mislead you.. वगैरे सांगितलं, मुलींना जाहिराती बनवायचे विडीओ दाखवले... मग "self-image enhancement" वगैरे प्रकार केले. You are Beautiful वालं एक motivational speech दिलं! उद्या भेटू म्हणुन त्यांना मग मी तश्याच feel good noteवर सोडुन दिलं.

करिष्मा वर्गातुन बाहेर पडताना माझ्या मागे पळत पळत आली. "तुम्हाला खरंच वाटतं आम्ही सुंदर आहोत?" मी फक्त मान हलवली.. तिनी अविश्वासाने बघत मला विचारलं "सगळ्या? खरंच? सुंदर?"
मी आजुबाजुला कोणी नाही ना पाहिलं.. तिला म्हणाले.." कोणाला सांगणार नाहीस?..बरं, मग सांगते.. सगळ्या सुंदर आहेत.. सुंदर.. पण तुझ्याएवढं सुंदर नाही कोणी" डोळे चमकले मग करिष्माचे. ती अजुन काही बोलणार तेवढ्यात मागुन सर आले म्हणुन ती पळुन गेली. सर तिच्याकडे बघत मला म्हणाले " सांभाळता येतोय ना हा वर्ग? पोरी जरा डॅम्बिस आहेत! अभ्यास काहीही नाही.. नुसत्या उनाडक्या.. ही आत्ता गेली ती पोरगी २दा नापास झाल्ये. अजुन एकदा नापास झाली की मग शाळेतुन तिचं नाव निघणार मग काय लग्नं करुन पोरं सांभाळणार.. हे असंच होतं गं ह्यातल्या अनेक मुलींचं..." सर पुढेही काहीतरी बोलले पण माझं खरंच लक्ष नव्हतं. करिष्मा लांबुन मला टाटा करत होती आणि मगाशी आणलेल्या चिंचा माझ्यासाठी टेबलावर ठेवत होती. तेव्हा ती खरोखर सुंदर दिसत होती..

Monday, January 11, 2010

शाळा आणि करिष्मा (१)

अलिबागला जाताना मधेच खिंडीत उतरुन साधारण एक किमी चालत गेलं की टमटम (6 सीटर) स्टॅन्ड आहे.. तिथे अर्धा एक तास थांबलं दुपारच्या वेळेला की मग माणसं गोळा होतात एक टमटम भरण्यासाठी..पुण्यासारखं एका टमटममध्ये १०-१२ माणसं नाही भरत इथे.. ६-७ जमली की निघतात. वळणावळणांचा रस्ता.. पण सुंदर वगैरे नाही..रुक्ष ब-यापैकी! माझ्या डोक्यात अनेकदा रेडिओ वाजत असतो. ह्या प्रवासात स्वदेसचं थीम म्युझिक आहे ना, ते ऐकत होते. भारी वाटत होतं. मी काही खास करायला चालले नव्हते पण अचानक मोहन भार्गव सारखं भन्नाट वाटलं. गावाच्या नावाची पाटी दिसल्यावर मी उतरले . टमटमवाल्याने लांब एके ठिकाणी बोट दाखवत "तिथे बघा शाळा" म्हणुन शाळा दाखवली आणि तिथे जायचा शॉर्टकट सांगितला. दगड-धोंडे आणि रानातला रस्ता.. मज्जा वाटली अजुनच मला!

शाळा समोर दिसत होती.. बैठी, टुमदार, कौलारु! बाहेर सायकली लावुन ठेवलेल्या १०-१२... चुन्याने रंगवलेल्या विटांचं एक तकलादू कुंपण, आत शोभेची झाडं.. सकाळीच शिंपण केलं असावं बहुतेक शाळेसमोरच्या मैदानावर..अजुनही हलकासा मातीचा वास येत होता. शाळेसमोरचं मोट्ठं आंब्याचं झाड मोहोरलेलं आणि त्याच्या पारावर ३ पिंपं ठेवलेली पाण्याची. एक लहान मुलगी तिथे पाणी पित होती..भांड्याला तोंड लावुन आणि ते भांडं न विसळता तसचं उपडं ठेवुन बाहीला तोंड पुसत पळुन गेली आत!

७ खोल्यांची शाळा.. पिवळ्या कार्डबोर्डवर लाल मार्करने "संगणक कक्ष" लिहीलेली खोली सर्वात डावीकडे. आत जुनी २ कपाटं आणि ३ नवीन कॉम्प्युटर! त्याच्या बाजुला निळ्या कार्डबोर्डवर "प्रयोगशाळा" लिहीलेला एक वर्ग.. हेच स्टाफरुम पण! २ शिक्षक आत पेपर वाचत बसलेले होते. एक सर फळ्यावर "आजचा प्रयोग..साहित्य, निरीक्षण" वगैरे लिहीत होते. कोणाचं माझ्याकडे लक्षचं गेलं नाही. बाहेर भिंतीवर रवींद्रनाथांची कविता चिकटवलेली. त्याच्याबाजुचा फळयावर "आजचा सुविचार" लिहीलेला कोरा फळा. एका वर्गाचं दार होतं मग.. आतमधली सगळी पोरं-टोरं मला बघत होती.. "हे कोण आलं आहे?" नजरा. एक मुलगी माझ्याकडे बघत असताना मी तिच्याकडे बघुन हसले तर असली मस्त लाजली ती.. इयत्ता कुठली ते लिहीलेलंच नव्हतं..कदाचित ७-८वी असेल. एक बाई वह्या तपासत होती.. "नवीन शब्द ऐका रे ह्याने बनवलेला.. आ-र-कु-ती.." मग मुलगा ओशाळुन बाईंकडे बघायला लागला.. बाई त्यांच्या अंगावर खेकसत म्हणाल्या. "आकृती लिहीत येत नाही हो अजुन साहेबांना". मी पटकन पुढे गेले.. शाळेचे "दैदिप्यमान यश" नावाचा फळा.. श्लोक पाठांतर स्पर्धेत शाळेची ८ मुलं निवडली गेली होती. त्यावर दहावीत शाळेतुन पहिल्या आलेल्या मुलांची यादी.. ६० ते ७५% मधली मुलं. गेल्यावर्षी ७९% मिळाले होते एका मुलीला.. तीच आत्तापर्यन्तची सर्वात जास्त टक्के मिळवलेली मुलगी होती.

पुढे एक एक वर्ग बघत मुख्याध्यापकांच्या खोलीत येउन बसले त्यांची वाट पाहत. तिथल्या शिपायाने लगेच टेबल फॅन माझ्या दिशेला फिरवला आणि लावला..खटार-खटर आवाज येत होता त्यातुन. एक बाई ओरडत होत्या. एका वर्गात कोणी शिक्षक नाही म्हणुन वर्ग उठलेला. बाजुच्या वर्गात एक शिक्षक कसल्यातरी सुचना देत होते. बाहेर एका झाडावरचा कावळा ओरडत होता. समोर प्लॅस्टिक कव्हर घातलेली सरस्वती, वह्यांचे ८-१० गठ्ठे, २००९ डिसेंबर- कालनिर्णय, तांब्या-भांडं.. मी तांब्यातुन पाणी घेतलं भांड्यात पण मग बाहेरची मुलगी आठवली.. तांब्यातुनच वरुन पाणी प्यायलं. घड्याळात ३ वाजलेले दिसले भिंतीवरच्या..

बसल्या जागेवरुन मला व्हरांडा दिसत होता. बाहेर कागदाचे बोळे पडलेले होते मधेच, पेन्सिलचे तुकडे आणि टरफलं, मधेच एखादी चॉकलेटची चांदी.. तितक्यात तो शिपाई परत आला घाईघाईने आणि घंटा वाजवली. शाळा सुटली! मुलं बाहेर आली वर्गातुन.. कोणी हसत-खिदळत..कोणी शांतपणे.. काही मुली पळाल्याच..काही मुलं इथे-तिथे बघत उभी राहिली. माझ्याकडे बघत मग आपांपसात काहीतरी बोलली.. आम्हीपण असंच करायचो, शाळेत कोणी नवीन दिसलं की त्या माणसाकडे बघत त्यावर कमेन्टस मारत बसायचो. कमेन्टच्या ह्या टोकाला उभं राहुन कसं वाटतं ते आत्ता कळत होतं मला.

तितक्यात सर आले. सगळी मुलं पळाली. सर मला पाहुन अगदी आनंद झाल्यासारखे हसले. "काय कसं करायचं?", "कधी येत्येस वर्ग घ्यायला?" .. मी सरांना विचारलं "उद्यापासुन येऊ?" सरांनी मान डोलावली.
मी तिथुन बाहेर पडताना मुलींकडे एकदा पाहिलं समोरच्या .. आमच्या चव्हाण बाई बघायच्या आमच्याकडे वर्गात शिरण्याआधी तसं.. "अब मुझसे बचके कहा जाओगे?" सारखं. पुण्याला एका शाळेत जात असले आधी शिकवायला तरी on my own असं पहिल्यांदा शिकवणार.. तेही इथे मला ह्या पोरी "बाई" किंवा "मॅडम" म्हणणार.. मी जरी २च दिवस येणार असले तरी फुलटू त्यांना गृहपाठ देणार असं मी ठरवलं होतं... एक्दम बाई टाईप वागणार.. मारणार किंवा ओरडणार नाही कदाचित पण धाक-दरारा वगैरे असा विचार करत होते मी.

परत रस्त्यापर्यन्त चालत आले आणि टमटमची वाट बघत उभी राहिले. अर्धा-एक तास लागणार ह्या तयारीनेच उभी होते. माझ्या शेजारी एक मुलगी उभी राहिली मागुन येउन.. माझ्या इतकीच उंची, वर बांधलेल्या २ घट्ट वेण्या पण कपाळावर एका बाजुने फ्लिक्स.. व्यवस्थित युनिफॉर्म, पायात स्लिपर्स.. माझ्याकडे बघुन ती हसली. मी पण हसले.. " तुम्ही शिकवायला येणार आम्हाला?" अचानक तिचा प्रश्न आला.. "कितवीत आहेस तू? मी ६वी-७वीचे तास घेणार २ दिवस." मग ती अजुन हसली.. "म्हणजे आमच्यावरच". मग ती लगेच म्हणाली.. " माझं नाव करिष्मा आहे. ७वीत आहे मी.." मी शिकवायला येणारे म्हणुन इतक्या आनंदाने आणि उत्साहाने कोणी माझ्याशी बोलेल असं वाटलं नव्हतं मला..

"तू पण टमटमसाठी थांबली आहेस?" मी विचारलं तिला. "नाही मैत्रिणीसाठी" तिनी गोंधळुन उत्तर दिलं. मागे २ मुली उभ्या होत्या गप्पा मारत. "तुम्ही टीव्ही-फिल्म्ससाठी काम करता ना? सर म्हणाले आम्हाला.. मला पण काम करायचं आहे एकदा असं" मी मनातल्या मनात सरांना नमस्कार केला, त्यांनी सॉलिडच काहीतरी सांगितलेलं दिसतं आहे.. मला ह्या पोरीला काय म्हणावं कळेना.. "अरे वा.. कर की" सारखं एक पाचकळ उत्तर मी टाकलं. ती अजुनही माझ्याकडे एकटक बघत होती मी पुढे काय सांगत्ये ऐकण्यासाठी थांबुन..मी मागे वळुन पाहिलं तर त्या दोन मुली गायब.. मी तिला म्हणाले "मैत्रिण गेली की गं तुझी". तिने मागे न वळता "हा.. जाऊ दे.. तुमच्याशीच बोलायला आले" असं प्रामाणिक उत्तर दिलं मग! "मला काजोल आवडते" ती म्हणाली.. मी हसले .."अरे वा.. मला पण!"

तितक्यात एक टमटम आला जो मी घालवु शकत नव्हते. मी तिला म्हणाले.. "उद्या भेटु गं आपण.. तेव्हा बोलु" ती हिरमुसली. "मॅडम.. करिष्मा नाव लक्षात ठेवा हं.. उद्या ओळखाल ना ? मी लगेच पुढे येईन तुम्ही आल्यावर..उंचीमुळे मागे बसावं लागतं." ती बोलत होती मी टमटममधे चढल्यावरही.. मी हात हलवुन तिला अच्छा वगैरे केलं. पुढे खिंडीत पोचेपर्यन्त डोक्यातल्या रेडिओवर "मेरे ख्वाबोंमें जो आए.." वाजत राहिलं!